रूपा दिलेल्या वेळेला डॅाक्टरच्या ॲाफिसमधे येऊन पोचली. मेडिकल चेकअप च्या आधीचा आठवडा नेहमीच खूप चिंतेत जायचा. ॲाफिसमधले बैठं काम, कमी पडणारा व्यायाम, वाढत जाणारं वजन आणि वेळोवेळी खाल्लेले वेडेवाकडे पदार्थ तिची चिंता वाढवत असतं. शुगर निघाली तर? बीपी आहेच.. मध्यंतरी एका मैत्रिणींचं सोडियम एकदम खाली गेले अन तिला हॅास्पिटलात ॲडमिट करावं लागलं होतं! असल काहीतरी सतत कानावर येत असे. काल तर तरुण होते म्हणेपर्यंत पन्नाशी समोर येऊन ठाकली होती. या सगळ्या चिंता डोक्यावर बांधून घेऊन ती डॅाक्टरांच्या वेटिंग रूम मध्ये जाऊन बसली.
ते निरनिराळे वास, पेशंटचे काळजीने ग्रासलेले चेहरे बघून ती अजूनच खचली. तेवढ्यात शिंदे नर्स तिच्या जवळ आली.
“थोडं जास्त बसावं लागेल आज. डॉक्टरना इमर्जन्सी साठी जावं लागलं सकाळी. ते जस्ट परत आलेत.” रूपानं यांत्रिकपणे मान हलवली. या चिंतेने भरलेल्या खोलीत बसून मला वेडच लागणार आहे म्हणत तिनं फोनमधे मुंडी खुपसली पण सगळं लक्ष इतर काय बोलतात त्यांच्याकडे होतं.
तेवढ्यात एक गलेलठ्ठ बाई आत आली. बाईंचा देह प्रचंड होता पण अगदी छान नटून थटून आली होती. शिंदे नर्सने तिला डॉक्टर आत्ताच आलेत हे सांगितलं.
“दमले असतील ना डॅाक्टर इमर्जन्सी करून? जरा सरबत वगैरे दे त्यांना. घाई नाही माझी!” ती तिचे चकचकीत पाटल्या बिल्वर नीट करत नर्सला म्हणाली.
तिने मोरपंखी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. कानात सोन्याची भोकरं होती. चेहरा तजेलदार दिसत होता. ओठावर लिपस्टिक फिरवून तिनं स्वत:कडे पावडरच्या कॅाम्पॅक्टच्या आरशात बघितलं. नाकीडोळी नीटस होती पण वजनात सगळं सौंदर्य हरवलं होतं.
तिच्यासमोर एक पाच वर्षांचा मुलगा अगदी रडवेला चेहरा करून बसला होता. तिनं त्याला मजेशीर चेहरा करून दाखवला. तो खुदकन हसला. ती त्याच्याशी बोलू लागली. पर्समधून तिनं एक उड्या मारणारं माकड किल्ली देऊन त्या मुलापुढे ठेवलं. तो मुलगा टाळ्या वाजवत माकडाचा नाच बघू लागला.
ती शेजारी बसलेल्या आजोबांकडे वळून म्हणाली, “काय आजोबा कसय उड्या मारणारं माकड? अहो परवा आमच्या गच्चीवर लाल तोंडाचं माकड आलं होतं..आजोबा शेतकरी असावेत. “लांबवर खायला टाका त्यांना म्हणजे घरात येणार नाहीत माकडं” आजोबांनी तिला उपदेश केला.
“आजोबा, तुम्हाला बरं नाही का?” तिने कारण नसताना विचारलं.
“मला काय झालंय? ठणठणीत आहे मी सत्तरीला. पण एकदा डाक्टरांना तोंड दाखवायला येतो.”
रूपा खाली मान घालून सर्व ऐकत होती. त्या बाईची स्वारी रूपाकडे वळली.
“काय हो..तुम्ही IT वाल्या का?” रूपाने उसनं हास्य आणून होकारार्थी मान हलवली. रूपा घाबरलेली आहे हे तिला जाणवले असावे.
“पुर्वी मी पण डॅाक्टरकडे चेकअपला येताना फार घाबरायची. बीपी निघालं, डायबेटिस निघाला, नाना तऱ्हा निघतात दरवेळी पण सांगू का -हल्ली मी याचा त्रास करून घेत नाही. बॅड न्युज म्हणून कळलेली गोष्ट खरी गुड न्युज असते.. काय करायचं काय नाही याची वॅार्निंग असते.. रुपाला आता तिचे बोलणे ऐकावेसे वाटत होते.
"प्रिलिम असते की नी दहावी बारावीत..तशीच ही शरीराची परीक्षा..शरीराचे सर्व घटक उत्तम मार्क मिळवून काम करत आहेत का म्हणून घेतलेली परीक्षा.. आता ते कधी ७०% तर कधी ८०% मिळवतात.. असा फरक येणारच हो! पण ते आतले गुरूजी काठी घेऊन बसतात ९०% मिळावेत म्हणून!" रूपा कान देऊन शरीराच्या परीक्षेची थेअरी ऐकत होती. बाई खूप काही बोलत होत्या.
"पाच किलो वजन कमी केलय बघा. अजून बरच कमी करायचे आहे पण सुरुवात तरी छान झाली आहे!" ती जोरात हसली.. "ते रामदेव बाबा म्हणतात ना हो - भगवानने इतना अच्छा शरीर दिया था लेकिन देखो आपने उसका क्या किया.. तसेच झाले माझे.. पण आता परत हे शरीर छान बनवण्याचे प्रयत्न करतेय.. या प्रयत्नातील पहिली कडी आहे हे डॉक्टर साहेब! तुम्ही छान सडपातळ आहात.. ते जपा बर का. आणि मनात काही ठेऊन बसू नका. मी इतक्या गोष्टी आत दाबून ठेवल्या होत्या आणि इतके आघात पचवले आहेत ते आता शरीरावर असे दिसत आहेत! खळखळून हसावे बघा ! "
डॉक्टरनी आत बोलावले म्हणून ती बाई आत गेली. शिंदे नर्स रुपाकडे बघत होती. बाईंची सगळी फॅमिली कोविड मध्ये गेली बघा. नवरा, आई, सासू गेले आता एक मुलगा आहे तो फक्त जवळ असतो. पण बाई घट्ट! कोविड नंतर त्यांचे तब्येतीचे त्रास फार वाढलेत..पण मनाच्या शक्तीवर जगतात बघा.. आलेला प्रत्येक दिवस उत्तम घालवतात. नटून थटून फिरतात.. घरी एखादे कार्य असल्यासारख्या! इथे आल्या की आमच्या पेशंटना हसवतात.. डॉक्टरनाही चार गोष्टी सांगतात आणि आनंदाने घरी जातात.. "
रूपा चकित होऊन ऐकत होती. दोन वर्षांपूर्वी घरचे सगळे गेले आणि बाई इतरांना हसवत होती. आणि आपण ठणठणीत असताना "काही निघाले तर.." ची काळजी करत स्वतःला आजारी बनवत आहोत.
तिने उठून त्या माकडाशी खेळणाऱ्या मुलाबरोबर खेळायला सुरुवात केली.
बाईचे वाक्य आठवत..
“काळजी करून काही होत नाही.. जे पुढे येईल त्याला हसऱ्या चेहऱ्यानं सामोरे जायचे..स्वतः उभे राहायचे आणि इतरांना उभे करायचे! आपले जवळचं गेलेले माणूस आजूबाजूच्या माणसात शोधायचे आणि त्याला आधार द्यायचा.. ते एकदा जमले ना की त्रास संपला बघा!
याला जगणे म्हणायचे..
©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा