काल परवा एक संदेश व्हॉट्स्ॲपवर पाहिला. एका लाकडी फळीवर ४/५ वाकडे खिळे होते आणि एक खिळा सरळ होता. जो सरळ खिळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते आणि खाली लिहिले होते.
"वाकड्यांना सोडून जे सरळ असतात त्यांनाच ठोकले जाते."
हे वाचले व मनात विचार आला हे खिळे जन्मतःच वाकडे असतील का? मग मी एका हार्डवेअरच्या दुकानात जाऊन १०० ग्रॅम खिळे घेतले ते सगळेच सरळ होते.
मी दुकानदारास विचारले, "भाऊ, वाकडे खिळे नाहीत का?"
त्याचे उत्तर, "दादा, कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात. फक्त हातोडीचा चुकीचा दणका किंवा खिळ्याची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने हे खिळे वाकतात."
मग मी विचारले की, "मग ह्या वाकड्या खिळ्यांचे करायचे काय?"
तर तो सहजतेने बोलला,
"साहेब, यांना पहिले जमिनीवर आणा. मग हातोडीने हळूहळू सरळ करा. जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे. एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळूहळू भिंतीत ठोका. एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्रॅमचा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल." परंतु तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता व त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकून देता ). बरं, फेकल्यावरसुद्धा तो खिळा काय करतो? तर
चालती गाडी पंक्चर करणे, चालणा-याच्या पायास रुतून जखम करणे असे उपदव्याप करतो.
त्या अशिक्षिताने माझे डोळे उघडले आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो. त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्यापासून चांगल्या चांगल्या गाड्या पंक्चर होऊ शकतात. ही गोष्ट मन्युष्य जातीलासुद्धा लागू होते. म्हणून त्याला प्रेमाने सरळ करा व जबाबदारी द्या तो निश्चितच निभावेल ही जाण मला झाली. दृष्टीकोन बदलला आणि वास्तवाची जाणीव आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा