समीधा एक सुंदर, हुशार, आणि स्वाभिमानी मुलगी होती. कॉलेजमध्ये तिचं सौंदर्य आणि आत्मविश्वास पाहून अनेक मुलं तिच्या मागे होती. ऑफिसमध्ये ही ती सर्वांची लाडकी होती मात्र समीधाला तिच्या आयुष्याबद्दल वेगळ्या अपेक्षा होत्या, त्यामुळे तिनं अभ्यास काम यावर जास्त लक्ष दिले. काही वर्षात तिच्या घरात लग्नाची चर्चा चालू झाली आणि तिच लग्न अरेंज मॅरेजद्वारे झाल. आकाश तिचा जोडीदार झाला. आकाश एक सभ्य आणि स्वतःच्या कामात रमलेला माणूस होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस सगळं स्वप्नवत वाटत होतं. दोघांचा सहवास आणि नवलाई यामुळे घर आनंदाने भरलेलं होतं. या सर्वातच लवकरच ते एका गोंडस बाळाचे आई-वडील झाले. आई होण्याचा अनुभव समीधासाठी खास होता, पण त्याचवेळी तिला जाणवत होतं की तिच्या शरीरावर मातृत्वाचे परिणाम होत होते. त्या सगळ्याशी जुळवून घेणे तिला जड जात होते. पण तरीही ती सगळे प्रयत्न करत होती. सर्व स्थिरसावर झाल्यावर काही वर्षांत, दुसऱ्या बाळाचा जन्म झाला. या प्रक्रियेमुळे तिचं शरीर पूर्णपणे बदललं. वाढलेलं वजन, थकवा, आणि काही आजारामुळे ती स्वतःला आरशात पाहताना ओळखू शकत नव्हती.
आकाश समीधाच्या या बदलांना स्वीकारायला तयार नव्हता. तो तिला सतत तिच्या वजनाबद्दल टोमणे मारायचा. "थोडं स्वतःकडे लक्ष दिलं असतंस तर चांगलं झालं असतं," व्यायाम करत नाही, चांगलं राहात नाही असे त्याचे शब्द समीधाला वारंवार टोचायचे. चार लोकात जाऊन आल्यावर, नातेवाईकात सतत आकाश तिला दुसऱ्यांशी कम्पॅरिझन करून बोलायचा . तिचं मन चिरडून जात होतं. खरंतर ती स्वतः पण अतिशय ताणात होती तिच्यासाठी हे सगळं अजिबात सोप्प नव्हतं कारण ती स्वतःही उच्चशिक्षित होती आणि तिला काहीतरी करायची इच्छा कायमच होती पण मुलं घर यासाठी आधीपासूनच दोघांनी ठरवल्याप्रमाणे स्वतःचे सगळं बाजूला ठेवून पूर्ण वेळ ती कुटुंबाला देत होती. अशातच तिच्या हातून सुटून चाललेलं बाहेरचं जग, मित्र परिवाराशी नाहीसा झालेला संपर्क आणि एकाकी पण याने ती मनातून खचून चालली होती. तिला वाटायचं याने आपलं मन समजून आपल्याला साथ द्यावी. आपल नैराश्य दूर कराव. तु जशी आहेस तशी मला खूप आवडते असं म्हणाव. ती कुटुंबासाठी करत असलेल्या प्रयत्नामध्ये तिला ऍप्रिसिएट करावं. समीधा दिवस-रात्र मुलांना सांभाळण्यात, घर सांभाळण्यात आणि स्वतः आतल्या आत कुढत होती.पण हळूहळू, तिच्या आत एका क्षणिक ठिणगीने जाग येऊ लागली. ती स्वतःशी म्हणाली, "माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर कोणाचंही नियंत्रण असायला नको. मी स्वतःसाठी काहीतरी करायला हवं."
समीधाने ठरवलं की ती स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा प्रेम करायला शिकेल. तिने तिच्या आवडीच्या गोष्टी करायला सुरुवात केली. स्वतःचे छंद जोपासायला लागली. नवीन गोष्टी शिकली, स्वतःच्या व्यक्तिमत्व सुधारल. तिच्या कामामुळे तिला थोडी ओळख मिळायला लागली. लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया ऐकुन तिला ऊर्जा मिळायला लागली. तिच्यात सकारात्मक बदल दिसू लागले. तिला आत्मविश्वास आला. ती हळूहळू तिच्या जुन्या रूपात परत येत होती पण यावेळी ती अधिक ठाम आणि जबाबदार होती. तिने स्वीकारलं होतं की शरीरातले बदल हे काळानुरूप होणारच पण आपलं मन तसंच असायला हवं. त्यात बदल होता कामा नये. पण हा प्रवास सहज नव्हता. आकाश अजूनही तिच्या प्रयत्नांना हलक्यातच घेत होता. त्याला वाटायचं की हे सर्व तिने त्याच्या टोमण्यांमुळेच केलं आहे. पण समीधाला आता हे समजलं होतं की तिचा हा प्रवास स्वतःसाठी आहे. समीधाचं नवीन रूप आकाशाला पुन्हा तिच्या प्रेमात पाडायला लागलं. तो पुन्हा तिच्याकडे आकर्षित झाला. पण आता समीधा भावनिकरीत्या त्याच्यापासून खूप दूर गेली होती. ती हसत हसत म्हणायची, "तुला माझं शरीर दिसत होत, माझं मन कधीच महत्त्वाचं नव्हतं."
आकाशाला तिच्या या शब्दांचा अर्थ समजायला वेळ लागला. त्याने मागील काळ आठवला, ज्या क्षणी तो तिला आधार देऊ शकला असता पण त्याऐवजी तिला फक्त कमीपणा दाखवला. त्याला आपली चूक जाणवली. आकाशने समीधाची माफी मागितली. पण समीधाचं मन त्या जुन्या जखमांनी इतकं भरलं होतं की ती त्याला पुन्हा स्वीकारायला तयार नव्हती. ती म्हणाली, "मी आता माझ्या स्वतःच्या आनंदासाठी जगते. तू मला माझ्या नैराश्याच्या काळात साथ दिली नाहीस, त्यामुळे तुझं माझ्यासाठी असलेल आकर्षण आता मला काहीच देऊ शकत नाही." पण या प्रवासातून मला कळलं की स्वतःवर प्रेम करणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे. समीधा तिच्या आयुष्यात एकटीनेही समाधानी झाली. तिने स्वतःसाठी एक नवीन ओळख निर्माण केली. आकाश मात्र त्या नात्याच्या सुंदर आठवणी आणि आपल्या चुकांचा पश्चात्ताप करत एकटाच राहिला.
©️ सौ वृषाली हणमंते गांगल.
ही कथा सांगते की नात्यात प्रेम हवं, पण आदर आणि पाठिंबा त्याहून महत्त्वाचा असतो. आपल्या सहचराच्या संघर्षात त्याला साथ न दिल्यास, त्याच्या यशात आपली जागा उरत नाही.🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा