तिने घरात येता बरोबर लगेच बॅग सोफ्यावर फेकून दिली. तिचं ते रुप त्यानं बघितलं आणि त्याला कळून चुकलं, की आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
"काय झालं, कुणाशी वाद वगैरे झाला का?" अगदी सौम्य भाषेत त्याने विचारलं.
"हो, मला काय येतं दुसरं वादाशिवाय, मीच भांडत असते ना सगळ्यांशी".
"अगं मी वाद म्हंटलंं...भांडण नाही".
"उगाच शब्द नको फिरवुस. वाद आणि भांडण फार वेगळं नाही."
"बरं !"
"हे बरं आहे. मी काही बोलली की नुसतं 'बरं !' म्हणायचं आणि शांत बसायचं."
ती बाथरूम मध्ये गेली, फ्रेश झाली, आतून आवाज आला "ह्या फेसवॉश ला सुद्धा आताच संपायचं होतं. लिस्ट मध्ये होतं ना ! पण ह्या घरात मी पुढे पुढे केल्याशिवाय काहीच नीट नसते."
"अगंं ह्यावेळी तूच गेली होतीस सामान आणायला."
"हो का?... ते बरंं लक्षात राहीलंं".
"बरं !"
"सर्वात आधी हे बरं ! बरं ! , बंद कर तुझं".
"बरं .... सॉरी .... हम्मम्म्म".
"सगळी विचित्र माणसं माझ्याच आयुष्यात आहेत."
"तुला भूक लागली का, मी भेळ चा प्लान केलाय मस्त."
"मी खादाडच आहे ना ! भूक लागली की चिडचिड करते नाही का?".
"मी असंं काही म्हणालो नाही".
"उद्देश तर तोच होता."
"असं नाहीं गंं राणी काही".
"जाऊ दे, तू मला कधीच समजून नाही घेतलंस."
"बरं !"
ती सरळ बेडरूम मध्ये निघून गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. ह्याने तिला थोडा वेळ रडू दिलं. तोवर त्याने छान भेळ तयार केली. नंतर 2 प्लेट छान सजवल्या आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला.
"ऊठा राणी साहेब, ही बघा स्वादिष्ट भेळ तयार आहे".
"मला नको".
"हे चालणार नाही."
"नको म्हंटलंं ना !".
"जाऊ दे मग मी सुद्धा नाही खात."
"अरे तू खा, मला भूक नाही".
"बरं ! ही भेळ मी तुला समजावून सांगतो. आपलं आयुष्य आहे ना, हे त्या शुभ्र कुरमुऱ्यांसारखं असतं, हळू हळू त्यात थोडे बालपणीचे शेव, चिवडा पडतो. मग थोडं वेगळं वाटायला लागतं. त्यात आपण थोडा त्याचे मित्र मैत्रिणी घालतो. उदाहरणार्थ कांदा, उकडलेला बटाटा, खारे शेंगदाणे, मग मिरची किंवा चटणी घालतो हे म्हणजे त्या माणसांसारखंं असतं जे सदैव आपल्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक घेऊन येत असतात. पण त्यांना आपण टाळू शकत नाही, त्यांचा एखादा विचार पटत नाही याचा अर्थ असा नाही की, आपण त्यात अजून तिखटाची भर घालावी. थोडं आपल्या विचारांचं मीठ घातलं, की भेळ चवदार होते. तरीही जर का तिखटच वाटत असेल, तर थोडं आपल्या स्वभावातील लिंबू पिळावं. म्हणजे तिखटपणा राहत नाही. समोरच्याच्या मनात सुध्दा नाही, आणि आपल्या जिभेवर सुद्धा नाही. त्यावर मस्त पैकी आपल्या सुसंस्काराची कोथिंबीर भुरभुरावी मग कशी भेळ आणि जीवन दोन्ही चटकदार होते"
ती हसत ऊठली. त्याला बिलगली आणि पुन्हा रडली, "नको ती माणसे का येतात समोर?".
"आपण आपल्या मनाला इतकं का कमकुवत करायचं की कुणी एखादी व्यक्ती समोर आली तर असं हतबल होऊन जायचं?"
"भेळीत काय रोल असेल मग याचा".
"सिम्पल आहे हे, माणसं एकेकाळी आपलीच असतात. उदाहरण लिंबू पण. ते पिळताना त्याची बी सुद्दा पडतेच भेळीत, मग ती जर का दिसली भेळ खातांना, तर अलगद तिला बाजूला करायचं आणि भेळ खात बसायचं".
"सो स्वीट... आयुष्याची भेळ."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा