निसरड्या पायऱ्या हळुवार उतरत स्वतःचा तोल सांभाळत यमुनाबाईनं वाकून लक्ख चमकणारा तांब्याचा गडू पाण्यात बुडवला, तसं हवेशी स्पर्धा करत पाणी आत शिरलं. नेहमीचा गुडगुड आवाज आला आणि यमुनाबाईच्या चेहऱ्यावर तेच निरागस हसू उमटलं, जे गेल्या कित्येक वर्षांपासून उमटत होतं…
बालविवाहाची प्रथा असलेला तो काळ… पंधराव्या वर्षी वामनरावांशी लग्न करून ही यमी आली ह्या गावात. आपल्या माहेराहून कोसो दूर… भेदरली, घाबरली, रडली, पडली… पण, ‘एकदा अक्षता पडल्या की बाईंचं सासरच तिचं घर असतं…’ मांडवपरतणीला आजीनं हे ठणकावून पण प्रेमानं जवळ घेऊन सांगितलं…
“फार तर फार जास्त लेकरं झाली तर बाळांतपणाला येता होईल हो यमे तुला…” असं हसत आजी म्हणत असताना, समोरून लहान विधवा सून गेली तेव्हा आजी टचकन बोलली होती,
“नाहीतर हिच्या सारखं… लेकरू नाही झालं आणि विधवापण आलं, तर बसा मग अश्या पाणी भरत…!”
आजीचं ते वाक्य ऐकून काकूनं पदरच लावला तोंडाला आणि आलेला हुंदका दाबला. ते सगळं साठवत यमी परत आली होती सासरी आणि रुजवू पाहात होती ह्या देहाचं रोपटं ह्या अंगणात…
पण छे! शरीर कामात गुंतलं तरी मन नाही रमायचं. माहेरचा टेकडीवरचा गणपती आठवायचा. ती हिरवीगार दुर्वांची जुडी घेऊन दुडूदुडू धावत जाऊन त्याला वाहायची… जाताना आजी मागून यायचीच आरडाओरडा करत. आपण घट्ट डोळे मिटून त्या गणपती समोर बसून असलो की मागून येऊन आजी वेणीच ओढायची… म्हणायची,
“आता काय लहान आहेस का...धावत टेकडीवर यायला? चांगली लग्नाच्या वयाची झालीस ग! उद्या एखाद्या खटल्याच्या घरात पडलीस ना, तर मग तोंड बाहेर निघायचं नाही स्वयंपाक घरातून… तेव्हा आठवेल टेकडीचा गणपती!”
आपणही मग आजीला उगाच चिडवायचो, “अग ह्या गणपतीलाच सांगते ना… ‘माझा जोडीदार असाच दे, ज्याला तुझं प्रेम असेल!’…”
आजी मग जवळ बसून डोक्यावर हात फिरवत म्हणायची, “बुद्धीचा देव हा! तू ह्याच्या दर्शनाला हट्टानं येतेस म्हणून जादू झाल्यासारखं तुझ्या बापानं सगळ्यांचा विरोध पत्करून शाळेत तरी टाकलं, अक्षराची ओळख तरी करू दिली… आता खरंच जर स्त्रीला समजून घेणारा जोडीदार मिळाला ना तुला, तर मग मी मान्य करेन की ह्याची कृपा आहे तुझ्यावर…!”
तेवढ्यात गणपतीच्या डोक्यावरचं फूल खाली पडलं आणि आपण टाळ्या पिटत पळत सुटलो… “तू म्हणते तसंच होईल आजी!” आणि झालंही तसंच ना!
हे आताही आठवून यमुनेच्या डोळ्यात पाणी आलं… पण परत गुडगुड आवाजानं यमी परत हसली. तेवढ्यात वामनराव मागून म्हणाले,
“चला, आता फार उशीर नका करू…”
मग तो थंडगार पाण्यानं भरलेला गडू घेऊन यमी निघाली. समोर वामनराव चालत होते आणि त्यांच्या थकलेल्या पण व्यायामानं कमावलेल्या त्या देहाकडे बघून यमी मनात सारं काही आठवत होती…
‘आज काय, सगळा भूतकाळच आठवायचा आहे की काय?’ असं वाटून तिनं मनात हसूनही घेतलं. ह्या नादात तिची चाल मंदावली, तेव्हा वामनराव मागं वळून म्हणाले देखील…
“अहो, आता परत लहान झालात का तुम्ही? अगदी सुरुवातीला मी जेव्हा तुम्हाला नवीनच ह्या गणपतीला आणलं, तेव्हा सगळ्या रस्त्यानं ही रानफुल तोडत, दुर्वा तोडत तुम्ही असेच दोन तास घालवले होतेत… आणि मग घरी जाऊन सगळ्यांचा ओरडा खावा लागला होता तो वेगळाच!”
वामरावांच्या या वाक्यावर यमीला वाटलं, ‘अगबाई ह्यांना देखील आज सगळ्या आठवणीच दिसताहेत वाटतं…!’
उन्हामुळं थकल्यानं आणि जरा दम लागल्यासारखं वाटल्यानं डेरेदार सावलीचं झाड दिसताच यमी म्हणालीच,
“अहो, थोडं बसायचं का? पाय बोलायला लागलेत…!”
तिच्या वाक्यावर पडत्या फळाची आज्ञा म्हणत वामनराव झाडाच्या सावलीकडे वळाले. हे वडाचं झाड तसं परिचयाचं झालं होतच त्यांच्या… त्याची एक विशिष्ट पारंबी जमिनीत रुजून पुन्हा स्थिरावलेली होती. ते इथं थांबले की नेहमी तिला टेकून बसायचे आणि मायेनं हात फिरवत म्हणायचे,
“फिरुनी नवे जन्मेन मी… असं शिकवतेस तू!”
आताही तसंच म्हणाले आणि यमीनं विचारलंच,
“नेहमी ह्या पारंबीला असं का म्हणता?”
यमीच्या वाक्यावर हसत वामनराव म्हणाले, “जरा हात द्या बरं आमच्या हातात…”
त्यांच्या या बोलण्यावर यमी एवढी साठीच्या पुढं सरकली असली, तरी पंचवीशीतल्या स्त्री सारखी म्हणाली,
“इश्श, भलतंच काय हे! कुणी पाहिलं तर काय म्हणेल?”
हे म्हणताना तिला आणि वामरावांनाही जाणवलं, तिचे गाल अगदी लाल झाले होते. वामनराव पटकन म्हणाले,
“स्त्री वयानं कितीही मोठी झाली, तरी लाजली की सुंदरच दिसते ना! ते काही नाही… आज हात जर हातात दिला तरच पुढे काही बोलू आम्ही!”
त्यांचा आताचा रुबाब पाहून यमीला देखील वामनराव चाळिशीतले आठवले… आपण अगदी कामात गढलेलो असताना, आजूबाजूला सासूबाई असताना, चोरून ‘शुकशुक’ करत डोळ्यानंच खुणावून आपल्या मनाला हुरहूर लावून निघून जाणारे…
दिवसभर ते डोळे आठवून मन मोर व्हायचं. ती ओढ ताणली जायची भेटीची आणि मग रात्री खोलीत जाताच आपण जर झोपायचं नाटक केलं तर असेच फुरंगटून बसायचे… जसे आज बसलेत, आपला हात हातात घेण्यासाठी!
‘पण आता जास्त ताणायला नको. आधीच तर यायला तयार नव्हते… पण आपल्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस. आपण हट्ट केला, म्हणून एवढ्या दूर शहरातून ह्या आठवणींच्या राज्यात त्यांनी आपल्याला आणलंय खरं! आता उगी रुसवे फुगवे नको…!’ म्हणत यमीनं आपला हात पुढं केला. वामनरावांनी तो हात आपल्या मांडीवर ठेवला आणि निरखत म्हणाले…
“किती कष्ट केलेस ग तू आपल्या संसारात!”
त्यांचं असं एकेरी बोलणं यमीला आवडायचं. सुनेच्या राज्यात ती बघत होती… नवरा बायकोच्या नात्यात किती सहजता आलीय… हे चटकन एकमेकांशी बोलू शकतात, हातात हात घेऊन बाहेर फिरू शकतात! आपल्या काळी हे नव्हतं.
हे सगळं तिच्या मनात सुरु असताना वामनराव म्हणाले, “आजकाल आपली मुलं आपल्या बायकांशी चहा घेताना किती छान बोलत असतात… दोघं मिळून किती गोष्टी ठरवत असतात! किती चटकन कुठलेही निर्णय दोघं मिळून घेतात… ह्या व्यक्तिस्वातंत्र्याचा हेवा वाटतो मला आणि वाटतं हे काळानुसार मिळालं ना माणसाला!
“आपल्यावेळी नव्हतं असं काही… किती किती दिवस निवांत बोलायला मिळायचं नाही. घरात नोकर माणसं ठेवायची नाहीत, हा शिरस्ता! मग तुम्ही बायका दिवसभर त्या रगाड्यात गुंतलेल्या… आणि आम्ही मनात आलेली भावना तशीच घेऊन चातकासारखे वाट बघत बसलेलो…!”
यमीला जरा गम्मतच वाटली आज… किती सुंदर हे क्षण उशिरा का होईना पण वाट्याला तर आले, म्हणून आनंदी होत ती ही त्या विषयाला ओढत बोलू लागली…
“काळानुरूप खूप बदलतंय, आपण बघतोय… भूमिकांमध्ये बदल झालेत. नवरा बायको ह्या नात्यातली सहजता तर आपल्या काळी काहीच नव्हती, हे अगदी मान्य पण नात्यातला एक धागा तेव्हा आणि आताही कायम आहे ना… प्रेम! ते आहे म्हणून संसार टिकून आहेत!”
वामनराव खिन्न हसले आणि म्हणाले, “यमे, हे प्रेम जर काळानुरूप टिकून असतं, तर आपल्या शरुच्या घटस्फोटापर्यंत नसतं का आलं? अगं, काळानुरूप प्रेमही बदललंच की…!”
यमीच्या त्याक्षणी टचकन डोळ्यात पाणी आलं. आपला काळ खरंतर किती विचित्र होता… दहा वर्षात जेव्हा आपल्याला मूल झालं नाही, तेव्हा सगळ्या कुळात चर्चा रंगल्या… ‘आता वामनरावानं यमीला टाकूनच द्यावं आणि दुसरं लग्न करावं…’
आपल्या आजीसारखीच वामनरावांची आजी होती… पण विचारांनी ती भिन्न होती. तिनं आणि वामनरावांनी सगळ्या खानदानाला विरोध केला आणि आजी आपल्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
दत्तक मुलं तेव्हा समाजाच्या पचनी पडायला किती अवघड संकल्पना… पण आजीनं आणि वामनरावांनी निर्णय घेतला आणि गेल्या कित्येक वर्षात आपल्या गायीची सेवा करणाऱ्या रुख्मिणीची पोरगी दोन जुळ्यांना जन्म देऊन वारली, तर ती दोन्ही लेकरं वामनरावांनी दत्तक घेतली, केवळ ‘मूल नाही म्हणून यमीला सोड’, ह्या नातेवाईकांच्या हट्टापायी.
पण हळूहळू लेकरांमध्ये दोघांचा जीव रमला… आजी सोडली तर सगळ्यांनी नातं तोडलं पण वामनराव, एक अश्या काळातला नवरा… जो बायकोच्या प्रेमाखातर उभा होता पहाडासारखा !
ही उजळणी जशी यमीच्या मनात सुरू होती, तशीच वामनरावांच्या मनात देखील सुरू होती… कारण ह्याच कारणापायी आज त्यांच्या लेकीचा घटस्फोट झालेला होता ! दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
यमीनंच मग वामनरावांनच्या हाताला स्पर्श करत डोळ्यांनी खुणावलं, “आपला निष्कर्ष ठरलाय ना, नशीब म्हणून सोडुन द्यायचं. आता ह्यावर चर्चा नको!”
वामनराव म्हणाले, “हो, ठरलंय आपलं… पण आज आपण पन्नास वर्ष झालीत, संसार करतोय… मन रमतंच ना ग माणसा त! असं कसं सोडून देता येतं, जीव गुंतलेल्या माणसाला? की जीव गुंततच नाही ह्यांचा…?”
शरू खरंतर खुप रमली होती संसारात… यमीला आठवलं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आपली चिमणी, भातुकलीच्या खेळातही किती रमून जायची! त्या खेळातही नवऱ्यानं भांडलेलं,मारलेलं आवडायचं नाही तिला.
आपल्या शेजारचा तो पंकज… खेळात तिचा नवरा असायचा आणि तो जसे आपले बाबा वागतात तशी नवऱ्याची भूमिका पार पडायला जायचा… त्यांच्याकडे काय, नवरा-बायको म्हणजे निव्वळ कुत्रा आणि मांजर होते. तो बायकोला ओरडून, चिडून आणि वेळ आली तर मारूनच संसार करायचा…
आपल्या शरूची घडण वेगळीच झालेली. तिनं कधी हात उगरलेलं पहिलं नाही तुम्हाला… मग ती म्हणायची,
“माझे बाबा बघ बायकोला, म्हणजे माझ्या आईला कसा मान देतात. बायकांना मन असत पुरुषांसारखं… उगाच मारझोड आणि आरडाओरडा करणार असशील, तर मला नाही खेळायचं! मी नाही होणार तुझी बायको…”
हे सगळं आठवत यमी म्हणाली, “पोरीच्या नशिबी जे नको होतं, तेच आलं वाट्याला…!”
वामनराव म्हणाले, “तशी ती आपल्या पोटचा गोळा नाही. तिच्या कुळात असेच पुरुष असतील… तिच्या आईला टाकूनच दिलं होतं नवऱ्यानं, म्हणून ती रुख्मिणीबाईकडे होती. तिच्या पोटचा हा गोळा संस्कारनं आणि विचारानं मात्र बदलला आणि आपल्याला शोभेल अशी शरू पक्की आपली लेक झाली ! अभिमान वाटतो तिचा की, त्याच्या लाथा खात न बसता तिनं हा निर्णय घेतला…”
ह्या वाक्यानं दोघांना उगाच हुरूप आला. खरंच अन्याय सहन करण्यापेक्षा एकटं जगलेलं काय वाईट? असंच आलं दोघांच्या मनात… आणि उठत वामनराव म्हणाले,
“चला आता निघूया…”
यमी म्हणाली, “निघू… पण हे, ‘फिरुनी नवे जन्मेन मी’ नेमकं काय होतं…?”_
वामनराव हसले. म्हणाले, “यमे, माणसाच्या आयुष्यात किती कठीण कठीण प्रसंग येतात… पण माणसंच एकमेकांचा आधार घेऊन आणि देऊन आपल्या प्रेमानं एकमेकांचं जगणं सुकर करत असतात… तशीच ह्या झाडाची ही पारंबी…
“ही झाडातून निघून पुन्हा रुजून पुन्हा त्या वटवृक्षाच्या डेऱ्याला बहर देतेय… तिचं मूळ रुजलंय आणि पुन्हा पालवी घेऊन बहरलंय. हे असत ग प्रेम…!!!”
त्यांच्या वाक्यावर यमी म्हणाली, “जसं तुम्ही वृक्ष आणि मी पारंबी ! वेगळी होऊन तुटून पडण्यापेक्षा तुमच्या प्रेमानं पुन्हा रुजले आणि बहरले, तसंच ना…?”
“हो… हो…!” अगदी खळखळ हसत दोघं गणपतीच्या टेकडीकडे निघाले… एकमेकांना आधार देत, जगण्यातले खाच खळगे पार करत, अनेक सुख दुःखांची शिदोरी सोबत बाळगत… फिरुनी नवे जन्मण्यासाठी !
— स्वप्ना मुळे (मायी), छ. संभाजीनगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा