शनिवार, ८ मार्च, २०२५

1764. निश्चय

  जवळ जवळ सात वर्ष झाले  इथे येऊन.  मुलाचा किंवा सुनेचा कधी फोन आला नाही, की भेटायला आले नाही.
हळू हळू आई इथे आहे याचा कदाचित त्याला विसर पडला असेल ??
मी आई, कशी विसरू शकेन??
 मीच अधे मधे फोन करायचे. 
पुन्हा मनाला एक दिलासा द्यायचा की, निदान माझा मुलगा माझा फोन तरी स्वीकारतो. काहींचे तर तसेही नशीब नाही. कुणाचा येत नाही, हे कुणाला करत नाही.
एक वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आपल कुणी असून नसल्याची. 
   घरी असतांना सून सारखी म्हणायची,  तुझी आई  म्हातारी आहे. त्यात अस्थमा,  सारखी खोकत असते. कफ पडतो, थुंकीतून जंतू  सगळीकडे पसरतात. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजार घरातील लोकांना होतात.
माझी मुलं लहान आहेत. त्यांच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही. तू तुझ्या आईला वृध्दाश्रम मध्ये ठेव. हे तिचे रोजचे पालुपद
    म्हातारी म्हणजे किती हो ??
जेमतेम ५९,  वय  माझे !
नुकतेच तर रिटायर्डमेंट झाले होते. 
अजूनही मन ऑफिस मध्ये अधून मधून चक्कर मारून येते.  त्यात शिक्षिका .
आठवणी ताज्याच आहेत आणि ही म्हणते म्हातारी झाली!
 अस्थमाचा थोडा त्रास होतो, त्यानेच जरा पोखरले  हो!
बाकी तंदुरुस्त आहे.
    खरतर हे राहते घर माझ्या नवऱ्याने बांधले होते. आमच्या दोघांच्या पैस्याने. दोघांच्या नावावर . त्यांना प्यारालिसिस चे निमित्त झाले.  दोनच महिन्यांत होत्याचे नव्हते झाले. वय जेमतेम ६४ वर्ष. 
   सून सारखी म्हणायची , आई बाबा बघा कसे  प्यारालिसिसच्या अटॅक चे निमित्त होऊन गेले. तुम्ही ह्या अश्या अस्थमा पेशंट . 
काय भरोसा जीवाचा ? 
 तसेही नवरा गेल्यावर त्याच्या मागे बायका लवकरच जातात. किती तरी उदाहरण आहेत . वेळीच हे घर ह्यांच्या आणि माझ्या नावावर करा. नाहीतर फार त्रास होतो नंतर.
   माझ्या एका मैत्रिणीचे असेच झाले.  सासरे गेले, पाठोपाठ सासू बाई. ना्मिनी कुणीच नव्हते. खूप त्रास झाला मग.
   मनीषा ताईंनी ठरवले काही झाले तरी माझ्या जवळची दमडी सुध्दा यांना द्यायची नाही आणि घर यांच्या नावावर करायचे नाही.
    जोवर मी जीवंत आहे तोवर सगळ्या प्रॉपर्टी वर माझाच हक्क असणार आहे.  माझ्या आणि माझ्या नवऱ्याची कष्टाची कमाई ती!
त्यात सून ही अशी, मुलगा तिच्या शब्दाबाहेर नाही.
  खरतर आई म्हणून मीच आंधळे प्रेम केले.
    आता आताशी खूपच त्रास व्हायला लागला. रोजचाच त्रास. खूप medicine खाऊन झाल्या  कशाचाही उपयोग नाही. तो खोकला काही कमी होत नव्हता.
   सुनेची रोजचीच कटकट, तुम्ही असच केलं, तसच केलं, खोकताना तोंडावर हातच ठेवत नाही. किती जोरात शिंकता ?
आता त्यांनाही या सगळ्याचा कंटाळा आला. 
   शेवटी मनिषा ताई मुलाला म्हणाल्या, बाबा रे! थोडे दिवस हवापालट म्हणून एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाण असलेल्या वृद्धाश्रमात नेऊन दे. दोन पैसे जास्त पडले तरी चालतील. माझी मी सक्षम आहे पैसे भरायला.  
   माझे पूर्ण आणि यांचे अर्धे. इतके पेन्शन मिळते की मी अजून एक, दोन गरजू लोकांना सुध्दा  मदत करू शकते. 
   तुझ्यावर माझा भार कधीच नव्हता आणि नसणार. 
दुसरी गोष्ट तुझी बायको सारखी मागे लागली. घर आमच्या नावावर करा. काही झाले तरी हे घर मी तुमच्या नावावर आताच करणार नाही.
वेळ येईल तेव्हा बघू. मी मृत्युपत्र करून ठेवेन काळजी करू नको.
तेवढ्यात डोळ्यासमोर नाना पाटेकरचां सिनेमा भरभर सरकुन गेला. 
स्वतःच्या मर्जीने हवापालट म्हणून आज दुपारी  आश्रमात जाण्याची तयारी चालू होती. 
नातू हळूच जवळ येऊन म्हणाला, आजी तू कुठे चालली  ?
कधी येणार परत ?
आजी लवकर परत ये !
मला नाही करमत तुझ्या शिवाय! 
तू गेल्यावर गोष्ट कोण सांगणार ?
आवडीचे खायला कोण करून देणार? 
लवकरच येणार बाळा !
तुझ्या शिवाय मला सुध्दा करमणार नाही !
तो आजीला घट्ट मिठी मारून रडू लागला. 
आजी नको जाऊ न ग!
तो मिठीचा विळखा सोडवताना खूप त्रास होत होता. कारण दुधा पेक्षा सायीला जपणारे आम्ही आजी आजोबा. 
  मुलाने गाडी काढली.घराचे शेवटचे दर्शन घेत, हळूहळू पावले टाकत मनीषा ताई बाहेर पडल्या. पुन्हा वळून उंबऱ्याला नमस्कार केला ! 
निघाल्या !!!  एक निश्चय उराशी बाळगूनच. 
   आता पुन्हा येणे नाही!
 काही झाले तरी !
 अधून मधून त्याच मुलाला फोन करायच्या.  सात वर्षात त्याचा कधीच फोन आला नाही.
 कधीतरी सून बोलायची, म्हणायची काळजी घ्या. ते खोकने थांबले की सांगा! 
 येऊ आम्ही भेटायला! 
घ्यायला येऊ हा शब्द पण कधी चुकून काढला नाही.
त्यांचा खोकला पूर्ण बरा झाला. त्यांनी सुध्दा कधीच सांगितले नाही.
  खरतर मनातून खूप राग यायचा. पण संयमाने घेत होत्या.
आपलेच दात, आपलेच ओठ!
    निसर्गाच्या सानिध्यात, समवयस्क लोकांच्या संगतीने आणि देवधर्म, पोथ्या , पुराण वाचणे. वेळ खूप चांगला जात होता. त्यात त्यांना झाडांची हौस. त्यामुळे आश्रमा शेजारी बरीच मोकळी जागा होती. 
तिथे जमेल तसे सकाळी, संध्याकाळी काम करून छान जागा तयार केली.
 स्वच्छ ,निरोगी हवा, त्यात निसर्गाच्या कुशीत. हळूहळू तब्येतीत सुधार झाला. आता तर खोकला सुध्दा येत नव्हता.
  आश्रमाततील लोकांना त्यांनी विनंती केली. मी पैसे देते. तुम्ही मला फुलझाडे आणि काही बियाणे आणून द्या. मला फुलबाग , आणि भाज्या लावायच्या आहेत. 
   अजून एक खूप मोकळी जागा आहे. त्यामुळे आपला जो भाजीचा, फळाच्या सालीचा ओला कचरा होतो. त्यापासून मी कंपोस्ट खत बनवणार आहे. अर्थात त्या खतावर आपली ही बाग फुलणार आहे.
   त्यांच्या म्हणण्याला नकार द्यायचे काही कारणच नव्हते. कारण त्या हे सगळे स्व खर्चाने करणार होत्या.
जागेचा प्रश्नच नव्हता.
   हळूहळू आश्रमातील प्रत्येक जण या उपक्रमात सहभागी होत होता. खूप सुंदर बाग फुलली, आता देवाला फुल, बागेतली भाजी. हे सगळे बघून सगळेच खूप आनंदात होते.
  अचानक फोन ची रिंग वाजली, अनोळखी नंबर बघून मनिषा ताई उचलू की नको अश्या संभ्रमात होत्या. बागेत काम करत असल्यामुळे मातीने हात माखले होते. बघू परत वाजला तर असे बोलून पुन्हा कामाला लागल्या. परत फोन वाजला, फोन उचलला. 
हॅलो आई ! 
थोड्या दचकल्या !
कारण फोन सावी, म्हणजे त्यांच्या सुनेचा होता .अचानक सुनेचा फोन आला. 
आई ! 
मी सावी! 
बोल अग! 
तुझा आवाज विसरले नाही मी !भरणार पण नाही!
आज अचानक कसा काय फोन केला? 
आई! 
प्रभाकर !
काय झाले प्रभाकरला?
हमसून हमसून रडायला लागली.
सावी !
अग बोल काहीतरी ? 
जीव टांगणीला लावू नकोस ?
आई! 
प्रभाकरला कोरोना झाला .
काय म्हणालीस? 
हो आई!
तो हॉस्पिटलला admit आहे. कालच admit केले. 
 आई !
 खूप भीती वाटते हो !
खूप एकटे ऐकटे वाटते! 
सावी ! 
चिंता करू नको !
लवकरच प्रभाकर तुझ्या जवळ असेल. 
आई! 
थोडे दिवस तुम्हाला यायला जमेल का? 
माझे आईबाबा,  भाऊवहिनी आणि दोन भाचे सगळेच positive आहे. 
कोणीच येऊ शकत नाही मदतीला ! 
मला एकटीला काहीच सुचत नाही.
मुलं पण लहान आहेत.
आई!  रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही ओ!
मनात म्हणाल्या , तरीच माझी आठवण झाली. 
सावरले स्वतःला.
ठीक आहे, उद्या येते मी.
मी वाट पाहते. 
मनात आले बोलावे, वाट नको पाहू, येते मी. निश्चिंत राहा.
शब्द ओठात विरले !
दुसऱ्या दिवशी सकाळी ओला बुक करून घरी आल्या
घराचा पार उकिरडा झाला होता. पण ही वेळ काही बोलायची नव्हती. 
तसेही त्यांना इथे आता राहायचे नव्हतेच.
फक्त प्रभाकर सुखरूप घरी येई पर्यंत राहायचे होते. त्यांची जिवाभावाची माणस आश्रमात  त्यांची वाट पाहत होती.
   येतांना प्रत्येक जण सांगून गेला मनिषा ताई लवकर या. आमच्या सारखीच ही बाग पण तुमची वाट पाहत असणार. 
आता तेच तर त्यांचे हक्काचे घर होते.
   सुनेला विचारले, काय ग? 
प्रभाकरच्या डब्याचे काय?   तिथे जेवण मिळते !
आपल्या घरून दिले तर चालते का?
हो आई! 
मग एक काम कर! 
रोज त्याला घरून डबा नेऊन दे. 
मी देईन करून ! 
घरच खाऊन लवकर बरा होईल! 
हो आई!
सावीने डबा काउंटरवर नेऊन दिला. घरी आली.
प्रभाकरने एक घास खाल्ला. 
लगेच मोबाईल उचलला, सावीला फोन केला. 
सावी आई कुठे आहे ?
का? 
सांग ना ! 
आई कुठे आहे? 
का पण? 
सावी , आजच्या जेवणाला आईच्या हाताची चव आहे. 
कुठून मागवला डबा ?
अरे घरून आणला! 
आई कुठे आहे ?
प्रभाकर ! 
बरोबर ओळखले तू! 
ते जेवण आईंनी बनवले.
काय?
आईला कसे कळले. ? 
कधी आली ?
त्याचे नाना प्रश्न !
आईंना मी इकडे बोलवून घेतले.
काय?
कशी आहे ती ?
बरी आहे !
घास घेत त्याला आठवले, आपण सात वर्षात स्वतःहून कधिच आईला फोन केला नाही. कारणही तसेच होते. रोजची बायकोची कटकट.  कारण सुरवातीला एक दोन वेळा केला. तर त्यावरून पण भांडण व्हायची. कंटाळा आला होता त्या भांडणाचा. 
   आज मात्र मला बरे वाटत नाही तर आई कशाचाही विचार न करता सरळ निघून आली. माझी मुलं आणि बायको positive असेल मला सुध्दा त्यांच्या पासून संसर्ग होऊ शकतो. हा विचार सुध्दा त्या माऊलीने केला नसेल. 
    माझ्या बायकोने, तिचा खोकला, तिचा तो अस्थमा . तिच्या मुळे माझ्या मुलांना संसर्ग होणार. याचे भांडवल करून त्या बिचारीला घर सोडायला भाग पाडले.
    फोन करावा तरी तिची कटकट असायची. त्यामुळे तो सुध्दा टाळत गेलो. 
शी ! लाज वाटते माझीच मला. 
 म्हणतात, बायको पुढे माणूस हतबल होतो. 
अगदी खरय ! 
मी हतबलच झालो होतो.
आईला जर वृद्धाश्रमात नेऊन सोडले नाही तर ती माहेरी निघून जायची धमकी द्यायची.
शेवटी आईने स्वतःहून हा निर्णय घेतला.
   माझी दोन छोटी छोटी मुलं त्यांचा विचार करून मी सुध्दा त्यात सामील झालो. चुकीचे निर्णय घेतले. 
     आता आपण घरी गेलो की, आईला कुठेच जाऊ द्यायचे नाही. बायकोला निक्षून सांगायचे तुला जे करायचे ते कर, आता आई इथेच राहणार तिच्या घरात.
तिच्या मुला,नातवा सोबत.
    जेवतांना त्यांला जोरात ठसका लागला.
त्याने आई अशी साद घातली!इकडे मनीषा ताईंना ठसका लागला. 
प्रभाकर !!! अशी साद घातली.
   सात दिवसाने त्याला सुट्टी झाली.
   आरती ओवाळून त्याचे स्वागत केले. सात वर्षाने आईला बघून त्याचे अश्रू अनावर झाले. कसे बसे स्वतःला सावरले. आईची सुध्दा अवस्था तशीच होती. पण त्यांनी ठरवले आता या मोहात गुंतून पडायचे नाही. आपला मार्ग वेगळा आहे.
    चौदा दिवस झाले. प्रभाकर चा quarantine पिरियड संपला. 
    मनीषा ताई म्हणाल्या, प्रभाकर आज मी जाईन म्हणते. 
   नाही आई ! तू आता मला , तुझ्या नातवंडांना सोडून कुठेही जायचे नाही. 
   प्रभाकर त्याला आता खूप उशीर झाला रे बाळा !
 ही घराची कागद पत्र. हे घर मी तुझ्या नावाने केले.मला इथे यायचेच नाही तर घराचे काय करू ? 
  हो ,पण पैसे मी माझ्या नातवंडांच्या नावावर फिक्स केले. माझ्या गरजे पुरते ठेवलेत.
  आई ! प्लीज तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहेस. शपथ आहे तुला माझी. 
   प्रभाकर आता साक्षात देव जरी समोर आला आणि त्याने सांगितले मनीषा राहा ईथेच. तरीही ते शक्य नाही. 
   माझा मार्ग वेगळा आहे. माझ्या मनाला आनंद देणारा आहे. 
स्वतःसाठी जगण्याचा आहे .
 अजून एक निसर्गाच्या सानिध्यात , समवयस्क लोकात राहून माझे सगळे आजार दूर पळाले. खोकला, अस्थमा साऱ्यांनी बाय बाय केला. 
   सावी , तुझ्या इच्छे नुसार घराचे कागद पत्र प्रभाकरच्या नावे केली. तुझ्या मैत्रिणीला झाला तसा त्रास होणार नाही. 
    आई ! प्लीज असे आम्हाला सोडून जाऊ नका.
   आई माफ करा आम्हाला !
सावी, खरतर मी तुला धन्यवाद देते. अग तू माझ्या डोक्यात हे खुळ भरवले नसते तर कदाचित हा निर्णय मी कधीच घेऊ शकले नसते. रडत, कुढत ईथेचं राहिले असते. 
   आज माझ्या जगण्याला एक दिशा मिळाली. पुन्हा या मोहपाशात मला अडकवण्याचा प्रयत्न करू नको. 
काय सांगावे इथे आल्यावर पुन्हा मला तसा काही त्रास झाला तर!!!! 
   पुढचे त्यांच्याने बोलवत नव्हते. 
   दारात गाडीचा हॉर्न वाजला. ओला दारात उभी होती. 
    पहिल्यांदा पाणावलेल्या डोळ्यांनी घर सोडताना बाहेर पडलेल्या मनीषा ताई. आज दुसऱ्यांदा आत्मविश्वासाने आपले पाऊले टाकत गाडीत बसल्या.
      मी करेन फोन वेळ मिळेल तसा. तुम्ही त्रास घेऊ नका. 
   गाडीची काच खाली करून हात हलवत राहिल्या. 
प्रभाकर आईविना असलेल्या घराचे कागद हातात घेऊन अश्रू ढाळत स्तब्ध उभा होता.

सौ. प्रभा कृष्णा निपाणे,कल्याण.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...