शुक्रवार, २१ मार्च, २०२५

1802. आई

 खूपदा  वाटतं,
फोटोत जाऊन बसलेल्या आईशी 
निदान फोनवर बोलावं !
जमलं तर नियतीशी गोड  बोलून 
तिने परतूनच यावं !

सकाळी झोपेतून तिनं 
हळूच उठवावं.
तरी तिच्या मांडीवर 
लोळत पडावं.

तिच्या हातच काहीही 
मनसोक्त खावं,
तिने पाण्याला सुद्धा 
दिलेल्या फोडणीने 
घर दरवळून जावं.

वय किती ही वाढलं असो,
तोंड तिच्या पदराला पुसावं.
स्वयंपाक शिकून घे,
तिने सतत ओरडावं 
आणि आपण मात्र 
ओट्यावर बसून 
आयतंच  खावं.

आई कुठल्या रंगाचा
 घालू ग ड्रेस  म्हणून सतवावं,
तिच्या साडीच्या मऊ स्पर्शाची 
पैठणी ला नाही सर! तिला सांगावं.

बाहेरून आल्यावर 
तिनेच समोर दिसावं,
थकला असशील ना म्हणून 
लगबगीने पाणी द्यावं.

आपण ही आल्या आल्या
आज दिवसभरात घडलेलं 
अधाशा सारखं सांगून टाकावं,
आपल्याशी वाईट वागणाऱ्या वर 
तिने खूप रागवावं.

आपली चूक असली तरी,
फक्त काही वेळा आपलीच बाजू घेऊन भांडावं.
आई तू गेल्यापासून खाण्या पिण्याची,
सणा वाराची मजाच गेली.

किती बोलायचो आपण.
पण नंतर कामात गेलो बुडून, 
पाच मिनिटं बोलतोस का बेटा, 
विचारायचीस घाबरून.

तुला दिसतंय ना कामात 
आहे ग मी ..जा ना असंच  म्हटलं मी 
आणि खरंच निघून गेलीस तू परत 
ना येण्यासाठी.

असं कुठलं काम असतं,
आईशी बोलायलाही नसतो वेळ.
माहीतच नसतं आपल्याला, 
नियती मांडून बसली आहे वेगळाच खेळ.

आता हे घर निशब्द आहे,
यात नाही तुझ्या मायेची ओल.
आज ही तुझा फोटो पाहिला की, 
काळजात उठते कळ खोल.
 
आज ही आनंद झाला की 
तुझ्यापुढे येऊन नाचतो. 
आज ही कुणी दुखावलं 
तर तुझ्या समोर रडतो.

चूक झाली तर तुझ्यापुढे येऊन 
कान धरतो. 
नवीन काही सुरु करताना 
नमस्कार करतो.

पण फोटोत तुझे शब्द नाहीत, 
तुझा स्पर्श नाही, 
आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही.
 
बघ ना जमेल तर, 
बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून. 
खरंच का ग एकदा 
गेलेली माणसं येत नाहीत परतून ?
😔 i miss you Aai 

ज्यांना आई आहेना त्यांनी त्या मातेला कधी ही अंतर देऊ नका.
कारण मातेची किमया फारच निराळी आहे बरं...!!
आई म्हणोनी कोणी. 
आईस हाक मारी. 
ती हाक येई कानी...🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...