शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1712. राजमहल

 वीणामावशी गेल्यापासनं दर रविवारचा नाश्ता करायला जोशीकाका आमच्याकडे यायला लागले. उमा घरी असेल तर बरेचदा दुपारचं जेवण सुद्धा. मग दुपारची झोप, मग संध्याकाळचा चहा झाला की आम्ही फिरायला बाहेर पडायचो.
जोशीकाका रात्रीचं जेवायचे नाहीत. मग त्याना घरी सोडून येताना कुल्फीचा कार्यक्रम ठरलेला. आधी एक कुल्फी, मग एकानं काय होतंय, म्हणून दुसरी आणि आग्रहाची तिसरी… सगळं कसं ठरून गेल्यासारखं.
त्यात हल्ली सुधारणा म्हणजे, पुढच्या रविवारी काय करायचं हे काका रविवारी घरी निघताना सांगायचे… त्यात बरेचदा ‘तांदळाची उकड नाहीतर अप्पे कर,’ हे टुमणं असायचंच. 
…आणि अप्पे केले की, ‘वीणाच्या हातचे अप्पे काही औरच…!’ हे वाक्य ठरलेलं. पण सध्या ग्रील्ड सँड्विचचा जमाना होता… ‘काय करू’ विचारलं की ‘ग्रील्ड सँडविच कर…’ हे ठरलेलं.
म्हणून या. म्हणजे मागच्या रविवारी उमानं विचारलंच नाही, ‘काय करू?’ न विचारताच दाल-ढोकलीचा बेत आखला. दाल-ढोकलीला दोनदा उकळी आली. पण आज काही जोशीकाकांचा पत्ता नव्हता !
तरी आम्ही वाट बघायला सुरुवात केली नाही. होऊ शकतो कधीतरी उशीर! अगदी ‘वक्त के पाबंद’ असले म्हणून काय झालं? आपली सत्तरी उलटली, हे त्याना मान्य नसलं म्हणून काय झालं? घर तसं जवळ असलं म्हणून काय झालं?
तसं वीणामावशी गेल्यापासनं काका जरा जास्तच शिस्तीचे भोक्ते झाले होते… ती कामाला असलेली बाई मावशीच्या हाताखाली तयार झाली होती, म्हणून तिचा निभाव लागला; नाहीतर तिनं सुद्धा कोपरापासून हात जोडत निरोप घेतला असता.
मग आज काय तिनं यायला वेळ लावला की काय?
न राहवून शेवटी फोन लावला, तर फोन उचलेनात! एकदा, दोनदा…
खोटं कशाला बोलू? त्यांची वाट बघत आम्ही नाश्ता करून घेतला, तेव्हढ्यात भीत भीत उज्वला आली. ती दर रविवारी आमच्याकडे काकांच्या भितीनं दबकतच येते. काकांच्या पाठी काय काय बोलून घेईल…
“म्हातारा फार खट आहे…”
“अक्षयकुमार म्हातारा झाला की असाच दिसंल…”
“त्यांचं दुसरं लग्न लावून द्या… काय डोकं खायचं ते त्या बाईचं खा!”
पण काका समोर आले की चिडीचूप्प! मग, ‘इकडे बघ कचरा आहे’ म्हंटलं की निमूट झाडणार. टीपाॅय परत पुसायला सांगितला, तर परत पुसणार. चपलांचा स्टँड नीट बाजूला करून केर काढणार आणि पुन्हा काकांच्या मागे उभं राहून आम्हाला काय काय तोंडं करून दाखवणार.
मी सुद्धा हेच म्हणतो… काका काही तास येतात, म्हणून मी सहन करू शकतो. कायमचा असा माणूस डोक्यावर म्हणजे…
पण तरी काका आता यायलाच पाहिजेत, असं वाटायला लागलं. उज्वला पण चार वेळा म्हणाली, “आतापरंत यायाला पाहिजे होतं नाय का…? आता येऊन मला काय बोलले तर बघा हं ! मी फायनल पोतेरं वाळत घालतेय…”
शेवटी तिलाच सांगितलं, “जरा जाताना बघ गं काय करतायत? नाहीतर घरी रद्दी बांधत बसले असायचे आणि आपण इकडे…” म्हणत आम्ही हसलो खरं, पण त्यात दम नव्हता.
मी जाऊन बघून यावं, असं उमाला फार वाटत होतं… पण बिचारीची जीभ रेटत नव्हती आणि मीही त्याचाच फायदा घेत होतो.
…आणि दहा मिनिटात उज्वला धावत आली.
“काका घरातच आहेत… पण दार उघडत नाहीत. बेडरूमचा फॅनही चालू आहे!”
ग्राऊंड फ्लोअरच्या घराचा हा एक फायदा… घरात डोकवता येतं, अंदाज घेता येतो. 
आम्ही दोघं तसेच  किल्ली घेऊन धावलो… जाऊन धडकन दार उघडायलाही मन धजावेना. आधी शेजारी विचारलं, 
“काकांना सकाळपासनं बघितलं का?”
ते म्हणाले, “हो! दुधवाला आला, तेव्हा दार उघडलं होतं त्यांनी… पण पेपर घेतला नाही आज. तो तसाच दाराला होता, म्हणून मी घेतला काढून…”
‘दूध घेतलं, मग पेपर का नसेल घेतला?’ मी घाईघाईत दार उघडलं. उज्वला पण होती. बेडरूममधे धावलो, तर फॅन चालू होता. थोडा नेहमीपेक्षा पसारा जास्त दिसत होता… पण काका घरात नव्हते.
उज्वलाला जे घरात आहेत असं वाटत होतं, त्याला कारण काकानी खुर्चीत ठेवलेलं सामान अशा पद्धतीनं ठेवलं होतं की कुणी मान खाली बसून बसलेलं असावं असंच वाटत होतं.
काका घरात नाहीत हे बघून हायसंच वाटलं… पण मग ते गेले कुठं? या प्रश्नानं ग्रासलं.
फोन घरी ठेवून का बाहेर पडले असतील? मग वाटलं, ते  आमच्याकडे गेले असतील… घराला कुलूप बघून गोंधळतील. भूक लागली असेल त्याना… म्हणत आम्ही घरी धावलो.
वॉचमनला विचारलं, “काका आले होते का?”
तो नाही म्हणाला.
या ‘क्राईम पेट्रोल’ सारख्या शोज् मुळे ना… कोणतीच गोष्ट स्वाभाविक राहिली नाही! जोशीकाकांसारखा धट्टा कट्टा समंजस माणूस, त्यांची काळजी करायचं तसं कारण नव्हतं… पण मन चिंती ते वैरी नं चिंती म्हणतात, तसं झालं…
तेही या क्राईम पेट्रोलमुळं… अख्खा एपिसोड डोळ्यासमोर उभा राहिला!
उगीच नातेवाईकांकडे जाणारे ते नव्हतेच… आणि वीणामावशी गेल्यावर नातेवाईक किती जवळचे आहेत, हे त्या प्रत्येकानं दाखवून दिलं होतंच…
व्हॉट्सअपवर उगाच दोन दोन फॅमिली ग्रुप्स बनवून आणि सकाळ संध्याकाळ गुड माँर्नींग, गुड नाईट म्हणजे संवाद नसतो. त्यात काळजीही नसते… त्यातला फोलपणा या वयातच जाणवतो!
काका मुळात समजुतदार; त्यामुळं त्यांनी ते सहज स्विकारलं होतं!
तरी मग जोशीकाका गेले कुठं? दूध घ्यायला होते आणि पेपर घ्यायला नव्हते. म्हणजे इतक्या लवकर गेले कुठं?
दुपारी मात्र आम्ही शोध मोहीम हाती घ्यायची, म्हणून बाहेर पडायच्या तयारीत होतो. जर पोलिसानी विचारलं, ‘तुमचा कुणावर संशय आहे का?’ तर काय उत्तर देणार?
आणि पोलिसानी आपल्यावरच संशय घेतला तर! या अशा काल्पनिक प्रश्नानं आम्ही आम्हाला त्रास देत होतो, ते सुद्धा ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यांच्यामुळंच…!
तेव्हढ्यात फोन वाजला…
फोन डॉ. गरोडियांचा होता.
“बोला डॉक्टर…” मी संयम राखत म्हणालो. गरोडिया म्हणजे जोशीकाकांचे डॉक्टर. त्यांचा असा ऑड टाईमला फोन म्हणजे……
पण, “कालजीचा काय पन कारन नाय हाय…” म्हणत डॉक्टरांनी बोलायला सुरूवात केली.
“जोशीकाका तुमच्याकडे आहेत का?” मी विचारलं.
“हां हां… मी तेच सांगते. आत्ता काय झाला, मी घरला येत होता ने तर राजमहल समोर मी त्यानला पायला… एकदम सांस फुलून गेली होती… मी गाडी बाजूला लावत गेला तर त्यानला व्हामेट झाली!”
मी घाबरलो… “डॉक्टर, खरं सांगा… घाबरायचं काही कारण नाही ना?”
“ते तर मी आधीच बोलला ना… काळजीचं कारण नाय हाय. त्यानेच मला वार्ता करताना सांगितला…
“ते काय झाला, ते एकदम भारीमंदी जेवले… त्याचा प्रेशर आला. मी त्याना घेऊन तुमच्याकडे आला, पर घरी कोन दिसला नाय… म्हणून पण हे थोडा अपसेट हाय… तुम्मी येऊन त्यानला नेणार काय? झोपला तर झोपू दे. बाकी काय पन नाय…”
मी तसाच आणायला गेलो… घुश्शातच होते. घरी यायला तयार नव्हते… “जाईन माझा मी, मलाही घर आहे!” असं घुश्शात बोलत होते.
मी सरळ उमाला फोन लावला आणि त्यांच्याकडे दिला. फोन उमाकडॆ दिल्यावर मात्र उमाशी फोनवर बोलले आणि निमूट घरी येऊन सोफ्यावर बसले.
उमानं पाणी प्यायला दिलं… नको म्हणाले. मग उमा म्हणाली,
“काका, हे काय मधेच? एकटं जाऊन राजमहल मधे जेवलात?”
“का? मी जेवू शकत नाही?”
“हो, जेवू शकता… पण आज रविवार आहे! आपला आजचा प्रोग्राम फिक्स असतो ना!”
“तो नेहमीच्या रविवारी…!” काका ‘नेहमीच्या’ या शब्दावर जोर देत म्हणाले.
“म्हणजे?” मी विचारलं.
“म्हणजे काही नाही…” ते घुश्शातच म्हणाले.
“आम्हाला किती काळजी लागून राहिली माहितीये? तुम्ही असे कधी वागत नाही!” उमा समजुतीच्या सुरात म्हणाली.
“असा म्हणजे कसा? वेड्यासारखा…?”
“असं कोण म्हणतंय?” मी समजूत काढत म्हणालो.
“असं तोंडानं म्हणत नसालात, तरी डोळ्यात दिसतंय…” तिरसटल्या स्वरात काका पुटपुटले.
“डोळ्यातलं दिसायला तुम्ही आमच्याकडे बघितलंत तरी कुठं?” उमा त्यांच्याजवळ बसत म्हणाली.
“एकदम असं प्रेशर येण्याइतकं काय जेवलात काका?”
“तुला काय करायचंय?”
ते असं म्हणाले आणि उमा खरंच रागावली…
“आता मात्र मी खरंच रागवेन हं… हे काय वेड्यासारखं काका? पुढच्या एकवीस तारखेला तुम्हाला बहात्तर पूर्ण होणार, याचं तरी भान राखा!”
तसं ते चकीत होत म्हणाले,
“पुढच्या एकवीस तारखेला…?”
आम्ही दोघं गोंधळलो.
“हो, एकवीस जून ना? मग पुढच्या महिन्यातच!”
“मग हा महिना कुठला आहे?”
“मे…!” आम्ही दोघं म्हणालो आणि काका खो खो खो हसायला लागले. “साॅरी, साॅरी…” म्हणत माझ्या पाठीत धपाटे सुद्धा घातले.
“काका, काय झालं सांगा…” आम्ही बुचकळ्यात पडत म्हणालो.
“अरे, या एक तारखेला कॅलेंडरचं पान बदलताना डायरेक्ट दोन पानं उलटली गेली… त्यामुळं सार्‍या जगात जरी ‘मे’ अवतरला असला, तरी माझ्या घरी ‘जून’ सुरू झाला!
“तरी मी म्हणतोय, पावसाला अजून सुरुवात कशी झाली नाही? पण मग म्हटलं, मागच्या वर्षी पाऊस कधी सुरू झाला कुठं आठवतंय? वीणा गेल्यापासनं पावसाशी आपला काही संबंध राहिला नाही…” असं म्हणत उगाच हसले आणि म्हणाले,
“वीणा असती, तर हा गोंधळ झाला नसता… पण सध्या माझं काय, दिनांक तारखेशी काही तसा डायरेक्ट संबंध येत नाही…
“पण एकवीस जून म्हटल्यावर माझा वाढदिवस आठवला. कालपासनं तुमचा अंदाज घेतोय, तुम्ही पठ्ठे काही बोलायला तयार नाही… रात्री आदित्य फोन करतो, त्याचाही फोन नाही…
“कुणाच्याच लक्षात माझा वाढदिवस नाही, याचा इतका राग आला की रागाच्या भरात राजमहल गाठलं आणि डिलक्स थाळी मागवून बकाबका जेवलो. इतका जेवलो, इतका जेवलो की विचारू नकोस…
“चांगली पन्नास रुपये टीप ठेऊन बाहेर आलो आणि मग त्रास व्हायला लागला. पण नशिबानं डॉक्टरांनी बघितलं आणि मला गाडीत घालून ते इथं घेऊन आले, तर इथं कुणी घरात दिसेना !”
“कसे दिसणार? आम्ही तुमच्याकडे गेलो होतो!”
“हो ना! मग डॉक्टर म्हणाला, ‘माझ्याकडे चला’, त्यांची डिस्पेन्सरी आज बंद ना! मग गेलो त्यांच्या घरी.”
काका थोडॆ खजील झाले, समजूत काढायला तसा वेळ लागला नाही कारण आपला वाढदिवस उमाच्या तोंडावर होता, याचा त्याना कोण आनंद झाला! शिवाय उमा हक्कानं रागावल्यानं म्हणे त्याना आंतरिक समाधानही मिळालं होतं. 
“या वयात असं रागे भरणारं कुणीतरी लागतंच.” असं वातावरण हळवं करत ते म्हणाले आणि उमाच्या पाठीवर थोपटलं. 
आता पुढच्या वीस तारखेला आमचं ‘राजमहल’ नक्की झालंय आणि पेनल्टी म्हणून नाटक सुद्धा !

- चंद्रशेखर गोखले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...