स्पेस टेक्नॉलॉजीत एमएससी झालेल्या किरणनं असिस्टंट मॅनेजर असलेल्या सुयशच्या आयुष्यात प्रवेश केला. लग्न लागलं आणि गोड गुलाबी स्वप्न घेऊन किरण सुयश च्या घरी आली. आपल्याबद्दल आपल्या नवऱ्याच्या मनात खूप सन्मानाची भावना असेल असं तिला वाटत होतं पण काहीतरी भलतच घडत होतं. घरी चुलत नणंद आली . किरण चहा घेऊन त्यांच्यासमोर आली.
"छान आहे रे तुझी बायको. अगदी तुला अनुरूप." ती म्हणाली.
सुयश म्हणाला," अगं ही बायको नाहीये माझी. ही आमची कामवाली आहे."
आपली ओळख आता सुयश अभिमानाने करून देईल अशी अपेक्षा मनात बाळगून असलेल्या किरणच्या भ्रमाचा भोपळा फुटला. हे सारे अनपेक्षित होते. अतिशय संवेदनशील असलेल्या किरणचे डोळे टचकन् भरले. तिचा चेहरा खर्रकन उतरला. पण सुयशच्या गावी गोष्ट नव्हती.
"माझा थट्टेखोर स्वभाव आहे. त्यामुळे मी बोलत असतो काहीबाही. तू नको मनावर घेऊ."
तिच्या उतरलेल्या चेहर्याकडे बघून तो म्हणाला. पण मनावर चरा पडायचा तो पडलाच. पुढे हे नेहमीचंच झालं. निमिष आणि मीनलकडे जेवताना
सुयश म्हणाला,
"मीनल भरपूर स्वयंपाक केलास ना? आमच्या बायकोला फार खायला लागतं बरं का. मी तर आता हिच्या बापाकडूनच तांदुळाचे पोतं मागवणार आहे."
मग काय? तिला बोलायची जणू स्पर्धाच लागली.
निमिष म्हणाला," काय वहिनी? तुम्हाला जेवढे लागेल तेवढे खा. कमी पडलं तर आमच्यातलं देऊ."
मीनल म्हणाली,
"हे बघ किरण, मी पंधरा वीस पोळ्या केल्या आहेत. तू काही काळजी करू नकोस. तुला हव्या तेवढ्या खा. कमी पडल्या तर मी स्वतः आणखी पोळ्या लाटायला उभी राहिन."
सुयश म्हणाला," हो ना. बहुतेक मला हिच्या खाण्यासाठी आता बँकेकडून लोन काढावं लागणार."
आणि तिघेही जोरजोरात हसू लागले. किरण शांतपणे खाली मान घालून भात चिवडत होती. तोंडातला घास तोंडातच फिरत होता. थट्टेच्या नावाखाली हे अशा पद्धतीने बोलणं तिला सहन होत नव्हतं.
नंतर प्रत्येक वेळी हेच होत राहिलं. आता मात्र त्याला बोलायला हवं. किरण त्याला म्हणाली,
"तुम्ही प्रत्येक वेळी असं का बोलता? मला कधीच सन्मानाची भावना दिसत नाही तुमच्या बोलण्यात. तुम्हाला माझ्यामुळे इतका त्रास होत असेल तर तुम्ही माझ्याशी लग्न कशाला केलं?"
तो म्हणाला,
" काय धरून बसतेस तू? मी सहज थट्टा करत होतो. माझा स्वभावच तसा आहे."
किरण खूपच हळवी होती. त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगली भावना असावी आणि ती त्याच्या बोलण्यात दिसावी. अशी तिची स्वाभाविक अपेक्षा होती. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा सुयशचा स्वभाव तिच्या लक्षात येऊ लागला. थट्टा या नावाखाली काय वाटेल ते तो बोलत होता. सुयशच्या लांबच्या नात्यातला भाऊ त्यांना भेटायला आला. किरणने वाकून त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले,
" खूप छान वहिनी मिळाली आहे आम्हाला. किती सुशील, सुंदर!"
आता सुयश नेहमीप्रमाणेच बोलू लागला.
"ही कसली सुंदर? काळी आहे अगदी. हिच्या बापाला तीन चार पोरी. मला त्याची कीव आली म्हणून घेतली करून."
किरण अगदी हिरमुसली झाली. चार दिवसांनी ती माहेरी आली. तिचा उतरलेला चेहरा आईच्या नजरेतून सुटला नाही. शेवटी मनातलं बाहेर आलंच. आई म्हणाली,
"अग एवढं काय मनाला लावून घ्यायचं? नवर्यांना सवय असते बायकोचा अपमान करायची. आपण लक्ष द्यायचं नाही. थोड्याफार फरकानं सगळ्यांचे नवरे असेच असतात."
पण किरणला हे काही पटलं नाही. उगाच आईचं मन कशाला दुखवा? म्हणून ती काहीच बोलली नाही. पण तिला सुयश बरोबर कुठेही जावेसे वाटेना. कारण तो चारचौघात तिला काय बोलेल याचा नेमच नसायचा. हळू हळू ती घरातच राहू लागली. तिच्या नोकरी करण्यावर घरच्यांचाही आक्षेप होता. सुयशही म्हणाला,
"एखादं मूल होऊन जाऊ दे. नंतर कर की नोकरी."
त्यामुळे तिचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता. घरी कोणी आलं तरी नकोसं वाटायचं. खरं तर तिच्यात काहीच कमी नव्हतं. उच्चशिक्षित, सुंदर, सुस्वरूप, सुस्वभावी. पण सतत थट्टेच्या नावाखाली त्याचं बोलणं असह्य व्हायला लागलं. हळूहळू ती अबोल व्हायला लागली. सुयश बरोबर कुठल्याही विषयावर बोलायला गेलं की तिला टोचून बोलण्याची एकही संधी तो सोडायचा नाही. अचानक रस्त्यात अनुजा दिसली. तिची अतिशय जिवलग मैत्रिण. अनुजा तिला जबरदस्ती तिच्या घरी घेऊन गेली.
"सुयशला घेऊन जेवायला ये गं एकदा." ती म्हणाली. किरणचे डोळे भरून आले.
"मला त्यांच्या सोबत कुठेही जायची इच्छा नाही. मुळात माझा प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे असं कोणालाच वाटत नाही. ना माहेरी ना सासरी. आपल्या पत्नीला सन्मानाने वागवायचे संस्कार द्यायला त्यांचे आई-वडील बहुतेक विसरले असावेत. थट्टेच्या नावाखाली वाट्टेल तसं बोलतात आणि मला नाही सहन होत. माझ्या मनाची घुसमट त्यांना कधीच कळत नाही. मला त्यांच्यासोबत चार शब्द सुद्धा बोलावेसे वाटत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं काही चुकतंय असं त्यांना अजिबातच वाटत नाही. आता हा तिढा सोडवायचा कसा?"
अनुजा म्हणाली,
" मला असं वाटतं की तू त्यांच्याशी शांतपणे बोलावं."
" मी अनेकदा बोलले आहे त्यांच्यासोबत. पण पालथ्या घड्यावर पाणी."
" आता यावर एकच उपाय आहे तो म्हणजे जशास तसे."
ही कल्पना किरणला पटेना. ती म्हणाली,
" मी पण त्यांच्या सारखीच वागू लागले तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला?"
अनुजा म्हणाली,
"तसं नाही. परदुःख शीतल असतं. तुझ्या मनात जी खंत आहे, ही खंत त्यांना तेंव्हाच जाणवेल जेंव्हा त्यांच्या मनामध्ये तशीच भावना निर्माण होईल आणि मी तुला आयुष्यभर तसंच वाग असं सांगत नाही. फक्त त्यांना त्याची जाणीव करून दे एवढंच. आईकडून फार अपेक्षा करू नकोस. ती पिढीच वेगळी होती. सुधाकराची सिंधू होण्यामध्ये आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असं मानणारी पिढी. त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही करायच्या. पण तू सुधाकराची सिंधू नाही तर तू आजच्या कलियुगातील दामिनी हो. आणि मग अनुजा जेवायला किरणच्या घरी आली. जेवत असताना अनुजा म्हणाली,
" छान झाला आहे स्वयंपाक." सुयश म्हणाला,
"हो ना. तेवढ्यासाठीच असली सातवी नापास बायको मी गळ्यात बांधून घेतली."
अनुजाने किरणकडे पाहिलं. किरण हसून म्हणाली,
"हो ना. खरं म्हणजे यांची तेवढीच लायकी आहे. सातवी नापास बायको मिळण्याइतकी. पण मिळाली माझ्यासारखी. त्यांना झेपेना. सांगता येईना आणि सहनही होईना. करतात काय बिचारे? म्हणून येता जाता असा काळा धूर सोडत असतात."
आश्चर्यानं आणि संतापानं थक्क होण्याची पाळी सुयशची होती. एक तर त्याला उलट उत्तर ऐकून घ्यायची सवय नव्हती. आपला अपमान सहन न होऊन तो रागाने उठून गेला. अनुजा घरी निघून गेली. रात्री अस्वस्थपणे इकडून तिकडे सुयश फेर्या मारत होता. किरण हातात दुधाचा ग्लास घेऊन आली.
"सुयश दूध घ्या ना. नीट जेवला पण नाहीत तुम्ही. "
"नको आहे मला दूध. तुझ्यासारखी बायको मला झेपत नाही. मग ज्याला ती झेपते त्याच्याकडे का जात नाहीस?"
" अरे, तुम्हाला इतकं लागलं? मी अगदी सहज थट्टा करत होते."
" थट्टा म्हणत तुझ्या मैत्रिणी समोर तू माझा अपमान केलास. मला हे अजिबात आवडलं नाही. "
सुयश खूपच भडकला होता. पण किरण तितकीच शांत होती. ती म्हणाली,
"आज मी एक वाक्य बोलले तर तुम्हाला इतकं लागलं. मी लग्नाच्या दिवसापासून आज पर्यंत प्रत्येकवेळी तुम्ही केलेला अपमान निमूटपणे सहन करत आले. माझा काळजाला किती घरं पडली असतील याची आता कल्पना आली असेल तुम्हाला. आज तुमचा अपमान झाला म्हणून तुम्हाला कळलं. नवरा-बायको एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसतात. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नात्यात बांधले गेलेले नसतात. ते परस्परपूरक असतात. माझ्याबद्दल वाट्टेल ते अपमानास्पद बोलून आपल्या नात्याला तुम्हीच सुरुंग लावला. मी इतके दिवस निमूटपणे सहन करत राहिले पण तुम्हाला कधीच जाग आली नाही. आज तुम्हाला जे वाटलं ते मी लग्नानंतरच्या प्रत्येक दिवशी अनुभवत आले आहे."
आधी संतापलेला सुयश अचानक खूप शांत झाला.
"सॉरी किरण. मी तुला समजू शकलो नाही. थट्टेच्या नावाखाली वाट्टेल ते बोलत राहिलो. मी पुरुषार्थ गाजवतो आहे या भ्रमात राहिलो. पण आपल्या सहचरीला समजून घेण्यात खूप कमी पडलो मी. तुला प्रत्येक क्षणी काय वाटत असेल याची जाणीव मला आता होते आहे."
तिनं काहीही न बोलता वपुर्झा हातात घेतलं. समोरच्या पानावर लिहिलं होतं,
'पुरुषार्थ म्हणजे अर्थ असलेला पुरुष. पुरुषाच्या जीवनाला हा अर्थ येण्यासाठी त्यानं फार काही भव्यदिव्य केलंच पाहिजे असं मुळीच नाही. आपल्या सहचरीला सुरेख साथ देणं, तिच्यावर अमाप माया करणं आणि तिला तिच्या कर्तृत्वाची हवी ती उंची गाठण्यात मदत करणं आणि तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतकं प्रेम तिच्यावर करणं म्हणजे पुरुषार्थ. हिरकणी योगायोगानं मिळते. ती टिकवायची असते हे ज्याला कळतं तो खरा पुरुष. ख-या सहजीवनाला तेंव्हाच अर्थ येतो.
बाहेर टिपूर चांदणं पडलं होतं. चंद्राचा मंद प्रकाश त्या दोघांवर पडला होता. त्यांच्या सहजीवनाला खरा अर्थ आता आला होता.
अश्विनी निवर्गी
उदगीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा