हा लेख सर्वांच्या साठी आहे पण +१८ आहे.
शिवरात्री ही शिव पार्वतीच्या लग्नाची रात्र मानली जाते.
अध्यात्मिक पातळीवर विचार केला तर पार्वती ही सगुण ब्रह्म. अखिल विश्वातील सर्व भौतिकतेची सम्राज्ञी. सौंदर्याचा मापदंड तिच्यात न्यूनत्व नाहीच.
शिव म्हणजे निर्गुण ब्रह्म. अज्ञाताच्या प्रदेशाचा स्वामी. पूर्णपणे निस्संग. ज्ञानघन. समाजाचा, संपूर्ण विश्वाचा हितैषी. समाजासाठी वाटेल तो त्रास सहन करायला तयार. नीलकंठ असणे तर सुप्रसिद्ध. केवळ समर्पण भावाने वश होणारा. मग मस्तक अर्पण करण्यास प्रेरित झालेला दशानन असू दे अथवा सगुण ब्रह्म रुपी हिमालय कन्या पार्वती. त्यांच्या समर्पण भावाने पूर्ण वश होणारा.
यांचे मिलन हे प्रतीकाच्या पातळीवर सुद्धा किती सुंदर आहे. किती गूढ आहे , रम्य आहे.
शिव आणि पार्वती हे मानव्यातील, ईश्वरी तत्वातील सर्वोत्कृष्ट असण्याचे प्रतिक आहेत आणि त्यांचे मिलन हे अत्यंत आदर्श आहे. मानवाने प्रेरणा घ्यावे असे आदर्श.
हिमालय पुत्री असणारी पार्वती ही अत्यंत सुंदर. ऐश्वर्यसंपन्न. पण तिचा जीव जडतो स्मशानात राहणाऱ्या, भूत खेत गण असणाऱ्या आणि नंदी हे वाहन असणाऱ्या शिवावर. तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिची समजूत काढलीच असेल की. पण ती बधत नाही. हा निर्गुण शिव प्रापंचिक मार्गांनी प्राप्य नाही हे तिला उमगते आणि म्हणून ती अत्यंत कठोर असे तप त्याच्या प्राप्तीसाठी करते.
शिव तिच्या वैराग्याला भुलतो. शिव तिच्या शरण भावाला शरण जातो. शिव तिच्या समर्पणापुढे दास्यत्व पत्करतो. ती शिवासाठी जे आणि जितके झिजते. शिव तिच्यासाठी अधिकाधिक नमतो. तिच्यातच एकरूप होतो.
शिवाचे हे तिच्यासाठी झुकणे ही एक प्रेम व्यक्त करण्याची वेगळीच पद्धत आहे. ज्याच्यासाठी झिजावे असा सर्वोत्तम शिव जिच्या समर्पणासमोर नतमस्तक व्हावे अशी उत्कृष्टतेची स्वामिनी पार्वती. हे जगातील सगळ्यात दुर्मिळ आणि सगळ्यात लोभस युगुल आहे.
पार्वती शिवाशी विवाह करणार याच निष्ठेने तपाचरण सुरु करते. तिचे उद्दिष्ट स्पष्ट आहे तिला शिवास प्राप्त करून घ्यायचे आहे. शिव सुद्धा तिच्याशी प्रणयाचा विचार नंतर करतो. तिच्याशी विवाहबद्ध होऊन तो निर्गुण लोकांचा स्वामी तिच्याशी आजन्म बद्धत्व स्वीकारतो. विश्वाच्या उत्पत्तीस कारणभूत होतो.
मला विचाराल तर प्रत्येक मानवाने पती पत्नी म्हणून शिव पार्वती चे नाते आदर्श मानावे. आपल्या कडे लक्ष्मी नारायणाचा जोडा ही संकल्पना आहे. पण लक्ष्मी नारायण हे ऐश्वर्याचे प्रतिक आहेत. प्रापंचिक सुखाचे प्रतिक आहेत. भौतिक विश्वातील सर्व सुख प्राप्त करून जगणाऱ्या जोडप्याचे प्रतिक आहेत. ते पती पत्नी आहेत पण त्यांच्यात द्वैत आहे.
शिव आणि पार्वती हे सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्माच्या मिलनाचे प्रतिक आहेत. त्यांच्यातील द्वैतभाव सुद्धा निमाला आहे. ते एकरूपच झाले आहेत. अर्धनारीनटेश्वर हे शिवाचे पार्वतीशी असणारे एकरूप आहे. शिव लिंग हे त्या एकरुपाचेच प्रतिक आहे. ज्यांना हे जिवाशिवाचे ऐक्य साधायचे असेल त्याने शिवपार्वती हे दंपती म्हणून आदर्श मानावेत.
शिव आणि पार्वती यांचा भौतिक आणि सामाजिक पातळीवर विचार केला तर त्यातून निघणारा अर्थ आदि शंकराचार्य फार सुरेख सांगतात..
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः ।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥ ७ ॥
ज्याने सर्वांगाला स्मशानातील चितेचे भस्म विलेपन केले आहे. जो अन्न समजून विष भक्षण करतो. जो दिगंबर आहे अर्थात दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा अवधूत आहे. ज्याच्या केसांच्या जटा झालेल्या आहेत. ज्याने गळ्यात सापांची माळ घातलेली आहे. जो बैलावर बसून फिरतो अर्थात ज्याचे वाहन वृषभ आहे अश्या सर्व दृष्ट्या निर्गुणाच्या कपाळावर जगदीश हि विश्वातील सर्वश्रेष्ठ पदवी आहे कारण त्याची पात्रता एकच आहे कि त्याने तुझे पाणिग्रहण केलेले आहे. अर्थात तू त्याचा हात धरून त्याची पत्नी झालीस आणि अश्या निर्गुणाचे भाग्य उजळले लोक त्याला जगदीश विश्वनाथ समजून त्याची पूजा करू लागले.
याला व्याजोक्ती असा अलंकार म्हणतात. एखाद्याच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी त्याच्या गुणांचाच उल्लेख उपहास स्वरूप केला जातो. परंतु त्यातून मूलतः त्या व्यक्तीच्या गुणांचेच कौतुक असते. ज्यांना समजेल त्यांच्यासाठी..
शिव पार्वतीच्या मिलनाचा आपण सामान्यांनी काय भावार्थ घ्यायचा :
या साठी मी काही दृष्टांत देतो ते समजून घ्या.
दृष्टांत १
सती ( पार्वतीचेच नाव/ रूप ) ही शिवपत्नी. हिमालय तिचा पिता. एक कथा आहे कि इंद्र आणि इतर देवता कट करून यज्ञातील हविभाग शिवाला देण्यास नकार देतात. त्याची पात्रता नाही असा अपवाद लावून. या कटात इतर देव सुद्धा सामील होतात. परंतु शिवाला याचे काहीही वाटत नाही. तो निरीच्छ आहे.
परंतु सती ही बुद्धिमान असते. शिव ज्या प्रवृत्तीला व्यक्त करतो. निर्गुण असूनही ज्या गुणसमुच्चयाचा स्वामी आहे. त्या वृत्तीचा सुद्धा सन्मान आवश्यक आहे. ती वृत्ती सुद्धा विश्वाचे संचरण करण्यास आवश्यक आहे. संहार ही सुद्धा विश्वाचीच गरज आहे अन्यथा विश्वकार्य योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. निर्मिती आणि पालनाच्या इतकाच संहार हा सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचा प्रतिनिधी शिव हा सुद्धा वंदनीय उपास्य आणि हविभाग घेण्यास पात्र आहे हा तिचा दावा असतो.
मग तिचा पिता हिमालय यज्ञ आयोजित करतो आणि त्यात शिवाला हविभाग द्यायचा नाही म्हणून तो मुद्दामून आमंत्रित करत नाही. सतीला सुद्धा आमंत्रण मिळत नाही. पण आपल्या वडिलांना आपण हे पटवून देऊ आणि त्या साठी आमंत्रण नसून सुद्धा मी या यज्ञाला जाणे आवश्यक आहे असे शिवास सांगून सती यज्ञस्थळी पोचते. शिवाने येण्यास नकार दिलेला असतो आणि त्याने तिला स्पष्ट सांगितले असते मला यज्ञाचा हविभाग मिळतो किंवा नाही याने मला काहीही फरक पडत नाही.
यज्ञस्थळी गेलेल्या पार्वतीचा अपमान होतो. ती वडिलांशी शास्त्रार्थ करते पण त्यांचे मन वळवू शकत नाही. पार्वती अपमानाने विद्ध होत नाही. तर ज्या तत्वांची समाजाला आवश्यकता आहे त्या तत्वांच्या स्वामीला ( शिवाला ) त्याचे महत्व उमजत नाही. जे समाजाचे संचालक आहेत ( हिमालय ) ते सुद्धा वैयक्तिक स्वार्थापोटी हे मान्य करण्यास नकार देतात. या दोन्ही गोष्टींच्या मुळे ती शोक संतप्त होते आणि म्हणून अग्निकाष्ठे भक्षण करते.
सतीचा हा त्याग समाजाच्या हितासाठी आहे. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. केवळ नवऱ्याचा अपमान झाला म्हणून तिने यज्ञ कुंडात प्रवेश केलेला नाही. तिची समाजहिताची तळमळ आपण समजून घेतली पाहिजे.
पत्नीच्या या आत्मार्पणामुळे शिव संतप्त होतो तो तत्काळ तिथे येऊन आपल्या पत्नीचा अर्धवट जळालेला देह घेऊन निघून जातो आणि त्या नंतर तो तांडव करतो. शिवाचे हे रौद्र रूप पाहून सगळेच देव भयभीत होतात.
पुढील भाग या लेखाचा विषय नाही. पण पतीच्या गुणांना योग्य सन्मान मिळावा म्हणून आपल्या पित्याशी वाद घालणारी सती आणि पत्नीच्या साठी तांडव करणारा शिव हे पतीपत्नीच्या प्रेमाचे खूप बोलके रूपक आहे.
दृष्टांत २
सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते कि तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात. ते पण या भीतीने कि आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.
अश्या सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अश्या सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते नारद तिला त्याचे आयुष्य लग्नाच्या नंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतो तरी ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.
नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ). ती पहिल्या वरदानात सासर्याच्यासाठी नेत्र मागते. दुसर्या वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते. ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तीचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक इतका विवेक तिचा त्या क्षणी सुद्धा जागा असतो. सावित्रीची हि बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.
दृष्टांत ३
अत्यंत सुंदर बुद्धिमान असणारी राजकन्या रेणुका. तिचे आई वडील ज्यावेळी स्वयंवर आयोजित करतात त्यावेळी ती जमदग्नी ऋषींना आपला पती म्हणून निवडते. राजकन्या असणारी आपली मुलगी ऋषींच्या आश्रमात राहून कष्ट करून जगणार. तिच्या आईवडीलांना त्रास झाला नसेल ?
परंतु तिला ते आश्रमातील आयुष्य किंवा कष्ट हे जमदग्नी सारख्या विद्वान आणि तपस्वी ऋषीच्या सान्निध्यात जीवन व्यतीत करण्यासमोर गौण वाटले आणि तिच्या कुटुंबाने तिचा निर्णय स्वीकारला.
शिव पार्वतीच्या मिलनाचे उत्कृष्ट वर्णन आदि शंकराचार्य सौंदर्यलहरी मध्ये करतात. त्यात पार्वतीचे सौंदर्य, गुण आणि तिचा समर्पण भाव याचे फार सुंदर वर्णन आचार्य करतात. शिव तिच्या मध्ये कसा विरघळतो याचे सुद्धा खूप अर्थपूर्ण वर्णन आचार्य करतात. त्यांच्या मिलनाचे रसाळ वर्णन करून झाल्यावर शेवटी पुस्ती सुद्धा जोडतात हे सगळे सुख तुम्ही तुमच्या धर्मपत्नी सह अनुभवा.
अर्थात प्रत्येक पतीपत्नीने एकमेकांशी शिवपार्वती प्रमाणे एकरूप व्हावे हा उपदेश आचार्य करतात.
शिव पार्वतीच्या या कथेतून आपण घ्यायचा भावार्थ इतकाच कि आपल्या पत्नीशी/ आपल्या पतीशी असे प्रेम करा तिच्याशी/ त्याच्याशी असे एकरूप व्हा कि अद्वैताची अनुभूती या मिलनात व्हावी. हे अद्वैत केवळ शारीरिक मिलन या पातळीवर नसून दोन आत्म्याचे मिलन होईल असे असावे. अर्थात एकमेकांवर तितके उन्मुक्त जीव तोडून प्रेम करा. या साठी एक खूप उत्कृष्ट शब्द आहे तादात्म्य पावणे. एकमेकांचे आत्मे एकरूप होतील असे प्रेम करा.
प्रेमाची खरी परिभाषा ती आहे. शरीराची झटापट, स्खलनाचे क्षणिक सुख आणि त्यातून होणारे वंश सातत्य याच्या खूप पलीकडे आत्मिक मिलन असते. ते आत्मिक मिलन अनुभवा या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. जिथे पतीपत्नी आत्मिक मिलन अनुभवतात तिथे जन्माला येणारे बालक हे लोकोत्तर गुण घेऊन जन्माला येते. म्हणून पतीपत्नी म्हणून अभिन्नत्व प्राप्त करा.
स्त्री म्हणून आपला नवरा निवडताना जुन्या काळात मुलीना स्वयंवर हा अधिकार होता हे लक्षात घ्या. आपल्याला कोणते गुण असणारा पती हवा आहे हे आधी स्वतःला विचारा आणि त्या गुणांचा स्वामी असलेला पुरुष स्वीकारा. त्याची आर्थिक स्थिती पाहून त्याच्याशी लग्न करू नका. लग्नाच्या नंतर प्रपंच हि दोघांची जबाबदारी आहे. दोघे मिळून तो भार उचलू शकता. पण असे गुण ज्यावर आपण लुब्ध होऊ ते असणारा पुरुष आर्थिक दृष्ट्या सक्षम नसला तरीपण त्याला स्वीकारा. डोळसपणे स्वीकारा, पुढील सहजीवनात तुम्हाला दोघांना हा भर उचलावा लागणार आहे हे समजून निर्णय तुम्ही घ्या. तुमच्या अंतरात्म्याला तो निर्णय घेऊ द्या. कुटुंबियांना घेऊ देऊ नका.
लग्न ही संस्था आपल्याला आवडणाऱ्या पुरुषासह संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवण्यासाठी विकसित झालेली आहे. त्याच्यासह सर्व सुख भरभरून मिळवण्यासाठी विकसित झालेली आहे. जर तुमच्या सुखांच्या व्याख्येत केवळ आर्थिक सक्षमता हे प्राधान्य असेल तर आपले विचार कमकुवत आहेत हे समजून घ्या.. आणि अधिक सखोल विचार करण्यास प्रेरित व्हा. आर्थिक सक्षमता हा एक मुद्दा असू शकतो पण हा एकच मुद्दा असू शकत नाही हे समजून असा.
हा लेख वाचणाऱ्या सर्वाना शिवशक्तैक्य मिलनाची अनुभूती मिळावी हीच सदिच्छा.
©सुजीत भोगले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा