राधिकाने भरभर डबे भरायला सुरुवात केली. तिचे सासू सासरे नणंदेकडे निघाले होते. जाताना रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून चिवडा, नातवाला आवडतात म्हणून चकल्या, जावयासाठी अनारसे असा खाऊ ठरला होता.
" नीरज आता लग्नाला आलाय आई. त्याला म्हणावं, घे मनावर. लग्नात मामी जंगी चिवडा लाडू करून आणेल असा निरोप द्या माझा" राधिका सासूला सांगत होती.
" तो कसल मनावर घ्यायला, अजून सेटल व्हायचय म्हणे.. मीता कंटाळून गेली आहे त्याच्या या धोरणामुळे. पण देते तुझा निरोप. ऐकलन तर बरच ग!" सासूबाई म्हणाल्या.
"ते जाऊ दे... शनिवार रविवार चे काय करणार तू? एकटीच आहेस ग तु दोन दिवस. तुझा नवरा टूरवर आणि मुलगा टुर्नामेंटसाठी जाणार.. तु जातेस का सन्मेषबरोबर? बघ, तुला पण जरा बदल होईल!"
" अहो आई, आपल्या घरात कसला आलाय एकटेपणा? आणि मला नाही वाटणार भिती, तुम्ही निश्चिंतच होऊन जाऊन या.." राधिका आत्मविश्वासाने म्हणाली.
"नाहीतर तुझ्या मैत्रिणींना बोलावतेस का दोन दिवस रहायला ? तुम्हाला जरा बदल होईल." तिचे सासरे काळजी लपवत म्हणाले.
"नको बाबा, शनिवार रविवार दोन दिवस मैत्रिणींचे प्लॅन्स असतात, त्यांना अचानक बोलवायचे तर कसे जमेल त्यांना? खरंच नका करू माझी काळजी, शेजारी टेंबे वहिनींना सांगितलय. आहेत त्या घरी, आणि त्यातून काही वाटलं तर लगेच फोन करेन त्यांना, दोन पावलांचे तर अंतर.."
राधिकाचा एकूण नूर बघून तिचे सासू सासरे गप्प बसले. तिकडे टूरवर गेलेला नवरासुद्धा समजून चुकला होता की आता परत हा विषय काढण्यात अर्थ नाही.
दुपारी तिने सन्मेषला स्टेशनवर सोडले. निघताना तो म्हणाला, " मम्मा, दोन दिवस कामाच्या दोन्ही बायकांना सुट्टी का? तु एकटीच असशील घरी.."
" ए भामट्या, तुला काय करायच्यात रे नस्त्या पंचायती? तुझा तू जा आपला खेळायला, माझे मी बघून घेईन!" हाताने पाठीत धपाटा घालत राधिकाने लेकाला लाडाने फटकारले.
" ओके माॅम , चिल् अग.. मारतेस काय? लागतो बरं का तुझा हात अजून.." तो पण चांगलाच खोड्या काढायच्या रंगात आला होता.
ती एकटीच घरी आली. लग्न झाल्यापासून तिला कधी असे एकटं रहायची वेळच आली नव्हती. अगदी नवीन लग्न होते तेव्हा सासुसासरे समजुतदारपणे नव्या नवरानवरीला एकटं ठेवून एकदोन गावाला जाऊन यायचे ते आठवले. तिला ते आठवले आणि हसू आले. ते थोडीच एकटे होते?
तिच्याकडून सुट्टीची अपेक्षा असलेल्या तिच्या बाईंना तिने "मी एकटी असले तरी काम आहे, तुम्हाला सुट्टी नाही " हे बजावले होते. ड्रायव्हर काकांना " सकाळी लवकर या.." अशी सूचना दिली.
सर्वात प्रथम तिने घरातले वाय् फाय् बंद केले. आले घालून मस्त मलाईवाला चहा केला बरोबर भरपूर खोबरे घातलेले पोहे. अजिबात दाणे, कांदा न घालता. सगळ्यांबरोबर चहा करायचा तर असा दाट, सायवाला चहा पिऊन जमाना उलटला तिला वाटले. ज्यात त्यात काय दाणे, कांदा घालायचा, असे सात्त्विक चवीचे पोहे पण आपल्यासाठी केले नाहीत कधी! ती मन लावून खात होती. जणू ब्रह्मानंदी टाळीच लागली तिची! तोवर मावशी आल्याच होत्या. तिने गरम गरम तांदूळाच्या भाकरी कुळथाचे पिठले करायला सांगितलं, वर पातेल्यात खरपुडीचा भात शिजवायला सांगितले. " एखादी मिरची पण तळा मावशी " तिची सूचना तंतोतंत पाळत मावशींनी स्वयंपाक केला.
संध्याकाळ होऊ लागली, तशी हळूहळू काळोखाने जग व्यापायला सुरूवात केली. हातपाय धूवून देवासमोर दिवा लावून ती तशीच शांतपणे हात जोडून बसली. नेहमीसारख शुभम् करोति म्हटले. समईच्या उजेडात तिच्या चेह-यावरचा सात्विक भाव खुलून आला होता. काहीच न मागता जगन्नियंत्याला शरण जाऊन परत एकदा डोकं टेकवलं तिने. देवासमोर बसायला इतका रिकामा वेळ रोज मिळतोच कुठे? सारखं काहीनाकाही चालूच असते तिला वाटले.
ती बाहेर आली. गच्चीत झाडांजवळ दोन मिनीटं बसली. झोपाळ्यावरचे कपड्यांचे ढीग आवरले, तिथेच अगदी संथ गतीने झोके घेत बसून राहिली. तितक्यात सासूबाईंचा फोन आला, त्यांचा प्रवास उत्तम झाला त्या लेकीकडे सुखरूप पोचल्या हे सांगायला. मग मीताशी म्हणजे नणंदेशी अघळपघळ गप्पा झाल्या. ती घरात येऊन सोफ्यावर येऊन बसली. पेपर वाचायला चष्मा शोधत होती इतक्यात मावशींनी तिला हाक मारली. आठ वाजत आले होते. स्वयंपाक तयार होता.
लहानपणी, माहेरी बसायची तशी ती ताटवाटी घेऊन जमिनीवर बसली. तिला असे बसलेले पाहून मावशींना हसू आवरेना..
" हसताय काय,मावशी ? घ्या तिकडचे एक ताट या बसा माझ्याबरोबर! मस्त वाटतय.. फक्कड जमलाय बेत!" ती म्हणाली..
" ताई, मला वाटलं तुम्हाला वाईट वाटत असेल पण तुम्ही तर एकदम खुशीत वाटताय.." भाकरीचा घास खात मावशी म्हणाल्या.
" का वाईट वाटायचे..चार दिशांना चार जण. पण , प्रत्येक जण खुश आहे ना? मग काय वाईट वाटून घ्यायचे?" तिने विचारले.
" उद्या सकाळी लवकरच या मावशी, मला बाहेर जायचय." स्वयंपाकघर आवरत ती म्हणाली. बरोबर दहा वाजता घरातले दिवे पंखे बंद करत ती झोपेच्या आधीन झाली.
तिचा दुसरा दिवस लवकरच उजाडला. आंघोळ करून देवाची पूजा करून ती ग्रामदैवताच्या मंदिरात सकाळी आरतीला पोचली. हातात स्वतः केलेला साजूक तुपातला शिरा होता. देवासमोर डबा ठेवताना तिला कसलातरी अनामिक आनंद झाला होता. घरच्यांच्या वेळा पाळताना सकाळी आरतीला येणं तिला मनात असून जमलं नव्हतं.
घरात थोडीफार आवराआवरी, नेहमीची खरेदी करून राधिका दोन दिवस मनासारखे बागडली. तेही आपल्याच घरात. आपल्याच घराचा आनंद घ्यायला आपण विसरतोय तिला राहून राहून वाटत होते. कोणी विचारले काय केलंस दोन दिवस? तर काय उत्तर देऊ मी? तिला वाटले..I was on vacation! ती स्वतःशीच म्हणाली. या उत्तराने तिची तीच खूप खूश होती स्वतःवर!
दोन दिवस मनासारखे वागण्यात भुरकन उडून गेले. रविवारी संध्याकाळी आधी नवरा आला मग लेक. घर परत नेहमीसारखे गजबजलेले दिसू लागले. सासुसासरे अजून दोन तीन दिवसांनी येणार होते. गप्पा मारत जेवणं आटोपली.
तिला असे आनंदात बघून संजीव , तिचा नवरा म्हणाला " अरे वा! एकदम फ्रेश दिसत्येस.. खूप दिवसांनी कदाचित खूप वर्षांनी इतके मजेत बघतोय तुला! अशीच हसत रहा..खरच!"
त्याच्याकडे बघत ती म्हणाली " अरे फ्रेश दिसणारच ना मी सुट्टीनंतर परत आले आहे! शीण कुठल्या कुठे पळून गेला माझा!"
" सुट्टीवरून? तु घरीच थांबणार होतीस ना? मग बदलास बेत ऐनवेळी?" तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
" छेः, रे ! आपल्या स्वतःच्या घराइतकं आरामदायक हाॅटेल जगात कुठेही नसते, संजू ! दोन दिवस मनासारखे वागले. मनासारखे आवडते ते करून जेवले. कसले बंधन नाही. त्यात घराची उब होती त्यामुळे दोनच दिवसांत मी अनेक दिवसांनी तरूण झाले बघ ! आता ठरवलंय दरवर्षी तुम्हाला चौघांना तुमच्या मनासारखी ट्रीप आखून देणार आणि माझ्या या घरातच मी सुट्टी एन्जाॅय करणार. सन्मेष म्हणतो तसे फुल टू धमाल करणार, ते ही आपल्या घरात ! आम्हा बायकांना छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद लाखमोलाचे असतात पण संसाराच्या जबाबदा-या निभवताना हे small delights जगायचे आम्ही सोडून देतो आणि सतत कुरकुरत रहातो. थोडं उशिरा उमजलंय मला पण तु म्हणतोस तसे better late than never हो की नाही?" असे म्हणत राधिका नव्या जोमाने रूटिनकरता सज्ज झाली.
~अनघा किल्लेदार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा