“मरणाच्या दारातून?” मी असं म्हंटल्यावर, बहीण तिचा नवरा आणि विनय एकमेकांच्या तोंडाकडे असे पहायला लागले जसे काही गुपितच उघडं झालं असावं. मी त्या तिघांकडे आश्चर्याने पाहू लागले. वाटलं Happy Ending होत आलेल्या चित्रपटात शेवटच्या क्षणाला अगदी दहा मिनिट असताना Twist येतो तसं काही इथे ही होत आहे. म्हणजे “पिक्चर अभी बाकी है|”
विनयनी सांगायला सुरवात केली, “तसं आता तुला सांगायला काही हरकत नाही. डॉक्टरांनी पुढच्या तीन तसात तुला अॅडमिट व्हा असं सांगितलं होतं ते यासाठी की तुझ्या पोटतील अपेंडिक्स इतका खराब झाला होता की तो कुठल्याही क्षणी फुटू शकत होता आणि त्यामुळे तुझ्या जीवाला खूप धोका होता. पण तुम्ही वेळेत हॉस्पिटला पोहचला म्हणून तो धोका टळला. पण इतक्यावर भागलं असंही नाही. ऑपरेशन करताना ब्लास्ट होण्याच्या अवस्थेतला अपेंडिक्स अर्थातच त्यांना आतडयाच्या फार जवळून कापावा लागला. तो आतडयाच्या जवळून कापावा लागल्यामुळे डॉक्टरांना आतडयाला टाके घालता येत नव्हते. म्हणजे एखादया खूप फुगवलेल्या फुग्याला जशी गाठ मारायला जागा उरत नाही तसं त्या आतडयाला टाके घालता येत नव्हते. डॉक्टरांनी ते कसेबसे घातले ही पण पुढचे दोन तीन दिवसांत ते टाके सुटून तुला त्रास होण्याची दाट शक्यता होती. म्हणूनच तुला एक दिवस “आय सी यू” मध्ये ठेवलं होतं आणि ती पिशवी यासाठी लावली होती की जर पोटातील टाके निघालेच असते तर पोटात झालेला रक्तस्त्राव त्यात जमा झाला असता आणि ते डॉक्टरांना समजलं असतं.” यदा कदाचित तसं झालं असतं तर परत तुझं ऑपरेशन करावं लागलं असतं आणि ते ही पोटाला कट देऊन. पण देवाच्या दयेने तुझ्या बाबतीत या सगळ्या वाईट घटना घडल्या नाहीत.
हे सगळं येकून मी थक्क झाले. पुढचे काही मिनिट मी सुन्न होते. मग मी विचारलं “तुम्हांला सगळ्यांना हे कधी समजलं होतं?” त्यावर विनय बोलले, “तुझं ऑपरेशन सुरू असतानाच हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसले होते. ते स्वत: फार टेंशनमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी हे मला, क्रांतीला आणि भाऊजी म्हणजे यतिन यांना सांगितलं होतं. मग आम्ही भक्ती आणि केदार यांना सांगितलं. ऑपरेशन झाल्यावर पुढचे दोन तीन दिवस आम्ही सगळेच खूप टेंशनमध्ये होतो. पण तुला यातील काही जाणून नाही द्यायचं ठरवलं होतं.
साधी वाटणारी गोष्ट कधी रौद्र रूप घेईल हे कुणी सांगू शकत नाही. माझ्या अवतीभोवती मरण रेंगाळत असताना मी किती नॉर्मल होते, बेफिकीर होते, शांत होते, काही नात्यांबद्दल खुश होते तर काहीं बद्दल नाराज. मगाशी ओला कारमध्ये कामाचे किती दिवस फुकट गेले याचा हिशोब लावत बसले होते, काय काय कामं करायची आजारातून उठल्यावर याची यादी मनात बनवत होते. आणि पुढच्या अर्ध्या तासात सगळंच बदलल्या सारखं झालं.
मरण...जिव आणि शरीर कायमचं शांत करतं पण कुणाचं ही मरण मला फार बोलतं करून जातं. मरण सांगून येत नाही पण ते असं हुलकावणी देऊन जातं ना तेव्हा खूप काही शिकवून जातं. असो.... शेवट मरणावर नको ना. मग पुढचे आठ दिवस बहीणीकडे सकाळ, संध्याकाळ नष्टयाला फक्त आणि फक्त सुप, नारळ पाणी, वरणाचं पाणी असं सुरू होतं. लिक्विड आहार असल्यामुळे सारखं बाथरूमला जायचं परत पोट रिकामं झालं की परत काहीतरी प्यायचं. लहान बाळ झालं होतं माझं. लाड करून घेत होते संगळ्यांकडून आणि सगळे करत ही होते. पुढच्या आठ दिवसांनी खुद्द डॉक्टरांनी टाके काढले आणि आता तुम्ही काहीही खाऊ पिऊ शकता यासाठी ग्रीन सिग्नल दिला. तरीही पुढे मी बेतानेच हळू हळू आहार वाढवला.
जानेवारीच्या १४ तारखेला माझ्या मुंबईच्या घरी आले. माझ्या वेदान्त पुढची पाच मिनिटं माझ्या मिठीत येऊन रडत होता. १५-२० दिवस मला सोडून राहिला होता बिचारा. पाऊण महिना घरापासून बाहेर यामुळे बरंच काही बदललं होते. बराच चहा पिणारी मी आता चहा फक्त आर्धा कप सकाळीच एवढाच पिऊ लागले. लॅपटॉपवर काम करताना तेलकट, मसालेदार चिप्स खायची ती सवय सुटली. सवय लागणे किंवा सुटण्यासाठी २१ दिवस लागतात हा फॉर्म्युला इथे वर्क झाल्यासारखा वाटला. काही सवयी कमी झाल्या काही लागल्या. पण घराची फार हालत झाली होती ती अशी.
घरपण
वर्षाची सुरवात झाली तरी
घरी नवं कॅलेंडर नव्हतं आलं
इन डोअर प्लांट सुकली सारी....
त्यांना प्रेमानी पाणी नव्हतं मिळालं
किचन पेपरचा रोल बिचारा
उघडा होऊन पडला होता
देवा जवळ फक्त उदबत्ती लागायची
घंटा नादाचा निनाद होत नव्हता.
कुकर मधील भात पामला होता सारा
बाहेरून जेवणाचा राबता सुरू होता.
केस पुसायचा तिचा मऊसूत पंचा
खरखरीत पोतेरं झालं होतं त्याचं.
धुळीच्या पुटांनी सगळीकडे
आपलं सामराज्य पसरवीलं होतं.
सगळीकडेच सगळा पसारा
ऑर्गनायझेशन काहीच नव्हतं.
म्हणे आम्ही सगळे बिझी होतो
घरात कोणच टिकतच नव्हतं.
डायनिंग टेबलवरचा पसारा
"आ" वासून बघत होता.
ड्रेसिंग टेबलचा ही थाट
सगळा गळून गेला होता.
येता जाता तिच्या बोटांनी
झंकारणारी गिटार बोलत नव्हती काही
साऱ्या घराचा सुर हरवला होता
ठिकाणावर नव्हंत काहीच.
तिचं दहा दिवसाचं हॉस्पिटलायजेशन
पण घरंच जणू काही आजारी पडलं
कळवळत होती बिचारी ती तिकडे
म्हणून घर ही अस्वस्थ होतं.
चार भिंती आणि वर छप्पर
बराच पैसा ओतून घर बांधलं जातं.
पण त्या घराला "घरपण"
फक्त तिच्यामुळेच तर मिळतं.
समाप्त
रुपाली चेऊलकर
२९/१२/२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा