शुक्रवार, १४ मार्च, २०२५

1791. माझ्या नजरेतून ती !....ओटी

     आज प्रथमच माई आजीला खूप बरे वाटले. आज आपल्या नातीला गौरीला हे किती छान प्रश्न पडले आहेत. तिची चिडचिड बरोबर आहे. तिच्या आईने कायमच " हे असे करायचे, आपल्याकडे असेच करतात, आपल्याकडे अशीच पद्धत आहे, तुला माझे काहीच पटत नाही, आम्ही काय मूर्ख आहोत का ? आपले पूर्वज हे ठरवून गेलेत ते असेच पुढे गेले पाहिजे, आम्हाला पाप लागेल. " अशी हजारो उत्तरे दिली होती, पण या प्रश्नांच्या मुळाशी ती कधीच गेली  नव्हती. आणि गौरीला तेच पटत नव्हते. तिला दिसत होते की, तिची आई समान वागत नाहीये. तिची आई मेघा मावशीचा घरी बोलावून अपमान करत आहे.
आज वहिनीच्या डोहाळजेवण वेळी आईने सर्वांची ओटी भरली, पण मेघा मावशीची, गीता वहिनीची आणि संध्या ताईची ओटी मुळीच भरली नाही. कारण काय...तर म्हणे मेघा मावशी विधवा आहे, गीता वहिनी कडे गुड न्यूज आहे आणि संध्या ताई लग्न करणार नाही. ओटी फक्त सवाश्णीची भरतात. म्हणूनच आज माई आजीने ठरवले की, आपल्याला माहीत असलेले हे शास्त्र नातीला सांगणे जरुरीचे आहे. कदाचित तिला ते समजेल किंवा ती त्याला विरोध करण्यासाठी आधी त्याची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करेल.
आपल्यालाही कदाचित कळेल की, आपण चूक की बरोबर. आणि जर आपण चूक असू तर सुधारू की आपली चूक , काय हरकत आहे ? आणि माई आजीने बोलायला सुरवात केली.......
गौरी बाळा, ओटी म्हणजे तरी काय ग?
सौभाग्यवती किंवा सुवासिनीच्या साडीच्या पदरात किंवा लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ, खण इत्यादी वस्तू घातल्या जातात त्याला ओटी म्हणतात. तसेच ओटी म्हणजे बेंबिखालचे पोट , त्याला ओटीपोट असेही म्हटले जाते. या ओटीपोटातच तर गर्भाशय असते, इथेच तर गर्भ वाढतो. म्हणूनच ओटी भरणे याचा सांकेतिक अर्थ असा आहे की तुला मुलबाळ होऊ दे. आता बघ, मेघा मावशी विधवा आहे. त्यामुळे तिला असा सांकेतिक मेसेज देणे हे तिच्याशी वाईट वागणे होईल की नाही सांग बरं? तसेच संध्या ताईने लग्न करायचे नाही असे ठरवले आहे, मग तिला सुद्धा असा आशीर्वाद कसा द्यायचा ? जर भविष्यात या दोघींनी लग्न केले, तर त्यांचीपण ओटी आपण भरू. त्यावेळेस हा आशिर्वाद त्यांच्यासाठी योग्य असेल. हेच कारण आहे की सहसा कुमरिकेची ओटी भरत नाहीत.
आता तसंच गीता वहिनी प्रेग्नंट आहे. तिची तिसऱ्या महीन्यात चोर ओटी भरली होती. आता तिची ओटी सातव्या महिन्यात भरली जाईल. याचे कारण पुन्हा तेच आहे. आपल्या शास्त्राप्रमाणे पूर्ण गर्भ, त्याच्या शरीरातील सर्व अवयव तयार होई पर्यंत आणि त्याचे लिंग ठरे पर्यंत हा अवधी जातो. तिसऱ्या महीन्यापर्यंत मिसकैरेज होण्याची शक्यता असते. थोडक्यात काय... तर स्त्री गर्भवती आहे हे सर्वांना समजण्यात तीन महिने निघून जातात. या नंतर सातव्या महिन्यापर्यंत तिच्या ओटीपोटात गर्भ वाढत असल्यामुळे तिला सध्यातरी मुलबाळ होऊ दे असा संकेत देण्याची आवश्यकता नसते. सातव्या महिन्या नंतर केव्हाही बाळाचा जन्म होऊ शकतो. म्हणून मग पुन्हा संकेत दिले जातात की, आयुष्यात तुला पुढे मागे परत मुलबाळ होऊ दे. आता कळलं का गौरी तुला, तुझी आई वागली ते बरोबर होते.
तुम्ही आजची मुले जशी सांकेतिक भाषा बोलता, शॉर्टकट मध्ये एकमेकांना मेसेज पाठवता...  तसच हे सांकेतिक आशीर्वाद, सूचना आहेत. मग त्याला विरोध कशासाठी ? विधवा, परित्यक्ता यांना मुलबाळ होऊ दे...  असा मेसेज देण्या ऐवजी त्यांना पुन्हा लग्न करा असे सांगणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जास्त गरजेचं आहे.
लग्नाशिवाय मुलबाळ जन्माला घालणे आणि त्याचा सांभाळ करणे नक्कीच सोपे नसते. म्हणूनच असा संकेत, आशीर्वाद सवाष्ण बाई शिवाय इतरांना दिला जात नाही. बघ, पटतंय का तुला ?......
हो आजी, पटलं मला. आजी, सून सासारहून माहेरी जाताना तिची ओटी भरत नाही...  कारण ती एकटीच माहेरी जाते, तिचा नवरा सासरीच असतो  पण तीच मुलगी माहेरून सासरी जाताना तिची आई तिची ओटी भरून तिला नवऱ्याकडे पाठवते त्यामागे सुद्धा हेच कारण आहे का ग ?... पण मग .. मला सांग... ओटी भरताना पदर असाच धर असा आग्रह कशासाठी ?......
गौरी,
अग... पदराचा जो भाग ओटी पोटावर येतो, तो म्हणजे पुढचा भाग किंवा लुगड्याचा ओचा. हाच पदराचा भाग वाढलेल्या पोटाला सामावून घेतो, पोटाची आणि बाळाची काळजी घेतो म्हणून ओटी पुढच्या पदरात घेतात......
आजी,
ओटीत नारळ, सुपारी, हळकुंड, तांदूळ, चोळी कशासाठी ?......
गौरी,
माझ्या बुद्धी प्रमाणे सांगायचे झाले तर "तो" नारळ, "ती" सुपारी. मुलगा किंवा मुलगी कोणतेही अपत्य प्राप्ती होऊ दे अशी सदिच्छा. हळकुंड म्हणजे अपत्य निरोगी असावे ही भावना, आणि साडी, चोळी, बांगडी म्हणजे सवाश्णीची केलेली हौस मौज. तांदूळ म्हणजे चागळे चुंगले खाऊन सुखी राहा हा आशीर्वाद. तसेच या प्रत्येक गोष्टीचा रोजच्या जेवणातला उपयोग आणि त्यामागच्या मांगल्याच्या भावना या सगळ्याच गोष्टींचा उपयोग करून घेतलेला. तसेच या गोष्टी सहज उपलब्ध होतील अशा आहेत. त्यामुळे त्यांना ओटीत महत्वाचे स्थान आहे.......
आजी,
पण मग माझी पाळी सुरू झाली तेव्हा माझी ओटी का भरली होती ? ......
गौरी,
सगळ्यांकडे ही प्रथा आहे असं नाही. मला वाटते... पूर्वी लग्न लवकर होत असे. मुलगी लग्नानंतरही मासिक पाळी चालू होई पर्यंत माहेरी राहत असे.  मुलीला पाळी चालू झाली, की तिला सासरी पाठवले जात असे. पाळी चालू झाली, याचा अर्थ आता मुलगी पुत्र प्राप्तीसाठी पुढील आयुष्यात प्रयत्न करू शकते. म्हणून पूर्वी तिची ओटी भरण्याची पद्धत चालू झाली असावी. काळा नुसार ही पद्धत बऱ्याच घरी बंद झाली आहे आणि खरंच ती पद्धत बदलायला आता हरकत नाही......
आजी,
तू किती छान समजावून सांगितलेस की ग.  कुमारिकेचे सुद्धा पूजन करून आशीर्वाद मागणारी आपली संस्कृती महान आहे.आपल्या परंपरा चांगल्या आहेत. त्यांच्या मागे अर्थ आहे, शास्त्र आहे. पण आपण ते उमजुनच घेत नाही. त्यांचा नीट शोध घेत नाही. सरळ नाही म्हणून पाठ फिरवतो. पण काळा प्रमाणे बदल स्वीकारणाऱ्या आपल्या परंपरांचा विचार आपणच करायला हवा. नाही पटलं तर नका पाळू हेही स्वातंत्र्य आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेले आहे. नक्कीच. पण  निर्णय घेण्याआधी असा तुझ्या सारखा विचार आणि संवाद प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी व्हायला हवा. आजी, हो मी मान्य करते की मी चुकले. अभ्यास न करता मी फक्त विरोध केला. मला पटले आहे की आईने कोणाचाच अपमान केला नाही... तर उलट तिने प्रत्येकीला समजून घेतले. जीचे सुख ज्यात आहे आईने तिला ते दिले आणि सर्वांचे आशीर्वाद घेतले. खरच आजी आज तुझ्याशी बोलले नसते, तर मी फक्त विरोध करत राहिले असते......
माई आजीला पण खूप बरे वाटले.  आजची पिढी नुसते फॉलो करण्यापेक्षा "का" असे प्रश्न विचारते.
ही जिज्ञासा महत्वाची !

🌹🌹🌹🙏🌹🌹🙏
ही पोस्ट आवडल्यास नक्की लाईक आणि शेयर करा.
🌀🌀🏵️🌀🌀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...