ऑफिसमध्ये होते आणि नेहाचा मेसेज आला. आत्तू, आमच्या नव्या घराचा ताबा मिळालाय. तुझी खूप आठवण आली किल्ल्या घेताना. मेसेज बघता क्षणी मी फोन लावला तिला. खूप उत्साहात होती पोर. आवाजात नुसता आनंद भरलेला. काय सांगू आणि किती सांगू असं झालं होतं तिला. मी म्हंटलं, फोटो पाठव घराचे.
नाही, तू प्रत्यक्ष यायला हवंस बघायला.
मी येईनच गं, पण तुमचं सगळं काम झालं, की सजवलेलं घर पाहायला येईन. तोवर फोटो तर पाठव.
फोटो कशाला, थांब विडियो कॉल करते. ठेव फोन.
पुढच्याच क्षणाला विडियो कॉल आला आणि घरभर नाचून तिने घराची प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा, open terrace, अगदी संडास बाथरूमची पण सैर घडवून आणलीन. छान होतं घर, चौदाव्या मजल्यावर. बक्कळ हवा, उजेड, उत्तम वस्ती, सगळंच छान होतं. पोरीचा आनंद बघून आनंदाश्रू तरळले डोळ्यात माझ्या. मी अकरावीत असताना, नेहा आली आमच्या आयुष्यात. भाऊ आणि वहिनीची सोनपरी. आई, बाबा, मी, दादा आणि वहिनी. त्यात नेहाची गोड भर. घराचं गोकुळ करणारी. दादा आणि वहिनी नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर, त्यामुळे मी, आई आणि नेहा, आमचा दिवसभर धुडगूस घरात. तिचं तान्हेपण शब्दशः जगले मी. तिनं इवल्याशा मुठीत धरलेलं माझं बोट अजूनही तसंच आहे. मी बारावीत गेल्यावर ती वर्षाची झाली आणि माझा अभ्यासच होईना झाला. सारखी आपली तिच्यात रमलेली मी. शेवटी आई ओरडली आणि मी अभ्यासिकेत जायला लागले अभ्यास करायला, तेंव्हा कुठे बारावीत तगले. तेंव्हापासून, ती आणि मी अविभाज्य. माय मरो मावशी जगो म्हणतात. इथे आत्या जगो, एवढाच बदल, तिच्या दृष्टीने.
माझं लग्न ठरलं आणि मी घरातून जाणार या कल्पनेनंच हतबल झालेली नेहा, मला अजून आठवतेय. सात आठ वर्षांची असेल ती तेंव्हा, पण गाल फुगवून बसायची, माझा होणारा नवरा, म्हणजे आदित्य घरी आल्यावर. तुझी आत्या चोरून नेणारे असं तो म्हणाला, की इकडे पाझर फुटायचे नुसते. पण आवडायचा आदित्य काका तिला. त्याच्या हळुवार वागण्याने, त्याने पण आपलसं करून घेतलं तिला. माझ्या लग्नाच्या दिवशी तर ती एवढी धाय मोकलून रडली ती, की माझा पाय अडखळला, डोळे डबडबले आणि शेवटी तिची बालमिठी निग्रहाने दूर करत, मी धावतच गाडीत बसले. काळीज पिळवटून टाकणारा तो क्षण आठवला की आज हसू येतं. पण तेंव्हा तो प्रसंग फार कठीण होता.
माझ्या लेकाचा जन्म झाला आणि तिचा आनंद गगनात मावेना. त्याच्या नावाची चर्चा घरात सुरू असताना, ठरलेलं नाव सोसायटीभर सांगत फिरणारी परकरी ती, अजूनही आठवतेय मला. त्याच्याशी खेळताना आणि मला आता भाऊ झालाय असं सगळ्यांना तोंडभर हसून सांगणारी ती, कशी विसरणार मी? नंतर माझा संसार, माझी नोकरी, माझा लेक यात मी गुरफटले, भेटी थोड्याश्या दुरावल्या, पण ते जपलेलं नातं मात्र अक्षय्य राहिलं. रक्षाबंधन, भाऊबीज तर होतेच, पण इतर सण सुद्धा आम्ही जमेल तसे एकत्र साजरे करत असू. जपत असू आमच्या नात्याचे धागे आम्ही, जिवापाड. तिची शाळा, कॉलेज, पुढचं शिक्षण यात आत्तूची जागा इतर बऱ्याच गोष्टींनी घेतली, पण एक कोपरा मात्र अजूनही माझ्यासाठी राखीव होता. उत्तम शिकली ती, बँकेत छान नोकरी लागली तिला आणि तिच्या ट्रेकिंग ग्रुप मधला कानडी राघवेंद्र भावला तिला. CA असलेला, मूळचा मंगलोर जवळच्या एका गावातला, पण आता पुण्यात नोकरीनिमित्त आलेला. त्याचे आई, बाबा आणि तो, भाड्याच्या 2 BHK मध्ये रहात असलेले. लाडकी आत्या म्हणून हे गुपित प्रथम मलाच सांगावंसं वाटलं होतं तिला, हेच तर आमच्या नात्याचं इंगित होतं. यथावकाश ते सगळ्यांना कळलं आणि आमचं छोटसं कुटुंब न्हाऊन निघालं आनंदाच्या कारंज्यात. राघवेंद्रशी बोलताना एकच दुर्दम्य इच्छा दिसली मला त्याच्या बोलण्यात, ते म्हणजे पुण्यात घर हवं आणि ते चौघांचंही हवं. नेहाचीही तीच मनीषा. लगेच मूल होऊ न देता, मनाशी जपलेलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास. दोन्हीकडच्या मोठ्यांची मदत, दोघांनी घेतलेलं कर्ज, या सगळ्याची मिळवणी होऊन आज नेहा नव्या वास्तूची स्वामिनी झाली होती. अभिमान मला, कारण मी जगले होते तिच्या सोबत, प्रत्येक क्षण. तिच्या आकांक्षांची साक्षीदार म्हणून. तिच्या सुखाचे कवडसे अनुभवले होते मी.
नात्यांचा दुरावा अनुभवण्याच्या आजच्या काळात नेहाचं आणि माझं हे नातं अगदी आगळंवेगळं. समरसून जपलंय ते नातं आम्ही. माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना सुद्धा हे ठाऊक आहे. त्या कौतुक करतात आमचं. म्हणतात, प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, दामदुप्पट. तू साक्षी आहेस. नेहाच्या नव्या घराचा विडियो बघताना, पापण्या ओलावल्या माझ्या. धूसर झाली चित्रं, पण मला झालेला आनंद तिला जाणवला. आत्तू, तुझंच घर आहे. कधीही ये हक्काने माहेरपणाला, असं ती म्हणाल्यावर मात्र मला सार्थक झाल्यासारखं वाटलं माझ्या जगण्याचं. तिच्या सासूचाही फोन आला, या चार दिवस मुक्कामाला, असं अगत्याचं निमंत्रण देणारा. भरून पावले मी.
अशीच जपायची असतात नाती, दोन्ही बाजूंनी, नाही का? तरच समरस होता येतं एकमेकांच्या भावविश्वात.
पराग गोडबोले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा