शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1682. हंबरडा

     रात्रीचे अकरा वाजले होते.चंदू अजून घरी आला नव्हता. लतिका त्याची वाट पाहत दारातल्या झोपाळ्यावर बसली होती. जाई आणि जुई तिच्या दोन गोड पोरी. जाई मोठी तर जुई तिच्यापाठची. दोघीजणी केव्हाच झोपल्या होत्या. तिलाही झोप येत होती.पण तिला चंदूची काळजी लागली होती. आजकाल चंदूचं असं उशिरा घरी येणं तिला खटकू लागलं. अशात त्याचा घरापेक्षा मित्र मंडळीतच जास्त वावर होता. लतिकेच्या मनाची घालमेल होत होती. इतक्यात तिला गेटमधून येणारा चंदू दिसला. तिच्या जिवात जीव आला. ती झोपाळ्यावरून उठली. चंदूच्या हातातली बॅग ती घेणार तेवढ्यात चंदू तिच्या हातला हिसका मारत म्हणाला, 
"ये चल सती सावित्री,मला माझी बॅग ठेवता येते. निघ इथून एवढं प्रेम नको दाखवू."
दारू पिऊन तर्राट झालेल्या चंदूला पाहून लतिकाच्या पायाखालची जमीन सरकली. चंदूकडं पाहत ती म्हणाली,
"आज तुम्ही दारू पिलीत?"
"हो पिली. तुला काय?"
"आधी तर कधी पीत नव्हता तुम्ही."
"मग काय तुला विचारून पिऊ की काय?"
"अहो,पण.."
"चल हो बाजूला."
"अहो, जरा पोरीचा तरी विचार करा. मोठ्या झाल्यात आता आणि तुमच्यासारख्या शहाण्यानं या दारूच्या नादी कशाला लागावं म्हणते."
"मग आता तू शिकव मला. सांग काय करू मी?"
"हे बघा आता तुम्ही पुन्हा पिऊन येऊ नका. तुम्ही जर दारू पिलीत तर.."
"...तर काय करतीस गं मला. भितो की काय तुला." असं म्हणत चंदूनं तिच्या कानाखाली जोरात थापड लगावली. तो झुलत झुलतच लतिकेला काहीबाही बोलू लागला. तिनं इकडं तिकडं बघत त्याला धरून आत नेलं. त्याचा असा अवतार तिनं पहिल्यांदाच पाहिला होता. खोलीत गेल्यावर चंदूनं धाडकन आपला देह पलंगावर टाकला. लतिकेनं त्याला नीट सावरलं. त्याच्या अंगावर पांघरूण टाकलं. नशेमध्ये धुंद झालेल्या चंदूकडे पाहून तिला रडू कोसळलं. ती त्याच्या बाजूला भिंतीकडं तोंड करून झोपली. 
   एक दोन तासानं तिला जाग आली. चंदू तिच्या अंगाशी सलगी करायचा प्रयत्न करू लागला. लतिकेला मात्र त्याची प्रचंड चीड आली होती. त्याचा स्पर्शही तिला नकोसा वाटू लागला. ती त्याला झिडकारू लागली. विरोध करू लागली. चंदूनं तिला गच्च आवळून धरलं आणि त्याला हवं ते घडत गेलं.
सकाळी पोरी शाळेत जाण्याची लगबग सुरू झाली. चंदू सुद्धा थोड्या वेळात निघणारच होता. काल रात्री जे घडलं ते त्याच्या गावीसुद्धा नव्हतं. लतिका आतून दुखावली होती. तरीही तिनं त्याच्यासाठी चहा केला. चहा देऊन ती आत गेली. आपल्या रूममधून बाहेर येत जाई म्हणाली,
"बाबा,मला ऑनलाईन क्लास लावायचाय नवोदयचा. दोन हजार रूपये भरा ना."
पाठोपाठ जुई आली आणि म्हणाली,
"बाबा माझ्याही ट्युशन ची दोन महिण्यांची फी भरायची राहिलीय. सर तगादा लावत आहेत."
"कारट्यांनो, तुम्हाला कशाला हवाय तो ऑनलाईन क्लास अन ते महागडं ट्युशन? तुम्ही शिकून मला काय फायदा?"
चंदूचा असा वर चढलेला आवाज ऐकून जुई शांतच बसली. पण तिची बाजू घेत जाई म्हणाली,
"पण..फी नाही भरली तर ट्युशन बंद करा. असं म्हणाले सर."
"मग बंद तर बंद. तो सखा म्हणत होता कुठं पोरींना शिकवण्याच्या नादी लागतोस. पोरी म्हणजे परक्याचं धन."
"आणि स्वत:चं धन?" जाई धिटाईनं म्हणाली.
"मुलगा. ज्याच्यासाठी मी आता पैसा गोळा करीत आहे."
पुढे काहीही न बोलता दोघीजणी आपापल्या शाळेच्या तयारीला लागल्या. बाप-लेकींचा हा संवाद ऐकून चंदूच्या मनात नेमकं काय चाललंय हे लतिकेनं ओळखलं. तिला वाटलं कालची नशा उतरली तर आता त्याला शरमल्यासारखं वाटत असावं. पण आज तर तो पोरींच्या शिक्षणालाच विरोध करतोय. वरून त्यांच्यासमोर बोलू नये ते बोलतोय. पगारवाढ झाल्यापासून त्यानं नव्या मित्रांशी संगत धरलीय. कदाचित हे नवं खूळ त्यांनीच चंदूच्या मनात भरलं असावं याची तिला पक्की खातरी झाली. अनिच्छेनंच तिनं त्याच्या हातात जेवणाचा डबा ठेवला आणि ती परत स्वयंपाकघरात गेली. पाठोपाठ दोघी बहिणी आपापला डबा घेऊन, दप्तर आवरून शाळेत गेल्या.
     सायंकाळची वेळ. जाई, जुईची शाळा सुटून दोन तास झाले. तरी दोघी अजून परतल्या नव्हत्या. लतिका ओसरीवर ये जा करू लागली. तेव्हा तिला चार पाच माणसांचा घोळका तिच्याच घराकडं येताना दिसला. दोघाजणांनी चंदूला कसंबसं उचलून धरलेलं दिसत होतं. मागे जाई जुई आणि गल्लीतील तिच्याच वयाची पोरं दिसत होती. त्या माणसांनी चंदूला  समोरच्या ओसरीवर आणून टाकलं व निघून गेली. सोबतची पोरंही एकमेकाकडे बघत, हसत घरी गेली. चंदूला असं नशेत बेशुद्ध झालेलं पाहून लतिकाच्या डोळ्याला धारा लागल्या. तिच्याकडं पाहत जाई म्हणाली,
"आई,आजकाल बाबा असं का वागत आहेत गं? आज तर कहरच झाला. चक्क आमच्याच शाळेसमोर या अशा पिलेल्या अवस्थेत. सगळ्या मित्रमैत्रिणींसमोर त्यांना पडलेलं पाहून लाज वाटली गं आम्हाला."
लतिका गप्प. उत्तर तरी काय देणार या निरागस प्रश्नाचं? लतिका आपले डोळे पुसत परसात गेली. झाडा वेलीच्या सहवासात तिला जरा बरं वाटायचं. ही वृक्षवल्लीच तर तिचे जिवाभावाचे मैतर होते. ती आपलं रडगाणं त्या हिरव्या वृक्षवेलींजवळ मांडू लागली.
"खरंच काय झालंय चंदूला? कालपरवा पर्यंत खाऊन पिऊन बऱ्यापैकी चाललेला त्यांचा संसार. दोन मुली..छोटं कुटुंब. चंदूचा स्वभाव तसा हेकाटीच. सारं काही वेळेवर पाहिजे. चांगलंच पाहिजे. परक्या माणसासमोर यायचं नाही. घराबाहेर निघायचं नाही. सगळं हाच आणून देणार. कशाबद्दल कुणापुढं तक्रार करायची नाही. घरची गाऱ्हाणी बाहेर जाऊ नये म्हणून कुणाशी मैत्री करायची नाही. शहाणपणाचं काही बोललेलं आवडत नाही. एक ना अनेक अटीतटीत या पोरीकडं बघत जगत आहे. 'नोकरीवालं..शहरात राहणारं पोरगं.दोन माणसाचं केलं की झालं.'असं म्हणून आईबापानं म्हणलं त्याच्याशी लग्न केलं. दिल्या घरी सुख मानलं. आईबापाकडं कधी तक्रार नेली नाही. पोटाला या दोन गोड पोरी आल्या म्हणलं आता बस्स. तर कधी तिसरंही राहिलं आणि या माणसाचा आता अचानकच पोराचा अट्टाहास? यावेळी जर मुलगा नाही झाला तर? पुन्हा कितीदा त्याच कळा सोसू? 'तुमची तब्येत नाजूक आहे. तुमच्या जिवाला धोका होऊ शकतो. जपायला हवं.'असं डॉक्टरांनी तर मागच्याच वेळेला सांगितलंय. निदान आता तरी त्याच्या मनावर होऊ दे रे देवा." रडत रडत लतिकेनं परसातल्या सोनचाफ्याला घट्ट मिठी मारली. क्षरभरासाठी परसातली सारी फुलं कोमेजून गेली. वेली रडू लागल्या. झाडं मुकी झाली. जणू लतिकाचं दु:ख त्यांनी जाणलं असावं.
    ती डोळे पुसत उठली. देवाजवळ दिवा लावला. सारं सुरळीत व्हावं यासाठी प्रार्थना केली. जाई,जुई आईच्या जवळ येऊन बसल्या. तिनं दोघींना कुशीत घेतलं. त्यांच्या निष्पाप डोळ्यात पाहून लतिकानं आपलं दु:ख बाजूला सारलं. तिला नुकताच तर चौथा महिना लागला होता. स्वतःला जपत, चंदूच्या हेकट स्वभावाकडं, त्याच्या व्यसनाकडं दुर्लक्ष करत घर सावरत ती नवी स्वप्न गुंफू लागली. रामय्या हॉस्पिटल मध्ये कुण्या फॉरेन रिटर्न डॉक्टरांची व्हिझीट होती. तिथं लपून छपून गर्भलिंग तपासणी केली जाते. चंदूला असं कुणीतरी सांगितलं होतं. म्हणूनच सकाळी पेशंटची गर्दी होण्याआधी पहिलाच नंबर लावावा यासाठी सकाळीच त्यानं लतिकाला तयार व्हायला सांगितलं. तिचा जीव अस्वस्थ होऊ लागला. तरीही ती तयार झाली.
"जाई,मी जरा दवाखान्यात जाऊन येते बाळा. दोघी मिळून जेवण करा. अभ्यास करा. आम्ही येतो लगेचच." लतिकेनं जाईला काही सुचना केल्या आणि दोघे घराबाहेर पडले. दवाखान्यात गर्दी होती.पण चंदूनं आधीच नंबर लावल्यानं त्यांना बोलावण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. सोनोग्राफीचे रिपोर्ट येईपर्यंत दोघांना बाहेर बसण्यास सांगितलं. लतिका काळजीत होती. आता हे शेवटचं. मुलगा असो की मुलगी तिला काही फरक नव्हता. तिच्या आईवडिलांनीही कधी तिच्यात व भावात भेदभाव केला नव्हता. पण आज चंदूसाठी तिला मुलगा हवा होता. ती रिपोर्टची वाट पाहू लागली. तितक्यात एक नर्स म्हणाली,"चंद्रकांत बेले कोण आहेत? त्यांचा रिपोर्ट आलाय."
"बेले, गर्भ मुलीचा आहे." डॉक्टरांचं बोलणं ऐकून चंदूचा चेहरा पडला. तो तडक म्हणाला,"मला नकोय पण मुलगी."
"निर्णय तुमचाय. पण काही करायचं असेल तर इथं,या दवाखान्यात नाही करता येणार. तुम्हाला राजापूरला आमच्या क्लिनीकमध्ये यावं लागेल."
लतिकानं आपल्या पोटावर हात फिरवला. जे नको होतं तेच घडत होतं. ती आतून हादरली. तिनं चंदूच्या चेहऱ्याकडं पाहिलं. तिला त्याचा राग येत होता.पण..
"डॉक्टर तारीख सांगा. आम्ही त्या तारखेला येतो." चंदू म्हणाला.
"तुम्हाला जमत असेल तर उद्याच."
डॉक्टरांना होकार देत चंदू तिथून निघाला. जड पावलांनी लतिकाही मागोमाग बाहेर पडली.
"तू जा घरी. मी इकडून इकडं कारखान्यात जाऊन येतो."
"डबा.."
"बघतो माझं मी."म्हणत चंदू निघून गेला.
लतिका घरी आली. जाईनं तिला प्यायला पाणी दिलं. लतिकाला थोडं बरं वाटलं. पण ती आतून हादरली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती. काही न समजण्याइतकी लहान नव्हती जाई. आईचं दु:ख तिनं ओळखलं. पण काहीच न बोलता ती आपल्या खोलीत गेली. जुई बंगईवर बसून पुस्तक वाचण्यात गुंग झाली. लतिकाचा बसल्याजागी डोळा लागला.
" लतिके उठ. तिन्ही सांजेची वेळ झाली अन खुशाल लोळतीय."
लतिका सावरली. चंदू आज पुन्हा पिऊन आला होता. तो घाणेरडा वास. त्याचं रानटी रूप. लतिकेला त्याच्याकडं पाहवेना. चंदू आज तो प्रचंड रागात होता. रागाच्या भरात तो लतिकेच्या पाठीत लाथा घालू लागला. ती विव्हळू लागली. गयावया करू लागली.
"पोरी पाहिजेत ना तुला. घे पोरी एक..दोन..आता तिसरी मग चौथी. साले,तू पोराला जन्मच देऊ शकत नाहीस." असं बडबडत त्यानं तिच्या पोटावर लाथा मारायला सुरूवात केली.
"नका. नका हो मारू मला. माझ्या पोटात आपला जीव आहे."
"पोरीचा जीव. तुझ्याबरोबर त्यालाही मारतो बघ आता."
जाई, जुई चंदूचा अवतार पाहून हादरून गेल्या.
"बाबा,नका ना मारू आईला."चंदूच्या हाताला धरून जाई आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. चंदूनं तिला एक कानाखाली लगावली. ती बेशुद्धच पडली. ते पाहून जुई घाबरत घाबरत दाराआड दडून बसली.
चंदूनं लतिकाची वेणी धरली. तिला ओढत ओढत तो परसात नेऊ लागला. मधून मधून लाथा मारू लागला. लाथा खाऊन खाऊन लतिका अर्धमेली झाली. तिच्या पोटात प्रंचड वेदना होऊ लागल्या. रक्तस्त्राव होऊ लागला. तरीही ती त्याच्या तावडीतून सुटण्याची केविलवाणी धडपड करू लागली.
"थांब आता तुझ्या नरडीचा घोटच घेतो. तू ही मोकळी आणि मी ही.."
"वाचवा..वाचवा..कुणीतरी ऐका हो माझी हाक. कुणी सांगा रे या माणसाला पोरी होतात ते माझ्यामुळं नाही रे." लतिकेनं सारं बळ एकवटून जोराचा हंबरडा फोडला आणि ती बेशुद्ध झाली.
अचानक तिला सोनचाफ्याच्या पानांची सळसळ ऐकू आली. पानांतून आवाज आला,"हे वेलींनो,हे वृक्षांनो..ही तर आपली सखी लतिका. जी आपल्याला रोज पाणी घालते. आपली काळजी घेते. आपल्याला जीव लावते. स्वतःचं दु:ख आपल्याला सांगते. कोण हा माणूस आज तिला छळतोय. कदाचित हाच तिचा नवरा. तिला छळणाऱ्या आणि तिच्या बाळाचं अस्तित्त्व पुसून टाकणाऱ्या या राक्षसाला आज आपण ठेचायलाच हवं."
    हा आवाज ऐकून लतिकेचे सारे हिरवे दोस्त तिच्या मदतीसाठी पुढे सरसावले. तिथल्या गुलाबानं चंदूच्या अंगावरून खरखरीत काटे फिरवले. क्षणात तो रक्तबंबाळ झाला. तो पुढे सरकला तर गुलमोहर आडवा झाला. त्यानं आपल्या फांद्यानं चंदूवर रपारप वार केले. इवली काटेकोरांटीसुद्धा चंदूच्या अंगाला टोचू लागली. आता तर चंदूलाच पळता भुई थोडी झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चंदू पळू लागला. तर इवल्या इवल्या वेली त्याच्या पायात अडकू लागल्या. बघताबघता बाजूच्या शिरीषानं आपल्या सहस्त्र फांद्यांनी चंदूची मान गच्च आवळली. त्या फांद्यांचा विळखा सोडवण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण तो हारला. आपल्या मृत्यूला त्यानं प्रत्यक्ष पाहिलं. गळ्याभोवतीचा विळखा अधिकच घट्ट होत गेला. चंदू कायमचाच शांत झाला. बेशुद्धावस्थेत लतिकेला असे चित्रविचित्र भास होऊ लागले. लतिका मेली असं समजणारा चंदू शांत झाला होता. तरी त्याची नशा अजून उतरली नव्हती. तेवढ्यात त्याला "पाणी.. पाणी." असा लतिकाचा आवाज ऐकू आला. त्यानं तिच्याकड पाहिलं. चंदू तिच्या हालचालीनं घाबरला. तो उठला. त्यानं जवळचाच एक मोठा दगड उचलला आणि तो लतिकेच्या डोक्यात घालणार तोच पायाला ठेच लागून तो समोरच्या एका मोठ्या दगडावर आदळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. डोक्यातून रक्त वाहू लागलं. जागच्या जागीच त्याचा जीव गेला.
     इकडे लतिका शुद्धीवर आली. तिचं अंग ठणठणत होतं. सभोवतीच्या लाल सड्यानं काळीज चिरू लागलं. आतली हालचाल बंद झाली होती. सारी परसबाग अस्ताव्यस्त झालेली. ती पुढं गेली. समोर चंदूचा निष्प्राण देह पडला होता. तिला काहीच समजत नव्हतं.
"माझा हंबरडा या मुक्या झाडवेलींनी तर ऐकला नसावा.?" ती मनाशीच पुटपुटली. साऱ्या परसबागेवर तिनं आपला  प्रेमळ हात फिरवला. अधिक विचार न करता ती घरात आली. जाई जुईला घट्ट बिलगली. दोघींचा हात धरून लतिका आता दूर जाणार होती.

~मनिषा कुलकर्णी-आष्टीकर
परभणी
मोबाईल-9511875353
(साहित्य चपराक दिवाळी-2024 मधील प्रकाशित कथा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...