शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1699. मर्यादा

 आशुचा कॉल आला तसा मिलिंद ऑफिसमधून काम टाकून घरी आला.
आशु वाट बघत होती. उदास चेहऱ्याने. अगदी सुन्न होऊन.
"काय झालं आशु, इतक्या तातडीने का बोलवलं?" घरी आल्यावर मिलिंदने विचारलं.
तशी ती त्याला बिलगून रडायला लागली.
"अगं काय झालं सांगशील का नाही?"
"अहो रेखा गेली!"
"काय?"
"हो, आईचा तसा कॉल आला म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं."
"रेखा तर..."
"ही बोलायची वेळ नाही, चल गावी जाऊ आपण."
"वेडी की काय तू, मागच्या आठवड्यात तुला सहावा महिना लागलायं. प्रवासाची दगदग तुला सोसणार नाही तुला."
"तुम्ही जाता?"
"मी!"
"तुम्हाला जावं लागेल या वेळी तरी मागचं सगळं विसरा."
"अगं पण..."
"माहिती आहे ती तुमच्याशी कशी वागली. खूप त्रास सहन केलत तुम्ही . पण या वेळी माझं ऐका."
"तू म्हणते तर जातो."
"लगेच निघा,आईला कळवते फोन करून."
मिलिंदने जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यापासून साधारण अडीच -तीन तासाचा रस्ता होता. लवकर जाणं महत्वाचं होतं.
शेवटी बसने जाण्याचा निर्णय घेतला.
रिक्षाने तो शिवाजीनगर बसस्टॅन्डवर आला. दहा मिनिटात गावी जाणाऱ्या बसमध्ये तो बसला.
पुण्यातून बाहेर निघायला त्याला अर्धा तास लागला.
रेखा गेल्याचं दुःख काही अंशी त्याला झालं होतं. तिनं त्याच्या आयुष्यात बरचं वादळ निर्माण केलं तरीही.
बसमध्ये त्याला मागील गतकाळ आठवू लागला.
          **
स्वतःच असं मिलिंदचं गॅरेज होतं. शिक्षण पूर्ण झालं होतं.त्याचे वडील गॅरेज चालवायचे. वडील गेल्यानंतर त्याने स्वतः गॅरेजकडे लक्ष दिलं.
सुदैवाने त्या धंद्यात त्याला यश झालं.
काही दिवसात त्याला लग्नाचं स्थळ चालून आलं. गावातील त्यांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी रेखा दिसायला सुंदर होती.
त्याला ही पसंत पडली.
लग्नाचा सारा योग जुळून आला.
एका दुपारी आशु त्याला भेटली.
रेखाची मैत्रीण ती.
दुपारी मिलिंद निवांत होता. तर स्कुटर घेऊन आशु आलेली.
त्याला वाटलं स्कुटरला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल.
"बोला काय होतयं?"
"कुठं काय?"
"अहो गाडीला काय होतयं.?"
"काही नाही."काय बोलावं तिला कळत नव्हतं.
"अहो मग काय काम होतं.?"
"तुमच्याकडे काम होतं."
"माझ्याकडे!"
"हो.. मी अश्विनी रेखाची मैत्रीण."
"तिचा काही निरोप आहे का?"
"हो."
"अहो मग सांगा ना."
"तेच तर कळत नाही कसं सांगू."
"देवाने तोंड दिलयं ते काही फक्त खाण्यासाठी नाही."
ती गप्प राहिली.
"खरं सांगू.?"
"एकदा काय ते सांग."
"रेखा या लग्नाला तयार नाही."
त्याच्या काळजावर कुणीतरी घाव घालतयं असं त्याला वाटलं.
"का.. काय झालं?"
"तिला तुम्ही पसंत नाही."
"मग आधी कशी तयार झाली.?"
"आधी पण नव्हती पण तिच्या बाबांच्या हट्टापुढं तिचं काही चाललं नाही."
"मग आता?
"तिचं म्हणणं तुम्ही तिला नकार द्यावा."
"इतकं सोपं आहे का ते.?"
"मलाही कळतयं पण.."
"ठीक आहे विचार करतो मी पण तू तिला आता काही बोलू नको."
"ठीक आहे."
ती निघून गेली.
मिलिंद सुन्न होऊन राहिला.
संध्याकाळी घरी आला. कशात लक्ष लागत नव्हतं.
अन्नावरून वासना उडाली होती. न जेवताचं तो झोपायला गेला तेव्हा आईला शंका आली.
"मिलिंद जेवायचं नाही का?"
"तू जेऊन घे आई, मला भूक नाही."
"थोडंतरी खाऊन घे."
"खरचं आई मला भूक नाही."
"नक्की तुझं काहीतरी बिनसलंय."
"तसं काही नाही आई."
"आपल्या आईला सांगणार नाहीस.?
मिलिंदनं मग सगळं सांगून टाकलं.
"वेड लागलंय का पोरीला."
"मलाही काही कळेनासं झालं."
"तू काही काळजी करू नको. मी असताना असं काही होणार नाही."
"असू दे आई, तिच्या मनात नसेल तर."
"असं कसं म्हणतोस तू. सगळं ठरलं असताना तिला हे सुचलं तरी कसं. शेवटी अब्रू वगैरे काही आहे का नाही."
"पण आई.."
"मी आहे. बघते सगळं "
मिलिंद नंतर गप्प राहिला.
           **
त्यानंतर आईनं सगळं निस्तारलं. ती स्वतः रेखाच्या बाबाला भेटली. झाला प्रकार तिनं मनोहरपंताच्या कानावर घेतला.
त्यांनी रेखाची चांगली कानउघडनी केली.
काही दिवस गेले.
लग्नाची तयारी चालू होती.
मिलिंद एकदा अश्विनीला भेटला.तोही तिच्या घरी.
मिलिंद आल्याचं तिला नवल वाटलं.
ती घरात होती हे पाहून त्याने दारातून विचारलं.
"येऊ का आत.?"
"या ना, असं विचारतायं काय."ती थोडी हसली.
"घरात कुणी नाही का?"
"आई आहे, स्वयंपाकघरात."
"थोडं काम होतं म्हणून आलो."
"या आधी बसा तर."तिनं खुर्ची दिली बसायला.
"थोडं थांबा हं. आईला चहा करायला सांगते."
"नको, त्याची काय गरज नाही.".
"असं कसं होईल पहिल्यांदा घरी आलात माझ्या."असं म्हणून ती आत गेली.आईला चहा करायला सांगितला.
"बोला काय काम होतं?"
"खरं बोलू?"
"बोला."
"रेखाच्या मनात नेमकं काय चाललयं.?"
"म्हणजे, मी नाही काही समजले.?"
"लग्न काही दिवसावर आलयं, तिच्या मनाविरुद्ध तर हे होत नाही ना. दुसरं काही नाही नंतर प्रॉब्लेम नको."
"तसं काही नाही मी बोललेय तिच्याशी म्हटलं पुन्हा असला अविचार करू नको."
"काय म्हटली ती.?"
"काही नाही ऐकलं माझं. "
"हे एक बरं झालं म्हणायचं."
"हो ना "
चहा आला. दोघांनी घेतला.
समाधानने मिलिंद बाहेर पडला.
             **
जे झालं ते अतिशय वाईट झालं.
मिलिंद मनातून पार कोसळला होता. जे झालं त्याची त्याला अजिबात शंका आली नव्हती.
लग्नाला चार दिवस कमी आणि रेखा पळून गेली. कुणी बबन साळवी नावाच्या पोऱ्याबरोबर.
घडलं ते सारं अनपेक्षित होतं.
रेखाचा भाऊ प्रवीण लग्नाच्या आठ दिवस आधी आला होता. येताना आपला मित्र बबन याला घेऊन तो आला होता.
रेखाच्या घरात प्रत्येक कामात त्याचा सहभाग असायचा. त्याच्या सुंदर दिसण्यावर रेखा फिदा झाली. तिला हवे असलेले प्रत्येक गुण त्याच्यात होते.
हळू हळू ओळख वाढत गेली. चार दिवसात तिनं त्याला आपलसं केलं.
चालून आलेली संधी त्यानं सोडली नाही.
एक दिवस सकाळी पाहिलं तर दोघेही गायब.!
झाला प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला.
मिलिंदला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. गॅरेजकडे पूर्ण दुर्लक्ष राहिलं.
आईला लेकाचे हाल पाहवेना.
आणि त्या धक्क्याने ती गेली.
मिलिंद एकटा पडला.
स्वतःच्या नशिबाला दोष देत.
काही दिवस गेले आणि त्याच्या आयुष्याला पुन्हा नवीन वळण आलं.
एका दुपारी आशुची आई घरी आली.
मिलिंदला वाटलं आई गेल्यामुळे भेटायला आली असेल.
"या बसा."
ती बसली.
"झालं ते खूप वाईट झालं."
"काय करणार त्याला आपण."
", झाली गोष्टी आशुने फार मनाला लावून घेतली."
"साहजिक आहे ते अगदी जवळची मैत्रीण तिची."
"जाऊ द्या ते आता मी आलेय एका वेगळ्या कामासाठी."
"कुठलं?"
"आशुच्या लग्नासंबधी."
"जमलं का कुठं तिचं?"
"नाही पण आता जमणार आहे."
"कुणासोबत?"
"तुमच्यासोबत."
"काय!" 
एकदम नवल वाटलं त्याला.
काय बोलावं त्याला कळेना.
"अहो, नको तो विषय आताच यातून पोळून निघालोय."
"तिची इच्छा आहे ही."
त्यानं चमकून काकूंकडे पाहिलं. एक सुखद धक्का होता तो.
काही दिवस गेले.
रेखाचं प्रकरण मनातून काढून टाकलं त्यानं. नव्या उमेदीने तो पुन्हा कामाला लागला.
एका शुभ मुहूर्तावर आशुबरोबर त्याचं लग्न झालं.
त्याच्या बेरंग आयुष्यात पुन्हा रंग भरला गेला.
एका दुपारी निवांत क्षणी..
"आशु "
"हं "
"एक विचारू?"
"विचारा "
"तुला माझ्याशी का लग्न करावसं वाटलं."
"खरं सांगायचं तर रेखा असं काही करेल मलाही वाटलं नव्हतं,
तिनं जे केलं बरोबर केलं नाही, सगळ्यांना त्रास झाला त्याचा.
तुमचा त्रास नाही पहावला मला."
"म्हणून तू माझ्याशी लग्न केलं."
"हो कुणाचं तरी आयुष्य मार्गाला लागावं म्हणून."
"खरचं आशु किती चांगली आणि समजूतदार तू तुझा थोडा तरी गुण तिच्यात असता तर..."
"नका आता मनात आणू काही."
मिलिंदनं तिला मिठीत घेतलं.
त्याच्या मिठीत ती हरवून गेली.
काही दिवसात आनंदाची बातमी आली. मिलिंदला एका कंपनी कडून नोकरीसाठी पत्र आलं.
खूप आनंद झाला त्याला.
आशुचं त्याच्या आयुष्यात येणं त्याच्यासाठी लकी ठरलं.
          **
सारा गतकाळ त्याला आठवून गेला.
दहा मिनिटात गाव येणार होता.काय झालं असेल तिथं.
तिचं अंतिम दर्शन होईल का नाही.?
अशा अनेक प्रश्नांची गर्दी त्याच्या डोक्यात झाली होती.
पाचच्या सुमारास तो गावात पोहचला.
रेखाच्या घरी पोहचला. तिथल्या वातावरणात सुन्न झाला तो.
घरासमोर गर्दी.
सर्व तयारी झाली होती. तिचा चेहरा पाहताना त्यावेळी त्यालाही गलबलून आलं.
नंतर सर्व क्रिया पार पडल्या.
नदीच्या काठावर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.
थोडं दूर उभं राहून मिलिंद पहात होता.
किती सहजपणे तिनं मृत्यूला कवटाळलं होतं.
पण झालं त्याला तिचं सर्वस्व जबाबदार होती.
बबन ती गेली तेव्हा तिच्या साऱ्या आशा फोल ठरल्या होत्या.
लग्नाचं आमिष दाखवून त्यानं फक्त तिचा उपभोग घेतला होता.
जेव्हा त्याने त्याला नाकारले तेव्हा तिची पायाखालची जमीन सरकली होती.
गावी आली तेव्हा तिला घरात तर घेतलं पण कुणी तिच्याशी बोलत नव्हतं.
पार वाळीत टाकलं होतं.
खूप मनस्ताप झाला तिला.
आपण केलेल्या चुकीची तिला जाणीव झाली. आणि तिनं प्रायश्चित घ्यायचं ठरवलं.
राहत्या घरात स्वतःच्या खोलीत तिनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
गावात आलं तेव्हा मिलिंदला इतकी माहिती कळली होती.
मिलिंदने एका जळत्या चितेकडे पाहिलं, चितेने चांगला पेट घेतला होता.
सुन्न मनाने तिथून सगळे परतू लागले.

@ शेखर ठोंबरे. (सोलापूर )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...