सोमवार, ३ मार्च, २०२५

1755. नामसंकीर्तन

 ‘धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे.’ खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस, जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहून तो दांभिक असण्याची शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे.
‘नामसंकीर्तन’ शब्दाचा अर्थ ‘ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुतिगौरव करणे’ असा आहे. याला नामस्मरण असेही म्हंटल्या जाते. ‘नामस्मरण’ म्हणजे नामोच्चाराने किंवा मनातल्या मनात ‘ईश्वराचे वारंवार स्मरण’ करणे होय. 'नामसंकीर्तन' अथवा 'नामस्मरण' (ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुतिगौरव करणे) या दोन्ही शब्दांचे अर्थ साधारण सारखेच आहेत. 
अशा या नामसंकीर्तनाला अध्यात्माचे अभ्यासक व गुरू पराकोटीचे महत्त्व देतात, कारण त्यांच्या मते ‘नामाइतकी ईश्वराने भरलेली दुसरी वस्तू नाही’. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने परिणामकारक अशी 'नामसंकीर्तना'ची एक व्यवस्थित प्रक्रिया बनवून तिला ते ‘नामसाधना’ हे भारदस्त नावही देतात आणि अशी ही ‘‘नामसाधना हेच ईश्वरकृपा होण्याचे रामबाण साधन आहे,’’ असे ते म्हणतात.
ज्या साधकांना अध्यात्मात विशेष प्रगती करायची तीव्र उत्सुकता असते आणि जे मुमुक्षु आहेत, अश्या साधकांसाठी नामसंकीर्तन साधनेचे प्रयोजन अधोरेखित आहे.
नामसंकीर्तन करतांना, सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते. इतके दिवस षड्रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे, हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरुन नामस्मरण करणे सोडून देतात.
नामसंकीर्तन या क्रियेत आपल्या अन्तर्मनात, आपल्या बहिर्मनाची इच्छा असो वा नसो पण आपल्या दैवताची आकृती आधी तयार होते नि ती उत्तरोत्तर अधिक बळकट होत जाते. पुढे पुढे आपले मन हे छान पैकी एक धारी वा एक विचारी होत, एक निर्भयता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक समाधान आपल्या अन्तर्मनात तयार होते ज्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपण अधिकाधिक विवेकी आणि साधे सहज सोपे वागू लागतो.
काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमा वाणीत आल्याचे ते लक्षण आहे. राग येत नाही. हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खुण आहे. नामस्मरण करुनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच त्याचा अर्थ होतो.
हळूहळू आपले चित्त नामात गुंतले की हळूहळू मन एकाग्र होऊ लागते. नामस्मरण सतत चालू रहाते. नामातून आनंदप्राप्ती होऊ लागतो. समोर डोंगराएवढ्या वाटणाऱ्या अडचणींचा पूर्वी बाऊ केला जायचा. आता त्या अडचणींकडे पहाण्याची दृष्टीच बदलून जाते. आणि मनाला अपूर्व अशी शांती प्राप्त होते.
     केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे | याची खात्री पटते.
भगवंत आपल्यासोबत कायम आहेत याची अनुभूती येऊ लागते, आणि मग यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. भौतिकातील कुठल्याही सुखापेक्षा हे चिरंतन सत्य आपल्याला समाधानी करुन जाते. आपण याच्याच शोधात होतो हे समजते. 
याठिकाणी आपला शोध पूर्णत्वाला जाऊन आपण नामातच स्थिरावतो. मनाला प्राप्त होणार्या अलौकिक शांतीतच आपण मग्न होऊन जातो. मग त्या मनाला कशाचीही फिकीर रहात नाही. आपला संसार कसा चालेल, बायकामुले यांचे जीवन, पैसा, प्राॅपर्टी यापैकी कशाचीही चिंता रहात नाही.
एकदा आपण स्वत:ला भगवंतचरणी सर्वस्वाने अर्पण केले की तोच आपला सर्व भार वहातो. आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे ही तोच ठरवतो. फक्त कधीही न डगमगणारा ठाम विश्वास मात्र हवा, मग तुमची नैया पार झालीच म्हणून समजा...
   ‌
सगुणातील ईश्वर आणि त्यानंतर निर्गुण निराकार तत्वाशी तद्रूप होणे या पायरीवर पोचले की, आपल्यातील ईश्र्वरी तत्व जाणवू लागते. मन आनंदमय होऊन जाते. कायमच सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागणे हे आपोआपच घडते.
नामस्मरण करायला सुरुवात केली की, पुढच्या टप्प्यात जाण्यासाठीचा प्रत्येकाचा कालावधी निश्चित नसतो. आपापल्या प्रारब्धानुसार आणि साधनेतील तळमळीवर ते अवलंबून असते. पण आपल्या मुखात नाम येणे ही सर्वात महत्वाची गोष्ट घडणे याचा अर्थ आपण साधनेच्या मार्गावर चालू लागलो आहे हा होतो.
आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते,पण जशी साधना पुढे जात रहाते,तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते.
नामसंकीर्तन म्हणजे नामसाधना हीच एक गोष्ट आपण आपल्यासोबत आपली पुंजी म्हणून घेऊन जाऊ शकतो. पुढील जन्मात आपली आध्यात्मिक उन्नती तिथून पुढे सुरू होते. त्यामुळेच आपण कधीकधी लहान बालकांना या जन्मात न शिकवलेली अनेक स्तोत्रे तोंडपाठ असलेली पहातो, ती त्यांची पूर्वजन्मीची साधना असते. 
स्वामी स्वरुपानंद म्हणतात.
               गोडी कळावया द्यावा गूळ खाया |
               देव ओळखाया स्वानुभव || 
अर्थ:-गूळ पाहून त्याची चव समजणार नाही, त्यासाठी तो खाल्लाच पाहिजे तद्वत भगवंताला ओळखायला स्वानुभवच घेतला पाहिजे. इतरांनी कितीही वर्णन केले तरीही स्वानुभव घेतल्याशिवाय त्याची गोडी कळणार नाही. 
आपण त्या स्थितीसाठी "अवर्णनीय आनंद" हाच शब्द फक्त वापरु शकतो ! आणि यासाठी नामजपाला पर्याय नाही.
स्वामी स्वरुपानंद म्हणतात.....
               जीवाशिवाचा संयोग | हाचि माझा राजयोग ||
               भेदभाव हारपला | हरि एकला संचला ||   
एकदा त्याच्याशी एकरुपता झाली की मनुष्यजन्माचे सार्थक झाले. मग किती घरे घेतली, किती गाड्या, मुले किती वेलएज्युकेटेड, वैगेरे वैगेरे सगळे अगदी कस्पटासमान भासू लागते. मन निर्मोही होऊन सतत भगवंताच्या नामस्मरणात लीन होऊन जाते. हजारो कामातून वेळ काढून नामस्मरण केले पाहिजे, देवा माझ्यावर दया कर, सदबूध्दि दे, सन्मार्गाला ने अशी प्रार्थना करावी.

               मुखाने नाम घ्यावे, कानाने नाम ऐकावे.🙏
               नाम हाच तारक मंत्र आहे ही श्रध्दा ठेवावी.🙏

                      🚩  ||जय जय राम कृष्ण हरी|| 🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...