शनिवार, २२ मार्च, २०२५

1806. I confess....!

      2021 मध्ये जवळजवळ  सात वर्षांनी मी अमेरिकेला गेले होते. तिथे आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. माझे चारही नातू आता चांगलेच मोठे झाले आहेत. दोघे तर चक्क नोकरीलाही लागले आहेत.  एका रात्री त्या चौघांनी मला घेरावच घातला. माझ्याजवळ येऊन बसले नि मला म्हणाले,
'आई तू आम्हाला लहान असताना खूप stories  सांगायचीस. आज पण सांग ना एखादी स्टोरी. पण आज तू आम्हाला तुझ्या real life मधली एखादी स्टोरी सांग. 
    मी क्षणभर विचार केला नि मग म्हटलं,'OK...आज मी तुम्हाला एक true story सांगते. माझ्या life मधली.
   '" Now I am 71 years old and today I want to confess something in front of you.....! 
   मी आज एक कबुलीजबाब देणार आहे. मी केलेल्या एका चुकीचा. माझ्या मनाशी,मी ती चूक हजारदा कबूल केली आहे.पण अखेर आणखी कोणापुढे तरी कबूल करेपर्यंत मला चैन पडणार नाही. खरंतर मला ती आठवण नकोशी वाटते. मला ती घटना आठवली की मी लगेच दुस-या कोणत्यातरी गोष्टीत मन रमवते आणि तात्पुरती त्या आठवणी पासून दूर पळते. आपल्या आयुष्यात कितीतरी घटना घडत असतात. त्यातल्या खूप  घटना मेंदू आपणहूनच विस्मरणाच्या कप्प्यात ढकलतो आणि आपण त्या गोष्टी विसरून जातो. पण काही घटना अशा असतात की त्यांचा आपल्या मनावर खूप खोल ठसा उमटतो. मग त्या  गोष्टी आपण विसरू शकतच नाही.कितीही वर्षं झाली, काळ कितीही पुढे सरकला तरीही त्याच्या प्रवाहासोबत त्या स्मृतीही वाहात वाहात तशाच पुढे येतात. आपल्याला नको असल्या तरीही, मधेच कधीतरी येऊन आपल्याला त्रास देतात.  आज मी तुम्हाला जी गोष्ट  सांगणार आहे ना, तिला जवळजवळ 65 वर्षं  लोटली असतील. म्हणजे मी तेव्हा होते साधारण पाच सहा वर्षांची. आता तुम्ही म्हणाल की इतक्या लहान वयात एखादी व्यक्ती करून करून किती मोठी चूक करेल? पण चूक ती चूकच.मग ती भले लहान असो किंवा मोठी  असो. नि त्या चुकीचं ओझं मी इतकी वर्षं नकळत मनावर बाळगते आहे.
     पहिलीत होते मी तेव्हा. मला अजूनही माझा तो वर्ग, तिथले  छोटे छोटे बाक, समोर मध्यभागी असलेली टेबलखुर्ची आंणि त्यावर बसून आम्हाला गाणी शिकवणा-या,गोष्टी सांगणा-या आमच्या गो-यापान,लांब केस असलेल्या बाई. सारं काही आठवतं. त्यांच्या उजव्या बाजूला जी भिंत होती तिथे खूप  खिडक्या होत्या. तिथल्या कोप-यात एक कच-याची बालदी ठेवलेली असायची. आणि डाव्या बाजूला वर्गाचं दार होतं. त्याला लागूनच मुख्याध्यापकांची खोली होती. माझ्या डोळ्यासमोर हे सगळं चित्र अजूनही अंधुकसं आहे. जणू गेल्या जन्मीचंच  असल्यासारखं...!
   तर झालं काय. त्यादिवशी मला आईने डब्यात बेसनलाडू दिला होता. बेसनाचा लाडू मला मुळीच आवडायचा नाही. तो खाताना टाळ्याला चिकटतो,असं मला वाटायचं. मी खूप कुरकुर केली. पण आई म्हणाली की आज डब्यात लाडूच न्यायचा आणि तो डबा संपवूनच आणायचा.शेवटी मी चुपचाप तो डबा दप्तरात ठेवला.मधली सुट्टी झाली आणि आमच्या बाई वर्गाबाहेर गेल्या. जाताना त्यांनी आम्हाला बजाालं की, 'आधी सगळ्यांनी दप्तरातले डबे बाहेर काढा. डबे खाऊन झाले की मग काय ते वर्गातच खेळा. पण दंगा मात्र करायचा नाही. ' बाई गेल्यावर आम्ही सर्वांनी 
आपापले डबे बाहेर काढले. मी  डबा उघडला आणि आतला लाडू पाहून मला घशाशी कसंसंच व्हायला लागलं. पहिला घास  कसाबसा खाल्ला. पण तो घशाखाली जाईचना. सगळेजण भराभर आपापला डबा खाऊन वर्गातच खेळायला लागले होते. आधीच माझं अर्धं लक्ष होतं खेळात. आता हा लाडू अर्धातास झाला तरी काही संपायचा नाही. मी हळूच दुसरा छोटासा घास घेतला. तो तोंडातच फिरायला लागला. काय करावं बरं? आणि मला एक कल्पना सुचली. असं वाटलं की हळूच हा लाडू मुठीत घेऊन कच-याच्या बालदी जवळ जावं आणि तो लाडू बालदीत टाकून द्यावा. प्रथम तर असलं काहीतरी करायच्या विचारानेच मला धडधडायला लागलं..! कोणी पाहिलं तर? नक्कीच बाईंना नाव सांगतील आणि मग बाई अशा रागावतील. सगळ्या वर्गासमोर आपली लाज जाईल. पुन्हा हे आईला कळलं की बघायलाच नको. त्यापेक्षा लाडू  खाणं परवडलं. पण कितीही मनाची तयारी केली तरी लाडू काही खाववेना. अखेर मनाचा हिय्या करून मी उठलेच.लाडू हळूच हातात घेतला आणि डबा बंद करून दप्तरात टाकून मी, जणू आपण त्या गावचेच नाही अशा अविर्भावात इकडे तिकडे पाहात कोप-यात बालदीजवळ गेले. पुन्हा पुन्हा एकदा सगळ्या वर्गावरून एक चोरटी नजर फिरवली. माझ्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. मी हळूच तो लाडू बालदीत टाकला आणि वळून, सगळ्यांमधे मिसळून खेळायला लागले. असं वाटलं, किती सोप्पं होतं हे सगळं. आपण उगीचच एवढ्या घाबरलो होतो.  तेवढ्यात मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली आणि बाई वर्गात आल्या. आम्ही सगळे पटापट आपापल्या जागेवर गेलो.बाईंनी रोजच्यासारखं विचारलं, 
 'सर्वांनी डबा नीट संपवला...?'
 'हो.... ! सर्वांचं कोरसमधे उत्तर. 
 'डबा खाऊन झाल्यावर वर्गात मस्ती केली? '
 'ना sss ही....' सगळे जोरात. मग सगळ्यांनी उठून एकसाथ,
 ' नमस्ते बाई ' चा पुकारा केला. 
 ' नमस्ते...! बसा खाली. '
       आम्ही सगळे नीट बसलो आणि तेवढ्यात कच-याची बालदी घेऊन जाणा-या मावशी आल्या. माझा एक डोळा त्यांच्यावर होताच. त्यांनी बालदीतला कचरा वरखाली केला आणि त्या एकदम म्हणाल्या,' अग्गोबाई, बालदीत बेसनचो लाडू खंयसून इलो?' मावशींच्या तोंडचे शब्द ऐकून आमच्याशी बोलत असलेल्या बाई एकदम थांबल्या. 
'बघू..बघू..कच-यात बेसन लाडू? खरंच की.' आणि मग आमच्याकडे वळून पाहात त्यांनी विचारलं, 
'काय रे, आज डब्यात बेसनलाडू कोणी आणला होता? आणि कच-यात का टाकून दिला?' सगळी मुलं एकमेकांकडे बघूून आम्ही नाही..आम्ही नाही.' करायला लागली. 
   आता बाईंचा सूर एकदम करडा झाला. 'लवकर सांगा आणि खरं बोला. कोणी टाकला लाडू? तुम्ही कबूल केलं नाही तरी माझ्याकडे मार्ग आहेत बरं का वेगळे. मला सगळं कळतं. मी ओळखू शकते कोण खोटं बोलतंय ते. चला..चला..लवकर सांगा. नाहीतर मी एकेकाला जवळ बोलावून विचारणार. मला लगेच समजेल हे कोणाचं काम ते.
इथे बाईंचा रागावलेला आवाज ऐकून मला तर घाईची लागली. छातीत तर एवढ्या जोरात धडधड व्हायला लागली की मला वाटलं, ही धडधड अख्ख्या वर्गाला ऐकू जाणार. माझ्या घशालाही एकदम कोरड पडली. आता बाई एकेकाला जवळ बोलावून विचारणार, ' तू टाकून दिलास लाडू..?' मला तर बाईंच्या चेह-याकडे पाहायचीही हिंमत होणार नाही. मग बाईंना तर लगेच कळेल. बाई मला शिक्षा करतील. मुख्य म्हणजे सगळा वर्ग मला हसेल. खोटारडी म्हणेल. मग मला कोणी कधी त्यांच्यात खेळायलाही घेणार नाहीत आणि ही गोष्ट घरी आईला कळली मग तर संपलंच. काय करू मी आता? यापेक्षा लाडू खाणं नक्कीच सोपं होतं. कुठून बुद्धी झाली मला लाडू टाकून द्यायची.आता मी काय करू. काय करू?'  आणि मग अंगावर पडणारं ओझं जिवाच्या आकांताने ढकलून द्यावं तशी मी उठले, नि एकदम माझ्या शेजारी बसलेल्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाले, 
'बाई , मला ठाऊक आहे लाडू कोणी टाकून दिला ते. मी पाहिलं, ही ना लाडू घेऊन बालदीजवळ गेली आणि हिने हळूच हातातला लाडू बालदीत टाकला नि परत जागेवर येऊन बसली. '
माझ्या शेजारी बसणारी मुलगी  आमच्या वर्गात नवीनच आली होती. तिचं नावही मला धड माहीत नव्हतं किंवा आज इतकं सारं सांगताना मला ते नाव अजिबातच आठवत नाहीये. पण मी तिच्याकडे बोट दाखवताच बाईंनी तिला उभं केलं आणि अगदी शांत सुरात विचारलं, 
'तू टाकलास लाडू कच-याच्या बालदीत?' पण बाईंच्या शांत सुरामागची धार सर्वांनाच कळत होती. ती इतकावेळ निश्चिंतपणे बसलेली मुलगी एकदम दचकली.
'मी..? मी नाही बाई. मी तर आज लाडू आणला पण नव्हता डब्यात..!' तिच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. आता पुन्हा मला धडकलं. बाईंनी हिच्या शब्दांवर विश्वास ठेवला तर?'  मग उसन्या अवसानाने मी म्हटलं, 
'ए ,खोटं नको बोलूस हं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुला लाडू टाकून देताना.   'ए, बाकी कोणीतरी पण नक्की पाहिलं असेल ना..? 'मी इतर मुलामुलींकडे पाहून विचारलं. ती तर सगळी माझी मित्रमंडळीच होती आणि 
कसं असतं ना, गल्लीतल्या कुत्र्यांमधे जर एखादा नवा कुत्रा आला तर तो त्या सर्वांना त्यांचा शत्रूच वाटतो आणि सगळे एक होऊन त्याच्यावर तुटून पडतात. त्यादिवशी तसंच काहीसं झालं असावं. त्या नवीन आलेल्या मुलीच्या विरोधात मी बोलते आहे म्हटल्यावर एकदम चारपाच जणांनी हात वर केले. 
'हो बाई. मी पण पाहिलं होतं तिला हळूच त्या कोप-याकडे जाताना....!'
'बाई बाई. मी तर चक्क तिला बालदीत काहीतरी टाकतानाही पाहिलं होतं...!'
      आता हळूहळू तर सगळी मुलंच तिच्याकडे बोट दाखवत होती आणि ती बिचारी ओक्साबोक्शी रडत होती.  आता मी सुटले हे मला कळत होतं. पण त्याचवेळी, मी चुकले आहे. हे सारं चुकीचं काहीतरी सुरू आहे. असं माझं मन सांगत होतं. बाईंनी तिला जवळ बोलावलं आणि त्या म्हणाल्या,
'हे बघ, खोटं कधीही बोलू नये. सगळ्यांनी तुला पाहिलं असताना ही तू कबूल करत नाहीयेस. एकदा खरं बोलून टाक. नाही तर मी तुला मोठेसर आहेत ना त्यांच्याकडे नेईन हं. मग ते काय शिक्षा करतील ते मला नाही ठाऊक. सांग बघू मला, तू तो लाडू का टाकलास कच-यात? तुला आवडत नाही का बेसनलाडू?'
'नाही बाई. मला बेसनलाडू खूप आवडतो. मग मी कशाला टाकून देईन? माझ्या आईने डब्यात बेसनलाडू दिलाच नव्हता.' ती रडत रडत म्हणाली. 
   आता कदाचित बाईंनाही वाटलं असेल की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मुख्याध्यापकांकडे घेऊन जाण्यात काहीच अर्थ नाही. पण इतर मुलांनाही  'खोटं बोललं तर शिक्षा होते हे कळणंही आवश्यक होतं. म्हणून त्या तिला म्हणाल्या, 
'जा तू जागेवर आणि ताससंपेपर्यंत बाकावर उभी राहा. हीच तुला शिक्षा. पहिल्यांदाच तू खोटं बोलताना सापडली आहेस, तेव्हा तुला इतकी शिक्षा बास् आहे. पण लक्षात ठेव, खूपदा आपल्याला वाटत असतं की मला चूक करताना, खोटं वागताना कोणीच पाहिलेलं नाही. पण असं नसतं. देवबाप्पा सगळं बघत असतो. त्याला सगळं कळत असतं आणि तो आपल्याला आपल्या वागण्याची शिक्षा दिल्याशिवाय राहात नाही.' 
     बाई हे शब्द तिला उद्देशून बोलत होत्या. पण ते ऐकून माझ्याच हृदयाचा थरकाप होत होता. खरं तर ते शब्द माझ्यासाठी होते. मला माझ्या वागण्याची आता खूप खूप लाज वाटत होती आणि देवबाप्पा मला शिक्षा करणार याची खात्रीही  वाटत होती. एकदा वाटत होतं की सरळ उठावं आणि बाईंना सांगावं 'बाई' मी चुकले. एक नाही तर दोन चुका केल्या आहेत मी. एकतर लाडू बालदीत मीच टाकला. ही पहिली चूक आणि ती कबूल न करता तिचा आळ दुस-याच एका निरपराध मुलीवर टाकला. ही तर खूपच मोठी चूक....!'
   पण माझ्यात तेवढी हिंमत नव्हती. 'बाईंना राग येईल. बाई नक्की आपल्याला मुख्याध्यापक सरांकडे नेतील. आईलाही भेटायला बोलावतील. सगळेच मला खोटारडी समजतील. मुख्य म्हणजे वर्गातली सगळी मुलं मला हसतील'. मला ते सहन झालं नसतं. सर्वांच्या नजरेतून मी उतरेन ही कल्पनाही मला करवत नव्हती. म्हणून मी गप्पच बसले. पण असं वागून मी माझ्याच नजरेतून किती उतरले होते ते मला त्या वयात कळत नव्हतं. दुस-या दिवशी शाळेत आल्यावर मला त्या मुलीशेजारी बसणं तर सोडाच पण तिच्याकडे बघण्याचीही हिंमत होत नव्हती. मी दोन चार दिवस कसेतरी काढले आणि मग,'बाई, तिस-या रांगेतून मला नीट दिसत नाही. मला पहिल्या रांगेत बसवा ना...!' 
     अशी बाईंच्या मागे भुणभुण लावून मी माझी जागा बदलून घेतली. ती मुलगी तशीही खूप शांत आणि अबोल होती. पण एरवी वर्गातल्या प्रत्येकाशी बडबड करणारी मी, तिच्याशी मात्र कधीही बोलायला किंवा मैत्री करायला गेले नाही. अर्थात, 'मी  तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हते हे त्यामागचं खरं कारण होतं. आम्ही पहिलीतून दुसरीत गेलो तेव्हा नेमक्या आमच्या तुकड्या बदलल्या होत्या. मी आधीच्याच तुकडीत आणि ती मुलगी दुस-या तुकडीत गेली होती. मला तर ते पाहून मनाला खूपच हलकं हलकं वाटलं. आता ती मला दिवसभर दिसत राहाणार नव्हती. त्यानंतर आम्ही कधीच एका तुकडीत आलो नाही. त्यामुळे आमचा कधी एकमेकींशी संबंधही आला नाही. हळूहळू मी तिचं नावही विसरून गेले. कदाचित ती देखील, काळाच्या ओघात मला विसरली असेल. ही घटनाही विसरून गेली  असेल. पण वयाच्या पाचव्या वर्षी घडलेली ती घटना मी मात्र आजतागायत विसरू शकलेली नाही. अजूनही तो वर्ग...ती बाकं...त्यातल्या तिस-या ओळीत एकमेकींशेजारी बसलेल्या आम्ही. ती मधली सुट्टी. मी हळूच टाकून दिलेला माझ्या डब्यातला बेसनलाडू. मी तिच्यावर घेतलेला खोटा आळ. सर्वांसमोर उभी असलेली, भेदरून गेलेली, ओक्साबोक्शी रडणारी आणि, 
'बाई, मी खरं सांगते. मी नाही लाडू टाकला बालदीत. मी आज डब्यात बेसनलाडू आणलाच नव्हता....!'  असं पुन्हा पुन्हा सांगणारी ती मुलगी. हे दृष्य खूपदा माझ्या डोळ्यांसमोर उभं राहातं. अर्धवट काहीतरी स्वप्नात येतं. माझ्या मनात त्यावेळी दाटलेल्या अपराधी भावनेसकट !
'कोणी नसलं तरी देवबाप्पा सगळं बघत असतोच.'  या बाईंनी सांगितलेल्या वाक्यासकट..!
'पण तरीही आजतागायत ही घटना मी कोणालाही सांगितली नव्हती. आज तुम्ही मला माझ्या 'real life ' मधली story सांग असं म्हणालात तेव्हा मला वाटलं की हीच एक शेवटची संधी आहे. हे सगळं कोणालातरी सांगून टाकायची. माझ्या मनावरचं एक अदृश्य ओझं उतरवून टाकायची.' 
     त्यांना ही कहाणी सांगताना, मी तो प्रसंग नव्याने जगले. अगदी त्यातल्या बारकाव्यांसकट. माझ्या त्यावेळच्या सर्व भावभावनांसकट माझी गोष्ट जेव्हा सांगून संपली तेव्हा मी अगदी हुंदके देऊन रडत होते. ती मुलगी तेव्हा रडली होती तशीच...!  मला हे सारं ह्या मुलांना सांगताना असंही वाटत होतं, की माझी ही गोष्ट ऐकून माझ्या चारही बाळांना माझ्याबद्दल काय वाटेल? लहानपणापासून माझं प्रेमळ रूप पाहाणा-या. माझ्या असंख्य कथांमधून चांगलं काहीतरी शिकणा-या..आणि माझ्यावर भरभरून प्रेम करणा-या माझ्या या नातवंडांच्या मनात आता माझी काय प्रतिमा तयार झाली असेल?  पण ही कहाणी मी जेव्हा संपवली तेव्हा मी रडत होते आणि माझ्या चारही बाळांच्या  डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. मोठाआशय माझ्या जवळ येऊन माझे डोळे त्य्याच्या हातांनी पुसत होता. तनयने माझ्या गळ्यात हात घातला होता नि तो म्हणत होता.  'Don't cry aai, तू का रडतो? केयूर माझा हात हातात घेऊन मला थोपटत होता आणि सगळ्यात धाकटा आयुष माझ्या मांडीवर डोकं ठेऊन स्वतःचेच डोळे पुसत होता... !
त्या चौघांचंही हळुवार वागणं आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून इतकी वर्षं खोलवर अस्वस्थ असलेल्या माझ्या मनाचं जणू शांतवन झालं होतं. मला कळत होतं की माझ्या बाळांनी मला माफ केलंय आणि मला अगदी मनापासून असं वाटत होतं की जणू आज इतक्या वर्षांनंतर त्या मुलीनेही मला माफ केलं आहे...!!!
    
- मंगला खानोलकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...