शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1669. गेलेली वेळ

 ऑफिसात बसून मी लॅपटॉप उघडला. 
लॉगिन करणार तितक्यात मोबाईलवर रोहितचा नंबर झळकला. 
"मम्मी, एक वाईट बातमी आहे."रडव्या सूरात त्याने म्हटले. 
एक मिनिट माझ्या काळजात चर्रर्र झाले. काय झाले असणार? आपली लेकरे वयाने किती मोठी झाली तरी ती नेहमीच आपल्याला लहानपणीचीच  आठवतात नाही का?
"काय रे पिल्लू, काय झाले?"
"मम्मी, प्रणव गेला गं " आता त्याचा आवाज थरथरता आला. 
"अगं बाई, कोठला प्रणव रे आणि काय झाले त्याला?"
त्याचे दोन मित्र आहेत प्रणव नावाचे. एक बेंगळुरूचा जो त्याच्याबरोबरोबर शाळेत शिकला दहावीपर्यंत आणि दुसरा जो आर्किटेक्चर पदवीला होता बेळगावला. 
"गदगचा. माझ्या वर्गात होता ना बेळगावला. काल रात्रीत त्याने गळफास लावून जीव दिला गं ".
आता माझे डोळे भरून आले.
प्रणव दोनदा आमच्या घरी बेंगळूरात आला होता. एकदा राहिला सुद्दा.  
पिल्लूच्या वयाचाच. 
अगदी आनंदी प्राणी. नेहमी हसन्मुख आणि  मजाकी मुलगा. 
एक महिन्यापूर्वीच त्याची लग्नपत्रिका मिळाली होती. अगदी नक्षत्रासारखी बायको मिळाली होती.
डिग्रीनंतर त्याने गदगलाच स्वतःचे ऑफिस काढले होते. 
सगळे व्यवस्थित चालले होते. हळूहळू त्याचापण व्यवसायात जम बसू लागला होता.
घरी मोठे कुटुंब होते. त्याचे वडील बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर होते. सगळे एकत्र राहत.
मोठा भाऊ, त्याची बायको, त्यांचे एक बाळ, प्रणवचे आई वडील, एक शिकणारी 
बहीण आणि आता हे दोघे नवदाम्पत्य.
मग  अर्धा तास बोललो दोघे. 
गेले काही महिने हे दोन्ही मित्र संपर्कात नव्हते. पण दोन आठवड्यापासून  प्रणवने रोहितला खूपदा फोन केला. काही मेसेजपण पाठविले.
कामाच्या ताणामुळे रोहितने त्याच्याशी बोलणे टाळले होते. सवडीने फोन करून निवांतपणे त्याच्याशी बोलू असे रोहितला वाटले होते.
खूपदा त्याच्या मेसेजचा सूर होता
-"रोहित, मला तुझ्याशी बोलायचे आहे. 
 मला फोन कर."
 "मित्रा, मला विसरलास काय?   फोन कर."
 "तू माझ्या लग्नालापण आला नाहीस."
 वेळ मिळताच मला फोन कर."
पण आता खूप उशीर झाला होता. 
फोन करायला वेळ काढला तरी बोलायला तो  नव्हता. 
हे सगळे आठवून रोहित स्वतःला खूप दोषी ठरवू लागला. 
"मम्मी, एकदा तरी मी त्याला फोन करून त्याच्याशी बोलायला हवे होते. त्याची काही काळजी असली होती तर मदत करायला हवे होते."
माझ्यातरी आकलनाबाहेर होते सगळे. 
२९ वयाचा  हा तरुण मुलगा आयुष्यात स्थायिक झाला असताना,
नक्षत्रासारखी मनाजोगती वधू मिळाली असताना,
घरदार असताना, भरलेले कुटुंब असताना,
सामाजिक प्रतिष्ठा मिळत असताना असा निर्णय का बरे?
पुढचे दोन दिवस रोहित व्यस्त होता. वर्गमित्रांशी बोलण्यात. 
प्रणवबद्दल माहिती काढण्यात. 
त्या छोट्या गावात त्याचे करियर चांगले झाले नाही म्हणून प्रणव असंतुष्ट होता म्हणे. 
पुढे शिकण्यासाठी  दुसऱ्या देशात जायला बाबानी नकार दिला होता. 
भरल्या घरात प्रणव एकाकी होता. 
बाकीचे सगळे मित्र आयुष्यात आणि व्यवसायात पुढे गेले. आपण तसेच राहिलो. 
मनाविरुद्ध लग्नाची जबाबदारी गळ्यात पडली. 
आपल्याला ह्या छोट्या गावात काम कमी आणि कमाईपण कमी. 
बाकीचे सगळे मित्र खूप व्यस्त झाले. बोलायलापण मित्र मिळेनात. 
रोहितसारख्या चार पांच मित्रांना त्याने गेल्या पंधरवड्यापासून संपर्क केला होता पण कोणीही त्याला वेळ दिला नाही.
मग नैराश्यात हा पराकोटीचा निर्णय घेतला त्याने. 
ऐकून मन सुन्न झाले. 
इतक्या तरुण वयात अशी का बुद्धी यावी?
आईवडिलांनी आता कसे दुःखाने जीवन काढायचे?
त्या नववधूचे आयुष्य आता कसे?
का मित्रांनासुद्धा वेळ नाहीय एकमेकांचे सुखदुःख विचारायला?
का प्रणवने आपल्या नैराश्याबद्दल  कोणाशी चर्चा केली नाही?
का एखादी वैद्यकीय किँवा नैतिक आणि मानसिक मदत घेतली नाही?
अशी कशी काय वेळ येतेय आपल्या लेकरांवरती की त्यांना आई बाबासुद्दा परके वाटतात?
थोडे पडले, झडले किंवा खरचटले की पूर्ण घर डोक्यावर घेऊन नाचणारी ही आपली बाळे कधी अंतर्मुख झाली?
एवढे मोठे नैराश्य त्यांना आपल्या पालकांना सांगावेसे वाटत नाही? 
एक लहान बक्षीस किँवा वर्गात गुणवत्ता हुकली तर आपल्या मांडीवर हुंदके देत रडणारी आपली मुले कधी एवढी दूर गेली ? ह्यासाठी कोण जबाबदार?
मलाच एकच उमगले ह्या घटनेमुळे. 
आपल्या आयुष्यातील एकाद्या चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीचे असलेले स्थान. 
स्वतःच्या घराच्या लोकांना न सांगता येणाऱ्या काही गोष्टींचे ते हक्काचे 'मैत्रीचे अकाउंट';
सगळी गुपिते, आशा निराशा आणि स्वप्नांचे 'सेफ़टी लॉकर'. 
त्यांची असल्या काळवेळेत मिळणारी असलेली अमूल्य मदत. 
मित्राला जीवनदान देण्यात त्यांचे योगदान.
आयुष्याच्या शेवटपर्यंत पालक हे पालकच असतात. मुले ही मुलेच असतात. 
त्यांना आपल्या मायेच्या  पदराखाली घेणे कधीच बंद करू नका. 
निरोगी आणि पोषक मैत्री करण्यास त्यांना स्वातंत्र्य द्या. 
मग ती व्यक्ती त्याचा मित्र असो व मैत्रीण. 
प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन करणे विसरू नका. 
निकोप आणि निर्भेळ घरगुती वातावरणात वाढलेली मुले मानसिक आणि भावनिकरित्या खूप सक्षम आणि आत्मविश्वासाने सशक्त असतात हे समजणे खूप महत्वाचे आहे.
आणि  नेहमी लक्षात ठेवा- गेलेली वेळ' कधीच परत येत नाही.    

**संध्या राजन*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...