अप्पा आणि माई. अगदी आदर्श जोडी. नुकताच लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता दोघांनी. अप्पा, वय वर्ष ७२ तर माईंचं ६८. ते मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीमधे रहात होते. अचानकच माई हृदयविकाराच्या झटक्यामुळं डाव अर्ध्यावर सोडून अप्पांपासून खूप दूर गेल्या. अप्पांना खूप मोठा धक्का बसला. माईंशिवाय जगणं अप्पांच्या कल्पनेपलीकडचं होतं. मुलगा आर्मीमध्ये नोकरीला होता. अप्पांना आठवणीनं पत्र लिहायचा, ख्यालीखुशाली कळवायचा. तेवढीच काय ती अप्पांच्या आयुष्यातली आनंदाची बाब !
पत्र वाचताच अप्पांच्या चेहेऱ्यावर एक वेगळीच चमक यायची. दोन घास जास्त जेवण जायचं त्या दिवशी त्यांना. मुलगा काही दिवसांसाठी घरी आला की त्यांना काय करू नी काय नको असं होऊन जायचं अगदी ! सगळ्या सोसायटीमध्ये अगदी अभिमानानं सांगायचे मुलाबद्दल. मुलगा घरी म्हणजे दिवाळी-दसऱ्यासारखं वातावरण असायचं अप्पांच्या घरी. मुलाचं पत्र आणि त्याची सुट्टी या आशेवर अप्पा दिवस ढकलत होते. अशातच एक दिवस सीमेवर लढता लढता अप्पांच्या मुलाला वीरमरण आलं !
अप्पांना खूपच वाईट वाटलं; पण त्याच बरोबरीनं त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. लष्करी इतमामात त्याचे अंत्यसंस्कार झाले. अप्पांना अश्रू आवरणं कठीण झालं. बिचारे अप्पा आता मात्र अगदी एकटे पडले. खूप भावुक झाले होते अप्पा. त्यांची मनस्थिती खूप बिघडली. सोसायटीतलं कुणीही दिसलं की, “माझ्या मुलाचं काही पत्र आलंय का?” असं त्यांना विचारत. हळूहळू सोसाटीमधल्या लोकांनी त्यांना वेडं ठरवलं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु लागले. त्यानंतर बर्याच दिवसांनी समोरच्या घरात पत्र द्यायला आलेल्या ‘सदा’ पोस्टमनची चाहूल त्यांना लागताच ते विजेच्या गतीनं धावत दाराकडे गेले. अगतिक होऊन त्यांनी सदाला विचारलं,
“माझ्या मुलाचं काही टपाल…?”
सदानं अर्थात ‘नाही’ उत्तर देताच, अप्पांच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहून सदाला खूप गलबलून आलं. बरेच वर्षांपासून त्या सोसायटीमध्ये येत असल्यामुळं मुलाचं पत्र देताच अप्पांच्या चेहेऱ्यावरचे आनंदाचे भाव सदालाही आनंद देऊन जात.
‘पण आता मुलगाच नाही राहिला, तर त्याचं पत्र कसं येणार? पण मग अप्पा हे मानायला तयार का नाहीत? ते खरंच वेडे झालेत की त्यांना फक्त विस्मरण झालंय?’ हे आणि असे अनेक प्रश्न सदाच्या मनाला भेडसावू लागले. त्याच दिवशी सदानं मनोमन काहीतरी ठरवलं. पुढच्या वेळेस सदानं स्वतःच अप्पांचं दार वाजवलं.
“अप्पा, घ्या तुमच्या लेकाचं पत्र आलंय. जरा मला पण सांगा, काय म्हणतोय लेक !”
असं म्हणताच अप्पांनी आनंदानं सदाला मिठीच मारली. वयोमानानं दृष्टी क्षीण झाल्याचं कारण देत (खरंतर डोळ्यांतले अश्रू लपवत) सदाकडूनच पत्र वाचून घेतलं.
दोघंही खूप भावुक झाले. सदानं त्याच्या लहानपणीच त्याच्या आईवडिलांना गमावलं होतं; त्यामुळं बापाचं प्रेम त्यानं अप्पांमध्येच अगदी जवळून पाहिलं होतं. अप्पांना भेटून त्याला स्वतःच्या वडिलांना भेटतोय, असंच वाटलं. पत्रवाचनाचा कार्यक्रम, अप्पांची मिठी, अप्पांशी केलेलं हितगुज, आप्पांबरोबर केलेलं जेवण. हा सगळं सिलसिला बरेच दिवस चालू होता. अप्पांना सदा आणि सदाला अप्पा असं एक समीकरणच झालं होतं. अप्पांची मनःस्थिती आता बरीच सुधारली होती. आता मात्र सदाला अप्पांशी आपण खोटं बोलत असल्याचं वाईट वाटू लागलं आणि आज त्यानं सगळं खरं काय ते अप्पांना सांगून टाकायचं ठरवलं. सदा अप्पांकडे आला, पण आज त्याच्या हातात पत्र नव्हतं. सदा अप्पांना सांगू लागला…
“अप्पा, मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नव्हतं. तुमचं दुःख मला बघवेना. म्हणून मीच स्वतः पत्र लिहिलं आणि तुमच्याशी खोटं बोललो. मी लहानपणीच बापाच्या प्रेमाला पारखा झालो. तुमच्यात मला माझा बाप दिसला. बापाशी ज्या काही प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्या होत्या, त्या तुमच्याशी पत्रातून बोललो. तुमच्या चेहेऱ्यावरचे आनंदाचे, समाधानाचे भाव टिपले. चुकलो. मला माफ करा !”
सदाचं बोलणं संपताच अप्पांच्या डोळ्याला पूर आला. सदाला काही समजेना ! अप्पा म्हणाले,
“आता मी जे काही सांगणारे, त्यानंतर आपण ठरवू की माफ कुणी कुणाला करायचं. मुलाच्या मृत्यूनंतर मी अगदी एकदा पडलो रे ! ‘पत्र आलंय का?’ विचारत सोसायटीतल्या लोकांशी बोलायला गेलो; कारण मला केवळ दोन शब्दांचा संवाद हवा होता रे ! दोन प्रेमाच्या शब्दांसाठी आसुसलेला होतो मी.
“एक दिवस तू आलास आणि माझं आयुष्य बदलून गेलं. माझा मुलगा मला परत मिळाला. आता मात्र मला त्याला गमवायचं नव्हतं; म्हणून मग मीही विस्मृतीचं नाटक केलं !”
यानंतर मात्र दोघंही निःशब्द…!!
म्हणूनच नाती केवळ रक्ताची असून भागत नाही तर नात्याची भावना रक्तात असावी लागते.
- सायली वझे-पानसे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा