शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कुणीच कामाला सुरवात करत नाही. तसा तो खाऊन आम्ही रोजच्याप्रमाणं आजही सुरवात केली. पण आज काहीसा वेगळाच दिवस होता. माझ्या टेबलवरला तो कावळ्यासारखा काळाकुट्ट फोन केकाटला. हा लँडलाईन सेट सात वर्षांपूर्वी घेतला होता. मालकाला तो ‘लकी’, म्हणून अजून तसाच आहे.
“नमस्कार, दैनिक दिनकर… बोला!”
“चीफ एडिटर?”
“हां, बोलतोय…”
“काहो? मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे, जी तुम्हाला हवं त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तिथं नेते !”
“अहो, अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी टॅक्सी कशी असू शकते?”
“नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले. तुम्हाला अश्या बातम्या माहीत असत्यात !”
“अशी काही अधिकृत बातमी आत्तापर्यंत तरी आमच्यापर्यंत आलेली नाही. आली, तर उद्या पेपरात तुम्हाला नक्की दिसेल. धन्यवाद.”
मी फोन कट केला. काय एक एक महाभाग असतात? काय तर म्हणे, ‘तुम्हाला हवं त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहात, तिथं नेते!’ अशी टॅक्सी…!!!
पुन्हा फोन वाजला.
“नमस्कार…”
“नक्की अशी टॅक्सी नाही ना?” मघाचाच आवाज.
हा मुडदा समोर असता, तर त्याचा पुन्हा मुडदा पाडला असता. एकदा सांगून कळत का नाही?
“अहो, कितीदा सांगायचं…???”
“नाही, म्हणजे तो धुमाळ म्हणत होता… पण तो खोटं बोलत असेल.”
मी काही सुनवायच्या आत त्यानंच फोन बंद केला. दुसऱ्या क्षणी पुन्हा रिंग वाजली… साला वैताग ! मी रागानं रिसीव्हर उचलला.
“अबे, भाड्खाऊ……”
“तोड सांभाळा कुलकर्णी ! मी देवधर बोलतोय…”
देवधर माझा बॉस !
“सॉरी सर , एक फोन मघापासनं……”
“उद्या बेंगलोरला सकाळी नवाला एडिटर्स मिट आहे. आपले सारे फॉरेन कोरसपॉडंट येणार आहेत. तुम्ही मुंबई रिप्रेझेन्ट करा… बाय.”
माझा ‘हॅव अ गुड डे…’ न ऐकताच बाबानं फोन कट केला. बोंबला… म्हणजे आज झोपेचं खोबरं !
लॅपटॉप जवळ ओढला. बेंगलोर फ्लाईट बुक केली. पहाटे चारचा डिपार्चर होता. दोन तास घरापासून एअरपोर्ट. तासभर चेक-इनसाठी आणि अर्धा तास बफर. म्हणजे रात्री बारा ते एकच्या दरम्यान घर सोडायला पाहिजे!
कॅब बुक केली. पुन्हा फोन किंकाळला. हे दिवसभर चालू असतं.
“नमस्कार, दैनिक दिनकर… बोला !”
“मी डॉ. अभ्यंकर. मला एक थँक्स द्यायचे आहेत, एका अननोन टॅक्सी ड्रायव्हरला…”
डॉ. अभ्यंकर म्हणजे मुंबईतलं बडं प्रस्थ ! नामवंत न्यूरोसर्जन. अन् फोनवर!
“बोला डॉक्टर साहेब, काय झालं?”
“गोष्ट काल रात्रीची आहे… माझी गाडी बिघडली म्हणून मी टॅक्सी बुक केली. घरचा पत्ता ड्रायव्हरला सांगून गाडीत बसलो. गाडी थांबली. मी उतरलो… पण ते माझं घर नव्हतं !
“माझ्यासमोर नुकत्याच एक प्रवासी बसचा अपघात झाला होता. लोक विव्हळत होते, काही मदतीसाठी टाहो फोडत होते. परिस्थितीची मला जाणीव झाली. मी माझ्या हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, ॲम्ब्युलन्सला भराभर फोन केले.
“काही वेळात सरकारी फौज आली. तोवर जमेल तसा लोकांना मदत आणि धीर देत होतो. फार नाही पण काही जणांचे प्राण वाचवण्यात माझी मदत झाली.
“माझी नेमकी जिथं गरज आहे, तिथं मला पोहोचवणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरचे आभार मानायचे आहेत. या गडबडीत त्याचं भाडं पण द्यायचं राहून गेलंय ! प्लिज एखाद्या कोपऱ्यात या माणुसकीच्या बातमीसाठी जागा द्या आणि हो, त्या ड्रायव्हरला मला भेटण्याचं अपील करा !”
“जरूर… ती मी सोय करतो.”
‘थँक्स’ म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. मघाशी त्या बावळट माणसाचा फोन आणि हा डॉक्टर अभ्यंकरांची बातमी…! सत्य की योगायोग? मी एक छोटी नोट तयार केली…
“आनंऽऽद…!” माझ्या असिस्टंटला आवाज दिला.
“सर…?”
“आनंद, एखादी फिलरसाठी आलेली चारोळी, कविता कमी कर. ही नोट नजरेखालून घाल आणि पेपरला घे. आणि हो, मी आता निघतो. उद्या बेंगलोरला मिटिंगसाठी जायचंय. थोडी झोप काढतो.”
“ओके सर!”
मी टेबलवरला पसारा आवरून निघालो.
—🌼—
“का रे… आज दुपारीच परतलास? बरं नाही की काय?” अंजलीनं दार उघडताच विचारणा केली.
“अगं, सगळं ठीक आहे… प्रकृती पण मस्त आहे.”
“मग?”
“उद्या बेंगलोरला मिटिंग आहे. पहाटे चारची फ्लाईट आहे. झोपेचं खोबरं होणार. जमेल तेव्हढी दुपारी झोप काढावी, म्हणून लवकर आलो.”
“मला वाटलं माझी आठवण.”
“अंजली, तू माझ्या आत्मा… जीव की प्राण… जान… जिंदगी आहेस ! तू नेहमीच माझ्यासोबत असतेस!”
“बस, बस… नको इतकं प्रेम उतू घालवूस… जेवलास का? नसलास तर जेवून घे. ताक केलंय… पी आणि झोप.”
मी बेडरूमकडे मोर्चा वळवला. कपडे बदलले. ताक प्यालो अन् झोपी गेलो.
—🌼—
अंजलीनं उठवलं तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते. फ्रेश झालो.
“चल अंजू, जेवून घेऊया… मग तू झोप.”
“नको, मी आज जेवणार नाहीये. अरे दुपारपासनं छातीत जळजळतंय… थोडं दूध पिऊन झोपणारेय.”
अंजलीचं हे नेहमीचं आहे. अरबट-चरबट खाते अन् मग पित्त होत, डोकं दुखतं.
मी जेवून घेतलं. थोडी मीटिंगची तयारी करायची होती, त्याच्या नादी लागलो.
कॅबला रात्री बरोबर बारा-वीसला येण्यासाठी बजावलं होतं आणि बारा-वीसला कॅब दाराबाहेर थांबली.
अंजलीचा नुकताच डोळा लागला होता. तिला उठवणं जीवावर आलं. जवळच्या चावीनं घराचं मेन डोअर लॉक करून टॅक्सीत बसलो.
आभाळ भरून आलं असावं. हवेत उष्मा वाढला होता. टॅक्सीच्या एसीमध्ये डोळे मिटून मागं टेकलो. गाडीनं वेग घेतला… तोच मोबाईल वाजला.
“बोल आनंद !”
“सॉरी सर… दुपारची तुमची नोट चुकून खिशातच राहिली. आत्ता लक्षात आलं. तरी प्रिंटिंग सेक्शनला गेलो होतो… पण पेपर लोड झाला होता.”
“ठीक आहे… उद्या मात्र आठवणीनं टाक. एक अपॉलॉजीचा फोन डॉक्टरला कर. बाकी घे सांभाळून…” मी पुन्हा डोळे मिटून मागे टेकलो.
साधारण तासाभरानं कॅबचा वेग वाढल्याचं जाणवलं. डोळे उघडून पाहतो, तर स्ट्रीट लाईटस् बंद! सर्वत्र अंधार. बाहेर पाऊस सुरू झालेला. कोणत्या भागात आहोत, हेही कळेना.
“काय झालंय?” मी ड्रायव्हरला विचारलं.
“बारिश है साब… इसलिये बत्ती गुल हो गई होगी.”
“आपण वेळेत पोहोचू ना?”
“हां, आप फिक्र मत करो. टाइम पर और सही मोके पर पहूॅंचा दूंगा!”
दहा-पंधरा मिनिटातच कचकन ब्रेक मारून कॅब थांबली. समोर ‘अपोलो हॉस्पिटल’ची निऑन पाटी चकाकत होती. दवाखान्याच्या इमर्जन्सी डोअर वर माझी टॅक्सी पार्क झाली होती.
“अबे, तेरे को एयरपोर्ट चलनेको बोला था.” माझे शब्द घशातच राहिले. तेव्हढ्यात सफाईदार वळण घेऊन सायरन वाजवत ती छोटी ऍम्ब्युलन्स माझ्या समोर थांबली. मागचं दार उघडून आमच्या शेजारी राहणारा शेखर बाहेर उडी मारूनच उतरला. लगोलग पेशंटला स्ट्रेचरवरून बाहेर घेतले. माझ्या पाय खालची जमीनच खचली…
स्ट्रेचरवर अंजली होती…!!!
—🌼—
अंजलीला आय.सी.सी.यू.मध्ये ॲडमिट केलं होतं. इमर्जन्सी होती. इ.सी.जी ॲबनॉर्मल होता. पण ती आता डॉक्टरांच्या देखरेखेखाली होती. थोडं स्थिरावल्यावर मी शेखरला विचारलं…
“काय झालं होतं?”
“तुम्ही गेल्यावर काकूंनी मला आवाज दिला. त्या खूप घाबरल्या होत्या. दम लागला होता. ‘छातीत जाळ होतोय’ म्हणाल्या. जबडा पण दुखतोय म्हणाल्या. मी तुम्हाला फोन लावला. ‘नॉट रिचेबल’ आला. मग ऍम्ब्युलन्स मागवली!
“पण तुम्ही इथं अगदी वेळेवर कसे? संध्याकाळी, ‘तुम्ही बेंगलोरला जाणार’ म्हणत होत्या काकू!”
“अरे, मी एअरपोर्टसाठी निघालोच होतो.” काही तरी आठवून मी मोबाईल काढला. त्यावर मी बुक केलेल्या टॅक्सीचा ‘गाडी फेल हुवा है, दुसरा कॅब बुक करो…’ असा मेसेज होता!
मग मला घेऊन निघालेली आणि इथं आणणारी कॅब कोणती होती…???
मी फोन लावला. मी बराच वेळ बोलत होतो… आणि शेवटी म्हणालो,
“आनंद, त्या चारोळ्या, कविता फिलरलाच राहू दे आणि ती ‘अँन्जेल टॅक्सी’ हेडलाईनला घे ! डॉक्टर अभ्यंकरांसोबत माझी घटना पण टाक !”
— सु र कुलकर्णी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा