पायाची जखम तशी बरी होत आलेली. हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये आज त्याचा चौथा दिवस होता. कधी एकदा आपल्याला डिस्चार्ज मिळतोय असं त्याला वाटतं होतं.फार दिवस राहून पार कंटाळून गेला होता. तेवढ्यात त्याला ती नर्स दिसली, हातात ट्रे घेऊन ती ड्रेसिंगच सर्व सामान त्यात होतं. काहीतरी गडबड होतेय, ही नेहमीची नर्स नाही हे त्याने मनोमन जाणले. गेली कुठे म्हणायची ही. का आज सुट्टी घेतली? विचार करत तो खजिल झाला. आपल्याला दुरावलेल्या बायकोबद्दल असा विचार करताना त्याच्या मनात प्रश्चताप वाटतं होता. ही नर्स सुजाता त्याची बायको होती आणि आपल्या चुकीमुळे आपण तिच्या आयुष्यातून दूर झालो होतो. विचार करताना त्याला आता खरचं खूप वाईट वाटतं होतं. तो विचारात असताना नर्स आली. तिनं व्यवस्थित पायाची जखम धुऊन नवीन बँडेज पट्टी बांधली. पायाचं हाडात अजून वेदना जाणवत होत्या.ती निघून गेली तेव्हा तो पुन्हा विचारात हरवला.
***
"सुहास "
आवाज ऐकला आणि तो जागा झाला आणि पहातचं राहिला.
समोर सुजाता उभी होती. क्षणभर गोंधळून गेला तो.
काय बोलावं त्याला कळेना.
"कसं वाटतंय आता?"
"बरं वाटतंय." तो बोलून गेला.
"डिस्चार्ज मिळालाय आज."
"दवाखान्याचं बिल?"
"मी पेड केलं सगळं."
आश्चर्य वाटलं त्याला.
"एक विचारू?
"विचार ना."
"हे सगळं कशासाठी?"
ती काही बोलली नाही.
अगदी निरुत्तर राहिली.
"तू थांब मी रिक्षा बघून आले."
जे घडतंय ते त्याच्या दृष्टीने कल्पनेच्या बाहेरचं होतं.
सहा महिन्याचा काळ आठवला त्याला. सुजाताबरोबर त्याचं छान आयुष्य चाललेलं. घरात आई आणि बायको सोडली तर कुणी नव्हतं. सर्व काही सुखात होतं. नंतर काही घडलं त्याला तो स्वतः जबाबदार होता. तिथं नोकरी करत होता, तिथं पुजाची ओळख झाली. तिच्यात पूर्ण गुंतून गेला. आई आणि बायको यांचा त्याला विसर पडला. आपल्या घराला तो कायमचा दुरावला. पुजासोबत तो रहात असला तरी त्यांचे काही महिने सुखात गेले. तिच्या तापट स्वभावाची खूप उशिरा कल्पना आली. घरात किरकोळ कारणावरून भांडण व्हायला लागली. याचा परिणाम असा झाला, पूजा त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. त्याच्या आयुष्यात अंधार दाटला होता. पुन्हा माघारी घरी जायची त्याला आता लाज वाटतं होती. अशा विचारात चालत असताना टेम्पोची पाठीमाघून धडक बसली. सुदैवाने तो त्यातून वाचला पण पायाला गुडघ्याला दुखापत झाली. तिथल्या जमवाने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केले. योगायोगाने सुजाता नर्स म्हणून तिथंच जॉब करत होती. वाईट तिलाही वाटलं. पण ती डगमगली नाही. सर्व काही विसरून तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं.आठ दिवस... आठ दिवस तिनं मनोभावाने त्याची सेवा केली. सारं काही त्याला आता या वेळेला आठवत होतं.
पर्स सावरत हॉस्पिटलच्या दारात येताना त्याला सुजाता दिसली. बहुतेक जाण्यासाठी रिक्षा बघून आलेली असावी.
जवळ आली.
"चल निघायचं आता."
सुहास गप्प.
"काय म्हणते मी?"
तो तिच्याकडे पहात राहिला. तिलाही दिसून आलं, त्याच्या चेहऱ्यावर एक उदासपण होतं.
"माझी लायकी नाही त्या घरात यायची "तो बोलून गेला.
"तू शांत रहा, आता कसलाही विचार करू नको."
"अगं पण....."
"बोलू नकोस सगळं माहितीय मला, ही वेळ नाही बोलायची."
"आई काय म्हणेन?"
"मी समजावते सगळं त्यांना."
"पण नको माझ्यामुळे पुन्हा वादळ त्या घरात."
"दुसरा मार्ग आहे का कुठला, साधं तुला अजून नीट चालता येत नाही."
शेवटी त्याचा नाईलाज झाला. किती मोठं मन केलं होतं सुजाताने. सगळं होऊनही घराचं "घरपण "ती आजही जपत होती. सुजाताच्या आधार घेऊन तो हॉस्पीटलच्या बाहेर आला. रिक्षा तयार होती. सावकाश सुजातानं त्याला आत बसवलं. ती स्वतः बसली. साधारण वीस मिनिटात रिक्षा कॉलनीच्या बाहेर थांबली. सुहास अजून विचारात हरवलेला होता. रिक्षा थांबली तसं त्यानं समोर पाहिलं, त्याचं घर त्याला दिसलं. तो तसाचं पहात राहिला. सुजाताचं लक्ष गेलं. "पहातो काय असं तुझंचं घर आहे "
"माझं घर!"
"तुझं घर, माझा जेवढा हक्क आहे तेवढा तुझाही हक्क आहे या घरावर."
थोडसं हास्य त्याच्या चेहऱ्यावर फुलून राहिलं. रिक्षाचे बिल तिनं दिलं. सावकाश सुहासला तिनं बाहेर घेतलं. चालताना त्याला आधारासाठी त्याचा एक हात स्वतःच्या खांद्यावर घेतला. सावकाश पावलं टाकीत दोघं चालू लागली. त्यांच्या आयुष्याची जणू " नवी सुरवात झाली होती.
@ शेखर ठोंबरे. सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा