राजीव आणि सुनील बालपणापासूनचे अत्यंत जिवलग मित्र. १९७० पासून दोघांचीही कुटुंबे पुण्यातील एका बैठ्या चाळीस राहत होती. घरची परिस्थिती सामान्य असल्यामुळे दोघांचेही शिक्षण लहानपणापासून एका मराठी शाळेत झाले. अभ्यासात तसे दोघेही सर्वसाधारण होते. १९८५ मध्ये दोघेही दहावी झाल्यानंतर त्यांनी सायन्स साईडला न जाता कॉमर्स साईडला जाण्याचे पसंत केले. राजीव व सुनील चे अकरावी कॉमर्स सुरू झाले. त्यावर्षी पावसाळ्यात जोरात पाऊस सुरू असताना राजीव चे वडील सायकलने घरी येत होते. वेळ संध्याकाळची होती. रस्त्यात सायकल घसरली व पाठीमागून येणारा ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. क्षणात राजीवचे वडील गेले. संध्याकाळी आठची वेळ. राजीवला समजायला रात्री दहा वाजले. त्या काळात इन्शुरन्स कल्पना जास्त प्रचलित नव्हती. त्यामुळे राजीवच्या वडिलांचा इन्शुरन्स नव्हता. संपूर्ण कुटुंबावर मोठा आघात झाला. आता पुढे काय करायचे? अनेक प्रश्न होते. लहान बहीण पाचवीत होती. आई गृहिणी होती. पगार तर कितीसा ! महिना ९८० रुपये. दोन मुलांची शिक्षण, राहत्या घराचे भाडे, महिन्याचा घर खर्च, या सर्वातून शिल्लक किती राहणार? राजीवचे वडील गेले त्यावेळी बँकेत पंधरा हजार रुपये होते. वडिलांचे अंत्यसंस्कार व दिवस क्रियाकर्म करण्यासाठी साधारण दोन हजार रुपये खर्च आला. आता शिल्लक तेरा हजार रुपयात पुढील आयुष्याचे नियोजन करायचे होते.
सकाळी दहा ते दोन या वेळात राजीव चे कॉलेज होते. कॉलेज संपल्यानंतर दुपारी दोन ते सहा या काळात त्याने एका कंपनीत पार्ट टाइम नोकरी पत्करली. राजीवचे व सुनीलचे कॉलेज एकच असल्यामुळे सुनील राजीवला अभ्यासात मदत करत असे. या कठीण परिस्थितीच्या वाळवंटात तोच एक "ओयासिस " होता. आईने “ लिज्जत पापड “ कंपनीचे पापड लाटून देण्याचे काम घरी सुरू केले. कंपनीच्या ऑर्डर कमी जास्त असल्यामुळे कामात नियमितता नव्हती. त्यामुळे या कामात पैसे म्हणावे तसे मिळत नव्हते. महिन्याचा भाजीपाल्याचा खर्च कसातरी निघत होता. दिवाळीच्या काळात त्याची आई लाडू, करंज्या करून देत असे. दिवाळीचा तो “ बोनस “च असायचा.
कसेतरी राजीव चे बी कॉम डिग्री शिक्षण पूर्ण झाले. त्याबरोबर सुनील चेही शिक्षण पूर्ण झाले.
पुढे एमकॉम करायचे होते पण खरोखरच घरची आर्थिक परिस्थिती साथ देईना. दोघांनी शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.सुनील बँकेत क्लार्क म्हणून लागला तर राजीव प्रायव्हेट कंपनीत साधा अकाउंटंट म्हणून लागला. एकाच शहरात असल्यामुळे व जवळच्या परिसरात असल्यामुळे दोघांची भेट सतत होत होती. सुनील ज्या बँकेत होते त्याच बँकेत राजीवच्या कंपनीचे खाते होते. राजीवला बऱ्याच वेळेला कंपनीच्या कामासाठी बँकेत जावे लागत असे. त्यामुळे आनाययासे भेट होऊन अधिक बोलणे होत असे. ते ज्या ठिकाणी राहत होते त्याच्या जवळपास एक मोकळे पटांगण होते. खूपच मोठे होते. सरकारी ग्राउंड असेल असे दोघांनाही वाटले पण ती एका मोठ्या बिल्डरची जागा होती. त्याने तेथे टोलेजंग टॉवर करण्याचे प्लॅनिंग केले होते. त्यामुळे तो सारखा बँकेत कर्जासाठी चकरा मारत होता.
बिल्डर सुनीलशी अधिक मोकळेपणाने बोलत होता. त्याला आपल्या नवीन साईट वरती रोजचे व्यवहार पाहणारा एक प्रामाणिक व कामसू अकाउंटंट हवा होता. सुनीलने आपल्या मित्राला राजीवला ही संधी आहे असे सांगितले. बिल्डरची ओळख करून दिली. बिल्डरला वाटले सुनीलने आपली फाईल बँकेत पुढे सरकवली तर आपल्याला लवकर कर्ज मिळेल म्हणून त्याने सुनीलने सुचवल्याप्रमाणे त्याचा मित्र राजीव ला आपल्या नवीन साईट वरती मॅनेजर कम अकाउंटंट म्हणून नेमले. पैशाचे व्यवहाराचे ज्ञान राजीवला होतेच. त्याने मनापासून खडी, वाळू, सिमेंट, विटा, लोखंड, इत्यादी बांधकाम साहित्याची माहिती व ज्ञान अधिक खोलपणे घेतले. साईट दोन वर्षे चालली. आता राजीव ला बिल्डिंग क्षेत्रातली बऱ्यापैकी नॉलेज आली होती. राजीव व सुनील नेहमी भेटतच होते. सुनील बँकेच्या रोजच्या लिखापडीमुळे तसं नाखुश होता. बँकेची नोकरी सोडावी असा विचार करत होता. एके दिवशी राजीवने सुनीलला बँकेत फोन केला व या संध्याकाळी आपण दूरच्या डोंगरावर निवांतपणे भेटून भरपूर गप्पा मारू असे सांगितले. सुनील तयार झाला. संध्याकाळी सहा वाजता दोघेही त्यांच्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगरावर गेले. थोड्या उंच ठिकाणी जाऊन जिथे माणसांची वर्दळ अजिबातच नसेल अशा ठिकाणी बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर राजीवने विषयाला सुरुवात केली.
आता दोन वर्षात मी बिल्डिंग लाईनचे नॉलेज बऱ्यापैकी मिळविले आहे. आता आपण दोघेही मिळून नवीन काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करूया असे वाटते. तुला काय वाटते ?
सुनील म्हणाला, मी तर बँकेची नोकरी लवकर सोडून दुसरीकडे शोधाशोध करावी या विचारापर्यंत आलेलो आहे. माझी प्रगती बँकेत पुढे होणार नाही असे वाटते. पण पुढे काही मार्ग दिसत नाही. तुझ्या डोक्यात काय आहे?
राजीव म्हणाला, आपण बिल्डिंग क्षेत्रात उतरूया. पण पैशाचे काय?
हो त्याची काळजी आहेच. पण आपण सुरुवातीला मोठा घास घ्यायचा नाही. आपण सुरुवातीला खडी, वाळू, डबर, लोखंड असा माल सप्लाय करण्याचे म्हणजेच ट्रेडिंग करण्याचे काम करूया. असा माल बऱ्यापैकी उधारीवर देणाऱ्या बऱ्याच कंपन्या व मोठे ट्रेडर माझ्या ओळखीचे आता झालेले आहेत. त्यासाठी सुरुवातीला वर्किंग कॅपिटल म्हणून साधारणपणे आपणास दहा लाख रुपये लागतील. आपण दोघांनी भागीदारीत हा व्यवसाय सुरू करूया. सध्या बँकेत तू असल्यामुळे तुझ्या बँकेत हे कर्ज प्रकरण आपण करूया. आपण दोघांनी पाच पाच लाख रुपये कर्ज घेऊया. त्यासाठी असणारे तारण आपण दोघेही एकत्र देऊया. एकदा कर्ज मंजूर झाले की साधारणपणे दोन-तीन महिन्यात तू नोकरी सोड. आपल्या या कामात आपल्या दोघांचीही गरज आहे. त्याशिवाय हा व्यवसाय व्यवस्थित पुढे जाणार नाही व प्रगती होणार नाही.
दोघानाही ते पटले. साधारणपणे तीन महिन्याच्या फॉलोअप नंतर त्यांचे दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. स्वतःचे कॉन्ट्रीब्युशन म्हणून दोघांनी एक एक लाख रुपये आपल्या बँकेच्या पार्टनरशिप खात्यात जमा केले होते. दोघांनी आवश्यक ते तारण जमा केले होते. सुनीलने मॅनेजरला भेटून प्रगती करण्यासाठी हे पाऊल उचलत आहे असे सांगितले. मॅनेजर भला माणूस होता. त्याने अधिक खळखळ न करता व एकाच वेळी दोन माणसांची प्रगती होत आहे म्हणून कर्ज मंजूर केले. दोन महिन्यानंतर सुनीलने बँकेतील आपली नोकरी सोडली. त्यापूर्वी तो दोन महिने संध्याकाळी राजीव च्या साइटवर जाऊन या उद्योगाचे धडे गिरवत असे. आंतरिक तळमळ असल्यामुळे त्याने दोन महिन्यात साधारणपणे २५% माहिती शिकून घेतली. राजीवला त्यामुळे आनंद झाला. राजीव व सुनील दोघांनी बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याचा धंदा सुरू केला. दोघे वेळेवर माल देत असत त्यामुळे बरेच बिल्डर त्यांच्यावर खुश होते. हळूहळू त्यांनी आपला उद्योग पुढे वाढवला. बँकेतून अधिक कर्ज घेतले व ट्रक, टेम्पो इत्यादी वाहतुकीची साधने वाढवली. त्यांचा उद्योग जोमात सुरू झाला. मधल्या काळात दोघांचीही लग्न झालीत. राजीवला दोन मुलगे झाले तर सुनीलला एक मुलगा व एक मुलगी झाली. दोघांची मोठी मुले आता दहा वर्षाची झाली होती. त्यांनी आता स्वतः मोठ्या बिल्डिंग बांधण्याचे काम सुरू केले होते. चांगला पैसा मिळत होता. आणि तो प्रसंग गुदरला म्हणण्यापेक्षा हादरला.
एका साइटवर दोघांचे २५ मजली इमारतीचे काम चालले होते. इमारतीच्या बांधकामासाठी दोघांनीही खूप कर्ज घेतले होते. आपले असलेले घर व गावाकडे छोटीशी शेतजमीन दोघांनीही तारण दिली होती. ट्रक, टेम्पो हे तर तारण होतेच. संध्याकाळी पाचची वेळ. दिवस थंडीचे होते. ५.३० नंतर अंधार होऊन काम थांबणार होते. म्हणून या दिवसात पाच वाजता काम बंद करण्यात येत होते. राजीव खुशीत होता. दहा मजली काम झाले होते. दिवसाचे नियोजन केल्याप्रमाणे प्रत्येक मजला वेळेत पुढे सरकत होता. पुढील दोन महिन्यात काम पूर्ण होणार होते. सुनील साईट जवळच उभे होते. अचानक मोठा आवाज झाला आणि काय कळायच्या आत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे बिल्डिंग पूर्ण कोसळली. कामावर असणारे मजूर व कंपनीचे अधिकारी त्यात पूर्ण गाडले गेले. आणि त्यात सुनीलही होते. पार्टनरशिप व मैत्री अशा विचित्र दैवयोगाने संपुष्टात येईल याची कोणालाही कल्पना नव्हती. एका सप्लायर चा फोन आला होता म्हणून राजीव दहा मिनिटे अगोदरच बाहेर पडले होते. नाहीतर ते सुद्धा त्यात निश्चितच सापडले असते. अर्ध्या तासाने त्यांना मोबाईलवर ही बातमी कळली. ते धावत पळतच साइटवर आले. दगड, माती, तुटलेल्या विटा, सुटलेले लोखंड यांचे ढिगारे पडले होते. अग्निशामक दलाचे बंब आले होते, माणसे आली होती. पण गाढलेल्या माणसांना शोधायचे कसे हा त्यांच्यापुढे मोठा एक प्रश्न होता. कारण मटेरियल चा पूर्ण डोंगर तयार झाला होता. साधारणपणे 200 माणसे गाडली गेली होती. त्यातील बाहेरील बाजूस असणारे २८ मृतदेह सापडले. तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर पुढील प्रयत्न करणे शक्य नाही या निर्णयापर्यंत सर्व अधिकारी आले व आहे तो मटेरियल चा डोंगर तसाच ठेवून मृतदेहांचे शोधकार्य थांबविण्यात आले.
सुनीलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कुटुंबात फक्त सुनीलच कमावते होते. पत्नी गृहिणी होती. पदरात दोन मुले. पती बांधकामाच्या उद्योगात आहे एवढेच पत्नीला माहीत होते. सामान्य भारतीय गृहिणी. घर चालवण्यापूरते पतीने पैसे आणले की विशेष चौकशी करायची नसते ही सामान्य धारणा. सुखी संसाराचे होत्याचे नव्हते झाले होते. मोठा मुलगा दहा वर्षाचा तर छोटी मुलगी सहा वर्षाची. त्यांच्या शिक्षणाची व पुढील भविष्याची मोठी जबाबदारी पत्नीवर अचानक पडली होती. काय करायचे हे तिला कळत नव्हते. सुनीलचे अंत्यसंस्कार व बाराव्याचा कार्यक्रम पूर्ण राजीवने उरकले. त्यानंतर दर आठवड्यातून एकदा राजीव व त्याची पत्नी दोघेही सुनीलच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीशी बोलून तिला धीर देत होते. दोघांनीही बिल्डिंगच्या बांधकामासाठी कर्ज काढले होते व तारण म्हणून आपली सर्व प्रॉपर्टी दिली होती. महिन्याभराने राजीव व त्यांच्या पत्नीने सुनीलच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीशी हा विषय काढला. तिला याची कल्पना होती. प्रश्न होता आता कर्जाचे पैसे कसे फेडायचे? सुनीलची एलआयसी पॉलिसी फक्त दहा लाख रुपयांची होती. हे दहा लाख व राहते घर यापेक्षा त्यांच्या कुटुंबात काहीच शिल्लक नव्हते.
राजीव बँकेत गेले व त्यांनी बँकेला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. सुनीलच्या कर्जाची जबाबदारी मी घेतो पण त्यांचे घर बँकेने ताब्यात घेऊ नये अशी विनंती केली. बँक तयार झाली. पण बँकेला प्रश्न होता, राजीव हे दुप्पट कर्ज कसे फेडणार ? धंद्यामध्ये पंधरा वर्षे असल्यामुळे राजीवना आत्मविश्वास होता. बँकेने त्यावर विश्वास ठेवावा अशी त्यांनी विनंती केली. बँकेचे मॅनेजर चांगले होते व सुनील पूर्वी बँकेचा कर्मचारी होता या आधारावर बँकेने राजीववर विश्वास ठेवला. राजीवची आयुष्यातील आता दुसरी इनिंग सुरू झाली.
त्यांनी आपले राहते घर विकले व भाड्याच्या खोलीत राहावयास गेले. कार विकली व फक्त स्कूटर ठेवली. त्यांनी पुन्हा बिल्डिंग मटेरियल जसे की वाळू, खडी, डबल, लोखंड इत्यादी सप्लाय करण्याचे निश्चित केले. आता पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावयाची होती. बिल्डिंगच्या उद्योगात असल्यामुळे त्यांना अनेक बिल्डर लोकांची माहिती होती. सचोटी हा राजीवचा मोठा गुण होता. तोच त्यांच्या आता कामाला आला. स्कूटर वर आता दिवसाचे शंभर ते दीडशे किलोमीटर दररोज फिरणे सुरू झाले. वाळू, खडी इत्यादी साहित्य मोठ्या सप्लायर कडून उधारीवर घ्यायचे व बिल्डरांना द्यायचे. त्यांच्या मागे लागून पेमेंट काढायचे व ते सप्लायरला द्यायचे अशी मोठी तारेवरची कसरत राजीवची सुरू झाली होती. त्यांनी मुलांना पूर्वीच्या जास्त फी असलेल्या शाळेतून काढून कमी फी असलेल्या शाळेत घातले. त्यांच्या ट्युशन बंद केल्या व पत्नीला मुलांचा अभ्यास घेण्यास सांगितले. मोठ्या मुलाला परिस्थितीची थोडीशी जाणीव होती, त्याला जुळवून घेणे थोड्याशा प्रयत्नांती जमले पण छोटा तर पाच वर्षाचा होता. त्याला खूप त्रास झाला. पण आभाळच फाटले होते, शक्य होईल तितके ठिगळ लावण्याचे काम सर्व बाजूंनी सर्वजण करत होते. दोन्ही मुले हुशार होती. आता घरीच आई अभ्यास घेत होती. खरे तर मुलांचा घरचा अभ्यास आई-वडिलांनीच घ्यावा अशी पूर्वीच्या काळची धारणा होती. पण आता आधुनिक युगात ट्युशन लावणे म्हणजे मोठी फॅशन झाली आहे. आई-वडिलांच्याकडे भरपूर पैसा असतो. ट्युशन लावली नाही म्हणजे आपला मुलगा कमी अभ्यास करेल व त्याला मार्क कमी मिळतील अशी आई वडिलांना भीती वाटते. ज्या आई-वडिलांना फुलांचा अभ्यास घेण्याची क्षमता असते त्यांनी मुलांचा अभ्यास खरोखरच घेतल्यास मुलांना त्याचा फायदाच होतो. राजीवची दोन्ही मुले मनापासून अभ्यास करत होती. त्याचा योग्य तो परिणाम झाला. पहिल्या दोन-तीन मध्ये मुलांचे नंबर असायचे. मोठ्या नचिकेतला दहावी मध्ये चांगले मार्क मिळाले ट्युशन नसताना. त्याच्या अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी पैशाची थोडी धावपळ झाली. पण राजीवने तेही सांभाळले. नचिकेतला बारावीत चांगले मार्क मिळाले व त्याला गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथे प्रवेश मिळाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला. जरी गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज असले तरी त्याची कमीत कमी फी भरणे सुद्धा सध्याच्या परिस्थितीत राजेवना जड जात होते. शिवाय त्याच्या हॉस्टेलचा, वह्या - पुस्तकांचा खर्च होताच. त्यात मंदी सुरु असल्यामुळे इतर उद्योगाप्रमाणे बांधकाम उद्योगावर सुद्धा परिणाम झाला. राजीवची बिल्डिंग मटेरियल ट्रेडिंगची उलाढाल कमी झाली. साहजिकच फायदा कमी मिळाला. मोठ्या मुलाचा इंजीनियरिंग खर्च व छोट्या शार्दुलचा दहावीचा खर्च करता करता त्यांचे खूपच हाल झाले. पण त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. मोठा नचिकेत चांगल्या मार्कांनी बीई पास झाला. गेटची परीक्षा देऊन आयआयटी पवई मध्ये तो पुढील शिक्षणासाठी गेला. त्याला आता शिष्यवृत्ती मिळत होती. त्यामुळे त्याचा खर्च आता खूपच कमी झाला होता. यथावकाश त्याचे एम टेक झाले व कॅम्पस इंटरव्यू मध्ये त्याचे सिलेक्शन झाले. त्याला बेंगलोरला चांगल्या आयटी कंपनीत नोकरी मिळाली. त्याने कंपनीत मन लावून काम केल्यामुळे कंपनीने खुश होऊन त्याला अमेरिकेला पुढील ट्रेनिंग साठी दोन वर्षे पाठविले. परत आल्यानंतर त्याच्या लग्नाचा विषय निघाला. त्याने अधिक खळखळ न करता आई-वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. वर्षभरातच त्याला पुन्हा एकदा सपत्निक पुढील पाच वर्षासाठी परदेशी जाण्याची संधी मिळाली. रामरावांनी व त्यांच्या पत्नीने त्याला आनंदाने परवानगी दिली. तो जाताना म्हणाला, शार्दुलच्या शिक्षणाचा खर्च मी पूर्ण उचलतो. शार्दुल आता बारावीत होता. साहजिकच बारावीनंतर एक वर्षाने त्याच्या शिक्षणाचा मोठा खर्च होणार होता.
नचिकेत आपल्या पत्नीसह फॉरेनला गेला व त्याने दिलेले आश्वासन हे निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणेच ठरले. सुरुवातीला तो म्हणायचा की अमेरिकेत सेटलमेंट साठी खूप खर्च येतो. त्यामुळे राजीवनी त्याच्याकडून पैसे येतील व आपल्या छोट्या मुलाचे शिक्षण व्यवस्थित होईल ही आशा आता सोडून दिली होती. छोटा शार्दुल सुद्धा हुशार होता. त्याला बारावीत चांगले मार्क मिळाले व त्याचे मोठ्या भावाप्रमाणेच गव्हर्मेंट इंजिनिअर कॉलेज, पुणे येथे ऍडमिशन झाले. राजीवनी नचिकेतला खूप फोन केले पण त्याच्याकडून अत्यंत कमी प्रतिसाद आला. आता तर तो दोन-तीन महिने फोन सुद्धा करत नव्हता. इकडून तिकडून सोय करून राजीवनी आपल्या शार्दुलचे इंजिनिअरिंगची शिक्षण चालू ठेवले होते.
आणि एके दिवशी नचिकेतचा अमेरिकेतून फोन आला. आईनेच फोन घेतला. नचिकेत आईला म्हणाला, आई तू आता आजी होणार आहेस. आईला खूप आनंद झाला. त्यावेळी राजीव घरी नव्हते. घरी संध्याकाळी आल्यानंतर पत्नीने त्यांना ही गोड बातमी दिली. नचिकेतचा शेवटचा फोन येऊन तीन वर्षे झाली होती. राजीवना सुरुवातीला आनंद झाला पण एक तासाने त्यांनी आपल्या पत्नीला विचारले, तीन वर्षानंतर नचिकेतला आपली कशी काय आठवण झाली. पत्नी म्हणाली काही का असेना मी आजी व तुम्ही आजोबा होणार आहात यापेक्षा अधिक तो आनंद कुठला. तुम्ही आता शंका कशाला काढता. ते म्हणाले, मी शंका काढत नाही पण तू पुढचा विचार केला आहेस का. त्याने आत्ताच का बोलावले. कितवा महिना सुरू आहे. पत्नी म्हणाली तीन महिने पूर्ण झालेले आहेत. राजीव म्हणाले, म्हणजे अजून सहा महिने आहेत. तुला तिथे साधारणपणे एक वर्ष राहावे लागेल. आपल्या छोट्या शार्दुलचे इंजिनिअरिंगचे शेवटचे वर्ष आहे. म्हणजे त्याच्या शिक्षणाची आपण काळजी घ्यायची नाही का. आणि तू विचार केला आहेस का की त्याने फक्त तुलाच का बोलावले आहे.
पत्नी म्हणाली, अहो मी मुलाची आजी होणार आहे, कशाला वेगवेगळ्या शंका काढताय. त्याने त्याच्या सासूबाईंना का बोलावले नाही. कारण ती सतत आजारी असते. तुला कल्पना आहे का अमेरिकेत गरोदर स्त्रीची काळजी घेण्यासाठी जी बाई येते ती किती पैसे घेते. ती दररोज दोनशे ते तीनशे किलोमीटर प्रवास करून कारने येते. जवळजवळ त्याचा पगार निम्म्यापेक्षा अधिक खाली होणार आहे. तसेच ती बाई २४ तास राहणार नाही. तू एकदा गेलीस की डिलिव्हरीच्या अगोदरचे सहा महिने व बाळ झाल्यानंतर पुढील सहा महिने त्यांची बिन पैशाची मोलकरीण होणार आहेस. तसेच तू अधिक काळजी घेशील जी पैसे देऊन काम करणारी बाई घेणार नाही. त्याने गेले पाच वर्षे आपणास किती पैसे पाठविले आहेत. त्याच्याकडून पैसे येतील ही आशा मी तीन वर्षांपूर्वीच सोडून दिलेली आहे.कोरोनाच्या काळात त्याने विचारपूस सुद्धा केली नाही, पैसे पाठविण्याचे तर दूरच. तुझा अमेरिकेत जाण्याचा व येण्याचा खर्च साधारणपणे पाच लाख रुपये होईल. पण त्याची बचत कमीत कमी एक कोटी रुपये होणार आहे याचा तू विचार केला आहेस का. आपल्या छोट्या शार्दुलच्या शिक्षणाचे काय? त्याची काळजी आपण करायला नको का करायला ? तुझी किंमत त्याने एक मोलकरीण म्हणूनच केलेली आहे याचा विचार तू केला आहेस का? आणि रामरावांनी नचिकेतला मेसेज केला
“तुझ्या पत्नीच्या डिलिव्हरीच्या अगोदरच्या काळासाठी व डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्याच्या काळासाठी भारतातून आमच्या कुटुंबातील तुला आवश्यक व अपेक्षित असलेली मोलकरीण येणे शक्य नाही. ”
दिलीप पाटील पिंपरी पुणे – ९८२२०६९०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा