उद्धव तिथल्या तिथे नुसता फेर्या मारत होता. अनंत काकांना अॅडमिट करून आज तीन दिवस झाले होते. सुमती काकूला काय सांगावं आणि कसं कळत नव्हतं. हॉस्पिटलचं बिल फुगत चाललं होतं. फिरायला गेलेले असताना अचानक ते चक्कर येऊन पडले आणि इतकी डोके दुखी सुरू झाली की शेवटी कोकणातून मुंबईला आणावं लागलं. सर्व प्रकारच्या टेस्ट करून झाल्यावर डॉक्टरनी निदान केलं ब्रेन ट्युमर.!
अनंत ब्रम्हे महानगर पालिकेच्या शाळेतील एक निवृत्त शिक्षक आयुष्यभर सचोटीने मुलांना गणित शिकवलं पण आयुष्याचं पैशाचं गणित काही सोडवू शकले नाहीत. तुटपुंज्या मिळकतीतून सुद्धा या विद्यार्थ्यांला मदत कर. त्या विद्यार्थिनीची फी भर यासाठी सुमती काकूंचा सतत ओरडा खाल्ला.
"आपल्याला काय करायचा आहे पैसा. आपल्या मागे कोण आहे. बिचारी गरिबाची मुलं. शिकण्यासाठी हात पाय मारतायत. त्यांना आपली थोडीशी मदत करतो झालं" हा काकांचा युक्तिवाद.
"आपल्या मागे कोणी नाही म्हणुन तर शेवटपर्यंत आपलं आपल्यालाच करायचं आहे. म्हणुन दुसरं काही नाही." ही काकूंची तक्रार.
"कुणाला केलेली मदत कधी फुकट नाही जात गं. आपल्याला शक्य होईल तेव्हा देत जावं. खात्री आहे मला. विश्वास आहे त्याच्यावर." काका वर आभाळाकडे बोट दाखवून म्हणत असत. तेच काका आज निपचित पडले होते. ऑपरेशन हा एकच मार्ग पण त्याचा खर्च उध्दवला न झेपणारा. हेच काकूंना कसं सांगाव ही चिंता उध्दवला लागून राहिली होती.
इतक्यात दोन नर्स, Rmo आणि एक डॉक्टर आत आले. Rmo त्यांना काहीतरी सांगत होता. त्यांनी बरेच रिपोर्टस, केस पेपर डोळ्याखालून घातले. काहीतरी नर्सला बोलले अणि भराभर निघून गेले. थोड्यावेळाने नर्स आली बोलवायला. काकू आणि उद्धव त्या मोठ्या डॉक्टरच्या केबिन मध्ये गेले.
"या काकू. .. या मि. उद्धव !" ....
एवढा मोठा डॉक्टर अदबीने बोलला.. काकूंना आश्चर्यच वाटलं....
"आपण काकांचं एक मोठं ऑपरेशन करतोय दोन दिवसांनी".. ..
"पण सर..."
"काळजी करू नका उध्दव." .. "खर्च फार येणार नाही." ...
" सर... तुम्हाला फार नसेल... पण मला तेवढाही झेपणं कठीण आहे हो " ..
"पण तुम्हाला काहीच करायचं नाहिये !"
"म्हणजे..??" काकूंनी विचारलं...
"तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही!" ...
कसं ओळखणार म्हणा. खूप वर्ष झाली!" ...
काकू. तुम्हाला आठवतं एक मुलगा तुमच्या घरी यायचा रात्री शिकायला."
" काका खूप छान शिकवायचे गणित. तुम्ही कितीतरी वेळा मला जेवायला पण वाढलं आहे."
डोळे बारीक करून. लांबवर बघत काकू काहीतरी जुनं आठवु लागल्या. एक धुसर चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला.
" कीर्ती..!! ... कीर्ती का रे तू?" अचानक त्यांनी विचारलं... आता डॉक्टरचे डोळे पाण्याने भरले.
" हो काकू ... मी किर्ती कुमार !"...
"आठवी ते दहावीपर्यंत काकांनी माझी फी भरली. वेळोवेळी शिकवलं. मला चांगले मार्क मिळाले. नंतर कष्ट करून स्कॉलरशिप मिळवून पुढे पुढे शिकत गेलो. आज मी मुंबईतला एक नामांकित ब्रेन सर्जन आहे. हे सगळं काकांमुळे शक्य झालं. तुम्ही दोघं नसतात तर मी इथपर्यंत पोचलोच नसतो."
"काही वर्षापासून शोधतोय तुम्हाला. तुमच्या घरी गेलो तर तुम्ही जागा विकून कोकणात गेलात असं कळलं. तिथला पत्ता माहीत नव्हता शेजाऱ्यांना."
"तेव्हापासुन कायम एक चुटपुट लागून राहिली होती. तुम्हा दोघांना भेटायची खूप इच्छा होती. पायावर डोकं ठेवायचं होतं काकांच्या. अभिमानाने त्यांना सांगायचं होत. की तुमचा कीर्ती आज मोठ्ठा डॉक्टर झाला आहे." कीर्तीच्या डोळ्यांना आता धारा लागल्या होत्या.
"काकू देवानेच आपली भेट घालून दिली आज. तुम्ही काळजी करू नका. सगळा खर्च मी करणार आहे. ऑपरेशन सुद्धा मीच करणार आहे. कृपया करुन उपकारांची फेड करतोय असं मनात देखील आणु नका. गुरूदक्षिणा देतोय असं समजा."
पुढच्या फोरमॅलीटीज पार पडल्या. ऑपरेशन यशस्वी झालं. झोपलेल्या काकांकडे बघून सुमती काकूंना वाटलं. आता जागे झाल्यावर सगळं समजलं की म्हणतील." बघ तुला सांगत होतो. माझ्या संस्कारांवर. चांगुलपणावर माझा विश्वास आहे. खात्री आहे मला ते फुकट जाणार नाहीत. दुसर्याच कराव गं. जेवढं करता येईल तेवढं."
आणि काकू आपल्या नवर्याचा अभिमान वाटुन समाधानाने हसू लागल्या.
✒️ संध्या जोशी.
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा