शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1670. एकटी

     सीमाला बऱ्याच दिवसांनी दीप्ती भेटली होती. लहानशी चण, सावळा रंग व बोलके डोळे असलेली दीप्ती गुजरात मधील एका लहान गावातून अमेरिकेत आली होती. तिचा नवरा हरीश पण त्याच गावचा होता. नव्या देशात बस्तान बसवण्यासाठी चाळीस वर्षं भरपूर कष्ट करून दिप्ती आणि हरीश रिटायर झाले होते.
सीमाने दीप्तीला “केम छो, दीप्तिबेन” म्हटल्यावर ती यांत्रिकपणे “मजामा” म्हणाली पण ती मजेत नसावी असं सीमाला वाटलं. पुर्वीची पाण्याच्या खळखळणाऱ्या प्रवाहासारखी मोकळी असणारी दीप्ती कुठे लुप्त झाली आहे ते सीमा शोधत होती. सगळे ठीक का विचारताच दीप्ती म्हणाली, "सगळे छान आहे! दोघी मुली, जावई, नातवंडे यांचे उत्तम चाललंय. हरी व मी छान आहोत…पण सांगू का? आयुष्यात काही अर्थ नाही, ध्येय नाही, meaning नाही, purpose नाही असे वाटतं.”
सगळे आयुष्य ज्यासाठी कष्ट केले ते हाती आले होते. जबाबदाऱ्या संपल्या होत्या. सकाळी उठल्यावर काही केलंच पाहिजे हे व्यवधान संपलं होतं. आपली कुणाला फारशी गरज नाही ही जाणीव प्रबळ होती. खूप मोकळा वेळ हाताशी होता पण तो कारणी कसा लावायचा माहित नव्हतं. आयुष्य अगदी बुळबुळीत वाटू लागलं होतं!
"तुला नेमकं काय आवडतं?" सीमानं नेमका प्रश्न विचारला. 
“मला प्रवास करायला, म्युझियम्स, आर्ट बघायला खूप आवडतं पण हरीला त्यात इंटरेस्ट नाही. मला जेवायला बाहेर जायला आवडतं पण हरी बाहेरचं सहसा खात नाही. He is happy with daal and chawal at home! मला थिएटर मधे सिनेमे बघायला आवडतात पण त्याला घरीच नेटफ्लिक्स वर सिनेमे बघायचे असतात." हरीला नावं न ठेवता ती खरं ते सांगत होती. Men are from Mars and women are from Venus हा अनुभव बोलत होती! 
"तू एकटी जाऊन तुझ्या आवडीच्या गोष्टी का नाही करत? हरीशला चालेल का ते?" सीमा मार्ग शोधत होती.
"हो! हो! ॲक्चुअली हरी मला नेहमी म्हणतो की तुला जे जे आवडतं ते तू तुझ्या मैत्रिणींबरोबर कर पण मला ओढून नेऊ नको.” ती गोंधळून गेली होती. “हरी खूप चांगला आहे ग! पण तो अजिबात सोशल नाही.”
"अग, मग काय प्रॉब्लेम आहे? तुझे छंद जोपासण्यासाठी तो तुला प्रोत्साहनच देतोय ना!!” यात तक्रार करण्यासारखं काय आहे असे सीमाला वाटले.
“नाही गं..सतत एकटीने कसं जायचं बाहेर? खायला, सिनेमाला वगैरे!! कंपनी नसेल तर त्यात कसली मजा? आणि दरवेळी कुठल्या मैत्रीणीला बोलावणार? पुर्वी बाहेर जायचो आम्ही चौघं पण आता त्याला नको वाटतं.” आयुष्यभर केलेल्या गोष्टी साठीनंतर बदलणं सोपं नव्हतं.
“मी जाते रेस्टॉरंटला एकटी!” सीमा तिला म्हणाली. नवरा बिझी असतो! “स्वत:”बरोबर वेळ घालवणं खूप छान असतं. अग जन्माला एकटे आलो, एकटे निघून जाणार आहोत. मग इथे असताना एकट्यानं काही का नाही काही करायचं?”
"हो का? पण तुला असे करताना विचित्र नाही वाटतं? लायब्ररी वगैरेला एकटं जाणं ठीक आहे पण बाकी? त्यात कुणी ओळखीचे भेटले तर काय सांगायचे असे वाटते. लोकांची नजर पण बदलते आपल्याकडे बघण्याची!” दीप्ती प्रामाणिक होती.
“विचित्र काही नाही. कुणी भेटले ओळखीचे तर खरे ते सांगावे! मला एक सिनेमा बघायचा होता आणि अवीला तो अजिबात बघायचा नव्हता.. मी एकटी गेले. मस्त पॉपकॉर्न घेतले, कोक घेतला आणि मजेत सिनेमा बघितला.. आजपर्यंत एखादी गोष्ट एकटीने केली नाही याचा अर्थ असा नाही की कधीच करू नये.अग..कुछ तो लोग कहेंगे कारण उनका काम है कहना..काही का म्हणेनात?” सीमाच्या डोक्यात काहीही गोंधळ नव्हता. 
दीप्तीने मान हलवली. "हो ग केले पाहिजे" म्हणून ती घरी गेली..”पण मला ते जमेल का!” हा विचार प्रबळ होता.
सीमा ही भेट विसरून गेली होती. चार महिन्यांनी सीमा व तिचा नवरा अवी एके ठिकाणी पिझ्झा खायला गेले होते. तिथे दीप्ती दिसली! ऑफ व्हाईट रंगाची पॅन्ट,स्वेटर व सुरेख सिल्क स्कार्फ घालून हलकासा मेकअप केलेली दीप्ती छान दिसत होती. तिलाही सीमा आणि तिचा नवरा अवी दिसले.
"सीऽऽऽमा, अवीऽऽ कसे आहात ?" म्हणत ती सीमाच्या टेबलाकडे आली.
“हरीश कुठंय?” अवीने विचारलेच.  सीमाने त्याच्याकडे गप्प बस या नजरेने बघितले..
“हरी छान आहे. त्याला बाहेरचं खायला आवडत नाही म्हणून मी त्याला जेवायला देऊन इथे आली आहे. इथला गार्लिक ब्रेड आणि वॅालनट सॅलड मला फार आवडत.” सीमा दीप्ती कडे कौतुकाने बघत होती..
“हरी म्हणतो सुध्दा की मी माझं जेवण स्वत: बनवेन. तू तुला आवडेल ते खाऊन ये. पण मला त्याला वाढून आलं की बरं वाटतं..घरातून बाहेर पडून चार लोक दिसले की बरं वाटतं. अगदी माझ्या समोर बसूनच कुणीतरी गप्पा माराव्यात असं नाही..किती पुरूष एकटे येतात पण एकट्या येणाऱ्या बायका फार कमी असतात. थॅंक्यु ग सीमा!  मला एकटीने बाहेर पडण्याचा सल्ला दिलास ते!” दीप्तीनं सीमाचे हात हातात घेतले.
“प्राऊड ॲाफ यु दीप्ती" सीमा विचार करत होती. आयुष्यात अशा कित्येक घटना येत घडतात जिथं मन मारावच लागते पण आपल्याला आवडणाऱ्या या साध्या चार गोष्टी करताना का मन मारायचं? साठी उलटली आहे. कोणता दिवस शेवटचा माहित नाही अन् कोण काय म्हणेल याची कुठं चिंता करत बसायचं?
दीप्ती सांगत होती..सीमा, मी काही मित्र मैत्रिणींचा ग्रुप बनवला आहे. “ड्रीमर्स” नावाचा! आम्ही चालतो, सिनेमाला जातो, पुस्तकांवर चर्चा करतो, हॅाटेलला जातो! आम्ही आता अलास्का बघायला जाणार आहोत आणि पुढच्या वर्षी पॅरिस बरं का! …
आणि ऐक!! हरीने एकदम पर्फेक्ट प्लॅन केला आहे आमच्यासाठी. तो आहेच उत्तम प्लानिंग करणारा! तो येईल का नाही माहित नाही पण आमच्यासाठी सुंदर प्लॅनिंग करतो आहे! एकदम पर्फेक्ट.. ते ही न कुरकुरता!”
दीप्ती मनाने केव्हाच अलास्का मधील बर्फात व पॅरीस मधील लूव (Louvre)या जगप्रसिद्ध म्युझियम मधे पोचली होती ! ती चमक तिच्या डोळ्यात दिसत होती ! आयुष्यातलं Purpose सापडले होतं आणि ड्रीमर्स ची स्वप्नपूर्ती करताना हरीशला बायकोला जे आवडतं ते आपण करत आहोत याचा केवढा आनंद होता. 
आणि दीप्तीला हरीबद्दल वाटणारा अभिमान बघून सीमा भरून पावली होती.

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...