“अक्का खूप आजारी आहेत. आठवण काढत आहेत. एकदा येऊन भेटून जा” असा नीरजाचा निरोप येऊन खरं तर ८-१० दिवस होऊन गेले होते पण काही ना काही कामं निघत राहिली आणि जायचं राहून गेलं. अक्का तशा माझ्या कुणीच लागत नव्हत्या. माझ्या मावशीच्या जावेची बहिण–इतका लांबचा संबंध होता आमचा. बालविधवा होत्या - घरात तसं त्यांना काही महत्त्वाचं स्थान नव्हतंच. मग कुणा नातेवाईकाकडे काही अडचण निघाली की अक्कांची रवानगी तिथे होई. अक्का त्या घरी मिळून-मिसळून राहत, तिथली अडचण निस्तरली की दुसरीकडे कुठेतरी बोलावणं असेच, नाहीतर मग पुतण्याकडे जात. नीरजा त्यांच्या चुलतसुनेची सून. म्हणजे तशी त्यांची नातसूनच. पुतण्याच्या घरात अक्कांना थारा होता, त्यांना कधी कुणी जा म्हटलं नाही पण प्रेमाने अगत्यही दाखवलं नाही. कर्तव्य समजून त्यांचं करत राहिली ती माणसं. पण तेवढंही आजकाल कोण करतं? त्यामुळे अक्कांना फार कृतज्ञता वाटे त्यांच्याबद्दल. एक दिवस मी अगदी वेळ काढून मुद्दाम अक्कांना भेटायला गेले. अक्कांची अगदी जुडी झाली होती. अंथरुणावर दिसतही नव्हत्या. मी त्यांच्याजवळ बसले. त्यांचा हात धरला.
“कशा आहात अक्का ?”
माझा आवाज ऐकून त्यांनी डोळे उघडून पाहिलं. चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित उमटलं. मला अगदी भरून आलं. अक्का खूप राबल्या होत्या आमच्या घरी. माझ्या भावांच्या मुंजी, आमची सगळ्यांची लग्नं, आम्हा बहिणींची आणि भावजयांची बाळंतपणं, आईचं आजारपण असे कितीतरी प्रसंग. प्रत्येक वेळी आई हक्काने अक्कांना बोलवून घेई. त्याही लगेच येत. आल्या-आल्या त्यांच्या हातात स्वयंपाकघर सोपवून आई इतर गोष्टीत लक्ष द्यायला मोकळी होई. प्रत्येकाची आवड, आमच्या घरच्या पद्धती, चवी-ढवी सगळं बरोब्बर लक्षात असे त्यांच्या. आमच्या परीक्षा, इतर उद्योगही त्यांना पाठ असत. आमच्या घरी यायच्या वेळा लक्षात ठेवून आवर्जून काहीतरी खायला, चहा त्या तयार ठेवीत. प्रेमाने आग्रह करून खायला घालीत. आई नेहमी म्हणे, “देव तरी कसा निष्ठूर. इतकी हौस आहे संसाराची, हाताला चव आहे. पण स्वत:चा संसार काही करु शकली नाही बिचारी. सासरे त्या काळी थोड्या नव्या विचारांचे म्हणून केशवपन तरी टळलं बाईचं. नाहीतर त्या काळी कोकणातल्या त्या चार उंबऱ्यांच्या खेड्यातले कर्मठ ब्राह्मण हिला तसेच सोडणार होते की काय ?”
अक्कांच्या वयाचा आम्हाला कधी नेमका अंदाज यायचाच नाही. विचारलं तरी त्याही हसून टाळायच्या. आता त्या आडगावात त्यांच्या जन्म तारखेची नोंद तरी कोण करणार होतं म्हणा. पण आईपेक्षा ५-७ वर्षांनी तरी लहान असाव्यात त्या. उभं आयुष्य ह्याच्या-त्याच्या घरी चूल फुंकण्यात गेलं. कोणतंच घर कायमस्वरूपी त्यांचं झालं नाही. आयुष्याच्या अखेरीला डोकं टेकायला जागा मिळाली हेच मोठं नशीब अशी परिस्थिती. त्यांचा हात हातात घेऊन मी त्यांची चौकशी केली. माझा हात त्यांनी अगदी घट्ट धरला. त्यांच्या त्या कृश हातात अजून बरीच शक्ती होती म्हणायची. माझा हात आपल्या गालावर घट्ट दाबून धरला. त्यांच्या डोळ्यातल्या काढत पाण्याने माझा हात ओला झाला. मला अगदी अवघडल्यासारखं झालं. एका मागोमाग एक कामे चपळाईने उरकणाऱ्या अक्का अशा विकल झालेल्या पाहून पोटात अगदी तुटलं. त्यांच्या डोक्यावर मी हात फिरवला. तोही हात आपल्या हातात घेऊन त्यांनी छातीशी अगदी घट्ट धरला. आता मला आणखीच अवघडायला झालं. तेवढ्यात नीरजा खोलीत आली. तिची चाहूल लागल्याबरोबर अक्कांनी माझे हात सोडून दिले. त्यांच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून ती म्हणाली, “चहा घ्यायला बाहेरच चला तुम्ही. इथे नको. पडू दे त्यांना शांत.”
मी तिच्या मागोमाग बाहेर आले. तिने पुढे केलेला चहा न बोलता घेतला. ती घुटमळत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं बहुतेक. बोलू की नको अशा संभ्रमात असावी. अखेर म्हणालीच, “तुमच्या आईची आणि तुम्हा सर्वांची सतत आठवण काढतात. त्यांना फार वाटतं तुम्हा सगळ्यांबद्दल. त्यांना तुम्ही जवळच्या वाटता म्हणून एक सांगावंसं वाटतं. बोलू का ?”
“हो, हो. बोल ना. अगदी नि:संकोच बोल.” मी असं म्हटलं खरं, पण मनातून थोडी धास्तावलेच. तिच्या प्रस्तावनेचा एकूण सूर पाहून अक्कांना तुमच्याकडे न्या असं म्हणते की काय याची सूक्ष्म भीती वाटली. ह्यांच्या अनियमित वेळा, मुलां-नातवंडांचं वेळापत्रक सगळं क्षणात मनात उभं राहिलं.
“अक्का हल्ली फार विचित्र वागतात. मुलांना जवळ बोलावतात, त्यांचे हात कुरवाळतात, त्यांना आपल्या अंगावरुन हात फिरवायला सांगतात. मुलांना नाही आवडत. या सदा कुणाच्या ना कुणाच्या घरी चूल फुंकत राहिलेल्या. मुलांना पणजी-आजी म्हणून त्यांची काही माया लागलेलीच नाही. आजोबांची काकू आपल्या घरात राहते एवढीच ओळख. आता शरीर अगदीच साथ देत नाही म्हणून इथेच पडून असतात एवढंच. बाबांकडे पाहून आम्ही काही बोलत नाही. त्यांचं सगळं पाहतो. देवाच्या दयेने आम्हाला काही कमी नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र खोली, आया सगळी व्यवस्था आम्ही केली आहे. पण त्यांच्या विचित्र वागण्याने मी आणि सासूबाई अगदी त्रासून गेलो आहोत. प्राचीच्या सासऱ्यांची साठी आहे म्हणून सासूबाई तिच्याकडे गेल्या आहेत ८-१० दिवसांसाठी. म्हणून मी बोलून घेतेय. काय करावं काही कळत नाही.” मी एकदम गप्पच झाले. त्यांच्या हातातली असोशी मलाही जाणवली होती. थोडं विचित्र वाटलं होतं, पण नीरजा काही वेगळंच सांगत होती.
“मी बघते, विचार करते. ताईशी, वहिनीशी बोलते. ८-१० दिवसांत चक्कर टाकते परत.” असं म्हणून मी बाहेर पडले. अक्कांचा निरोप घ्यायचंही सुचलं नाही. विचार करते असं नीरजाला म्हटलं तरी काय विचार करणार होते मी तरी? काही सुचत नव्हतं. ही विचित्र समस्या कुणाशी अगदी ताई आणि वहिनीशी तरी कशी बोलावी असं झालं होतं. ४-६ दिवसांनी पुन्हा नीरजाचा फोन आला. “ताबडतोब येऊन जा.” यावेळी मी लगेच गेले. खोलीत जाऊन अक्कांजवळ बसले. अक्का घळा घळा रडायला लागल्या. नीरजा तिथेच उभी होती. “गेले चार दिवस चाललंय हे रडणं. थांबतच नाहीत. मी अगदी घाबरून गेले आहे. सासुबाईंना यायला अजून ४ दिवस अवकाश आहे. काय करावं काही सुचत नाही.”
मी स्वस्थ राहिले. जरा वेळाने अक्का उठून बसल्या. पाठीशी उशी घेऊन भिंतीला टेकून बसल्या. आवाज जरा क्षीण झाला होता, पण वाणी स्पष्ट होती. माझा हात हातात घेऊन सांगू लागल्या, “दहाव्या वर्षी लग्न झालं. न्हाण यायच्या आधीच साप चावून नवरा गेला. नाव लिहावं लागतं म्हणून ते आठवतंय, पण चेहरा नाही आठवत आता. माझे सासरे त्या काळच्या हिशेबाने नव्या विचारांचे होते, म्हणून न्हाव्याला परतवला त्यांनी, बोडकी नाही केली मला. पण यापेक्षा जास्त सुधारणा नाही झेपली त्यांना. माहेरी गरिबी. तिथे तरी कोण विचारणार होतं? सासरी निदान अन्न-वस्त्राला तरी काही कमी पडलं नसतं. म्हणून त्यांनी ठेवून तरी घेतलं. तेव्हापासून कष्टांना जे जुंपून घेतलं ते हात-पाय चालेनासे होईपर्यंत. कष्ट करीत होते, म्हणून लोकांना माझी आठवण तरी येत होती. पुढे कोकणातून इथे शहरात आले. गोपाळ मोठ्या हुद्द्यावर होता, त्याने ठेवून घेतलं. पण सुनेला ही गावंढळ चुलत सासू फारशी आवडत नव्हती. तिच्याकडे चार नोकर राबत होते. तिला माझ्या कष्टांची तशी गरजही नव्हती. मग जिकडे गरज असे, तिकडे ती माझं बोचकं ती पाठवून देई. दोन वेळचं जेवण आणि अंगावर धड लुगडं एवढ्यावर राबले सगळ्यांच्या घरी. लोकांनी आपुलकी दाखवली, विश्वास टाकला, नोकराइतकी हलकी वागणूक नाही दिली पण शेवटी मी आश्रितच राहिले. कुणाच्याही घरात घरची होऊन राहणं नशिबात नव्हतं माझ्या.
लग्न झालं तेव्हा मायेचा स्पर्श जो सुटला, तो पुन्हा कधी मिळाला नाही. न्हाण यायच्या आधी नवरा गेला, म्हणून नवऱ्याचा स्पर्श नाही. नवरा नाही म्हणून मुलं नाहीत, त्यांचा लडिवाळ स्पर्श नाही. ज्या ज्या घरी राहिले-राबले, तिथे कुणी जवळ यावं, मिठी मारावी, गळ्यात हात टाकावे असं काही नातं नसायचं. देवाच्या दयेने कधी आजारपण आलं नाही, पण कधीतरी डोकं कलकलायचं. मग आपलं आपणच आल्याचा चहा घ्यायचा, कपाळावर वेखंड-सुंठीचा ओढा घालून घ्यायचा आणि पुन्हा पदर खोचून उभं राहायचं. मुलं खायला माझ्याकडे मागायची, पण शाळेतून-बाहेरुन आल्यावर त्यांना आई-आजीच लागायच्या. अक्का नाही. फार जीव तुटायचा माझा. आपण अधांतरी तरंगतोय, आपल्या पायाखाली जमीनच नाही असं वाटायचं. दोन वेळा जेवण, अंगभर कपडा आणि डोक्यावर छप्पर असलं की शरीर जगतं, पण मनाला तेवढं पुरत नाही. त्याला प्रेम, माया हवी असते. शरीराला मायेचा, प्रेमाचा स्पर्श मिळाला की मन शांत होतं. आयुष्यभराची ही ओढ मला जाळतेय. आग होतेय अंगाची. ती औषधाने थांबणार नाही. तिला मायेच्या स्पर्शाचीच गरज आहे. कुणाला सांगणार ही जळजळ? आश्रित बाईला मन असतं हे कुणाला पटणार? कोणत्या जन्मातलं पाप फेडतेय ते एक त्या देवालाच माहीत.”
अक्का बोलायच्या थांबल्या. पण त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत राहिलं. “शांत व्हा” असं म्हणून मी त्यांचा हात धरला. तो त्यांनी घट्ट धरला. “रडू दे गं. उभ्या आयुष्याचं रडणं साठवून ठेवलंय. रडण्याचा आनंद तरी मिळू दे.” मी अगदी कानकोंडी झाले. अक्कांचं बोलणं कणभरही खोटं किंवा चूक नव्हतं. अक्कांच्या वागण्याची तक्रार करणारी नीरजाही एकदम गप्प झाली होती.
मी घरी आले. आल्या-आल्या ह्यांनी माझ्या हातातली पिशवी घेतली. सुनेने पाणी दिलं. तिच्या कडेवरच्या नातवाने माझ्या अंगावर उडी मारली. आजी त्याला दिवसभर भेटली नव्हती. तिच्याकडून लाड करुन घ्यायची हुक्की आली होती त्याला. त्याला छातीशी कवटाळून सोफ्यावर टेकले. त्या सगळ्यांच्या ओझरत्या स्पर्शाने माझ्या शरीराचा दिवसभराचा थकवा गेला पण मन आणखी थकून गेलं. अक्कांचा चेहरा, त्यांची विकलता मनातून जाईना. आजपर्यंतच्या आयुष्यात झालेले स्पर्श आठवत राहिले. प्रेम, माया, आपुलकी, ओढ – काय नव्हतं त्या स्पर्शात? आनंद, दु:ख, संताप, निराशा, कंटाळा, वैफल्य – विविध भावनांच्या कल्लोळात किती वेळा सापडले. ज्या ज्या वेळी स्पर्शाची ओढ लागली, त्या त्या वेळी ती मिटवणं मला सहज शक्य झालं होतं. मुलगी, मैत्रीण, बहिण, बायको, आई आणि आता आजीही. प्रत्येक नात्याचा वेगळा स्पर्श त्या त्या वेळी मला न मागता-अगदी सहजपणे मिळत गेला. कदाचित त्यामुळेच अन्न-वस्त्राइतकीच जिवंत माणसाचा स्पर्श ही देखील माणसाच्या जगण्याची गरज असते हे मला कधी कळलंच नाही. अक्कांच्या रूपाने अगदी अचानक ते सत्य प्रकर्षाने माझ्या समोर आलं आणि त्यामुळे मी अगदी अस्वस्थ होऊन गेले. रस्त्यावरच्या भिकारणीलाही जे सहज मिळू शकतं, ते कित्येकांचा अंतरात्मा तृप्त करणाऱ्या अक्कांसारख्या बाईला का मिळू नये? इतकी साधी बिन-पैशांची गरजही पूर्ण होऊ नये आणि आयुष्यभर तळमळत राहावं असं काय पाप केलं असेल त्यांनी मागच्या जन्मी?
दुसऱ्याच दिवशी सकाळी अक्का गेल्याचा निरोप आला. सगळं आटपून आम्ही घरी आलो. सून म्हणाली, “अक्कांचं जाणं तुम्हाला फारच लागलेलं दिसतंय. तुमचं सगळं जगावेगळंच असतं. अक्का आपल्या नात्याच्या न गोत्याच्या. एका आश्रित, स्वयंपाकाच्या बाईसाठी तुम्हाला इतकं वाईट वाटावं याचीच कमाल वाटते मला.” अक्कांच्या वेदनेचा आणि अतृप्तीचा मनाला लागलेला भुंगा माझं मन कुरतडतोय हे नाही सांगू शकले मी तिला.
राधा मराठे
Copied from facebook.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा