हल्ली एक व्हिडिओ viral होतोय. फळ्यावर आपल्या सगळ्या प्रिय व्यक्तींची नावे लिहिण्याचा आणि त्यातली कमी प्रिय असलेल्या व्यक्तीची एक एक नावे पुसण्याचा. त्यांना आपल्या आयुष्यातून घालवण्याचा. शेवटी एक नाव शिल्लक राहतं. अर्थात ते आपल्या जोडीदाराचं !
हा खेळ मी प्रत्यक्ष अनुभवलाय. अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावना हेलावून टाकणारा असा तो अनुभव होता.
सन 1993 साली मी दिल्लीला IIPA मध्ये पंधरा दिवसाच्या एका resident ट्रेनिंगला गेलो होतो तिथला हा अनुभव आहे. त्या ट्रेनिंगला सगळे चाळीशीच्या पुढचे साठीपर्यंतचे आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेले trainees होते.
एके दिवशी आधीची दोन दोन तासांची दोन सेसन्स झाली होती. नंतर लंच अवर होता. कॅन्टीनकडे वळताना थंडी जाणवत होती. डिसेंबरचा महिना होता. वातावरण खूप आल्हाददायी होतं.
कॅन्टीनमधलं जेवण खूपच रुचकर होतं. स्पेशल स्वीटच्या दोन पंजाबी डिसेस होत्या. एक खास राजस्थानी नमकीन मिठाई होती.
लंच घेतल्यावर आम्ही तीन वाजता पुन्हा क्लास रुममध्ये आलो.
साठीच्या घरातले प्रोफेसर अमीत सक्सेना आले. त्यांनी बघितलं, लंचला भरपेट झालेल्या जेवणाने बरेच लोक आळसावलेले होते.
ते म्हणाले, "Good afternoon. ... So what is the topic today ? ... Priorities - Elimination of Don'ts."
थोडा गॅप घेऊन ते म्हणाले, "हरिकांत भैय्याजी तो हमे हर रोज अच्छाही खाना खिलाते है. लगता है आज वो हम पर ज्यादाही मेहेरबान थे. आज मै आपको लेक्चरसे बोअर नही करूंगा."
थोडं थांबून ते म्हणाले, "चलो, आज हम एक गेम खेलते है. माॅनिटरींग करनेके लिए मुझे एक खूबसुरत चेहरा चाहिये, जो मन से भी खुबसुरत हो."
मग ते हसत म्हणाले, "जेन्ट्सके चेहरे मुझे इतने खुबसुरत नही लगते."
सगळे हसायला लागले.
ते पुढे म्हणाले, "हाँ, एक शर्त है. ज्यो भी खुबसुरत चेहरा प्लॅटफाॅर्मपर आये, वो पुरी प्रामाणिकता, सच्चाईसे और दिलसे परफाॅर्म करे."
पाच मिनिटे गेली. कुणीच महिला उठत नव्हती. आमच्या क्लासमध्ये चौदा महिला होत्या. शेवटी प. बंगालची निधी सेन नावाची एक अभिजात बंगाली सौदर्याचं लेणं ल्यालेली, नजरेत भरणारी पन्नाशीच्या घरातली महिला उठून प्लॅटफाॅर्मपर आली.
सरांनी विचारलं, "तो निधीजी आप तैयार हो ?"
ती म्हणाली, "जी हाँ, सर."
सरांनी विचारलं, "भावनेवर तुम्ही किती नियंत्रण ठेवू शकता ?"
ती म्हणाली, "फारसं नाही, मी खूप सेन्सेटिव्ह, इमोशनल आहे सर."
सरांनी विचारलं, "गुड ! मला भावूक होणारी तरुणीच हवी होती. तुम्ही किती लोकांवर प्रेम करता ?"
विचार करून ती हसत म्हणाली, "मी खूप जणांवर प्रेम करते ! माझं हृदय सदैव प्रेमाने पूर्ण भरलेले असतं."
सर म्हणाले, "good. त्या प्रेमाचा स्तर कमी जास्त असेल ना ?"
ती म्हणाली, "निश्चितच. व्यक्तीपरत्वे फरक पडणारच ना, सर ?"
सर म्हणाले, "good. आता तुम्ही या बोर्डवर तीस पस्तीस व्यक्तींची नावे लिहा ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता. एक काळजी घ्या. ज्यांच्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करता त्याचं नाव आधी लिहा. मग क्रमाने दुसरी तिसरी चौथी अशी नावे लिहा."
सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखल्या होत्या हे ती पाहत होती. तिच्यासाठी खूप अवघड टास्क होता असं तिच्या चेह-यावरून जाणवत होतं.
पहिल्याच नावाला ती अडखळली, चार वेळा तिने आपल्या हातातला पेन बोर्डजवळ नेला व परत खाली घेतला. तिच्या मनात उलाघाल चाललीय, ती तिची सर्वात जास्त प्रिय व्यक्ती ठरवू शकत नाही किंवा लिहू इच्छित नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. ते सरांच्याही लक्षात आलं, तसं ते म्हणाले, "प्रामाणिकता, सच्चाई और दिलसे लिखना है ये याद रखो. यहाँ शायद तुम्हे पहचाननेवाला कोई नही होगा. अपने दिलसे लिख सकती हो."
तिने फळ्यावर नाव लिहिलं. "आशुतोष."
सरांनी विचारलं, ''ये कौन हे नसीबवाला ?'
ती म्हणाली, "माझा लहानपणापासूनचा जिवलग मित्र आहे."
एक मित्र तिचा सर्वात जवळचा आहे हे ऐकून सगळे चकित झाले होते. मनातून तिच्या खरं बोलण्याला, धाडसाला दाद देत होते.
नंतर तिने आपल्या आईवडिलांची नावे लिहिली.
त्यानंतर एका भावाचे नाव लिहिले.
इथे सगळे पुन्हा चकित झाले. तिच्या भांगेत कुंकू होतं म्हणजे ती विवाहिता होती. मित्र, आई वडील, भाऊ यांच्यानंतर तिच्या नवरा की काय हा प्रश्न आम्हाला पडला होता. तिचा नवरा वारला असेल का अशीही शंका काही लोकांना आली असेल पण तिच्या भांगेतलं कुंकू तसं दर्शवत नव्हतं.
त्यानंतर तिने आपल्या पतीचे नाव लिहिलं.
इथपर्यंत नावं लिहिताना ती बराच विचार करायची हे आमच्या लक्षात आलं होतं.
पुढे ती एक एक नावे फारसा विचार न करता पटापट लिहित होती. जवळजवळ 38 नावे तिने फळ्यावर लिहिली. प्रत्येक नाव लिहिल्यावर ती त्यांची ओळख सांगायची.
सर म्हणाले, "आपने 38 नाव लिखे है और उनकी पहचानभी बतायी है. और भी कुछ नाम लिखना हो तो आप लिख सकती हो."
तिने अजून चार नावांची भर घातली.
सरांनी विचारले, "अब आप कुछ कहना चाहोगे ?"
ती म्हणाली, "जी नावे लिहिली ती आणि त्यांचा क्रम मी मनापासून लिहिलाय."
सर सगळ्यांना म्हणाले, "निधीजी बयालीस लोंगोंपर प्रेम करती है, एक क्लॅप तो निधीजी के लिए होनी ही चाहिये."
सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या.
सर म्हणाले, "आता निधीजींची कसोटी लागणार आहे. खेळाला आता खरी सुरुवात होत आहे."
खेळ खूप दिलचस्प होता. निधीजी फळ्यावर एक एक नावं लिहित होती. सगळे त्या खेळामध्ये मनाने सामिल झाले होते. तिच्याबरोबर सगळे खेळायला लागले होते. आपल्या मनःपटलावर आपण प्रेम करतो त्यांची एक एक नावे लिहित होते. काही लोकं वही पेनचा वापर करत होते.
सर म्हणाले, "निधीजी, तैयार हो, आगे खेलने के लिए ?"
निधी म्हणाली, "जी सर !"
सर म्हणाले, "आता चार जणांची नावे eliminate करा. तुमच्या आयुष्यातून त्यांना बाहेर काढायचे आहे. कायमचं !"
निधीने एका क्षणाचाही विलंब न करता फळ्यावरील चार नावे पुसली.
सरांनी विचारले, "कोण आहेत ही चौघे ?"
निधी म्हणाली, "सर, ऑफिस निमित्ताने संपर्कात आलेली."
सर म्हणाले, "ओके, अजून काही अशी नावे असतील आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांनाही तुमच्या आयुष्यातून कायमचं घालवू शकता."
निधीने अजून काही नावे फळ्यावरून पुसून टाकली.
सर म्हणाले, "आता अजून सात आठ नावे पुसून टाका जी तुमच्या आयुष्यात नसतील तरी तुम्हाला चालतील."
निधीने अजून काही नावे फळ्यावरून पुसून टाकली.
सरांनी विचारले, "कोण होती ही सगळी ?"
निधी म्हणाली, "आमच्या संपर्कात आलेली आणि आमचे शेजारी पाजारी."
सर म्हणाले, "good. You are on the right track. आता अजून चार पाच नावे फळ्यावरून पुसून टाका ज्यांच्या नसण्याने तुम्हाला विशेष फरक पडणार नाही."
खेळ रंगत चालला होता. खेळात बहुतेक सगळे सामिल झाले होते. तेसुद्धा खेळाशी एकरुप झाले होते. फरक एवढाच होता की निधी फळ्यावरची नावे पुसत होती आणि आम्ही आमच्या मनःपटलावरची नावे पुसत होतो.
निधीने काही नावे पुसल्यावर सरांनी विचारले, "ये सब कौन थी ?"
निधी म्हणाली, "मेरी सहेलिया."
आत्ता फळ्यावर मोजकी नावे उरली होती.
तिचा जिवलग मित्र.
तिचे आईवडील.
तिचा एक भाऊ.
तिचा पती.
तिची दोन मुले.
तिच्या दोन बहिणी.
तिचा अजून एक भाऊ.
पतीचे आईवडील.
पतीची एक बहीण.
सरांनी त्या नावांकडे नजर टाकून पुन्हा एकदा त्यांची ओळख विचारली. निधीने ओळख दिल्यावर सरांनी निधीला तीन नावे पुसायला सांगितली.
निधीने थोडा विचार करून पतीचे आईवडील व पतीच्या बहिणीचे नाव पुसून टाकले.
आतापर्यंत या खेळाचा शेवट बहुतेकांच्या लक्षात आला होता. निधीची चांगलीच कसोटी लागणार असल्याची कल्पना आम्हाला आली होती कारण तिचा priority चा क्रम काहीसा अस्वाभाविक होता.
निधी काहीशी तणावाखाली आली होती. सासूसास-याचे नाव पुसताना तिचे हात कापत होते. ती काहीशी उदास दिसत होती.
सरांच्याही लक्षात तिची स्थिती लक्षात आली होती. ते म्हणाले, "आता अजून चार नावे पुसून टाका."
निधी भावनावश झाली होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. अश्रुंचे काही थेंब तिच्या डोळ्यांतून गालावर ओघळले होते.
तिने दोन भाऊ आणि दोन बहिणीची नावे पुसली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
सर म्हणाले, "आपने अपनी दो बहने और दो भाईयों को भी अपनी जिंदगीसे निकाल दिया ? क्यो ?"
निधी रडत म्हणाली, "मै बहुत प्यार करती हूँ उनसे. लेकिन कभी कभार छः महिने, सालमे एक बार मिलते है. एक भाई तो यू के मे है. तीन साल हो गये, वो नही मिला. छोटा भाई भी दूर रहता है. छः आठ महिनेंमे मिलते है. पहले हम पुजाकी छुट्टीयोंमे हर साथ इकठ्ठा आते थे. अब सब अपने अपनामे काममे व्यस्त हो गये है."
आता फळ्यावर मोजकी नावे शिल्लक होती.
तिचा जिवलग मित्र.
तिचे आईवडील.
तिचा पती.
दोन मुले.
सर म्हणाले, "अब छः नाम याने छः रिश्ते बचे है. आप कौनसे दो लोगोंको अपनी जिंदगी से निकालना चाहोगी ? हमेशाके लिए !"
निधी कासावीस झाली. ती रडतच फळ्याजवळ गेली. तिचं मन द्विधा झालं होतं. या सहा जणांमधून कुणाला आपल्या आयुष्यातून बाहेर काढायचं ? तिच्या रडण्याचा उमाळा वाढला होता. दोन नावं पुसायला तिला धाडस होत नव्हतं. तिचे हात थरथरायला लागले होते.
तिने थरथरत्या हाताने आपल्या दोन मुलांची नावे फळ्यावरून पुसून टाकली आणि फुटू पाहणारा जोराचा हुंदका दिला. दुसरा हुंदका आवरण्यासाठी तिने तोंडावर हात ठेवून दाबून ठेवला.
सरांच्या अपेक्षेप्रमाणे घडत होतं. त्यांना निधीचे अश्रू आणि तिची मानसिक अवस्था पाहवत नव्हती पण गेम अर्धवट सोडूनही चालणार नव्हते. आम्हीसुद्धा निधीच्या विकल मनोवस्थेने काहीसे अस्वस्थ झालो होतो. आमच्या मनात हुरहूर दाटून आली होती.
आता चार नावे शिल्लक होती.
निधीचा जिवलग मित्र.
निधीचे आईवडील आणि
निधीचा पती.
सर तिला म्हणाले, "निधीजी, भावनेवर कंट्रोल करून मन घट्ट करा आणि अजून दोघांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा. कायमचं !"
निधी फळ्याजवळच उभी होती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिच्या हाताची थरथर खूपच वाढली होती. कंप पावणा-या हाताने तिने आपल्या आईवडिलांची नावे पुसून टाकली आणि तिथेच खाली बसून ती ओक्साबोक्सी रडू लागली.
तिच्या रडण्याने सगळे सून्न झाले होते. एक जीवघेणी शांतता पसरली होती. तिच्या हुंदके देत रडण्याचा आवाज हाॅलभर पसरला होता.
सरांनी तिला आठ दहा मिनिटे रडू दिलं. मग ओडिशाच्या मिसेस महापात्राला हाताने खूण करून जवळ बोलावलं.
निधीजवळ जाऊन मिसेस महापात्राने निधीला सांत्वना देत तिच्या पाठीवर हात फिरवला. तसा निधीला पुन्हा दुखाःचा उमाळा दाटून आला. तिने त्यांना मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागली.
ते दृष्य पाहून सगळ्यांची मने हेलावली होती. बहुतेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.
निधीची अवस्था अशी झाली होती की जणू काही पाच दहा मिनिटांपूर्वी तिच्या प्रिय आईवडिलांचा मृत्यू झालाय.
पंधरा वीस मिनिटाने निधी त्या स्थितीतून बाहेर आली. तिने स्वतःला सावरलं. महापात्रा मॅडमला धन्यवाद देत ती उठून उभी राहिली.
निधीची झालेली अवस्था बघून सर एकदम स्तब्ध झाले होते. कदाचित हा खेळ पुढे चालू करायचा की नाही या विचारात पडले असतील.
माईक हातात घेऊन सगळ्यांवर नजर फिरवत निधी म्हणाली, "मला माफ करा. माझ्याबरोबर मी तुम्हालाही डिस्टर्ब केले. माझ्या बाह्य मनाला समजत होतं की हा एक फिक्टिशियस गेम आहे. वास्तव नाही पण माझं अंतर्मन मात्र हा गेम प्रत्यक्षात अनुभवत होतं. एक एक नावे डिलिट करताना मी प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी जोडलेल्या भावनांची अनुभूती अनुभवत होते. ऑफिसात ओळख झालेले, शेजारीपाजारी यांची नावे मी सहज पुसून काढली. नंतर माझ्या अंतर्मनाला जाणीव व्हायला लागली ती मैत्रिणींच्या नावापासून. काही बालपणीच्या मैत्रिणी होत्या. काही शाळा काॅलाजातल्या होत्या. त्या त्यावेळी आम्ही खूप इंटिमेट होतो. पण नंतर संपर्क कमी होत खेला होता तरी त्यांच्याबरोबरच्या आठवणी तर मनात होत्या ना ! नंतरचा माझा अनुभव माझ्यासाठी हळुहळू जीवघेणा होत गेला. बहीण भावांची नावे पुसताना माझं मन हेलावलं होतं पण ती माझ्यापासून प्रत्यक्षात दूर होती. संपर्कही मर्यादित होता आणि मला तर चार नावं पुसून टाकायची होती. माझ्या आयुष्यातून कायमची घालवायची होती.
थोडं थांबून ती म्हणाली, "नंतर दोन मुलांची नावे पुसताना माझं आईचं मन कासावीस, व्याकुळ झालं होतं. माझं काळीज थरथरत होतं. नऊ महिने मी त्यांना माझ्या उदरात वाढवलं होतं. सतरा अठरा वर्षे मी त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या होत्या. पण शिक्षणासाठी ती बाहेर पडली. पुढे नोकरीला लागली. मोठा मुलगा चेन्नईला आहे. त्याने एका तमीळ मुलीशी लव्ह मॅरेज केलंय. तो त्याच्या संसारात सुखी आहे. तशी त्याला आणि आम्हाला एकमेकांची गरज नाहीये. दुसरा मुलगा मुंबईला आहे. त्यानेही आयुष्याची जोडीदार म्हणून एक महाराष्ट्रीयन मुलगी शोधली आहे. त्या सहा नावात त्यांची नावे वगळणे क्रमप्राप्तच होते. दोन नावे मला पुसायची होती. पर्याय त्यांचाच होता. नंतर चार नावातली दोन नावे पुसायची होती. त्यांना माझ्या आयुष्यातून कायमचं घालवायचं होतं. आईवडील, माझा जिवलग मित्र आणि माझे पती. आईवडिलांच्या वयाचा विचार करून मी त्यांची नावे निवडली, पुसली पण त्या क्षणी माझ्या अत्यंत प्रिय आईवडिलांनी माझ्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतलीय या नुसत्या कल्पनेनंच मी मनाने कोलमडून पडले आणि ढसाढसा रडायला लागले. त्यांचा मृत्यू मी जीवंतपणी पाहिला अशी माझी अवस्था झाली होती. त्या अवस्थेतून बाहेर पडणं मला अजिबात सोपं नव्हतं. महापात्रा मॅडमनी मला सांत्वना देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा स्पर्श मला आपल्या प्रिय माणसाच्या मायेचा वाटला. मी त्यांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडले."
निधी पुढे म्हणाली, "No, it was not a only simple game. It was a real and true experiment for me. My emotions are tested at extreme level. It's simply appalling."
सरांबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. निधी बरीचशी भानावर आली होती. तिने सगळ्यांना हात हलवून धन्यवाद दिले.
सर म्हणाले, "निधीजी, can you conclude this game ?"
निधी म्हणाली, "Yes sir. आता दोन नावे उरली आहेत. एक बालपणापासून असलेल्या माझ्या जिवलग मित्राचे आणि माझ्या पतीचे. या माझ्या मित्रावर मी खूप जीवापाड प्रेम करते. दररोज आम्ही दोन मिनिटं तरी फोनवर बोलतो. रविवारी व सुट्टीच्या दिवशी आम्ही तास तासभर बोलत असतो. माझ्यासमोर माझा नवरा बसलेला असतो आणि त्याच्यासमोर त्याची बायको असते. दोघंही बोअर होत असणार याची आम्हा दोघांनाही कल्पना आहे. पण त्या दोघांनी आमची intimate मैत्री स्वीकारलीय. दोन दोन वर्षे आमची गाठभेट होत नाही पण आम्ही भेटलो की एकमेकांच्या मिठीत सामावून जातो. To be very honest, ती आमची ऊरभेट असते. माझे पती किंवा त्याची बायको सोबत आहे याचंही भान आम्हाला नसतं. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे वास्तव व सत्य आहे. माझ्या पतीवरही माझं खूप प्रेम आहे पण माझा मित्र आणि माझे पती या दोघांच्या प्रेमाच्या त-हा, नातं वेगवेगळ्या पातळीवरच्या आहेत. माझ्या पतीपेक्षा मी माझ्या जिवलग मित्रावर जास्त प्रेम करते हे खरं असलं तरी आता eliminate करायचं शेवटचं नाव माझ्या मित्राचं असेल, पतीचं नाही ! माझ्या पतीआधी मला माझ्या मित्राला माझ्या आयुष्यातून घालवणं मला भाग आहे. माझा पती हा मला आयुष्यभर physically साथ देणार आहे. माझ्या सुख-दुःखात physically सहभागी असणार आहे. आम्ही दोघेच शेवटपर्यंत एकमेकांचे असणार आहोत !"
निधीने माईक धरलेला हात खाली केला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
थोड्या वेळाने सर म्हणाले, "This is real priorities - elimination of don'ts."
सर पुढे म्हणाले, "कुणाला काही बोलायचंय ?"
महापात्रा मॅडम म्हणाली, "सर, मला निधीजींचं खूप कौतुक वाटतं. बहि:र्मनात त्यांना माहीत होतं की हा एक fictitious गेम आहे. पण त्यांचं अंतःर्मन या खेळात इतकं एकरुप झालं होतं की त्या या गेमशी पूर्ण समरस होऊन प्रत्यक्षात जगल्या. आम्हीसुद्धा अनुभवत होतो की हे प्रत्यक्षात घडतंय. तसं आम्हीसुद्धा हा गेम आमच्या मनात खेळतच होतो पण निधीजींची भावनिक पातळी ही अतिशय हायेस्ट लेव्हलवरची आहे. आम्ही आयुष्यभर आजचं हे सेशन आणि निधीजींना कधीही विसरणार नाही."
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
सर म्हणाले, "तुम्हाला कल्पना आली असेलच की आपलं आयुष्य जगताना, आपल्या कामाने देशाची सेवा करत असताना आपली priority काय असायला हवी आणि कोणती don'ts eliminate करावयाची."
चार पाच yes sir चे आवाज आल्यावर ते म्हणाले, "मला कल्पना आहे की आपलं दररोजचं दोन तासांचं सेशन शेवटी शेवटी 10/15 मिनिटे कंटाळवाणं होत असतं पण आता साडेपाच वाजले आहेत. अडीच तास झाले तरी आम्ही जागेवर खिळून आहोत. निधीजींनी केलेले केलेलं elimination हेच खरे elimination of don'ts आहे. याचं श्रेय निधीजींना जातं. त्या पूर्ण भावनाधिन होऊन या खेळात समरस झाल्या होत्या. पुन्हा एकदा निधीजींसाठी टाळ्या वाजवून आपण आजचं सेशन इथेच संपवू या."
निधीसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या आणि निधीजींचं अभिनंदन करून आम्ही बाहेर पडलो.
..रमेश नागपुरे, मुलुंड पूर्व,
मुंबई ४०००८१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा