शुक्रवार, २१ मार्च, २०२५

1798. दागिन्यांनी भरलेली पेटी

  कमलाबाई आज एकदम खुशीत कामाला आल्या. सुधाताईंनी त्यांच्या चेहर्‍यावरील चमक लगेच हेरली.
"काय गं कमला, आज तर सोन्यासारख्या चमकतोय तुझा चेहरा !"
"ताई अहो, बातमीच तशी हाये. मी आजी होणारे. कालच फोन आला होता कविताचा. माझं लेकरू कधी इतकं मोठं झालं? कालपर्यंत माझ्या पदराला धरून माझ्या मागं-मागं करणारी  लेक आता आई होणार. कधी एकदा नातवंडाचं तोंड पाहतेय असं झालंय मला ! " 
 "खरंच मोठी गोड बातमी आहे गं. तू इतके कष्ट करून तिला शिकवलं, स्वतःच्या पायावर ती उभी राहील, इतकं सक्षम तिला बनवलं. पोटाला चिमटे काढले पण तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. एकटीने मोठ्या हिमतीने तिला सांभाळलं. हा  आनंदाचा प्रसंग साजरा केलाच पाहिजे. मी शिरा करते आपल्या दोघींसाठी. "
"ताई, माझ्या कविताची कधी मी कोणतीच हौस भागवली नाही. तिला धड कपडे नव्हते की पायाला चांगली चप्पल! कधी कपडे घेऊ म्हणले तर लगेच ती म्हणायची 'आई, मला कपडे नको, पुस्तकं घे.' कुणी कुणी दिलेल्या कपड्यांवरच तिनं कायम भागवलं. तिच्या लग्नात पण मला काहीच करता आलं नाही. साधा एक दागिना घेऊ शकले नाही पोरीला. तिच्या सासरचे लोकं लई चांगले. कविताचं शिक्षण आणि गुण बघून कशाची अपेक्षा न धरता माझी पोर पदरात घेतली. लई वाईट वाटलं ताई ! लोकं काय-काय करतात पोरीच्या लग्नात ! आणि मी? माझ्या या कमाईत तिच्यासाठी काहीच करू शकले नाही. पहिल्या दीवाळसणाला जावईबापू आणि कविताला फक्त कपडेच केले. तेव्हा पण लई वाटत होतं. एखादी अंगठी तरी घ्यावी, पण ह्या फाटक्या पदराची ती सुद्धा ऐपत नव्हती. माझी कविता लई गुणाची. तिची आणि जावई बापूंची  कसलीच  अपेक्षा नाही. पण माझं काही कर्तव्य हाये की नाही? 
        ताई, आता येणार्‍या बाळाला मी नक्की दागिना करणार. सोन्याचे डूल कसे वाटतील ताई? त्या डुलात छोटा लाल मणी पण घालील. बाळाने मान हलवली की डूल पण हलतील मग लोलकासारखा चमचम करील तो मणी. किती छान दिसल ना बाळाला ! बाळाच्या आजीकडून बाळाला ही पहिली भेट. ताई, या महिन्यापासून माझा अर्धा पगार माझ्या खात्यात टाकत जा. बाळ येईपर्यंत पैसे साठतील. बारशाला मी बाळाला तसेच डूल  देणार. "  
     होणार्‍या आजीकडे सुधाताई बघतच राहिल्या. आजी होण्याचा आनंद किती वेगळा असतो. प्रत्येक आजीसाठी तीचं नातवंड खास असतं. सगळ्या आज्यांची मनोराज्येही सारखीच असतात. ती आजी गरीब असो वा श्रीमंत. भावना शेवटी त्याच. नातवासाठी काय करू आणि काय नको असं तिला होऊन जातं.  कमलाबाईंनी  पैसे जोडायला सुरुवात केली. सुधाताईंनी तिला बॅंकेत खातं उघडून दिलं होत. तिचे बॅंकेचे व्यवहार त्याच बघत. बॅंकेत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा होऊ लागली. 
       दिवस, महिने सरत चालले. कमलाबाई लेकीला भेटून आल्या. कविता नोकरी करत असल्याने तिला मधे येणं शक्य नव्हतं. फोनवर मात्र त्या लेकीची रोज चौकशी करत. तिच्या सासरकडचे म्हणत होते, बाळंतपण तिकडेच करायचे. कारण त्यांना कमलाबाईंची परिस्थिती माहित होती. त्यात घर छोटं. पण कविताने हट्टच धरला की, ती माहेरीच जाणार. माहेरचं घर छोटं असलं तरी  मुलीसाठी ते राजवाड्याहून कमी थोडंच असतं. तिथल्या प्रत्येक गोष्टीत आईचं प्रेम दडलेलं असतं. भलेही सुखसुविधा काहीच नसो, लेकीसाठी आईचं सानिध्य लाख मोलाचं असतं. आणि बाळंतपणासाठी माहेराशिवाय दुसरं कोणतं ठिकाण मुलीला आपलं कसं वाटेल? कविताने आपला निर्णय सांगून टाकला. तिच्या घरच्यांनीही मग त्याला दुजोरा दिला. 
        कमलाबाई लेकीसाठी आणि तिच्या होणार्‍या बाळासाठी कशाची कमी ठेवणार नव्हत्या. त्यांची छोटी छोटी खरेदीही चालू झाली. दुपटे शिवून झाले. नेमके पावसाळ्याचे दिवस होते. दवाखाना घराजवळच असल्याने त्याची काळजी नव्हती. त्यांनी कविताचे नावही तिथे नोंदवले. कविता माहेरी यायला आता आठ-दहा दिवसांचाच काळ बाकी होता. कमलाबाईंनी नेहमीच्या कामाच्या ठिकाणी आधीच  राजेचे सांगून  ठेवले होते. एके दिवशी खूप पाऊस सुरू झाला. वादळ तर भयंकर होते. आधीच तकलादू झालेले घराचे पत्रे गळू लागले. गळणाऱ्या पत्र्यांचे काय करायचे याचा विचार त्या करत असतानाच इतका जोराचा वारा सुटला की, झिजलेले ते  पत्रे एका क्षणात उडून गेले. कमलाबाईंचं घर उघड्यावर पडलं. पाऊस आत शिरू लागला. त्यांना त्या घरापेक्षा आता लेकीच्या बाळंतपणाची चिंता वाटू लागली. पाऊस थांबला.
    पण मनात मात्र प्रश्नांचे थैमान सुरू झाले. आता नवीन पत्रे बसवायचे. किती खर्च येईल. कविताला आणि बाळाला कशाची अडचण व्हायला नको. बाळंतविडा बनवायचा. बाळासाठी डूल घ्यायचे. कसं करायचं? पत्रे बदलणं तर गरजेचं होतं. शेवटी त्यांनी सुधाताईंबरोबर जाऊन बँकेतून पैसे काढले. नवीन पत्रे बसवले. घर स्वच्छ केले. सगळं व्यवस्थित झालं. पण आता मनातली इच्छा तशीच राहणार. बाळाला दागिना कसा घेणार? 
       कविता आली. लेकीचे कोडकौतुक करण्यात कमलाबाई त्यांच्या चिंता विसरून गेल्या. बाळंतपण व्यवस्थित पार पडले. कमलाबाईंनी आपल्या नातवाला पाहिले आणि त्यांना जणू आकाशच ठेंगणे झाले. बाळाचे आणि कविताचे लाड पुरवता पुरवता दिवस कुठे जात होते त्यांनाही कळत नव्हते. त्यांनी कविताला खायला-प्यायला काही कमी पडू दिले नाही. तिची आणि बाळाची खूप छान काळजी घेतली. बाळाने चांगलं बाळसं धरलं. जे कुणी भेटायला येत ते बाळाचे खूप लाड आणि कौतुक करत. ते बघून कमलाबाईंचा ऊर अभिमानाने भरून येई. सुधाताई भेटून गेल्या. आता बाळ- बाळंतिणीची पाठवणी करायची वेळ आली़. कमालाबाई लेकीला घेऊन जाणार होत्या आणि बारसं करूनच परत येणार होत्या. बारशाची मोठी तयारी केली होती कविताच्या सासरकडच्यांनी. कमलाबाईंनी बाळासाठी कपडे, खेळणी घेतली. लेक आणि जावयालाही कपडे घेतले. त्यांचं मन मात्र राहून राहून भरून येत होतं. एक छोटासा दागिनाही त्या बाळासाठी घेऊ शकल्या नव्हत्या. लाल मणी असलेले डूल त्यांच्या मनातच राहिले होते. तेव्हड्यात सुधाताईंचा  फोन आला म्हणून  त्या त्यांच्याकडे गेल्या. 
"कमला अगं, तुला बाळासाठी डूल घ्यायचे होते ना. आपण बॅंकेत जाऊन बघू, तुझ्या खात्यात किती पैसे आहेत ते." 
" ताई, जे पैसे आतापर्यंत साठवले होते, ते घरासाठी खर्च झाले. काय असणार आहे आता बॅंकेत?" 
"अगं, तरी बघून येऊ एकदा." 
 दोघी बॅंकेत गेल्या. खात्यात पुरेसे पैसे होते. कमलाबाईंना आश्‍चर्य वाटले. 
 "अगं, मागे  शासनाच्या कोणत्या तरी योजनेत तू  गुंतवले  होते ना पैसे ! त्याचेच आले असतील . तुझे काम तर झाले ना. चल आता लवकर जा सोनाराच्या दुकानात. "
   कमलाबाईंचा चेहरा परत खुलला. त्यांची हौस पूर्ण झाली. बारशाच्या मुहूर्तावर बाळाला त्यांनी डूल घातले. अगदी त्यांना हवे होते तसे. लाल लोलकासारख्या मण्यांचे ! त्यांना भरून पावले. बाळाचा पहिला दागिना त्याच्या आजीकडून आला. आजीचे प्रेमच त्या डूलाच्या रूपाने बाळाबरोबर आता राहणार होते. तृप्त मानाने त्या घरी परतल्या. सुधाताईंना बारशाची मौज सांगताना त्या हरखून गेल्या होत्या. सुधाताई, त्या आजीच्या चेहर्‍यावरील अवर्णनीय आनंद बघून देवाला मनोमन हात जोडत होत्या. खरंच ! धन्य ती माय लेकीची जोडी आणि धन्य ते प्रेम ! 
      कविताला सुधाताईंकडून घराबद्दल सगळे कळले होते. आई तिच्याकडून पैसे घेणं शक्यच नव्हतं. कविताला नोकरी लागल्यावर ती सुधाताईंना दर महिन्याला पैसे पाठवू लागली होती. पण कमलाबाईंचा स्वाभिमान त्यामुळे दुखावला गेला. 'मी कष्ट करायला समर्थ आहे. लेकीचे पैसे घेतले तर पाप लागल मला'  या विचाराच्या आईला ती समजाऊ शकली नव्हती. कमलाबाईंनी ते पैसे परत केले होते. पण कविता, सुधाताईंच्या मदतीने दर महिन्याला आईच्या खात्यात पैसे पाठवतच राहिली. कमलाबाईंना याची काही कल्पना नव्हती. सुधाताई त्यांना ते सांगणारही नव्हत्या. आईचा स्वाभिमान जितका त्यांच्यासाठी मोलाचा, तितकीच मोलाची होती कविताची कर्तव्यभावना ! दोघीही आपापल्या दृष्टीने बरोबर होत्या . म्हणुन सुधाताईंनीच हा तोडगा काढला. कारण कविताचं म्हणण त्यांना पटलं, 
     "आई माझ्या आयुष्यातील अनमोल हिरा आहे. माझा सर्वात मोठा दागिना ! स्वतः अनेक हाल अपेष्टा सोसून तिने मला शिकवले. तिला वाटते की तिने मला काहीच दिले नाही. पण तिने मला जीवन जगण्यास लायक बनवले. चांगले संस्कार दिले. भलेही दागिन्यांची हौस तिला नाही करता आली, पण शिक्षणाचा दागिना तिने माझ्या गळ्यात  घातला. मी आईमुळेच आज स्वतःच्या पायावर उभी आहे. आज तिला वाटतंय की माझ्या बाळाला तिने दागिना करावा. आम्हाला तिच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. पण ती जर बाळासाठी डूल आणू शकली नाही, तर तीचं मन तिला खात राहील. तिच्या समाधानासाठी आपण हे नाटक करू. माझ्या स्वाभिमानी आईला न दुखावता तिची एक इच्छा तरी मी पूर्ण करावी असं मला वाटतं."
      कविताचं बोलणं ऐकून सुधाताईंना आज कळून चुकलं. जगातला कोणताही दागिना या मायलेकींच्या प्रेमापुढे फिका आहे. एकमेकांना जपणे, समजून घेणे, समाधानीवृत्ती, स्वाभिमान आणि आहे त्यात सुख मानण्याची वृत्ती हेच आयुष्यातील खरे दागिने  आहेत. कमलाबाईंकडे असलेली याच दागिन्यांनी काठोकाठ भरलेली पेटी त्यांनी कविताला आयुष्यभरासाठी भेट दिली आहे आणि कविता आज ते दागिने लेऊन आपल्या आईप्रमाणेच गुणांनी लखलखत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...