महात्मा फ़ुलेंबद्दल जी माहिती येथे सादर केली आहे त्याचा हेतू कोणालाही दुखावण्याचा अथवा भडकवण्याचा नाही. लेखकाने सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया सदरची माहिती वाचून कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
१- महात्मा फुले हे १८९० साली मरण पावतात; तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाहीत; याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्या मुळे समाजातील काही कर्मठ लोक अग्नी देवू देत नव्हते;
यशवंत मुलगा अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत ; हा खेळ बराच वेळा चालला; महात्मा फुले यांचा पार्थिव पडून आहे; तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला शेवटी सावित्रीबाई फुले पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला.
विचार करा जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना अपमान धर्मांध लोकांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राम्हणी विचारधारेच्या प्रभावाने विटंबना करतात. यावर फुले अनुयायी विचार करतील काय?
२- दुसरी एक घटना अशी की महात्मा फुले यांची सून म्हनजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती; अतिशय गरीब अवस्थेत खायला अन्न नाही राहायला घर नाही; अशाच वेळेस एक दिवस असा आला घरातील सर्व अन्न संपले घरात कपाळावर लावायला एक रुपया नाही;
अशा वेळी त्या माऊलीने आपले घर शंभर रुपयात विकून टाकले व फुले यांनी लिहिलेले पुस्तके रद्दीत विकून दिवसाची गुजराण केली व दुसऱ्या दिवशी सकाळी मरण पावली;
तर मग तीचे प्रेत तसेच पडून आहे; पण दफन करायला पुढे कोणीही आले नाही; दिवसभर ते प्रेत सडत आहे त्याचा वास येतोय; जातीचे लोक कोणीच तिकडे गेले नाही; शेवटी पुणे महानगर पालिका ने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व अंत्यसंसकार केला.
विचार करा त्या काळात या फुल्यांच्या वडीलांचे मासिक उत्पन्न बारा लाख रुपये होते; तर रतन टाटा यांच्या उत्पन्न फक्त वीस हजार रुपये होते म्हणजे फुल्याकडे दोनशे एकर शेती होती व काही प्रमाणात फुलझाडे लावत; (संदर्भ-हरी नरके लिखित पुस्तक)
विचार करा आम्ही शिकून साहेब बनावे यासाठी फुल्यांनी जीवनाची माती केली पण त्यांचा शेवट हा पशु प्रमाणे व्हावा ही आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे; जगाच्या पाठीवर फुले हालहाल होवून मेले मग आम्ही घरात त्यांचा फोटोदेखील लावत नसू तर हा किती कृतघ्नपणा करत आहोत याचा विचार केला पाहिजे;
एकदा सावित्रीबाई फुले आपल्या पतीला म्हणाल्या की आपण मेल्यावरही आपल्या बहुजन समाजाचे कसे होईल? ही चळवळ पुढे कोण चालवणार? तेव्हा फुले उत्तर देताना सांगितले की "माझ्या शरीरात असलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून बहुजनाच्या घरात महात्मा फुले जन्म घेतील"
विचार करा म फुल्यांनी बहुजनावर किती विश्वास ठेवला मग सांगा आतापर्यंत किती फुले जन्मले? एकही नाही.. मग महात्मा फुले चुकीचे बोलले की त्यांचे अनुयायी चुकीचे वागले याचा आम्ही विचार केला पाहिजे..
जर उदयोगपती असलेले हे फुल्यांनी समाजाचा विचार केला नसता तर त्यांचे वारस जीवंत राहिले असते व आजचे रतन टाटा.. बिर्ला; अंबानी; सचिन तेंडुलकर व अमिताभ बच्चन या साऱ्या श्रीमंत लोकांना महात्मा फुले यांच्या वारसदाराने विकत घेऊन घरी पाणी भरायला लावले असते एवढे गर्भश्रीमंत राहीले असते पण फुलेंनी समाज हितासाठी स्व वडीलोपार्जित सम्पत्तिचा त्याग केला आज आम्ही त्यांचे अनुयायी त्यांचा विचार देखील जोपासत नाही...!!
संदर्भ- ""किशन सूर्यवंशी"" यांच्या महात्मा फुले यांचे खरे वारसदार कोण? या पुस्तकातून..
राष्ट्रपिता, शिवजयंतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे जनक, बहुजनांचा राजा, स्त्री उध्दारकर्ता, अश्पृश्यांचा वाली, अशा क्रांतीकारी समाजसेवकास कोटी कोटी प्रणाम
*********
बहुजन समाज कृतघ्न आहे काय? - प्रा.हरी नरके
महात्मा जोतीराव फुले शेतकरी, व्यापारी, ग्रंथप्रकाशक, ग्रंथविक्रेते, आयुक्त आणि एका मोठ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. सचोटीने, अपार मेहनतीने आणि रात्रंदिन काम करून त्यांनी संपत्तीची निर्मिती केली. ती सगळी संपत्ती त्यांनी वंचित, दलित, बहुजन आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी खर्चून टाकली. त्यांना पक्षाघाताचा [ पॅरलिसिस ] आजार झाला तेव्हा त्यांच्याकडे औषधपाण्यालाही पैसे नव्हते. डॉ. विश्राम रामजी घोले आणि भवाळकर या मित्रांनी त्यांना थोडीफार मदत केली. मामा परमानंद यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वैद्यकीय मदतीसाठी आवाहन केले. महाराज परदेशात असल्याने मदत यायला उशीर झाला, तोवर औषधपाण्याविना २८ नोव्हेंबर १८९० ला जोतीरावांचे निधन झालेले होते.
त्यांनी ब्राह्मण विधवेच्या दत्तक घेतलेल्या मुलाला डॉक्टर केलेले होते.
त्याने पुढे सैन्यात देशविदेशात नोकरी केली. १८९७ च्या प्लेगच्या साथीत रूग्णांना मदत करीत असताना प्लेग होऊन सावित्रीबाई १० मार्च १८९७ ला गेल्या. डॉ. यशवंतही १९०५ सालच्या प्लेगच्या साथीत काम करताना गेला.
त्याच्या मुलीकडे आणि पत्नीकडे उदरनिर्वाहासाठी काहीही नसल्याने त्यांनी जोतीराव- सावित्रीबाईंची पुस्तके रद्दीत विकली. दागिने आणि भांडीकुंडी विकून संपली. शेवटी त्यांनी जोतीराव- सावित्रीबाईं घर शंभर रूपयांना विकले. दोघीजणी खडकमाळ आळीच्या फूटपाथवर राहू लागल्या. पुढे मुलीचे एका सापत्य विधूराशी लग्न झाले. सून मात्र रामेश्वराच्या दारात भिक मागुन जगत होती. १९३३ मध्ये ती गेली तेव्हा पुणे नगरपालिकेने तिचा बेवारस म्हणून अंत्यविधी केला.
त्याकाळात सत्यशोधक चळवळ जेधे जवळकरांच्या ताब्यात होती. केशवराव जेधे कोट्याधिश होते. त्यांच्या जेधे मॅन्शन या भव्य वाड्यापासून हाकेच्या अंतरावर जोतीराव- सावित्रीबाईंची सून भिक मागून जगली आणि फूटपाथवर बेवारस म्हणून मेली तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. त्यावेळी अनेक बहुजन श्रीमंत होते पण त्यांच्याकडे दानत नव्हती. तशी ती आजही नाही. निवडणुकीवर आणि धार्मिक कार्यांवर कोट्यावधी रूपये सहज उधळणारे बहुजन लोक सामाजिक कामासाठी दमडीही खर्चायला पुढे येत नाहीत.
जोतीराव फुले "पुणा कमर्शियल ॲण्ड कॉट्रक्टींग कंपनी"चे मॅनेजिंग डायरेक्टर होते. कंपनीने बोगदे, पूल, इमारती, राजवाडे, धरणं, कॅनाल, रस्ते बांधले. बांधकामांसाठी वाळू, खडी, चुना पुरवला. पुस्तकप्रकाशन व विक्री केली. भाजीपाला पुण्याहून मुंबईला पाठवून विकला. सोन्याचे दागिने बनवण्याच्या मुशी [मोल्ड्स] विकल्या. अनंत व्यवसाय यशस्वीपणे केले. मुबलक संपत्ती कमावली. पण ती सगळीच मुलींच्या शाळा, वसतीगृहे, विधवांसाठीचे बालहत्त्या प्रतिबंधक गृह, शेतकरी, दलित-वंचित-बहुजनांवर खर्च केली.
स्वत:साठी पैसुद्धा शिल्लक ठेवली नाही.
ज्यांच्यासाठी ते आयुष्यभर झटले, राबले त्या बहुजनसमाजाला जोतीरावांना औषधोपचारांसाठी मदत करावी असे का बरे वाटले नाही? त्यांच्या सुनेला मदत करायची दानत जेधे-जवळकरांमध्ये का नव्हती? बहुजन समाजाला कृतघ्नतेचा शाप आहे काय? वंचित बहुजन समाज कृतज्ञता बुद्धीला पारखा आहे काय?
-प्रा.हरी नरके ११ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा