शनिवार, २२ मार्च, २०२५

1807. आठवणींचे निसरडे कोपरे

      आज मी माझ्या एका जुन्या स्नेह्यांनां फोन केला. दोनेक महिन्यानंतर. त्यांची खबरबात घ्यायला. आता ते ऐंशीच्या दशकात आहेत, एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर आराम करत आहेत. कदाचित ते घेत असलेल्या औषधांचा दुष्परिणाम असेल किंवा वयामुळे असेल, ह्या खेपेला मला जाणवलं की त्यांचा मेंदू आठवणींच्या जंगलात चाचपडत होता. 
मी त्यांना विचारलं कसे आहात, तर माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी ते सतत माझं नाव घेत राहिले. त्यांच्या फोनमध्ये सेव्ह केलेलं नाव. पुन्हा पुन्हा, जणू काही हातातून निसटणारी एखादी मौल्यवान गोष्ट ते धरून ठेवायचा चिकाटीचा प्रयत्न करत होते.
ते पुन्हा पुन्हा मला विचारत होते,
 “आपण कसं ओळखतो एकमेकांना ?”
“आपण शेजारी राहात होतो का?”
“आपण कॉलेजमध्ये एकत्र होतो का?”
     प्रत्येक प्रश्न जणू एखाद्या मच्छीमाराने गढूळ पाण्यात पुन्हा पुन्हा गळ टाकावा, आणि प्रत्येक वेळी गळ रिकामाच वर यावा तसा. मी त्यांना पुन्हा पुन्हा हळुवारपणे आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत होते की आपण प्रथम कधी आणि कसे भेटलो, आपल्या ओळखीला किती वर्षे झाली याने काहीच फरक पडत नाही. मी फक्त त्यांची, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला फोन केला आहे. पण त्यांना ते मान्य नव्हतं. 
“नाही नाही, तू कोण आहेस हे आठवल्याशिवाय मला रात्री झोप लागणार नाही,” ते म्हणाले, शांत पण हट्टी सुरात. मग मी पुन्हा प्रयत्न केला, माहितीच्या छोट्या छोट्या धाग्यांमधून आठवणींचं जाळं विणायचा. मी त्यांना किती वेळा भेटलेय, आमची शेवटची भेट कुठे झाली होती, तेव्हा आम्ही काय बोललो होतो, काय खाल्लं होतं, सांगत राहिले सगळंच. पण काहीकेल्या त्यांच्या मनातला आठवणींचा तो दिवा पेटत नव्हता. शेवटी, सहज, बोलता बोलता मी माझ्या नवऱ्याच्या कंपनीचं नाव सांगितलं, आणि जणू काही, त्यांच्या मनातल्या आठवणींच्या चोरकप्प्याची चावी अचानक फिरली! एक दिवा पेटला, मनातला अंधार दूर झाला आणि एका दिव्याने दुसरा, मग तिसरा पेटवावा तसे शंकर रामाणींच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्या मनाच्या तमाच्या तळाशी सारेच आठवणींचे दीप लागले. 
     अचानक त्यांना एकेक करत सगळंच बारीक सारीक आठवायला लागलं. माझा नवरा फायनान्समध्ये आहे, मी शहराबाहेर एका सुंदर घरात राहते, माझी बाग, माझी तिळी मुले, काही वर्षांपूर्वी मला त्यांच्याकडे राहायला यायचं होतं पण ऐनवेळी काही अडचणीमुळे  येता आलं नाही…सगळंच. त्यांच्या मनातलं गोंधळाचं धुकं दूर झालं आणि त्यांच्या आवाजातला सूरही बदलला—गोंधळलेपणा, चाचपडत बोलणं गेलं आणि त्यांच्या आवाजात ओळखीची ऊब, उत्साह, आणि एखाद्या लहान मुलाच्या आवाजात असते तशी आनंदाची उधळण मला जाणवायला लागली. खरंच जादुई होता तो बदल. क्षणभर आधी धूसर असलेलं सगळं, एका क्षणात इतकं स्पष्ट झालं होतं, जणू डोळ्यांची चाचणी करताना भिंग नीट बसल्यावर चार्टवरची आधी अस्पष्ट, धुरकट दिसणारी अचानक स्पष्ट, तेजस्वी दिसायला लागतात तसं. पण त्यांच्या आवाजातला तो  आनंद अनुभवतानाही मला सारखं जाणवत होतं की त्या पहिल्या काही मिनिटांत त्यांना किती असहाय वाटलं असेल—मनातल्या बंद खोल्यांची दारे ठोठावताना? हे माहिती असून की त्या दारांमागे मौल्यवान आठवणींची रत्नभांडारे आहेत, पण त्या दारांची चावी कुठे ठेवली आहे हे आठवत नाहीये! 
वाढत्या वयासोबत आठवण अशी कमी का होत जाते?
     आधुनिक विज्ञान सांगतं की वय वाढतं तसं मेंदूतील हिप्पोकॅम्पस हा स्मृतीचा मुख्य भाग. त्याचा आकार कमी होतो. मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाहही कमी होतो आणि न्यूरॉन्समधले तंतू कमजोर होतात. औषधे, शस्त्रक्रिया, ताणतणाव, आजार ह्या सगळ्या गोष्टी हा बदल अधिक वेगाने घडवून आणतात. मेंदूच्या घड्यांमध्ये जमा होणारे बीटा-अमाय्लॉइड प्रथिन ज्याला काही लोक थट्टेने ‘मेंदूची विष्ठा’ असेही  म्हणतात. साचून मेंदूच्या पेशींमध्ये संवाद अडतात. न्यूरॉनच्या जाळ्यात भोके पडतात आणि त्यातून आठवणी निसटून जातात. हे थोड्याफार फरकाने सर्वांच्याच बाबतीत होत असतं. 
     पण स्मृती म्हणजे केवळ जीवशास्त्र नव्हे किंवा रसायनशास्त्रही नव्हे. स्मृती ही आपली ओळख असते. आपल्या स्मृतीतून आपल्या अस्तित्वाचा, आपल्या आयुष्यातल्या बऱ्या-वाईट अनुभवांचा, त्यातून आपण शिकलेल्या धड्यांचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा गोफ विणला जातो. जेव्हा स्मृतीचे रंग मेंदूतून गायब व्हायला लागतात, तेव्हा माणूस फक्त नावं, चेहरे विसरत नाही. तर स्वतःची ओळख, स्वतःच्या आयुष्याची संदर्भरेषाच हरवतो. स्मृतीचे हे रंग विटत, विरत जाण्याचा हा प्रवास आपण थांबवू शकतो का? त्यासाठी काय करता येईल? अलीकडे मी या विषयावर बरंच वाचतेय, कारण ओळखीच्या, प्रेमाच्या अनेक माणसांच्या बाबतीत हे घडत आहे. स्मृतींचे विरत जाणे आपण पूर्णपणे थांबवू शकत नाही. पण त्या प्रवासाची गती जरूर कमी करू शकतो. स्वामी शिवानंदांनी त्यांच्या लेखनात ह्या विषयावर खूप भर दिलाय. त्यांच्या मते नियमित व्यायाम, वाचन-लेखन, ध्यान, मनन, जप, साधं, सात्त्विक अन्न, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थपूर्ण नातेसंबंध - मग तो समाजाशी असो वा कुटुंबाशी-जोपासणे ह्या सर्व गोष्टी स्मृतिभ्रंशाची गती निश्चितपणे कमी करू शकतात. आधुनिक आरोग्यशास्त्र आणि मानसशास्त्रही हेच सांगतं. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकत राहणं, स्वतःला कामात व्यस्त ठेवणं, इतर लोकांशी संवाद जिवंत ठेवणं, आयुष्यातला तणाव कमी करणं, शारीरिक आरोग्य टिकवणं, चांगला आहार घेणं ह्या सर्व गोष्टी सगळं स्मृतीचं पतन कमी करू शकतात. आज माझ्या मित्राने मला ह्यातल्या सगळ्यात सुंदर गोष्टीची परत एकवार आठवण करून दिली. माणसामाणसातले बंध जपणं, ते तुटू न देणं याचं महत्त्व.
      कारण कधी कधी स्मृती हरवत असली तरी एखादा परिचित आवाज एखादं नाव एखादी विसरलेली आठवण प्रेमाने, संयमाने, जागृत करून दिली तर सगळ्या आठवणींचा ओघ परत येतो आणि कदाचित कुणा दुसऱ्या व्यक्तीला आठवणींच्या स्वरूपात त्याची ओळख परत देताना आपणही आपली स्वतःची ओळख पुन्हा शोधतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...