बुधवार, १२ मार्च, २०२५

1785. सत्कृत्याची प्रार्थना करा

  किती अनासक्त असायला पाहिजे, दोन्ही बाजूने, अलिप्त आणि अनासक्त, प्रयत्नवादी किती असायला पाहिजे, याचे उदाहरण सांगणारी ही गोष्ट आहे.
    एक व्यापारी होता. गंगेच्या तीरावर राहत होता. त्याच्या स्वप्नात लक्ष्मी आली. ती त्याला म्हणाली, "तुझ्या आयुष्यात मी आले, आतापर्यंत तुला पुष्कळ धनधान्य दिलं. आता मी तुझ्या आयुष्यातून निघून जाते आहे." तो व्यापारी म्हणाला, 'लक्ष्मीदेवी, अजून फक्त सहा महिने आपण माझ्या आयुष्यात राहा.' लक्ष्मी म्हणाली, 'ठीक आहे, राहते.' सहा महिन्यांत या सावकाराने काय केलं? सगळी आपली शेतं विकली, कोट्यवधी रुपयाचं ते सोनंनाणं, हिरे, रुपं, सगळं एकत्र केलं. लाकडी खांबात ते सगळं भरून ठेवलं. बाहेरून कोणाला दिसणार नाही फक्त आपल्यालाच माहिती आहे. आता कुठे जाणार ती संपत्ती? आता तर ती माझ्याजवळ ठाम राहिलेली आहे. घरातील खांबाखांबात ती पुरून ठेवलेली आहे, जपून ठेवलेली आहे. बाहेरच्या कोणाला दिसायला मार्ग नाही. असा विचार करून तो व्यापारी सुखी झाला. सहा महिन्याने लक्ष्मीने पुन्हा स्वप्नात येऊन सांगितलं की "मी आता जाते आहे. येथून जाऊन हरिद्वारला एका मिठाईवाल्याकडे राहणार आहे. त्याच्यावर माझा वरदहस्त असणार आहे."
     व्यापारी म्हणाला, "ठीक आहे, पत्ता तर कळला!" तेवढ्यात असं झालं की हिमालयात त्या दिवशी सोसाट्याचा वारा प्रचंड पाऊस पडला! घर पडलं. नदीकाठी घर होतं. खांब वाहून गेले. ते खांब नावाड्यांना सापडले. नाबाडी म्हणाले, हे लाकडी खांब आपल्याला काय करायचेत ? हरिद्वारच्या काठावरच्या मिठाईवाल्याला त्यांनी ते खांब विकून टाकले. त्याने ते खांब घराच्या मागल्या बाजूला टाकले. हा व्यापारी त्या हरिद्वारच्या मिठाईवाल्याकडे आला आणि विचारले की "तुम्ही काही खांब विकत घेतले आहेत का?" तो म्हणाला, "हो घेतले आहेत."
     व्यापाऱ्याने ते खांब कापायला सांगितले. तर त्यातून बरीच रत्न, संपत्ती निघाली. व्यापाऱ्याने स्वप्नातील ती हकिकत सांगितली. लक्ष्मी आता तुमच्याकडे आली आहे. तेव्हा मिठाईवाला अतिशय आनंदाने व्यापाऱ्याला म्हणाला, "तुम्ही मला येथे येऊन सांगितले म्हणून कळले. नाहीतर मी याचं काय केलं असतं काय माहीत नाही. तेव्हा या संपत्तीतील निम्मी तुमची आहे." व्यापारी म्हणायला लागला की, "मी मुळीच ही संपत्ती घेणार नाहीये. कारण लक्ष्मीने मला सांगितलं आहे की तिने मला सोडलं आहे. फक्त तुला जाणीव देण्याच्या उपचाराने मी येथे प्रसन्नपणे आलेलो आहे. सहा महिने लक्ष्मी माझ्याकडे राहिली. आता मला लक्षात आले आहे की ती माझ्याकडे राहणार नाहीय. तेव्हा तुमचा काय जो असेल तो विचार करा." मिठाईवाल्याने विचार केला की हे काहीच घेत नाहीयेत. तेव्हा तो व्यापाऱ्याला म्हणाला की, "तुम्ही प्रवासाला जाता आहात तेव्हा मी तुम्हाला चार लाडू देतो आहे ते घ्याल का नाही?" तर व्यापारी म्हणाला, की "हो मी प्रवासात काही बरोबर आणलेले नाही तेव्हा मी ते घेऊन जातो." त्या लाडवामध्ये या मिठाईवाल्याने एक एक रत्न ठेवले होते. एका रत्नाने दारिद्र्य निश्चितच फिटलं असतं. तो व्यापारी ऋषिकेशला निघाला. नदी ओलांडताना त्याला लक्षात आलं की आपण पैशाचे पाकीट विसरलो मिठाईवाल्याकडे किंवा रस्त्यात सांडलेले दिसते. आता करायचे काय? तो नावाड्याला म्हणाला, माझ्याजवळ चार लाडू आहेत ते घे आणि हिशेब मिटवून टाक. नावाड्याने ते लाडू घेतले. दुसऱ्या दिवशी हरिद्वारला आल्यावर नावाड्याने विचार केला की आपल्याला लाडू काय करायचे आहेत? ते मिठाईवाल्याला विकून टाकू म्हणून त्या मिठाईवाल्याकडे ते लाडू विकून टाकले. मिठाईवाल्याने ते लाडू घेतले. त्याने ओळखले की हे आपलेच लाडू आहेत. नावाड्याचे पैसे दिले. आणि त्या लाडूतील हिरे काढले. ही लक्ष्मी माझ्याच नशिबात आहे. करायचं काय, तर आता शांतपणे हिला भोगलंच पाहिजे.
      यात दोघांचाही प्रयत्नवाद आहे म्हणून ही गोष्ट येथे तुम्हाला सांगितली. दोघांचीही संतुष्टता आहे. दोघांनीही निर्लेप व्हायचे आहे. असं जीवनात वागा. असं असा म्हणजे अस्तु !! 'हरि ओम् तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु।' इतक्या चांगल्या पद्धतीने आपला हा मंत्र आहे. या पद्धतीने विचार करण्याची सवय जर लागली तर 'हरि ओम् तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु' हा शब्द न राहता, तो मंत्र बनेल ! मंत्राचा महामंत्र होण्याचं एक रसायन आहे ते म्हणजे 'वर्तन'!! त्या मननाला तुम्ही वर्तन जोडा तो महामंत्र बनेल. सर्व आयुष्य शुद्ध होईल. मनशक्तीचा ज्ञानगुणाकार करता करता सत्कृत्याचं, समाजाचं काम करा. बाहेरची जी दु:खाची, मत्सराची भुतं आहेत ती झाडून टाकायची असतील, सबंध आयुष्य सुखी करायचं असेल तर हा एकमेव मंत्र आहे.
 सत्कृत्याची प्रार्थना करा
                           
स्वामी विज्ञानानंद
सादर साभार पोस्ट 
Espike

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...