( जहा आप हो वहा ॲप की क्या जरूरत ??)
आधी आध्यात्मिक अंगाने बोलते.. जेव्हा एकटे असाल तेव्हा भगवंताशी बोला आणि समुहात असाल तेव्हा भगवंताविषयी बोला.. हे इतकं सुंदर , कुठलीही फसवणूक न होणारं ॲप असताना या कलियुगात सोशल मिडीयावर वेगवेगळी ॲप्स आली आहेत .. हे चांगलं कि वाईट यात मला जायचं नाही पण आपली प्रेमाची माणसं सोडून ही मंडळी अनोळखी लोकांना भेटतात .. त्यांच्या सोबत वेळ घालवतात.. आजी आजोबा नकोत...आईवडील नकोत..नातेवाईक नकोत.. आपला मित्रपरिवार सोडून अनोळखी लोकांसोबत जाऊन तिथे २०० ते १००० रुपये भरुन , त्यांच्या जोडीला व्यसने करुन या पिढीला खरच आनंद मिळतो का ?? .. कि ही पळवाट आहे ?? आपल्या आयुष्यात असलेला मौल्यवान वेळ आपण असा वाया घालवून या पिढीला काय साध्य करायचे आहे ??..सुंदर साहित्य असताना आपण पुस्तकाशी बोलूं शकताना ही संकट ओढवणारी फ्याडं मिरवण्यात खरच शहाणपण आहे का ??
यांना कुठलीही कमीटमेंट नको , जबाबदारी नको , चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या नाहीत आणि वाईट गोष्टी मार्केटमधे आल्या कि त्याच्या आहारी जाऊन आयुष्याची माती करुन घ्यायची..
माझ्या ओळखीत एक २८ वर्षांची मुलगी आहे.. भरमसाठ वाढलेलं वजन, मंद हालचाली , कशातही रस नाही , समोर उद्दिष्ट नाहीत , स्वप्नं नाहीत , नवीन काही शिकण्याची तयारी नाही फक्त रोज एका नवीन मित्रासोबत हिंडायचं , खायचं , प्यायचं आणि आलेला प्रत्येक दिवस पुढे ढकलायचा .. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न नाहीत , व्यायाम नाही , वाचन नाही , नोकरी नाही.. खरच वाईट वाटतं आणि किव येते.. स्वतःचं घर आहे , वडिलांनी ठेवलेले पैसे आहेत त्यामुळे आर्थिक गरज नाही म्हणुन मुलांना अति प्रॉपर्टी देउ नये.. आयतं मिळालं कि मुलं कष्ट करत नाहीत..
गेल्या आठवड्यातली एक गोष्ट , माझा ५८ वर्षाचा मित्र मला या अशा ॲप बद्दल विचारत होता.. मी त्याला म्हटलं मला कुठल्याही ॲपबद्दल काहीही माहित नाही.. त्याला म्हटलं , तुला कशाला हवय रे ॲप ??.. त्यावर तो म्हणाला , अगं बायको तिच्या व्यापात , मुलगा बाहेर देशात गेलाय तुला माहीत आहे कि त्यामुळे कधीकधी एकटं वाटतं...त्याला म्हटलं , आम्ही आहोत कि.. त्यावर तो म्हणाला , सोनल तुला माहित आहे कि मला जास्त मित्र नाहीत .. त्याला म्हटलं, मित्र कर ना .. मित्र परिवार हवाच.. त्यावर तो म्हणाला , अगं मित्र म्हटलं कि रुसवे फुगवे , देणं घेणं आलं.. इथे बरं ना २००/५०० रुपये दिले , आनंद घेतला कि झालं.. पुन्हा नवा गडी नवं राज्य.. ऐकून कमाल वाटली .. म्हणजेच काय तर तरुण पिढीच नाही तर ६० च्या घरातील मंडळीही आप से बढकर ॲप म्हणू लागली.. मग वृध्दाश्रम आणि एकाकीपण आलं तर दोष कोणाला द्यायचा??.. तरूण पिढिला कि या माझ्या मित्रांना ??..
सगळच भंजाळलय राव.. काय बी कळेना झालय..
( आप ( वाचक मित्र ) हो त्यामुळे मला तरी या ॲपची गरज नाही.. आणि तुम्हाला ???)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा