संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या त्या तिघींनी एका पडक्या वाड्याचा आसरा घेतला. तसा बऱ्यापैकी निर्मनुष्य रस्ता, मुसळधार बरसणारा पाऊस, पावसामुळे झालेला काळोख, सोबत ढगांचा गडगडाट आणि वीजेचा कडकडाट. खरतर अशा वातावरणात त्या पडक्या वाड्यात कोणीही घाबरल असत. पण त्या तिघी मात्र निर्विकार होत्या.
रात्रीच साडेआठ वाजून गेले तरी पावसाचा जोर काही ओसरत नव्हता. मोबाईललाही नेटवर्क नव्हतं. इतका वेळ शांत बसलेल्या त्या तिघी हळूहळू एकमेकींशी संवाद साधू लागल्या.
या मुसळधार पावसासारखेच माझ्या डोळ्यातूनही असेच अश्रू वहात असतात. खूप खोल जखम झाली आहे हृदयात. अशाच मुसळधार पावसात मला एकटीला सोडून निघून गेला तो. कोणा दुसरीसाठी ! ज्याच्यासाठी घरदार सोडलं, आई वडिलांशी नातं तोडलं; तो माझ्या आयुष्याचा जोडीदार मला वाऱ्यावर सोडून निघून गेला. काय कमी होती माझ्यात? माझ्या प्रेमात? हे प्रश्न निरुत्तरीत ठेवून, माझ्या आत्मसन्मानाचा अपमान करुन. माझ्या हृदयावर असंख्य जखमा करुन निघून गेला मला सोडून कायमसाठी ! आई वडीलांनी घराची दारं कायमसाठी बंद केली होती. माझी चूक ही त्यांच्या दृष्टीने अक्षम्य अपराध होता. माझ्यामुळे त्यांची बेअब्रू झाली होती. त्यामुळे त्यांनीही माफ केलं नाही आणि मी पूर्णपणे एकटी पडले. पण ज्याच्यामुळे हे घडलं तो मात्र सुखात आहे; तिच्यासोबत ! शरीरावरच्या जखमा भरुन येतात पण मनावर झालेल्या जखमेच काय? जगावरचा आणि जगण्यावरचा विश्वासच उडाला आहे आता. पुन्हा दुसरं नातं जोडण्याची हिम्मतच उरली नाही; इच्छाही नाही आणि नात्यांवर विश्वासही उरला नाही. तरीही मी जगतेय. का जगतेय? आयुष्य संपवायची हिम्मत नाही म्हणून जगतेय.
कोणी सांगितल तुला शरीरावरच्या जखमा भरुन येतात म्हणून. काही वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार केला त्या नराधमाने. ओरबडून काढल मला. बड्या बापाचा बेटा होता. त्याला वाटल सुटेल तो आरामात. पण मी लढले. एकटीने लढले. शिक्षा झाली त्याला, अगदी फाशीची शिक्षा झाली. त्यावेळी त्याला लाचार झालेलं बघताना आत्मसन्मान सुखावला माझा. अशीच अगतिक झाले होते मी. तेव्हा हात जोडून, 'मला सोड' म्हणून विनंती करत होते त्याच्याकडे. पण नाही सोडलं त्याने मला. तिच अगतिकता त्याच्या डोळ्यात बघताना मनातून आनंदाच्या लाटा उसळल्या होत्या. पण त्याचा तो किळसवाणा स्पर्श आजही आठवतो मला. कितीतरी वेळा तासनतास शॉवरखाली उभी रहाते त्या बलात्काराच्या जखमा धुवून टाकण्यासाठी. टर्किश टॉवेलने अंग घासून अंगावर ओरखडे उठतात पण तरीही नाही भरुन येत त्या जखमा. एखादा तर आंघोळ करताना डेटॉलची पूर्ण बाटली ओतली होती आंघोळीच्या पाण्यात. पण त्या नराधमाच्या स्पर्शामुळे अंगावर झालेल्या असंख्य जखमा नाही भरुन येत. आई बाबा म्हणतात, "त्याला शिक्षा झाली पण आपलीही बदनामी झाली या प्रकरणात. आता कोण करणार तुझ्याशी लग्न?" पण खरं सांगू? नाही करायच मला लग्न. त्या किळसवाण्या स्पर्शाच्या जखमा जोपर्यंत भरुन येत नाहीत तोपर्यंत त्यावर हळूवार हलके स्पर्श विसावणार नाहीत.
मला तर शरीर आणि मन आहे का? असाच प्रश्न पडतो अनेकदा. गेल्या कित्येक रात्री बेडरूममध्ये नवऱ्यानेच केलेले बलात्कार झेलतेय मी अंगावर. तो शरीराजवळ यायचा नेहमी पण मनाजवळ यायला त्याला कधी जमल नाही. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता; कारण माझ शरीर हे जणू त्याची प्रॉपर्टी होतं. निर्विकारपणे सहन करत होते सगळ. पण त्यादिवशी मात्र अंगात ताप असताना नको म्हटलं म्हणून चक्क जबरदस्ती केली त्याने माझ्यावर. माझ्या आत्मसन्मानाला अक्षरशः पायदळी तुडवल त्याने आणि माझ्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या. त्यानंतर अनेकदा हे असे मन आणि शरीर दोन्हीवर झालेले बलात्कार झेलले मी; आजही झेलतेय. दोन्हीवरच्या जखमा कधीही भरुन येणार नाहीत. निव्वळ मुलांसाठी सगळ सहन करतेय. बेडरूमबाहेर अगदी आदर्श माणूस आहे तो. मी त्याच्या विरोधात बोलले तर बाकीचे जाऊ देत माझे आई वडीलही मलाच वेड्यात काढतील. त्यामुळे कोणालाही काही सांगू शकत नाही मी. म्हणूनच मी ठरवल आहे आता. आपल्याला मन आणि शरीर नाही असं समजूनच जगायच.
त्या तिघीही बोलून शांत झाल्या. जिथे आपले परके झाले तिथे अनोळखी असूनही त्या तिघी एकमेकींशी मोकळेपणाने बोलल्या. पाऊस थांबल्यानंतर सगळा रस्ता स्वच्छ झाला. हवेतला उकाडा जाऊन निवांत गारवा आला. त्या तिघीही आपआपल्या वाटेने निघून गेल्या. तिघींचही आयुष्य जसं आहे तसच चालू रहाणार होतं. त्यांच्या जखमा सहन करतच त्या जगणार होत्या; पण या पावसामुळे आज कितीतरी दिवसांनी त्यांच्या मनात साचलेला गाळ स्वच्छ झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा