“ बघ किती लठ्ठ झालीय ती…”
“ कंट्रोलच नाही जीभेवर…”
“ हं हे मात्र अगदी बरोबर हं… बोलायलाही फटकळ आणि खायलाही सुस्ती नाहीच…”
“ काहीही समोर येऊ देत… मसालेदार, गोड, तेलकट, विकतचं… कशाचंच वावडं नाही….”
“ कसं समजत नाही काय माहित? आपलं आपण लक्ष द्यायला नको का?”
“ नाही तर काय? बघ नं , उचललेच चार बिस्किटं… काय ते खाणं , काय ते रहाणं… काय ते बोलणं….”
“ तरूण आहे… या वयातच काळजी घ्यायला नको का… आता काही नाही वाटत…. एकदा का तब्येत बिघडली की एका मागे एक कितीतरी आजार घर करतील शरीरात… मग समजून काय फायदा?”
“ सांगा गं तिला कुणी समजवून…”
“ कोणी सांगायचं बाई? एका वाक्यासाठी दहा ऐकायची हौस कुणाला आली इथे.”
आणि एकच हशा !
“ ठेव ती बिस्किटं… मरत नाहीस जरा वेळ उपाशी राहिलीस तर…” खसकन तिच्या हातातली बिस्किटं ओढत आई तिच्यावर ओरडली. दोघींच्याही डोळ्यात पाणी! आई ओरडली म्हणून तिच्या, तर तिची टिंगल उडवली म्हणून आईच्या ! हे ही वारंवार होत होतं आजकाल…. कधी खुणावत तर कधी ओरडून आई तिच्या खाण्यावर बंधन घालायची .
तिच्याकडे वळणाऱ्या नजरा आणि आता चाललेली खसखस…आताशा नवं नव्हतं तिच्यासाठीही आणि तिच्या चिंतेत अर्ध्या झालेल्या आईसाठीही ! आजकाल कोणत्याही समारंभाला जाणं नकोनको व्हायला लागलं होतं तिच्या आईला.
माधवीने आता नुकतीच पंचविशी पार केली होती.
लहानपणी चुणचुणीत चपळ असणारी माधवी गेल्या सहासात वर्षापासून जास्तच सुस्त आणि स्थूल झाली होती. अभ्यासात हुशार असणारी ती पूढे काही शिकलीही नाही की कुठे नोकरीचा प्रयत्नही केला नाही.
“ छोटी मामी, मावशी आणि आई तूही … मला आजिबात नाही आवडत तुमचं असं माधवीताईची टिंगल उडवणं…” श्यामल नाराज होत म्हणाली, ”आणि मोठी मामी तू ही का ओरडतेस गं ताई वर ? “
“ मग काय करू सांग ना तूच ?” मोठी मामी म्हणजे माधवीची आई डोळ्याला पदर लावत म्हणाली, “ सगळे तिची टर उडवतात, आधी माघारी हसायचे, आता तुझा मोठा मामा नाही तर ,अगदी ऐकू येईल असं हसतात… त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा! रोज रोज कोण कुणाला सहानुभूती दाखवणार किंवा रोज कशाला कुणी समजून घेणार.” स्वतःवर ताबा ठेवत मोठी मामी म्हणाली.
सगळं वातावरण आता एकदम गंभीर झालं, एकदम शांतता!
श्यामल माधवीची आतेबहीण, नुकतीच वर्षापूर्वी डॅाक्टर झालेली. पूढे सायकॅट्रीत पदव्यूत्तर शिक्षण घेत होती .जवळजवळ सात वर्षांनंतर ती मावसभावाच्या लग्नाला भारतात आली होती आणि सगळ्यांना भेटत होती. मधल्या काळात माधवी आणि मोठ्या मामीच्या आयुष्यात बरीच संकटं आली होती हे तिला माहीत होतं. सुरुवातीला फोनवर बोलणं व्हायचं , ते ही इतक्यात बंदच झालं होतं.
“ मामी मला आठवतंय… ताई किती चुणचुणीत होती शाळेत असताना. पण कॅालेजमध्ये गेल्यावर मात्र हळूहळू वजन वाढलं, चेहऱ्यावर पिंपल्स पण येत होते… नाही का?”
“ हो नं! हार्मोन चा असमतोल , असं निदान केलं डॅाक्टरांनी… औषधी दिली, व्यायाम करायला सांगितला, खाणंपिणं संतुलित ठेवायला सांगितलं… खरी चूक तेव्हाच झाली…”
“ ???”
“हो नं, तिनेच काय मी ही मनावर नाही घेतलं, तेच चुकलं…. नंतर मात्र माझं टोकणं दोघा बापलेकीला खटकू लागलं… मी काही म्हटलं की ते तिची बाजू घेत मलाच बोलायचे….”
माधवीचं शून्य नजरेने बिस्किटांकडे बघणं सुरूच होतं!
“ तरीही बरं चाललं होतं… लठ्ठपणा होता तरी सुस्तपणा नव्हता गं … त्यामुळे वाटलं होईल काही दिवसांनी आपोआपच बरोबर …. पण नंतर ती कॅालेजला जायला कंटाळा करू लागली… अभ्यासातही मागे पडू लागली… घरीच तासनतास बसून असायची…. काही बोललं की लगेच चिडायची आणि फटकळपणे काहीतरी बोलायची….. “
“ का असं होत असेल? तू किंवा मामाने विचारलं नाही तिला ? “
“ कॅालेजमध्ये एकदा हिच्या वजनाबद्दलच सगळेजण टिंगल उडवत होते , ही अचानक तिथे गेली , तिच्या कानावर सगळं पडलं अन् ती संतापली… त्यांचं तर चुकलंच, पण हिने संतापाच्या भरात सगळ्यांनाच धारेवर धरलं… अपशब्द वापरले….अगदी जवळचे मित्रमैत्रिणीही दूरावले … त्यांची टवाळी हिने मनावर घेतली ती अशी! कुणी अगदी समजावून सांगितलं तरी ती खाण्याच्या आणि वजनाच्या बाबतीत सगळ्यांना फटकूनच बोलते… मनावर घ्यायचं तर वजन कमी करून दाखवायचं! पण तसं नाही… हे असं उलट बोलून…. मग आता ह्यांनी अशी चर्चा केली अन् हसल्या त्यात त्यांची तरी काय चूक? “
“हं…. बरोबर पण नाही!” श्यामल माधवी शेजारी बसत म्हणाली.
“नंतर मामा गेले… लग्न ठरत नव्हतं… कसंबसं झालं तर हिच्या स्पष्ट आणि कडक बोलण्याने तिथे कुणाशीच पटलं नाही…. उलट हिच्या वागण्या बोलण्याचा, खाण्याचा त्यांनी सगळ्या नातेवाईकांत जाहिरात केली की ही जास्तच बिथरायची … गेल्या वर्षभरात ती परत गेलीच नाही.”
“ मी मुद्दाम का करते? कितीही ठरवलं उलट बोलायचं नाही, चटपटीत, गोड खायचं नाही तरी दिवसातून दोन तीन प्रसंग असे येतात की माझी अस्वस्थता वाढते आणि बोलल्याशिवाय , काही तरी गोड खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही…” माधवीची निराशा लपत नव्हती.
“ स्ट्रेस… ताण तणाव… अस्वस्थता….नैराश्य….
नैराश्य लपवण्यासाठी बोलण्यात घाई आणि आक्रमकता… मग वादविवाद…आदळआपट… या सगळ्यातून सुटण्यासाठी कशात तरी मन गुंतवायचं…. काही करण्यासारखं , मन गुंतवण्यासारखं, आनंद वाढवणारं करायला नसलंच तर काही तरी खायचं… त्यातल्या त्यात गोड किंवा तेलकट चटपटीत… कारण त्यामुळे तात्पुरते हॅपी हार्मोन तयार होतात…तात्पुरता आनंद देतात … पण हळूहळू हे प्रमाण वाढतच जातं… सतत काही तरी खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही , मग वजनही वाढत जातं…. हे एक दुष्ट चक्र आहे, तेच माधवी ताई तुझ्यासोबत होतंय… “
“ असं असतं का खरंच?” धाकटी मामी अविश्वासाने म्हणाली.
“ हो… असतं,असंच असतं… सध्या माझं शिक्षण त्यातच सुरू आहे.” श्यामल ठामपणे म्हणाली.
“ याला उपाय तरी काय करणार?” श्यामलची आई.
“ आपण मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेऊ…” श्यामल.
“ वेडी आहेस का ? तशा डॅाक्टरकडे गेलं तर कायमचं लेबल लागेल , डोक्यावर परीणाम झाला म्हणून! सासरच्यांना नावं ठेवायला अजून एक मुद्दा…” माधवीची धाकटी आत्या .
“ मग काय असंच चालू देणार? नातेवाईक टर उडवतील, ती जास्त एकलकोंडी होईल आणि प्रमाण वाढत जाईल… पुढचा विचार केला पाहिजे की नाही?” श्यामल समजावत म्हणाली.
“ पण नुसत्या गोळ्यांनी सगळं व्यवस्थित होईल?” माधवीची आई अविश्वासाने म्हणाली.
“ अगं मामी, गोळ्या आणि कौन्सेलिंग दोन्ही… काही सेशन्स न कंटाळता, ताईच्या कलाने घ्यावे लागतील! एकदा तिच्या आतली ऊर्जा योग्य दिशेला लागली की सगळं सुरळीत होईल …”
“ म्हणजे कसं?” माधवीचा प्रश्न.
“ मला चांगलं आठवतं, तू खूप सुरेख चित्र काढायचीस शाळेत असताना… हो ना? आता काढतेस?”
“ आता कशाची गं चित्रं आणि रंग…शाळेत काढायचे….. नंतर कधीतरी रेघोट्या … नंतर तर बंदच… आता तर काहीच जमणार नाही मला …”
“ असं कसं म्हणतेस ताई? बालपणीचं कौशल्य विसरत नाही कुणी… सराव नसतो,म्हणून तसं वाटतं… तू प्रयत्न तर कर….”
“ बघते…. त्यात काही इन्ट्रेस्ट नाही वाटत आता…”
“ तुला यातून बाहेर निघायचं आहे ना? मग प्रयत्न पण तुलाच करावा लागेल! बाकीचे एकतर सल्ले देतील,सहानुभूती दाखवतील किंवा टर उडवतील… नाही का?” श्यामल बाकीच्यांकडे पहात म्हणाली.
“ पण जमेल ना?” माधवीच्या मनात परत निराशा.
“ ताई, प्रत्येकालाच राग, द्वेष, संताप, निराशा , एकटेपणा याचा सामना करावाच लागतो…. कुणी काही बोललं तर भली मोठी प्रतिक्रिया द्यावीच वाटते…. पण त्याचा काही फायदा होतो का? उलट आपली शक्तीच व्यर्थ होते आणि मन दुखावतं ते वेगळं…. यात जो गुरफटतो तो हारतो आणि जो पटकन बाहेर पडतो तो पूढे जातो! या सगळ्यात लागणारी ऊर्जा एखाद्या आवडीच्या कामात लावली की त्यातून लवकर बाहेर तर पडता येतंच… पण ज्यात लक्ष घातलं ते जास्त सुंदर आणि सुबक होतं. शिवाय सर्जनाचा आनंद मिळतो तो वेगळाच! पटतंय का? “
“ हो गं , करेल ती! तिने कंटाळा केला तर आम्ही तिच्याकडून करून घेऊ… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू म्हणते तसं तिला आधी समजून घेऊ !! तिचं बोलताना भान सुटलं तर काही दिवस ऐकून घेऊ….शेवटी कुटुंबाचा गोतावळा असतोच यासाठी ना!” धाकटी मामी माधवीला जवळ घेत निश्चयाने म्हणाली .
“ म्हणजे अर्धी लढाई इथेच जिंकली तर…!”
काही गडद रंगाचे मोठे मोठे नुसतेच स्ट्रोक,
काही अनाकलनीय वेड्यावाकड्या रेघोट्या,
कुठे विचित्र रंगसंगतीचा नुसताच गोलगोल गुंता,
रंगसंगतीचा ताळमेळ नाही की आकारउकारांचा नाही…..मनातले भावतरंगच शेवटी कागदावर उमटतात!
किती तरी चित्रं अशीच…. फक्त रंग आणि कागद खराब केलेत असाच कुणाच्याही मनात विचार येईल! पण केवळ माधवीच्या आईनेच नाही तर काकू , दोन्ही आत्या, तिचे मामा मावशी, इतर भावंडे आणि सर्वात जास्त श्यामल सर्वांनीच तिला समजून घेतलं. रोज चित्र काढायला भाग पाडत प्रोत्साहन दिलं! नंतर नंतर कागदावर उमटणाऱ्या साध्या फुला पानांचही कौतुक केलं!
आज माधवीच्या चित्रांचं प्रदर्शन होतं, शहरातील प्रसिद्ध आर्ट गॅलरी मध्ये !
गडद , रंगांचे जाड वेडेवाकडे फरकांडे ते सुबक सुरेख प्रमाणबद्ध रेखाटलेली स्केचेस ! उत्कृष्ट रंगसंगतीची निसर्गचित्रे, व्यक्तिचित्र, देवीदेवतांच्या सुंदर कलाकृती. सगळंच मनमोहक !
योग्य वेळी योग्य रीतीने झालेलं कौन्सेलिंग, माधवीची स्वतःची इच्छा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाची साथ यामुळे माधवीची कला बहरली! नुसतीच बहरली नाही तर तिला स्वतःच्या ओळखीसोबत अर्थार्जनाचा मार्गही गवसला!!
केवळ तीन वर्षात तिने सगळ्या शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यावर मात केली ! नकारात्मक गोष्टीत व्यय होणाऱ्या उर्जेला योग्य दिशा देण्यात कुटुंबाची भूमिका पण तितकीच मोलाची!! दृढ संकल्प आणि अथक प्रयत्न असतील तर काय असाध्य?
©️रश्मी.#rashmi lahoti
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा