रात्री तीन वाजता त्याची शिफ्ट संपायची... नी घरी येता येता, त्याला चार - सव्वा चार वाजायचे. तो येतांना अर्थातच सगळीकडे सामसूम असे, रस्ते निर्जन असत. अशात सिस्टीमवर 'जगजीत' लावत असे तो, मध्यम आवाजात... आणि घर यायच्या आधी विसेक मिनिटांवर, एका ठरलेल्या जागी गाडी उभी करत असे. मग आपल्या बाजूचं दार उघडायचं... एक सिगारेट शिलगावायची... आणि बरोब्बर त्याच दरम्यान चालू असलेलं, 'दिल ए बरबाद से निकला नही अबतक कोई' म्हणत म्हणत... ती ओढायची. 'कोई ये कैसे बताए के वो तनहा क्यूँ है' ही गझल संपेपर्यंत, त्याची सिगारेटही संपत असे. त्या नंतरच गाडीत बसून घरी... आणि हे अगदी असंच्या असं, रोजचं ठरलेलं असे.
तशीही घरी परतायची, फारशी अशी ओढ नसेच त्याला. मुळात घरातच थांबवत नसे त्याला, विशेषतः रात्रीचं. म्हणूनच तर त्याने मुद्दामहून त्याच्या 'BPO' मधून, ही आडनिड्या वेळेची 'US' शिफ्ट मागून घेतली होती... संध्याकाळी ६ ते रात्री ३ वाजेपर्यंतची. ऑफिसहून घरी परतल्यावर, कपडे बदलून तो झोपूनच जात असे... ते उठत असे थेट दुपारी बारा च्या सुमारास. फ्रेश होईपर्यंतच, त्याने लावलेला दुपारच्या जेवणाचा डबा येत असे. तो खाऊन झाल्यावर लगोलग, ऑफिसचा लॅपटॉप घेऊन बसत असे तो... नी घरून शक्य असलेली कामे उरकत असे. मग तयार होऊन चार वाजता, घराबाहेर पडायचं. खाली इराण्याकडे बन मस्का आणि चहा घ्यायचा, एक सिगारेट मारायची... नी निघायचं ऑफिस करता. ऑफिसमध्ये लवकरात लवकर... नी घरी उशिरात उशिरा पोहोचण्यातच, त्याचं आयुष्य चाललं होतं... ती गेल्यापासून. त्याची बायको... दोन वर्षांपूर्वी अचानक ब्रेन हॅमेरेज होऊन, अवघ्या काही तासांत गेली होती... पाच महिन्यांची प्रेग्नन्ट असतांना. त्याला तिच्यासाठी... नी तिच्या पोटातील त्यांच्या बाळासाठी, अगदी काहीही करायची संधी न देता. त्या दिवसापासूनच, रंग उडाले होते त्याच्या आयुष्यातले... निरस झालं होतं जगणं त्याचं. आपल्या वयाच्या तिशीतच, पोक्त झाला होता तो. गुलजार जसा म्हणतो... 'वक्त से पहले हादसों से लडा हूं.. मैं अपनी उम्र से कई साल बडा हूं'... अगदी तसाच.
तर... असंच त्याचं आयुष्य 'मागील पानावरून पुढे' अशा प्रकारे चाललं होतं, नी काहीतरी घडलं... काहीतरी अनपेक्षित. त्या रात्री कामावरून घरी येतांना... त्याने नेहमीच्या ठरलेल्या जागी, त्याची गाडी थांबवली. नेहमीप्रमाणेच जगजीत ऐकता ऐकता, सिगारेट शिलगावली त्याने... नी चपापला तो. त्या लाईटरच्या मंद प्रकाशात... त्याच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर जमिनीवर पडलेल्या तिला बघून, घाबरलाच होता तो. पण नंतर भानावर येत, त्याने तोंडातील सिगारेट फेकून दिली... नी पुन्हा लाईटर लावून तिच्याकडे पाहिलं. अत्यंत वाईट अवस्थेत होती ती... हे तिच्याकडे त्या तेवढ्याशा उजेडात पाहूनही, त्याला समजलं होतं. त्याने लगेच गाडीचे हेडलाईट्स ऑन केले... आणि तो दबकत दबकतच, तिच्यापाशी गेला. प्रचंड भीषण परिस्थिती होती तिची. केस विस्कटलेले... चेहऱ्यावर क्रूरपणे मारल्याच्या जखमा... जागोजागी रक्त साकळून, लाल - जांभळी पडलेली त्वचा... अंगातील टॉपची लक्तरं... स्कर्ट गुढग्यांच्याही खालपर्यंत आलेला... आणि अंतर्वस्त्रही आपापल्या जागी नाहीत. अशा भयानक अवस्थेतील, तिला पाहूनच त्याच्या लक्षात आलं की... ह्या मुलीसोबत कोणीतरी काहीतरी, प्रमाणाबाहेर वाईट केलेलं आहे. त्याने मग पुढे अजिबात वेळ न दवडता, पोलिसांना फोन केला होता.
ह्या गोष्टीला एव्हाना, आठवडाभर उलटून गेला होता. त्याचा जबाब, साक्ष, उलट तपासणी, प्रश्नांच्या फैरी, त्याच्या ब्लड नी सीमेन्सची चाचणी... असं सगळं काही झालं होतं पोलिसांकडून. त्यानेही अर्थातच शांतपणे, पुर्ण सहकार्य केलं होतं. अजूनही ती मुलगी अत्यवस्थच होती... आणि ती काहीच बोलू शकत नसल्याने, तिची ओळखही अद्याप पटली नव्हती पोलिसांना. त्या दृष्टीने त्यांचा पुरेपूर तपास चालू होता. प्राथमिक अंदाज असा होता की... त्या मुलीसोबत एकाहून अधिक जणांनी, कुकर्म केलं होतं. पण ती मुलगी स्वतः जोपर्यंत काही ठोस सांगत नाही, तोपर्यंत नक्की निष्कर्ष काढणं पोलिसांकरता कठीण होऊन बसलेलं. हॉस्पिटलच्या स्पेशल रूम मधील एका बेडवर, निपचित पडून होती ती मुलगी... आणि तिच्या जवळ दिवस - रात्र बसून होता तो, तिची काळजी घेत. तिचं सगळं हवं नको ते बघत होता तो, अगदी ऑफिसमधून सुट्टी घेऊन. अचानक उद्देश मिळाला होता जणू काही, त्याच्या आयुष्य जगण्याला. काहीतरी अर्थ प्राप्त झालेला अकस्मातच, त्याच्या ह्या श्वास घेण्याला. अगदी तेव्हापासूनच.... जेव्हा तिच्या तपशीलवार तपासणीत हे सुद्धा कळून आलं होतं की, ती प्रेग्नन्ट आहे... पाच महिन्यांची. त्यामुळेच आपल्या बायकोसाठी करू न शकल्याचं सारं काही, तो तिच्यासाठी करत होता... अगदी जीवाचं रान करून.
असेच दिवस सरले, दिवसांचे महिने झाले. ती आता बऱ्यापैकी उपचारांना प्रतिसाद देऊ लागली होती... जरी जबरदस्त मानसिक आघातामुळे, अजून बोलू शकत नव्हती. एव्हाना तिचा नऊवा महिना संपत आला होता. हे गेले चार महिने... त्याने काहीच कमी केलं नव्हतं, तिच्यासाठी शक्य ते करण्यात. हेतू फक्त हाच की... ती लवकर बरी व्हावी, नी तिचं बाळ सुखरूप जन्माला यावं. आणि आता तर तोच अधीर झालेला तिचं बाळ पहायला, त्याला उचलून हातात घ्यायला. तिच्या प्रेग्नन्सी बद्दल, डॉक्टरांचा काय तो निर्णय झाला होता. पाच दिवसांनी तिच्या बाळाला, सिझेरिअन करून जन्म देण्यात येणार होता... आणि हे ऐकून तो प्रचंड खुश झाला होता. ते पाच दिवस त्याने कसे काढले, हे त्याचं त्यालाच माहित होतं.
अखेर तो दिवस उजाडला. त्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर... अगदी मिनिटभरही न झोपता, तयार होऊन तो हॉस्पिटलला गेला... नी बघतो तर तिच्या रूममध्ये, त्याला बऱ्यापैकी गर्दी दिसली. बाहेर पोलिसांकडूनच कळलं त्याला की... तिच्या कुटुंबाचा शोध लावण्यात, अखेरीस पोलिसांना यश आलेलं होतं. अथक प्रयत्नांनंतर... मिझोराम मधील ऐझॉल ह्या शहरातील, त्या मुलीच्या कुटुंबियांना शोधून काढण्यात... पोलीस सफल झाले होते. हे कळल्यावर... त्याला स्वतःला नेमकं कळत नव्हतं की, ह्या सगळ्याचं त्याला बरं वाटलंय की वाईट. स्वतःशीच खिन्नपणे हसला तो... आणि तिच्या खोलीत न जाताच, तसाच आल्या पाऊली परतला... तिच्या होणाऱ्या बाळाला आपल्या न धरलेल्या हातांनी, भरभरून आशीर्वाद देत. कारण त्याला कोणाकडूनही आभार, धन्यवाद मानून घेणं अजिबात नको होतं. त्याला शेवटपर्यंत फक्त अपेक्षा होती... तिच्या डोळ्यांतून दिसणाऱ्या एका अस्पष्ट का होईना, पण ओळखीच्या छटेची... आणि अर्थातच तिच्या बाळाच्या, लुसलुशीत स्पर्शाची. पण ह्या आपल्या इच्छा तशाच अर्ध्यावर सोडून, तो निघून गेला तिथून... तिला मिळालेल्या तिच्या पुर्ण कुटूंबीयांपुढ्यात. त्याच्या आधीच्या जगात परतणार होता तो आता, जे विस्कटलेलं हे गेले चारेक महिने. पुढे आणि जगायला काही 'उद्दिष्ट' मिळतंय का, ते बघणार होता तो आता.
जाता जाता पॅन्टच्या डाव्या खिशातून, रुमाल काढला त्याने. ज्याच्या एका कोपऱ्यावर, सुकलेला पिवळसर रंग होता. मागच्याच आठवड्यात तिला तो हळद दूध पाजत असतांना. तिच्या तोंडातून गळलेलं थोडं दूध, त्याने ह्याच रुमालाने पुसलं होतं... आणि तो डाग काही गेला नव्हता. त्या आपल्या रुमालाकडे पाहून. खरोखरचा गळा दाटून येत खोटंच हसला तो, कुठेतरी वाचलेला शेर आठवून की. 'वो कच्चा रिश्ता.. पक्के रंग छोड गया'.
- सचिन श. देशपांडे
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा