हॅलो बाबा
हं बाळा काय रे? बरा आहेस ना? आत्ता अचानक फोन केलास
मी बरा आहे हो. ऐका ना, मला कॅंपस इंटरव्ह्यूमध्ये एका कंपनीचा कॉल आलाय. मी इथे चौकशी केली. कंपनी चांगली आहे असे माझे सिनियर आणि सर म्हणत होते. पगार ही बरा आहे. काय करू? त्यांना उद्या पर्यंत उत्तर द्यायचे आहे.
अरे एवढी घाई कशाला करताहेत ते?
बाबा, त्यांच्याकडे दोनच पोस्ट आहेत. माझा मित्र पण आहे. तो अॉलरेडी हो म्हणालाय. मी हो म्हणालो तर ते कंपनीवाले आणखी इंटरव्ह्यू घेणार नाहीत.
बर बर एक काम कर. मला कंपनीचे डिटेल्स आणि तुझा पे स्केल वगैरे माहिती पाठव. मी इथे चौकशी करतो आणि तासाभरात कळवतो.
हो बाबा. मी पाठवतो माहिती.
ठेऊ फोन?
अरे या नादात तुझे अभिनंदन करायचे राहून गेले. बाळा तुझे मनापासुन अभिनंदन ! असाच यशस्वी हो!
थॅंक्यू बाबा. बाबा तुमच्यामुळे तर मी इंजिनिअर झालो. माझे यश फक्त तुमच्यामुळेच तर मिळाले आहे.
असू दे रे. तू पण मन लावून अभ्यास केलास. बर तू माहिती पाठव. मी चौकशी करून परत फोन करतो.
बर बाबा, बाय बाबा.
आमचा फोन झाल्यावर लगेचच मनिषने माहिती पाठवली. मी ही माझ्यापरीने चौकशी केली. मनिष च्या आईलाही फोन केला. तिला त्याचा फोन आधीच आला होता. ती पण म्हणाली की मला योग्य वाटत असेल तर मनिष ने होकार द्यावा नोकरीला. मनिषला मिळणारा पे स्केल पाहून तर मी थक्क झालो. एवढी वर्षे नोकरी करून मला जेवढा पगार मिळतो आहे जवळपास तेवढाच त्याला सहा महिन्याच्या ट्रेनिंगनंतर मिळणार होता. मी त्याला फोन करून ग्रीन सिग्नल दिला. त्याचे परत अभिनंदन केले. लवकर घरी यायला बजावले. मी ही आज लवकरच निघालो. घरी जाताना पेढ्यांचा बॉक्स आणि मनिषच्या आवडीचे पॅटिस घेऊन घरी आलो. घरी हिने देखील त्याला आवडतो म्हणून गोडाचा शिरा केला होता. मनिष घरी आला तो हवेत तरंगतच
"आई आलो ग!"
आल्या आल्या तो आईच्या गळ्यात पडला. तिच्या आणि माझ्याही डोळ्यात आनंद मावत नव्हता. हातपाय धुवून त्याने देवासमोर पेढा ठेवला आणि आम्ही पण एकमेकांना पेढा भरवला. हिच्या माहेरी आणि माझ्या आईबाबांनाही लगेचच आनंदाची बातमी कळवली. फायनल इयरचा रिझल्ट लागला की एका आठवड्यात अॉफिस जॉईन करायचे होते. यथावकाश मनिष इंजिनियर झाला. चांगले डिस्टिंक्शन मिळाले. त्याला नोकरी लागली तेव्हा मी त्याला एक सल्ला दिला होता.
"हे बघ आता तू कमवायला लागणार आहेस. स्वतःचे पैसे मिळताहेत म्हणून वाट्टेल तसे पैसे खर्च करू नकोस. पैसे नीट गुंतव. कोणा सीए चा सल्ला घे. नीट बचत कर. मी म्हणणार नाही की मजा करू नकोस पण वायफळ खर्चही करू नकोस. बघ पटतय का ते."
"बाबा याबाबतीत मी तुमचं ऐकेन पण एका वर्षानंतर ! पहिले एक वर्ष मी मला हवे तसे पैसे खर्च करणार आहे. मग मात्र तुम्ही म्हणाल तशी मी बचतही करीन आणि वायफळ खर्च ही करणार नाही."
ही आमचे बोलणे ऐकतच होती. ती ही म्हणाली. "अहो, करू दे त्याला मनाप्रमाणे. इतकी वर्षे कधी कसला हट्ट केला नाही की इतर मुलांसारखा आपल्याला कधीही खर्चात पाडलेले नाही. कसलाही क्लास न लावता. त्याने हे यश मिळवलेन ना? मग वागू दे जरा मनासारखे."
"बर बाई तुम्ही मायलेक काय माझे ऐकणार आहात ! करा तुमच्या मनासारखे !"
बघता बघता मनीष कंपनी जॉईन झाला. पहिले सहा महिने ट्रेनिंग होते. सुरुवातीला निम्मा पगार मिळणार होता. तरीही नाही म्हटले तरी चाळीस हजार त्याला मिळणार होते. पहिल्या महिन्याच्या पगारात त्याने हिला आणि त्याच्या दोन्ही आज्यांना साडी आणली. मग काय तिघी एकदम खुश. आजुबाजूला आणि नातेवाईकांना फोन करुन तिघींनी मिरवून झाले. पुढच्या एक दोन महिन्यात त्याने स्वतःसाठी काही कपडे घड्याळ घेतले. माझ्यासाठी मात्र त्याने काहीच आणले नव्हते. हिने एकदोनदा छेडल्यावर, "मी बाबांना काय देणार ! त्यांना ते आवडेल का?" अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो मोकळा झाला. मी कितीही चेहऱ्यावर दाखवले नाही तरी मनात थोडा नाराज झालो होतो. मी छानछौकी नाही करत पण म्हणून एखादा शर्ट तरी तो नक्कीच आणू शकला असता. काहीशा नाराजीनेच मी स्कूटरला किक् मारली आणि कंपनीत निघालो. आज नेमके खूप ट्रॅफिक होते. ऊनही चांगलेच जाणवत होते होते. कसाबसा घामाघूम होत मी आॉफीसला पोचलो.आज माझे कामात लक्ष लागत नव्हते.
आमच्या लग्नानंतरचे दिवस आठवत होते. मी घरातला मोठा मुलगा नव्हतो. पण नेहमी मोठ्यानेच काय सगळ्यांचा मक्ता घेतलाय का? असे म्हणून दादाने घरातून अंग काढून घेतले. धाकट्या दोघी तर खूपच लहान होत्या. मी नोकरीला लागल्यावर दादा वैनीने वेगळे बिह्राड केले. चारपाच वर्षात माझेही लग्न झाले. त्यानंतर वर्षभरात बाबा रिटायर्ड झाले. मग बहिणींची शिक्षणं त्यांची लग्नं करून देण्यात माझ्याकडची पुंजी शुन्यावर आली उलट थोडे कर्जच काढावे लागले. त्यातच मनिष जन्माला आला. मनिष थोडा मोठा होत नाही तर बहिणींची बाळंतपण त्यांचे सणवार सगळे यथास्थित करायला हवेच होते. या सगळ्यात मनिषला काही कमी पडू नये यासाठी आम्ही दोघेही सतत धडपडत होतो. त्याला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. घराला हातभार लावण्यासाठी हिनेही ट्यूशन घ्यायला सुरुवात केली. कशीबशी बचत करून लग्नानंतर पंधरा वर्षानंतर आम्ही जरा मोठे घर घेतले. आईबाबांनी जुन्याच घरात राहायचे ठरवले. पण आम्हाला मात्र मोठ्या हौसेने नवीन संसार थाटून दिला. हळूहळू मनिषही मोठा होत होता. त्याचे शिक्षण, इतर छंद, घराचे हप्ते यातच पगार कसा कापरासारखा उडून जायचा. मनिषही हुशार होता. उत्तम मार्क मिळवून त्याने चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली.मन लावून अभ्यास केला. अतिशय गुणी आणि मनमिळाऊ आहे मनिष. मग तो असा कसा मला विसरला? मला काही सुचतच नव्हते. माझ्या मित्राजवळ मी मन मोकळे केले. तर तो म्हणाला, "अरे ही आजकालची मुलं, तुला सांगतो एकदा का नोकरीला लागली की शिंग फुटतात यांना आईबाबांना विसरूनच जातात आणि त्यात जर एखादी छोकरी आली त्यांच्या आयुष्यात तर मग काय बघायलाच नको! असे प्रसंग आता आपल्या आयुष्यात येत राहाणार तू मन घट्ट कर."
आपला मनिष पण असाच असेल? आपल्याला विसरेल? मी अगदी भांबावून गेलो होतो. म्हणतात ना काळ हे सगळ्या समस्यांवरचा रामबाण उपाय आहे. तसेच माझ्या बाबतीत झाले. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी माझी सलही बोथट होऊ लागली. मनिषला नोकरीला लागून बरोबर दहा महिने झाले. आज कसलीशी सार्वजनिक सुट्टी होती. मी घरीच एक कादंबरी वाचत आराम करत होतो. मनिष तयार होऊन निघाला. मी त्याला हटकले,
"काय रे तुला पण सुट्टटी आहे ना मग आत्ता कुठे निघालास?"
"काही नाही जरा मित्राकडे जाऊन येतो. आम्ही बऱ्याच दिवसात भेटलो नाही ना. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत येतो परत." असे म्हणत तो घराबाहेर पडलाही.
मला परत मित्राची वाक्य आठवत होती याला एखादी खास मैत्रिण असेल का? हा तिलाच भेटायला गेला असावा. मी स्वैपाकघरात जाऊन हिच्या मागे भुणभुण सुरु केली." त्याच्यावर लक्ष आहे का तुझं? कुठे जातो, कोणाकडे जातो तुला तरी माहीत असतं का? "
"अहो, लक्ष ठेवायला आता काय तो लहान आहे का? चांगला मोठा झालाय. तुमचं आपलं काहीतरीच. जा बघू ते पुस्तक वाचा. उगीच नसते विचार करत बसू नका." ही तर माझ्यावरच रागावली.
मी परत वाचायला लागलो. इतक्यात मनिषच्या मित्राचा फोन आला," हॅलो काका, मी प्रथमेश बोलतोय, मी एक पत्ता तुम्हाला मेसेज करतोय त्या पत्त्यावर मनिषने तुम्हाला दोघांना लवकरात लवकर बोलावलय. या हं लवकर आम्ही वाट बघतोय.' इतकेच बोलून त्याने पटकन फोनच ठेऊन दिला. त्याला परत फोन लावला तर एंगेज येत होता आणि मनिषचा तर फोन स्विच ऑफ होता. आम्ही दोघेही अक्षरशः हादरून गेलो होतो. त्यातल्या त्यात एक गोष्ट दिलासा देणारी होती की प्रथमेशने कोणत्यातरी शॉपिंग कॉंप्लेक्सच्या जवळचा पत्ता दिला होता. एखाद्या दवाखान्याच्या किंवा हॉस्पिटलचा नाही. मनिषने का बोलावले असेल आणि त्याने का फोन केला नाही मला काही समजतच नव्हते. आता तर प्रथमेशचा फोन पण स्विच्ड ऑफ होता. हिला हातातला स्वैपाक तसाच अर्धवट ठेवून तयार व्हायला सांगितले. मी घरात होते तेवढे सगळे पैसे बरोबर घेतले. खिशातले क्रेडीट कार्ड चाचपून पाहिल. देवाचा धावा करीत स्कूटरला किक मारली आणि प्रथमेशने सांगितलेल्या पत्त्यावर पोचलो. तिथे तो आमची वाटच पाहात होता.
अरे प्रथमेश मनिष कुठेय? त्याला काही झाल नाहिये ना? मला काय झालय ते सांग. "मी प्रथमेशवर प्रश्नांचा भडिमार केला.
" हो हो काका सांगतो. ही स्कूटर पार्क करा या बाजूला. तो बघा मनिष रस्त्यापलिकडे तुमची वाटच पाहातोय".
समोरच्या बाजूला मनिष हसतहसत आम्हाला यायला खुणावत होता. त्याला सुखरूप पाहिल्यावर आमच्या दोघांच्या जीवात जीव आला.
आम्ही रस्ता पार करून त्याच्या जवळ गेलो. त्याने माझ्या हातात एक चावी दिली आणि जवळच रिबीनींनी सजवलेल्या एका नव्या कोऱ्या आय टेन गाडीपाशी आम्हाला घेऊन गेला. भर रस्त्यात मला नमस्कार करून म्हणाला, "बाबा हे माझ्या पगारातून तुमच्यासाठी आणलेलं गिफ्ट, तुम्हाला वाटले असेल ना की याने सगळ्यांना काहीना काही आणले आपल्या पगारातून मग मलाच का नाही. बाबा तुमची गिफ्ट आणायला एक पगार पुरला नसता ना म्हणून थांबलो. रागावू नका, तुम्हाला न विचारताच एवढी मोठी खरेदी केली. तुम्ही रोज स्कूटरने अॉफिसला जाता ना आता उद्यापासून मस्त गाडीने जा. ऊन पण लागायला नको आणि पाठ पण दुखायला नको. आणि हो मी एक महिन्याच्या ड्रायविंग क्लासचे पैसे पण भरले आहेत."
अभिमानाने आणि आनंदाने माझा ऊर भरुन आला होता. समोरचा रस्ता, बाजूची गाडी सगळे सगळे धूसर दिसत होते.फक्त मनिष स्पष्ट दिसत होता. तो माझ्यापेक्षा इंचभर जास्तच ऊंच आहे हे मान ताठ करून त्याच्याकडे बघताना मला पुन्हा एकदा जाणवले.
डॉ. समिधा गांधी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा