सोमवार, ३ मार्च, २०२५

1748. एस्कॉर्ट

 शेवटचा पेशंट माझ्या केबिनमधून बाहेर पडला अन् मी घरी जाण्यासाठी आवरू लागलो.
आधीच खूप उशीर झाला होता. तोच कानांवर शब्द पडले, "डॉक, येऊ का?"
मी चमकून दाराकडे पाहिलं. दारात शिबानी उभी होती. सोनेरी रंगवलेल्या केसांची मॉडर्न केशरचना, सावळ्या पण सुंदर चेहऱ्यावर काळजीपूर्वक केलेला मेकअप, अंगावर सुडौल बांधा उठून दिसेल असा भारी कापडाचा वन पीस. हातातली
फॅन्सी पर्स तालबद्ध हलवत, डौलदार पावलं टाकत, कॅटवॉक केल्यासारखी, पण काहीशी लंगडत ती माझ्या पुढ्यात उभी राहिली. माझ्या क्लिनिकच्या शेजारच्या वाड्यात राहणारी, लांब-दाट केसांच्या दोन घट्ट वेण्या, त्यावर फुलांचा भरदार गजरा माळणारी, जरीचं परकर पोलकं, वर ओढणी असा पारंपरिक मल्याळी पोशाख घालणारी लाजरीबुजरी शाळकरी शिबानी. 
आणि आता आत्मविश्वासानं, नव्हे काहीशी फाजील धिटाईन समोर आलेली शिबानी कुठे काही ताळमेळच नव्हता.
शिबानीचे अप्पा फार वर्षांपूर्वी सरकारी नोकरीनिमित्त पुण्यात आले. मग इथेच राहिले. माझ्या क्लिनिकजवळच्या वाड्यात त्यांचं बिऱ्हाड. मी क्लिनिक सुरू केल्यापासून सारं कुटुंब माझे पेशंट. अप्पा, अम्मा, आजी, छोटा भाऊ शिबू अन् शिवानी, सारे सारे. फॅमिली डॉक्टर असल्यामुळे कधीकधी मी त्यांच्या घरी व्हिजिटला पण जात असे. कितीही घाईत असलो, तरी बानीची अम्मा कोणता तरी स्पेशल केरळी पदार्थ आणि कॉफी घेतल्याशिवाय सोडायची नाही. शिबानी माझ्या डोळ्यांदेखतच मोठी झाली.
साधीसुधी, गोड, हसरी पण काहीशी लाजरीबुजरी संस्कारी बानी सगळ्यांची लाडकी होती. बी.ए. नंतर ती एकदम मुंबईला गेली, ती चार वर्षांनी माझ्यासमोर उभी होती. तिच्यातला हा विलक्षण बदल माझ्या पचनी पडेना.
"बानी, अगं कुठे होतीस एवढे दिवस ?" मी उद्‌गारलो.
माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता ती माझ्या समोरच्या खुर्चीत बसली, स्टायलिशपणे, दोन्ही पाय एकावर एक ठेवत.
"मला वाटलं, की तुम्ही भेटता की नाही. मुद्दामच थोडी उशिरा आले, म्हटलं थोडं बोलताही येईल. तुम्हाला भेटून तीन- चार वर्ष झाली. नाही का?"
मी प्रश्नार्थक चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं.
"डॉक, मी सध्या मुंबईत असते.
तशी हैदराबाद, चेन्नई भरपूर फिरत असते शूटच्या निमित्तानं."
मी अविश्वासानं तिच्या तोंडाकडे बघत असतानाच ती पुढे म्हणाली, "मी हल्ली मॉडेल म्हणून काम करते आहे. बी.ए. नंतर जरा चेंज म्हणून मावशीकडे मुंबईला गेले. मावशीच्या घरी पीजी म्हणून राहत असलेली देवबाला मॉडेलिंगचा कोर्स करत होती. मी म्हटलं, आपणही करावा. अम्मानं परवानगी दिली अन् मग मी सहा महिन्यांचा कोर्स केला. कोर्स सुरू असतानाच मला ॲड्सच्या ऑफर्स यायला लागल्या. बी.ए. झाल्यावरही नोकरी वगैरे काही नव्हतीच. मग मी ही संधी स्वीकारायचा निर्णय घेतला.
अप्पा-अम्माला हे पसंत नव्हतं, पण मोठी अम्मा ठामपणे मागे उभी राहिली. माझ्या सावळ्या रंगानं आणि माझ्या फोटोजिनिक चेहऱ्यानं मला हात दिला. भरपूर काम मिळू लागलं. आतासुद्धा मी दुपारच्या फ्लाईटनं हैदराबादला निघाले आहे. मघाशी बाथरूममध्ये घसरले. पाय मुरगळला आहे. थोडी सूज पण आली आहे. म्हटलं, तिकडे गेल्यावर प्रॉब्लेम नको. तुम्हाला दाखवूनच जावं. त्या निमित्तानं तुमची भेटही होईल."
एका दमात एवढं बोलून शिबानी थांबली. तिच्या देखण्या चेहऱ्यावर विलक्षण आत्मविश्वास होता. मी पाय तपासला. औषधं दिली.
"तुमचा पन्नासावा वाढदिवस खूप जोरात साजरा झाला म्हणे! अम्मा सांगत होती." उत्साहानं माझा हात हातात घेऊन, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ती केबिनमधून बाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत माझ्या मनात मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. 'हिचा निर्णय योग्य आहे का ?'
https://chat.whatsapp.com/Fm1CPYb9KRcEjpn9Fw34ue
दिवस महिन्यांमध्ये आणि महिने वर्षांमध्ये झपाट्यानं बदलत होते. काही वर्ष अशीच निघून गेली. माझ्या रोजच्या व्यग्र दिनक्रमात ही घटना केव्हाच विस्मृतीत गेली. रोज सकाळ-संध्याकाळ शंभर-शंभर पेशंट्स तपासणं, तेही वर्षभर. हे काम खूप दमवून टाकणारं, काहीसं नीरस, त्यातून थोडासा विरंगुळा मिळवण्यासाठी मी नेहमी वेगवेगळ्या देशांचा प्रवास करत असतो. मला सध्या नव्या डेस्टिनेशन्सना भेटी द्यायला खूप आवडतं. आताही मी आठ दिवसांसाठी क्रोए‌शियाला निघालो होतो. सेक्युरिटी चेक, इमिग्रेशन, चेक इनचे सारे सोपस्कार उरकून मी वेटिंग लाऊंजकडे निघालो, वेटिंग एरियामध्ये नॅशनल, इंटरनॅशनल प्रवाशांची भरपूर गर्दी होती. सहज एका जोडप्याकडे लक्ष गेलं आणि मी हबकलोच, नक्की ती शिवानीच! केसांनी चेहरा झाकलेला होता. पण ती, तीच होती. एका गोऱ्या परदेशी माणसाच्या गालाला गाल घासत शिबानी बसली होती. तोकड्या कपड्यांत आक्षेपार्ह स्थितीत. तिनं मला बघितलं असावं. कारण मी जेव्हा त्यांच्या पुढून गेलो, तेव्हा तिनं आपला चेहरा त्या पुरुषाच्या चेहऱ्यानं झाकून घेतला. पण तेवढ्यातही तिनं माझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलेली घृणा नक्कीच पाहिली असणार.
नेहमीप्रमाणे ट्रिप छान झाली. परत निघालो तेव्हा मन आणि शरीरही फ्रेश झालं होतं. पण संपूर्ण प्रवासात मी निघताना पाहिलेली शिबानी मला बेचैन करत राहिली. लहानपणापासून पाहिलेली, मध्यमवर्गात वाढलेली, सुशील, कर्मठ, सज्जन आई-वडलांची ही पोर हे काय चाळे करते आहे. चेक आऊट करून मी एक्झिटकडे निघालो अन् समोर काचेच्या दारामागे शिबानी उभी. माझी वाट पाहत. फिक्कट निळी साडी नेसलेली, लांब बाह्यांचा ब्लाऊज, सौम्य मेकअप. जाताना पाहिलेल्या तिच्या रूपापेक्षा एकदम विपरीत. मी एअरपोर्टच्या बाहेर पडलो, तशी ती पुढे आली. माझी बँग स्वतःकडे घेत, ती ढकलत बानी माझ्या शेजारून चालू लागली.
"मला इथे पाहून धक्का बसला ना डॉक ? तुम्हालाच भेटायला आले आहे. तुमच्या एजंटकडून मी तुमच्या येण्याच्या सर्व फ्लाईट डिटेल्स मिळवल्या होत्या." धक्का तर मला खरंच बसला होता. तिला पाहून मला आनंद तर नक्कीच झाला नव्हता.
"मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं." असं म्हणत ती एअरपोर्टच्या रेस्टॉरंटकडे वळली. मनात नसतानाही मी तिच्या मागे आत गेलो. शिबानीनं फारशी वर्दळ नसलेला कोपरा निवडला. माझी बॅग शेजारी ठेवत ती खुर्चीत बसली. समोरच्या खुर्चीत मीही बसलो. सकाळचे सात वाजले होते. मला न विचारता, तिनं माझ्यासाठी इडली सांबार ऑर्डर केलं, स्वतःसाठी सँडविच. इडली हा माझा वीकपॉईंट आहे, हे तिच्या लक्षात होतं. काही क्षण असेच शांततेत गेले. माझी चुळबुळ सुरू झाली, पण ती बोलेना. बहुतेक योग्य शब्दांची जुळवाजुळाव सुरू असावी मनात.
"बानी, काय बोलायचंय तुला? बोलण्यासारखं काही राहिलं आहे का एवढं पाहिल्यावर?"
"डॉक, असं बोलू नका. आधीच तुमच्या नजरेतून मी उतरल्याचं दुःख माझं मन पोखरून राहिलंय. माझ्या आयुष्यात जे झालं, ते सारं तुम्हाला सांगायचं आहे मला. ऐकाल?" तिच्या स्वरात अजिजी होती. याचना होती.
"का? मलाच का?"
"कारण लहानपणापासून माझा तुमच्यावर विश्वास आहे, श्रद्धा आहे म्हणा ना. माझ्या पापाची तुमच्याजवळ कबुली दिली, तर कदाचित जरा हलक वाटेल मला म्हणून. मी घरात कुणाजवळ नाही बोलू शकत. अप्पांनंतर दुसरा जवळचा माणूस तुम्हीच आहात." वेटरनं आणून ठेवलेली इडली माझ्यासमोर सरकवत, अत्यंत गंभीर स्वरात ती बोलू लागली.
"माझं मॉडेलिंगचं करिअर बऱ्यापैकी आकार घेत होतं. पैसेही छान मिळत होते. अप्पांसाठी मी एक फ्लॅट पण घेऊ शकले, मॉडेलिंगच्या दुनियेत मी रुळले, त्यात मला खूप आनंदही मिळत होता. तिथली स्पर्धा,हेवेदावे अंगवळणी पडले. माणसांचे खरे-खोटे चेहरे हळूहळू ओळखाता येत गेले. सुदैवानं या व्यवसायात मुलींना करावी लागते ती तडजोड मला करावी लागली नाही. कधीतरी मेकअपमन किंवा कॅमेरामन यांचा साहेतूक केलेला स्पर्श कळायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करायला मी शिकले. सारं सरळ रेषेत सुरू असताना माझ्या आयुष्यात अचानक एक विचित्र वळण आलं अन्....." शिबानी एकदम गप्प झाली. गतकाळाच्या आठवणीनं तिचा चेहरा कसानुसा झाला.
"एक दिवस माझं सारं शूट संपल्यावर मी घरी निघाले. तेवढ्यात आमचा असिस्टंट, डायरेक्टर सरांचा निरोप घेऊन आला. मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. अनिंदो विश्वास नुकतेच कंपनीत जॉईन झाले होते. त्यांनी मला बसायची खूण केली, तेव्हा मी जरा संकोचानंच बसले. समोरच्या कागदांवरची नजर काढून त्यांनी माझ्याकडे पाहिलं, माझा वेध घेतल्याप्रमाणे.
'मिस शिबानी, आजचं शूट कसे झाले?'
'चांगलं झालं सर. एकाच टेकमध्ये पूर्ण झालं,
आता घरी निघालात ना? कुठे राहता ? घरी कोण कोण आहेत?' आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांची जुजबी माहिती विचारल्यासारखं ते बोलत होते.
'मी जवळच एक फ्लॅट घेऊन राहते. माझे परेट्स पुण्याला असतात. इथे मी एकटीच असते.
एखादं ॲडिशनल काम करण्यात इंटरेस्ट आहे ?'
"कसलं सर?' मी उत्सुकतेनं विचारलं.
'माझा एक मित्र आहे, अमेरिकन कामासाठी आला आहे. आज त्याचं काम संपलं. अजून तीन-चार दिवस तो इंडियात राहणार आहे. त्याला आग्रा आणि फतेहपूर सिक्री बघायचं आहे. तुम्ही जाल त्याच्याबरोबर ? खर्च सगळा तोच करेल. तुमच्या सोबतीची चांगली किंमतही देईल तो. तुम्ही फक्त एस्कॉर्ट करायचं त्याला' सर सहज स्वरात बोलले.
म्हणजे मला काय करायचंय सर ?'
'काही नाही. सतत त्याच्याबरोबर फिरायचं, त्याला  आग्रा दाखवायचा. तो जे म्हणेल ते करायचं. तो आनंदी, खूष राहील अशी काळजी घ्यायची.
खरं सांगते डॉक, तोपर्यंत मला 'एस्कॉर्ट'चं फक्त डिक्शनरी मीनिंग माहीत होतं. एखाद्याला सोबत करणं, त्याची काळजी घेणं, रक्षण करणं, मला वाटलं चला, जरा नेहमीच्या चाकोरीतून सुटका होईल, आपलीही. आग्र्याला ट्रिप होईल बिनाखर्च. पुरुषांबरोबर प्रवास ही काही नवीन बाब नव्हती. शूटिंगला मी अगदी रिमोट ठिकाणीही एकटी जात असे टीमबरोबर. मी सरांना आनंदानं होकार दिला. त्यांना खूष केलं, तर त्याचा मला पुढे फायदाही होईल, असा स्वार्थी विचारही डोकावला माझ्या मनात.
'मग उद्या सकाळी ६.२० पर्यंत एअरपोर्टला पोचा. आणि हो, दोन-तीन दिवस राहण्याच्या तयारीनं या.'
मोठ्या उत्साहानं मी एअरपोर्टला पोचले. आपण एका विदेशी पर्यटकाला आपल्या देशाची एक हेरिटेज वास्तू दाखवायला जातो आहोत, हा सूक्ष्म देशाभिमानही होता मनात. किती मूर्ख होते मी. अनिंदो सर त्याच्या मित्राला घेऊन आले. माझी ओळख करून दिली. बिल कार्टर. आपण नेहमी पाहतो तसाच तो अमेरिकन पर्यटक होता. बडे बापवाला, हॅप्पी गो लकी. हसरा. निळे डोळे मिश्किलपणे मिचकावून बोलणारा. चाळिशीचा तरुण, म्हटलं चला, कंपनी तर छान आहे.
आग्ऱ्याला पोचल्यावर ग्रैंड पॅलेसच्या लॉबीमध्येच बिलनं लगेज हॉटेलच्या स्टाफकडे सोपवून दिलं आणि लगेच 
निघालो. ताजमहाल आणि आग्रा फोर्ट दोन्ही एका दिवसांत बघायचं होतं. ताज बघताना तो अक्षरशः वेडा झाला. मधून मधून माझा हात पकडून 'marvellous, stunning!' असे उद्‌गार काढत मला मिठीही मारली. मला त्याचं फारसं काही वाटलं नाही. एवढी वर्ष या फील्डमध्ये राहून इतकी सहिष्णुता माझ्यात आली होती. लंच घेतल्यावर आम्ही आग्रा फोर्टला गेलो. डॉक, फोर्ट बघताना मलाही खूप विशेष वाटलं, इतका सुंदर प्रेक्षणीय आहे. त्यात गाईड इंग्लिशमध्ये अप्रतिम माहिती देत होता. बिल त्याला खूप प्रश्न विचारत होता. एक नवा अनुभव मिळाला. फिरताना पॉपकॉर्न, आईस्क्रीम, सारखं चरणं होतं त्याचं आणि बरोबर माझंही. सोबत त्याची गंमतशीर बडबड, खूप मजा आली. वाटलं, बरं झालं, आपण बिलबरोबर आलो. छान चेंज झाला. फोर्ट बघून झाल्यावर खरेदी करत आम्ही आग्र्यात फिरलो, गोलगप्पे खाल्ले. पाणीपुऱ्या खाताना त्याची होणारी धांदल पाहून त्याची चेष्टाही केली. बिलनं माझ्यासाठीही खूप खरेदी केली, मी 'नको नको' म्हणत असताना. आम्ही रात्री हॉटेलवर परतलो. काऊंटरवरून किल्ल्या घेऊन आम्ही बिलच्या रूमवर आलो. बिलच्या सामानाबरोबर माझं सामानही तिथे दिसलं, जरा नवल वाटलं. मनात म्हटलं, 'तात्पुरतं ठेवलं असेल." फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. तिथला एकूण सगळा घाट पाहून मी भारावून गेले. आम्ही डिनर बिलच्या रूममध्ये घेतले. त्याला कंपनी म्हणून मी ड्रिंकही घेतलं. त्याची अखंड बडबड सुरू होती. सारखं माझं कौतुक करत होता. माझ्या दिसण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं मलाच जरा संकोच वाटला. एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते. गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही. छान गेला एवढं खरं.
एवढ्यात बिल उठला अन् 'मी वॉश घेऊन येतो,' एवढं बोलून बिल झटकन बाथरूममध्ये गेलाही. मी त्याला माझ्या रूमबद्दल विचारायच्या आधीच. आता रूममध्ये मी एकटीच होते. नाही म्हटलं तरी दिवसभराच्या भटकंतीमुळे शीण आला होता. खरंतर मला माझ्या रूमवर जाऊन मनसोक्त अंघोळ करण्याची जबरदस्त इच्छा झाली होती, पण आता बिल येईपर्यंत थांबावंच लागणार. मी तिथल्या सोफ्यावर आडवी झाले. केव्हा डोळा लागला कळलंच नाही.
जाग आली ती कसल्या तरी ओलसर स्पर्शानं, बिल माझ्या गालांवरून त्याचे ओठ फिरवत होता. मी घाबरून एकदम उठून उभी राहिले. शेजारी बिल कमरेला फक्त एक मोठा पांढरा टॉवेल गुंडाळून उभा होता. माझा गोंधळ उडालेला पाहून तो मागे झाला.
'डार्लिंग, तू बाथ घेऊन ये.'
'मी माझ्या रूममध्ये जाऊन घेईन.'
'तुझी रूम ? हीच तुझीही रूम आहे.
आपण एकच रूम बुक केली आहे. तुला अनिदोनं सांगितलं नाही?'
मी हादरलेच. अपरिचित माणसाबरोबर एका खोलीत, एका बेडवर झोपायचं ! शूटला गेलो तरी माझ्यासाठी स्वतंत्र रूम बुक केलेली असे. सगळे परिचित असूनही. आता माझ्या डोक्यात 'एस्कॉर्ट' शब्दाचा खरा अर्थ. अनिंदो सरांचे शब्द आठवले, 'सतत त्याच्या बरोबर राहायचं, त्याला हवं ते द्यायचं. त्याला खूष ठेवायचं.' मला उमगेना काय करावं. या अनोळखी शहरात, एवढ्या रात्री जाणार तरी कुठे? मनाचा गोंधळ लपवण्यासाठी मी बॅगेतून माझे कपडे घेऊन चटकन बाथरूममध्ये शिरले. शॉवरखाली उभी किती काळ उभी होते कोण जाणे. बिलनं दारावर टॅप केलं, तेव्हा मी भानावर आले. अंगावर गाऊन चढवून बाहेर येताना माझं हृदय जोरात धडधडत होतं. बिल एव्हाना बेडमध्ये शिरला होता. मी नुसती उभी होते संभ्रमात. त्यानं दोन्ही हात पुढे केले. येण्याचं आवाहन दिल्यासारखे. मी परिस्थितीला शरण गेले अन् अलगदपणे त्याच्या मिठीत शिरले, खरं सांगू डॉक, दिवसभराची जवळीक, मद्याचा परिणाम, नुकताच अंघोळ करून आलेल्या बिलभोवती पसरलेला सुगंध आणि... आणि त्याच्या गोऱ्यापान, उंच्यापुऱ्या पुरुषी देहाची, पुरुषी गंधाची मला भुरळ पडली. आजवर कधी न घेतलेला अनुभव घेण्यासाठी मी स्वतःला झोकून दिलं,
दोन दिवसांनी मी मुंबईला परत आले. बिल दिल्लीहूनच यूएसला परत गेला. जाताना माझी पर्स नोटांनी भरून गेला होता. कामावर परतले तेव्हा अनिंदो सर मला दोन दिवस भेटलेच नाहीत. शेवटी मीच जाऊन भेटले त्यांना, मी आग्र्याच्या ट्रिपचा एका शब्दानं उल्लेख केला नाही. त्यांनीही नाही केला. रूटिन सुरू राहिलं. महिन्याभरानं त्यांनी मला पुन्हा बोलावलं, त्यांच्या एका परिचिताला तीन दिवस काश्मीरला एस्कॉर्ट करायचं होतं. मग हा सिलसिला सुरूच राहिला. कधी बेंगलुरु, कधी पाँडिचेरी, जयपूर, कधी राजस्थान डेझर्ट सफारी. मी त्यात वाहवत गेले. पैसे न खर्च करता चैन करायला मिळते, मिळणाऱ्या पैशाला गणती नव्हती. तारुण्याच्या लाटेवर मी वाहत गेले. त्यात चांगले-वाईट अगदी पाशवी अनुभवही आले. पण त्यातून मला बाहेर पडता आलं नाही."
शिबानी एकदम बोलायची थांबली. मीही माझी इडली संपवली, न बोलता. म्हणजे काय बोलावं, हे कळत नव्हतं. शिबानीचं प्रांजळ कथन खरंतर भयंकर होतं, संतापजनक होतं. पण मला तिचा राग येण्याबरोबरच तिची कीवही आली. पैसा, चैनीच्या मोहात भान विसरलेल्या या नव्या जगाचा हा चेहरा माझ्यासारख्या मागच्या पिढीला अपरिचित होता, अनाकलनीय होता. समोर आलेली कॉफी सुन्नपणे पित राहिलो. शिबानी पण खाली मान घालून बसून राहिली. समोरची तिची कॉफी थंड झाली होती. त्यावर साय धरली होती, पण तिनं वर पाहिलं नाही. शेवटी मीच म्हणालो, "चल, निघू आता. खूप उशीर झालाय."
निःशब्दपणे आम्ही उठलो. निरोप घेताना नकळत काळजीच्या स्वरात मी म्हणालो, "काळजी घे स्वतःची."
दोन-तीन वर्ष अशीच गेली. शिबानीचा विचार माझ्या डोक्यातून गेला होता, नव्हे मी जाणीवपूर्वक काढून टाकला होता. अचानकपणे 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'त ती मला दिसली. अंगावर भारी जरीची साडी, पाठीवर सोडलेली एक लांब वेणी, त्यावर मोगऱ्याचे तीन-चार गजरे माळलेले, अंगावर मोजकेच पण ठसठशीत दागिने आणि कुंकवानं भांग भरलेला. हातात सोन्याच्या बांगड्यांसोबत काचेच्या बांगड्या. हे तिचं रूप अतिशय लोभस दिसत होतं. तिच्या मूळच्या सौंदर्याला झळाळी चढलो होती. हे काय नवीन नाटक आता! मी चकित होऊन पाहू लागलो. बरोबर तिचे अम्मा अप्पाही होते. शिवाय, तिच्याशेजारी एक तरतरीत, देखणा युवकही दिसत होता. व्हेरी वेल ड्रेस्ड, मी खूप दिवसांनी भेटल्यामुळे तिच्या आई- वडलांना खूप आनंद झाला होता.
"Meet my son-in-law. Mr. shekharan gopal. He is in Central Government's foreign services. He was posted abroad many years. Just shifted to India." शिबानीच्या बाबांनी ओळख करून दिली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान यांचं गमतीदार मिश्रण उमटलं होतं. मी थक्क होऊन शिबानीकडे पाहिलं. तिनं माझी नजर चुकवली. मला खात्री होती, की ती लवकरच माझ्या क्लिनिकमध्ये धडकणार. झालंही तसंच. दुसऱ्याच दिवशी क्लिनिक बंद होण्याच्या सुमारास शिबानी हजर. तिचा पेहराव खूप सौम्य होता. तिची चर्या खूप प्रसन्न दिसत होती. तिचं हे रूप खूप लोभस होतं. मी तिच्याकडे बघतच राहिलो.
"हे काय नवं नाटक आहे, बानी?" मी थोड्या कठोरपणे विचारलं.
"हे नाटक नाही, डॉक. ही रिॲलिटी आहे. माझं शेखरनबरोबर लग्न झालं आहे. खरंच,"
"हे अघटित कसं घडलं?"
"हे खरंच अघटित घडलं आहे. त्या दलदलीतून मी कधीच बाहेर पडणार नाही आणि कंटाळून मी एक दिवस जीव देईन, असंच मला वाटत होतं. सुरुवातीला वाटलेलं थ्रिल हळूहळू कमी झालं. पैशांचंही आकर्षण संपलं, आपण जे करतोय, ते घरी कळलं तर ती पापभीरू माणसं हाय खातील, ही बोचही मनाला स्वस्थता मिळू देईना. मी सारी खबरदारी घेत होते, पण तरीही सतत भीती वाटे. पण यातून बाहेर पडता  येईना. ऑफर आली की मी मनात नसलं, तरी जात असे. माझी अनिच्छा मी अनिंदो सरांनाही सांगितली होती. तशात एक दिवस अनिंदो सरांनी एक ऑफर आणली.
'बानी, माझ्या खरंच जवळचा एक मित्र आहे. आयएएस अधिकारी आहे. सरकारच्या फॉरन सव्र्व्हिसेसमध्ये आहे. एवढी वर्ष परदेशातच होता. आता इंडियात पोस्टिंग झालंय त्याचं, हम्पी या आपल्या वर्ल्ड हेरिटेजला आणखी कसं लोकप्रिय करता येईल, याचा अभ्यास करण्याचा प्रोजेक्ट त्याच्याकडे देण्यात आला आहे. तो एक आठवडा तिथे राहणार आहे. त्याला एस्कॉर्ट करशील?'
माझ्या चेहऱ्यावरची नाखुषी पाहून सर जरा नाराज झाले.
'माझ्याकडून तुला ही अखेरची ऑफर आहे, असं समज. प्लीज ! चांगला उच्चशिक्षित आहे. डिसेंट आहे. त्याला चांगली सोबत हवी आहे. मला म्हणाला, 'जरा बोलका, लाईव्हली पार्टनर दे. सोबत राहून बोअर होणार नाही असा. शिवाय, तिथली माहिती असलेला. आठ दिवस काढायचे आहेत यार।' त्याला मुख्यतः हम्पीचा अभ्यास करायचा आहे. तू तिथे बऱ्याच वेळ जाऊन आली आहेस. तुला तिथला कोपरा न् कोपरा माहीत आहे. त्याचं बोलणं ऐकून मला तुझंच नाव आठवलं. प्लीज, 'नाही' म्हणू नको.'
हे खरं होतं, की मी हम्पीला खूप वेळा गेले होते. परदेशी पर्यटकांचं कोणार्क, खजुराहो इतकंच लाडकं डेस्टिनेशन हम्पी होतं. पाहुण्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देता यावं म्हणून मी तिथल्या वास्तूंची माहितीही समजून घेतली होती, इतिहासाचा थोडा अभ्यासही केला होता.
दुसऱ्या दिवशी मी आणि शेखरन गोपाल हुबळीच्या एअरपोर्टला उतरलो. आम्हाला न्यायला एक सरकारी गाडी आली होती. शेखर खरोखरच डिसेंट तरुण होता. वेल ड्रेस्ड, वेल मॅनर्ड, बोलण्या- वागण्यात एकदम रिफाईंड. प्रवासातही मांडीवर कम्प्युटर उघडून ठेवलेला होता. बऱ्याच वेळा लँडस्केप निरखत होता. बरोबरच्या कॅमेऱ्यानं फोटो घेत होता. आपल्या लॅपटॉपवर नोट्स घेत होता. संपूर्ण प्रवासात माझ्याशी जवळीक करण्याचा किंचितही प्रयत्न केला नाही त्यानं. काम करत असताना मधून मधून गप्पाही मारत होता, पण त्याचे बोलायचे विषयही निराळे होते. परदेशांतली अनेक ठिकाणं त्यानं पाहिली होती. आता देशातली प्रसिद्ध स्थळं बघायची होती त्याला. मी देशात कुठे कुठे फिरले आहे, काय काय पाहिलं आहे,
त्यातलं कोणतं ठिकाण मला आवडलं, का, असे प्रश्न तो विचारत होता. मी अलेप्पीच्या बँक वाटर्सबद्दल सांगितलं, तेव्हा उत्साहाने म्हणाला, 'मलाही जायचं आहे तिकडे. तिथल्या बोटींमध्ये आणि बँक वाटर्सच्या बाजूच्या जुन्या बांधणीच्या बंगल्यांमध्ये राहणं एक अनुभव असतो म्हणे. त्यांचे संपूर्ण लाकडी डेकॉर, खास केरळी फूड, कच्च्या केळ्याची भाजी, अप्पम विवीध स्ट्यू वगैरे. खूप ऐकल आहे.' एकूण संभाषणाची दिशा, विषय, त्याच वागणं सारंच इतरांपेक्षा खूप निराळं होतं.
जाताना सगळीकडे सर्वत्र प्रचंड मोठे दगड दिसले. आमची गाडी कुठल्या मोठ्या हॉटेलवर न जाता, एका सरकारी गेस्ट हाऊससमोर थांबली. तेही एखाद्या फाईव्ह स्टारपेक्षा कमी नव्हतं. मॅनेजरसकट सगळा स्टाफ स्वागताला बाहेर आला होता. त्यांच्या वागण्यात विलक्षण आदब होती. एकूण सरकारी अधिकाऱ्यांची शान वेगळीच. मला पहिला शॉक बसला तो माझ्यासाठी स्वतंत्र रूम बुक केलेली होती हे पाहून. शेखरनच्या शेजारीच असलेली माझी रूम खूप सुरेख, कोझी होती. लंच घेऊन थोडी विश्रांती घेऊन आम्ही बाहेर पडलो. आधी आम्ही टूरिझमच्या ऑफिसमध्ये गेलो. शेखरननं तिथल्या ऑफिशिअल गोष्टींची पूर्तता केल्यावर आम्ही निघालो. ऑफिसच्या प्रमुखांनी 'बरोबर गाईड देऊ का?' विचारलं. त्यावर शेखरननं नम्रपणे नकार दिला.
गाडीत बसताना शेखरन गमतीनं म्हणाला, 'मॅडम, आता माझ्या गाईड तुम्ही! सारी टूर तुम्ही प्लॅन करायची. मी तुमचा पदर धरून, नो, नो, तुमची स्लोग बॅग धरून तुमच्या मागे येणार!' मला गंमत वाटली. मी हम्पीचं सगळ्यात मोठं भूषण असलेल्या विजय विठ्ठल मंदिराला भेट द्यायचं ठरवलं, माझा स्वतःचा तो आवडता स्पॉट होता. विठ्ठल मंदिराकडे जाताना अनेक दगडी बांधकामं दिसली. विविध देवळं, बाजारपेठ, सभामंडप, द्राविडियन शैलीतले भव्य, काही सुस्थितीत, काही भग्न अवशेष, तरीही विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची साक्ष देणारे. मी मोठ्या उत्साहानं हम्पीची माहिती सांगू लागले. शेखरनही ती लक्षपूर्वक ऐकू लागला. पण त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल स्मित होते. मी सांगितलेल्या माहितीत तो भर घालू लागला, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की तो सरकारी अधिकारी आहे, उच्च पदावरचा. इथे येण्यापूर्वी तो हम्पीचा सारा सखोल अभ्यास करूनच आला असणार ना फक्त प्रत्यक्ष बघितलं नव्हतं. मग मलाच माझं हसू आलं.
तिरुमला प्रवेशद्वारातून आम्ही मंदिरात प्रवेश केला. तशी मंदिराला तीन उत्तुंग प्रवेशद्वारं आहेत. कृष्णदेवरायच्या तीन पत्नीनी बांधलेली. आत प्रवेश करताच प्रथम मनाला स्पशून गेलं ते प्रसन्न वातावरण, एक प्रकरची पॉझिटिव्हिटी आसमंतात भरून राहिली होती. शेखरन उत्साही झाला. पटापट फोटो घेत सुटला. मंदिराचे प्रांगण खूप प्रशस्त, सर्वत्र दगडी बांधकामं दिसत होती. मधोमध प्रशस्त, अतिशय देखणं विठ्ठल मंदिर, मंदिराच्या बरोबर समोर, चटकन नजरेत भरणारा जगप्रसिद्ध दगडी रथ. शेखरन आधी रथाकडेच गेला. त्यानं वॉलेटमधून पन्नास रुपयांची नोट काढली अन् रथाच्या समोर धरून दोन्हीचं निरीक्षण करू लागला. मग शांतपणे नोट वॉलेटमध्ये ठेवली अन् बारकाईनं रथाचा अभ्यास करू लागला. त्यावरचं कोरीव काम, त्याची प्रमाणबद्धता. कुठे कुठे झालेली पडझड, साऱ्याच्या बारकाईनं नोंदी घेत होता. तो सरकारी अधिकारी असल्यामुळे आम्हाला रथात जाऊन गरुडाची मूर्तीही बघता आली. रथाच्या कारागिरीचं कौतुक करताना त्याला शब्द कमी पडत होते. विठ्ठल मंदिर विलक्षण कोरीव काम केलेल्या अनेक खांबांवर उभं आहे. गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती नाही. इथली विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर इथे स्थापित केली आहे. महामंडप, सभामंडप गाभारा पाहून आम्ही रंगमंडपात आलो, रंगमंडप ५६ अद्वितीय खांबांवर उभा आहे. मधे एक खांब आणि भोवती सात खांब मधला मोठा खांब निरनिराळ्या संगीत वाद्यांच्या आकाराचा आणि आणि भोवती सात अ‌द्भुत खांब त्यांवर हातांनी आघात केला, की खांबांमधून सप्तस्वर उमटतात, हे अद्भुत आपल्या पूर्वजांनी कसं साध्य केलं, हे आजही रहस्य आहे. इंग्रजांनी दोन खांब कापून खूप संशोधन केलं. पण त्यांना हे रहस्य उलगडलं नाही. विठ्ठल मंदिराच्या पायावर वेगवेगळ्या नक्षीदार बॉर्डर्स आहेत, त्यांच्या कारागिरीला तर तोडच नाही. सगळ्यात खाली वेगवेगळ्या देशांमधून आपले घोडे विकायला घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांची बॉर्डर कोरली आहे. इथे त्या काळात घोड्यांचा मोठा व्यापार चाले. एक बांगड्यांची नक्षी असलेली अतिशय सुंदर बॉर्डर आहे. पावसाचे पाणी साचून मंदिराचं नुकसान होऊ नये, म्हणून कारागिरांनी एक युक्ती केली होती. वरपासून खालपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण छिद्र कोरली होती. वरच्या ओळीच पाणी खालच्या छिद्रात, तिथून आणखी खालच्या छिद्रांत, असं करत तिथून आणखी खाली पडत पडत वाहून जात असे. एकूण तिथली भव्यता आणि कोरीव काम पाहून शेखर अगदी भारावून गेला.
विठ्ठल मंदिराच्या परिसरात आणखी अनेक वास्तू होत्या. त्या साऱ्या बघून आम्ही गेस्ट हाऊसमध्ये परतलो. डिनरनंतर आधी आम्ही रूमबाहेरील व्हरांड्यात गप्पा मारत बसलो. त्यानं कॉफी ऑर्डर केली. गरम कॉफीचे घोट घेत आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. त्यानं बरंच जग पाहिलं होतं. ते अनुभव खूप छान भाषेत सांगत होता. आजच भेट झालेले आम्ही खूप जुन्या मित्रांप्रमाणे गप्पा मारत होतो. शेवटी तो उठला.
'चल, सकाळी लवकर निघायचं आहे. उद्या बऱ्याच जागा कव्हर करायच्या आहेत.' त्याच्या रूमचं दार त्यानं उघडलं. माझ्या हृदयात उगीचच कधी नव्हे ते धकधक सुरू झाली. दिवस इतका मजेत गेला होता. पुढचा विचार नको वाटला. एवढ्यात शेखरन मला म्हणाला, 'झोपायच्या आधी रूमची दारं-खिडक्या नीट चेक करून घे आणि काही वाटलं तर कॉल कर. गुड नाईट आणि तो आत निघून गेला. मी आश्चर्यान पाच मिनिटं तिथेच बसून राहिले. मग माझ्या रूममध्ये आले. एकूण आजचा दिवसभराचा अनुभव फार वेगळा पण आनंददायी होता. पुढचे सारे दिवस हा आनंद सुरूच राहिला. रोज दिवसभर आम्ही निरनिराळ्या साईट्स बघत फिरलो. कमल महल, हत्तीखाना, हजारीराम मंदिर, एका प्रचंड शिलेतून कोरलेली लक्ष्मी-नृसिंहाची महाकाय, २० फूट उंचीची एकाच शिळेतून कोरलेली मूर्ती, अनेक मंदिर, राजदरबारचा विशाल चौथरा, मारुतीचं जन्मस्थान अंजनेय पर्वत, पंपा सरोवर आणि महानवमी डिब्बा, राजतुला आणि कितीतरी, एकूण एक वास्तू या स्थापत्यकलेचा आणि कोरीव कामाचा अनुपम नमुना होती. अत्यंत प्रमाणबद्ध असंख्य पायऱ्यांची पुष्करणी पाहून आणि विरुपाक्ष मंदिरातल्या पिनहोल कॅमेऱ्यातून दिसणारी गोपुराची प्रतिमा पाहून तो आवक् झाला.
'आपले पूर्वज आपल्यापेक्षा सर्वच बाबतीत किती श्रेष्ठ होते, हेच इथे येऊन कळलं. उगीच नाही जगभरातून लोक इथे येऊन अभ्यास करतात.' एका जागी मोठी खोल सपाट विस्तीर्ण जागा होती. त्या जागी कृष्णदेवरायच्या काळात नवरत्नांचा बाजार भरत असे म्हणे, हिरे, मोती, माणकं तराजूनं तोलले जात असत म्हणे, शेखरन हम्पी पाहून नुसता चकित झाला होता, आणि डॉक, खरं सांगू, मी आजवर कितीतरी वेळा हम्पीला आले होते वेगवेगळ्या लोकांबरोबर, पण तिथल्या शिल्पसौंदर्याचा एवढा निखळ, निर्भेळ आनंद मी पहिल्यांदाच अनुभवला. पूर्वी दरवेळी नाहीतरी पोटात रात्रीची भीती असेच, अनोळखी पुरुष, कसा वागेल, काय करेल ? शेखरनन मला कधीही त्याच्या रूममध्ये बोलावलं नाही. रोज रात्री गेस्ट हाऊसच्या व्हरांड्यात गप्पांची मैफल रात्री उशिरापर्यंत रंगे.
कधीतरी ड्रिंक्सचा आस्वादही घेत असू. साईट्स बघताना हास्यविनोद, चेष्टामस्करी चाले. पण त्यानं माझ्याशी कधीही लगट केली नाही. वास्तूंचं रसग्रहण करताना फारच एक्साईट झाला, तर क्वचित हात धारत असे, एवढंच. पण त्या स्पर्शात कधी वासनेचा लवलेशही नसे. आमच्यामध्ये एक सुंदर बॉडिंग निर्माण झालं होतं मैत्रीचं, विश्वासार्ह, वेळ मिळेल तेव्हा तुंगभद्रेच्या काठी मोठ्या दगडांवर निवांतपणे बसून राहत असू. वाटलं तर कोरॅकल राईडचा आनंद घेत असू. त्या गोल बोटींमध्ये बसून तुंगभद्रेच्या पात्रात गोल गोल प्रवास म्हणजे एक गमतीशीर अनुभव असे. गेस्ट हाऊसमधून निघताना भरपूर खाद्यपदार्थ बरोबर दिलेले असत. कोरॅकल राईडमध्ये त्यांचा समाचार घेतला जायचा. संध्याकाळी मातंग टेकडीवर सूर्यास्त बघायला जायचं, हे ठरलेलंच असे. दिवसभराच्या दमणुकीनंतर सूर्यास्त बघत निवांत बसण्यासारखं दुसरं सुख नव्हतं. समोर विजयनगरच्या साम्राज्याची याद करून देणारं विशाल शहर, त्याच्या सभोवताली प्रचंड मोठ्या मोठ्या दगडांची स्काय लाईन, तुंगभद्रेचं शांत पात्र, शेजारी शेजारी बसून हे विहंगम दृश्य मनात कायमचं घर करून राहिलं,
मातंग टेकडीवर संध्याकाळी सूर्यास्त होऊन कितीतरी वेळ गेला, तरी शेखर उठायचं नाव घेईना. आपल्याच विचारात तो गुरफटला होता, उद्या परतायचं, दोघांच्या वाटा वेगळ्या. माझं मनही उदास होतं. मी नकळत शेखरनवर जीव जडवून बसले होते. हा खूप आधी माझ्या आयुष्यात का नाही आला!
एवढ्यात शेखरनं अचानक माझे दोन्ही हात पकडले आणि भावनावेगानं म्हणाला, 'बानी, एक विचारू? गैरसमज नाही ना करून घेणार?' मी दचकून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं.
'बानी, माझ्याशी लग्न करायला आवडेल तुला?' हा प्रश्न एखाद्या बॉम्बगोळ्यासारखा माझ्या कानांवर आदळला. 'तू काय बोलतो आहेस कळतंय का तुला? माझा भूतकाळ...
'माहीत आहे मला, अनिदोनं तुझ्याबद्दल सारं सांगितलं आहे. हम्पीमध्ये मी सरकारी प्रोजेक्टवर आलो होतो. पण एकटं फिरायच्या ऐवजी एक सोबती हवा होता. उत्साही, खेळकर, मनमोकळा. अनिंदोनं तुझं नाव सुचवलं. मला पहिल्याच नजरेत तू खूप आवडलीस. मग मी तुझं बारकाईनं निरीक्षण करू लागलो. तुझा हसरा स्वभाव, नेटक वागणं, नेमकेपणा, गोड बोलणं या साऱ्याची मला भुरळ पडली आहे. गेल्या आठ दिवसांत मला तुझ्या वागण्यात जराही उथळपण दिसला नाही. तुझ्या हावभावात, नजरेत, हालचालीत कणभरही उठवळपणा जाणवला नाही. प्रत्येक गोष्ट एंजॉय करताना तुझ्या चेहऱ्यावर निरागस भावच उमटायचे. ते मला तुझ्याकडे आणखी आकर्षित करतात. बानी, मी तुझ्या भूतकाळाचा विचार करत नाही. मला वर्तमान, भविष्य महत्त्वाचं वाटतं.'
ज्याची मी कल्पनाही केली नव्हती, ते सुख अकल्पितपणे माझ्या पुढ्यात आलं होतं. मी त्या सुखाच्या वर्षावात भिजून चिंब झाले होते अन् शेखरन पुनःपुन्हा विचारत होता, 'बानी, मला तुला जन्मभर एस्कॉर्ट करायला आवडेल. मला जीवनभर तुझा एस्कॉर्ट बनून राहायचं आहे... तुला आवडेल का हे?'"

शुभांगी पाथरकर, पुणे
kishoripatharkar@gmail.com 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...