गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

1741. गा प्रकाशगीत

      परवाच्या दिवशी एक सुंदर व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओत दोन माणसे बोलताना दाखवली होती. त्या व्यक्तींची नावे त्यात दाखवली नाहीत. पण मला तो व्हिडिओ फार आवडला. जीवनाचे सत्य तो सांगून जातो. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बहुधा डेव्हिड शॅड्स ( David Shands )असावा. तो दुसऱ्या एका तरुण व्यक्तीशी बोलत होता. झाडांवरून त्यांची चर्चा सुरू होती. डेव्हिड त्या तरुणाला म्हणत होता," तुला माहिती आहे का झाडांची वाढ दोन दिशेने होत असते? जमिनीच्या वरच्या बाजूला आणि जमिनीच्या खाली सुद्धा. "
तो तरुण आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. खरंतर झाडे जेवढी जमिनीवर वाढतात तेवढीच ती जमिनीखाली देखील वाढतात हे सत्य मला माहीत नव्हते असे नाही. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली कारण यापूर्वी मी तसा विचारच केला नव्हता. मग झाडांबद्दल बोलताना डेव्हिड केवळ झाडांबद्दलच नव्हे तर जीवनाचे सत्यही उलगडू लागला. तो म्हणाला," आपल्याला सर्वांना जमिनीच्या वर वाढणारे झाड दिसते, त्याला येणारी फळे फुले दिसतात. आपण आनंदीत होतो आपल्याला फळे देणारा वृक्षच माहिती असतो. पण ही फळे किंवा फुले देणारा वृक्ष स्वतःला जमिनीत गाडून घेतो तेव्हाच आपल्याला तो फळे किंवा फुले देऊ शकतो. 
झाडांच्या या दोन दिशेने होणाऱ्या वाढीसाठी त्यांनी दोन शास्त्रीय शब्द वापरले. त्यातील एक होता Gravitropic तर तर दुसरा शब्द होता Phototropic. पहिल्या शब्दाचा अर्थ म्हणजेच जमिनीच्या खाली गुरुत्वाकर्षणाचा सामना करत वाढणारा झाडाचा भाग आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ म्हणजे जमिनीचे वर सूर्यप्रकाशात वाढणारा झाडाचा भाग. आपल्या सगळ्यांना हा जमिनीच्या वर वाढणारा झाडाचा भाग दिसतो झाड हळूहळू मोठे होत जाते त्याला फुले फळे येऊ लागतात. डेव्हिड म्हणतो, " Fruit system is very similar to the route system. " जेवढे झाड वर वाढते आणि पसरते तेवढेच त्याला जमिनीखाली देखील वाढावे आणि पसरावे लागते. झाडाचे बी जमीन भेदून एकदा वर आले की मग त्याला विरोधाचा सामना करावा लागत नाही. आता त्याचा सामना वेगळ्या गोष्टींशी असतो म्हणजे ऊन, वारा, वादळे, पाऊस यासारख्या नैसर्गिक गोष्टींशी. पण त्याच वृक्षाच्या मुळांना जमिनीखाली वाढताना मात्र अनेक प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागतो. जमीन कठीण असू शकते, खाली कठीण असा खडक असू शकतो, अंधार तर असतोच. ओलावा असेल किंवा नसेल. पण जमिनीखाली वाढताना मुळांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जमिनीच्या वर वाढायचे असेल, आपला विकास करून घ्यायचा असेल तर या सगळ्या अडचणींना तोंड द्यावेच लागते. त्यासाठी जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते. 
     फुले आणि फळे देणारे झाड सर्वांनाच आवडते. अशी झाडे सर्वांनाच हवी असतात. पण ही फुले फळे देण्यासाठी त्या वृक्षाने स्वतःला जे अंधारात गाडून घेतले, ते कोणाच्या लक्षात येत नाही. मानवी जीवनाला देखील ही गोष्ट लागू होते. आपल्याला जीवनामध्ये अनेक यशस्वी माणसे दिसतात. ती उच्च पदावर पोहोचलेली असतात, त्यांचा पैसा, त्यांचे ऐश्वर्य, त्यांचे दैदीप्यमान यश सर्वांनाच दिसते. आपल्यालाही आपण तसेच व्हावे असे वाटते. पण या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी जे कष्ट केलेले असतात, ते फार कमी लोकांच्या लक्षात येतात. वृक्षाचा जमिनीखाली अंधारात वाढणारा भाग लोकांना जसा दिसत नाही, तसेच यशस्वी लोकांनी यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांनी केलेल्या अपयशाचा सामना, जीवनातील अनेक अडचणींना दिलेले तोंड याची फारशी दखल आपण घेतलेली नसते. 
     रात्रीच्या वेळी आकाशात लखलखणारे एखाद्या नक्षत्र आपले लक्ष वेधून घेते, आपल्याला आकर्षित करते. पण सभोवताली असणाऱ्या अंधाराचा भेद करून त्या नक्षत्राचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. आपल्या भोवती असणाऱ्या अंधाराचा सामना त्या नक्षत्रालाही करावा लागतो, तेव्हाच त्याचे तेज जगाला दिसते. कोणत्याही महान व्यक्तीचे जीवन आपण पाहिले तर त्यांना या अंधाराचा अडचणींचा सामना करावा लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना केवढ्या प्रचंड विरोधाचा आणि मानहानीचा सामना करावा लागला हे आपल्याला माहिती आहे. लालबहादूर शास्त्री, सर विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांना घरच्या अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. विपरीत परिस्थिती असतानाही शिक्षण घ्यावे लागले. महर्षी कर्वे यांनी देखील अशाच विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. पण या सगळ्यांनी आपण ज्या परिस्थितीत आणि समाजात वाढलो त्याची जाणीव ठेवून पुढे आपल्या परीने समाजाचे ऋण फेडले  
     संतांचे जीवन देखील यापेक्षा वेगळे नाही. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजाचा केवढा छळ सहन करावा लागला. संत तुकारामांना देखील लोक निंदेला तोंड द्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपले स्वराज्य अक्षरशः शून्यातून निर्माण केले. या सगळ्या महान व्यक्तिमत्त्वांनी अंधाराचा, संकटांचा, समस्यांचा सामना करण्याची इच्छाशक्ती दाखवली नसती तर जीवनात ते यशस्वी होऊ शकले नसते. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनीही अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षण घेतले. प्रसंगी वर्तमानपत्र टाकण्याचे काम त्यांना करावे लागले पण शिकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यांचे वडील तर एक सामान्य नावाडी होते. नाव चालवताना वल्हे मारावे लागतात. शक्ती लावून त्या वल्ह्यांच्या सहाय्याने पाणी मागे सारावे लागते, तेव्हा कुठे नाव पुढे जाते. जीवनातही असेच वल्हे मारून कठीण परिस्थितीचे, समस्यांचे पाणी मागे सारावे लागते तेव्हा कुठे जीवनाची नाव यशाच्या दिशेने वाटचाल करायला लागते.
      सूर्यप्रकाशात फुललेल्या, फळलेल्या वृक्षाकडे आपली नजर जाते आणि ते साहजिक आहे. पण त्याने जमिनीखाली स्वतःला गाडून घेऊन अंधाराचा जो सामना केलेला असतो, त्याची जाणीव देखील ठेवणे आवश्यक आहे. हे रहस्य आपल्याला लक्षात आले तर जीवन जगण्याची एक नवीन दृष्टी आपल्याला मिळते. आपल्या जीवनातील अडचणींवर, संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. जयवंत कुळकर्णी यांनी गायलेले एक सुंदर गीत मला याप्रसंगी आठवते. ते म्हणतात 
अंधाराची खंत तू कशाला करिसी रे
 गा प्रकाश गीत.
     आपणही अंधाराची खंत न करता प्रकाश गीत गात जावं. मग आपलाही जीवनवृक्ष फळाफुलांनी बहरल्याशिवाय राहणार नाही.

 © विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...