शुक्रवार, २१ मार्च, २०२५

1804. घर

         प्रज्ञा लग्न होऊन सासरी आली, तेव्हा घरात चार माणसं. चौघंही नोकरी करणारे. त्यामुळं सकाळी नऊ ते चार घर कडी कुलुपात बंद. सगळ्यात आधी चार वाजता सासरे यायचे. मग मोठे दीर आलेले असायचे. ‘ही’ घरी येईपर्यंत घर बर्‍यापैकी स्थिरस्थावर झालेलं असायचं.  प्रज्ञा आली की परत तिच्यासोबत चहा व्हायचा. ती घरात आल्यापासून कुणाला आपल्या हातचा चहा आवडेनासा झाला. मोठा दीर अविवाहित होता. पण बर्‍यापैकी स्वैपाक करायचा. आई बरीच वर्ष आजारी होती. शेवटी गेलीच. तिचं करता करता मोठ्याला लग्नाची इच्छाच उरली नाही. म्हणून धाकट्याला स्थळ सांगून आल्यावर बाबांनी घाई केली. नशिबानं पत्रिकाही जुळली. ‘चट मंगनी पट शादी’ म्हणतात तसं लग्न उरकलं.  प्रज्ञालाही लग्नाची घाईच होती. माहेरचं घर अगदी लहान. त्यात दोन भावांचे संसार. शिवाय आई वडील आणि काकू. तिघं वयस्कर असले, तरी तिघांच्या तब्येती उत्तम. त्यामुळे एक मेंबर कमी होईल ती म्हणजे प्रज्ञाच. साध्या साध्या प्रसंगातून प्रज्ञाला हे जाणवायचं. सगळे आपण घरातून जायची वाट बघतायत. त्यावर उपाय म्हणून ती बदली करून घ्यायच्या विचारात असताना हा योग जुळून आला. मग ऑफीसमधे बदली मागण्या पेक्षा तिनं घर बदललं. 
      सासरचं घर अगदी ऐसपैस. मोठ्या चार खोल्या शिवाय हाॅलला लागून मोठी गॅलरी. तसंच स्वैपाकघरही मोकळं, छान. माहेरी सोसलेली गिचमीड तिला सासरी आल्यावर जाणवायची आणि तिला अधिकच मोकळं मोकळं वाटायचं.  प्रेम, माया या भावना रुटीनमधल्या असल्या तर गिचमीड होणारच. चाळीचा काॅमन व्हरांडा. पण, ‘मुलीच्या जातीला सारखं व्हरांड्यात उभं राहणं शोभत नाही,’ म्हणून सारखं घरात. घरात बसायला जागा नाही. धाकटी वहिनी शिक्षिका. तिची सकाळची शाळा, म्हणून ती लवकर झोपायची. म्हणून स्वैपाकघराचं दार लोटलं जायचं आणि घरात उंदीर शिरतात म्हणून बाहेरचं दार लावलं जायचं. कोंडवाडा याहून वेगळा नसेल ! म्हणून मग, बघण्याचा कार्यक्रम मुलाकडेच ठरला. उगीच चाळीत चर्चा नको हा उद्देश ही होताच.  हिनं मुलगा बघण्यापेक्षा घर पाहिलं. तिथला झुळूझुळू वारा अनुभवला, मोकळा श्वास घेतला आणि लगेच होकार देऊन टाकला. हिला नाकारण्यासारखं काही नव्हतच. शिक्षण, सेल्सटॅक्स मधली नोकरी आणि दिसायलाही सुंदरच म्हणायला हवी अशी. धाकटा निर्विकार होता. तिला जरा हे खटकलं. जरा इगोही हर्ट झाला. पण तिनं स्वतःला समजावलं. बदली घेऊन दुसर्‍या ठिकाणी जाण्यापेक्षा ही सोय बरी. आपण करू ॲडजेस्ट. 
    पण खरच ॲडजेस्टच करावं लागलं. कारण धाकटा पुरता योगासनं आणि अध्यात्माच्या आहारी गेलेला. हिच्या मते ‘गाॅन केस!’ कांदा लसूणही खायचा नाही. वाटतं, पण अशा आयुष्याचाही मनस्ताप होतो. त्याला सदेह समाधी घ्यायची होती ! हा प्रकार तिला बापजन्मात कळणारा नव्हता. ‘मेंदीच्या पानावरं मन अजुन झुलतय ग’, गुणगुणायचे तिचे दिवस आणि तेव्हा हा कुंडलिनी वरची जाड जाड पुस्तकं वाचत असायचा. श्वास रोधून धरण्यात त्यानं खूप प्रगती केली होती म्हणे ! चार महिन्यांत हिला कळून चुकलं, आपल्याला भातुकलीचा खेळ खेळायचाय. लहानपणी व्हरांड्यात दांडेकरांच्या घरासमोर अंजू आणि शुभीसोबत भातुकलीचा डाव मांडायची. त्या दोघी घर सोडून गेल्यावर ही एकटीच डाव मांडायला लागली. भातुकलीला लागतं काय? चार बोळकी आणि त्यात रमायची दुर्दम्य इच्छा ! त्या इच्छेवरच तिनं नवा डाव मांडला. सासरा भला माणूस होता. मोठा दीर सज्जन होता. तिला घरभर वावरायची मुभा होती आणि ती उभारीनं जगत होती. नवरा मात्र त्या सदेह समाधीच्या ध्यासात एकदा कोमात जाऊन हे जग सोडून गेला. 
    नवरा गेला म्हणजे आयुष्यात मोठी उलथापालथ. पण प्रज्ञानं धीरानं घेतलं. माहेरच्या घरी सगळ्यांच्या पोटात गोळा! ‘माघारी येते’, म्हणाली तर ‘नाही’ म्हणता येणार नाही आणि सासरी राहिली तर मोठा दीर आणि सासरे लोकं काय दहा तोंडानं बोलतील ! यावर सासर्‍यांनी उपाय काढला. ते म्हणाले, “मोठ्याशी लग्न कर. म्हणजे कुणीच काही बोलायला नको.” मोठा तयार झाला. चार वर्षात ही घरी आल्यापासून त्याच्या उदासीन वॄत्तीतही बराच फरक पडला होता. पण ही ‘नाही’ म्हणाली. ‘आता सोय बघत जगण्याचा कंटाळा आलाय,’ म्हणाली. “मनापासून वाटत नाही लग्न करावसं. पहिलं लग्न सोय म्हणूनच केलं होतं. आता नाही तसं करणार. लेडीज हाॅस्टेल शोधेन, पेईंग गेस्ट राहीन पण आता आयुष्यात सोय बघत जगणार नाही.” 
मोठा धीर देत म्हणाला, “आपलं एवढं छान घर असताना कशाला निवारा शोधत फिरतेस? खुशाल इथं रहा. कुणी काही बोलणार नाही आणि बोललं तर मी उत्तर देईन!”
‘आपलं इतकं छान घर असताना...’ दिराच्या एका वाक्याने किमया केली. संपूर्ण आयुष्य आपण हेच शोधत होतो, याची जाणीव तिला झाली. ‘आपलं घर…!’ हे सामावून घेणं जे असतं, ते माहेरच्यांनाही कधी जमलं नाही. त्याहीपेक्षा सुचलच नाही. त्याना फक्त अर्ध्या वाक्याचा धाक होता. ‘लोक काय म्हणतील?’
पण यापुढं जाऊन, ‘कुणी काही म्हणालं, तर मी उत्तर देईन’ ही जबाबदारी कुणी घेतलीच नाही. ती आतल्या आत निवांत झाली. पण तरी लग्नाचा निर्णय तिनं घाईनं घेतला नाही. प्रत्येक ॠतू प्रत्येक दिवस ती मोठ्याच्या साक्षीनं मनमुराद जगली. दोघं छान फिरायचे. वाचनालयात जायचे. अगदी चहाचे घोट घेत गॅलरीतही गप्पा झोडायचे. बरेचदा सासरेही कौतुकानं सहभागी व्हायचे. कधी माहेरी गेली तर दादा वहिनीला प्रश्न पडायचा, ‘ही इतकी खुश कशी असते?’ आई समजवायची… “तुझ्यासारख्या बाईनं खाली मान घालून वावरावं. असं उंडारत फिरू नये !” 
त्याचा परिणाम असा झाला की, तिचं माहेरी जाणं जवळ जवळ बंदच झालं. तरी पुन्हा लग्नाचा विचार मनात येत नव्हता आणि सासर्‍यांनी जेव्हा निरवानिरव करायला घेतली, तेव्हा तिला गळ घातली  “धाकट्याचा वेडेपणा माहीत असताना त्याला तुझ्या गळ्यात बांधला. त्या चुकीची दुरूस्ती करायची संधी दे. माझे डोळे उघडे आहेत तोपर्यंत मोठ्याशी लग्न कर. ‘या घराला संसारसुख लाभत नाही’ हा समज तुम्ही दोघांनी मिळून खोटा ठरवा. मला जायचे वेध लागलेत. मला निवांत जाऊ दे…!”
    मग सासर्‍यांनी सनईचे सूर ऐकले. दोघांनी रजिस्टर्ड लग्न केलं. तरी सासरेबुवानी दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या आणि सुखानं डोळे मिटले.

- चंद्रशेखर गोखले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...