अनुष्काला दिल्लीला नोकरीसाठी काॅल आला. सुनिता चिंतेत पडली ही एकटी कशी रहाणार. हल्ली काय काय येत कानावर. मधुकरने तिला उडवून लावले,
"हे बघ ती एकटी राहिली तर जरा जबाबदारी कळेल.इथ कशाला हात लावत नाही ती...!"
"अहो, मला मदत नको आहे का पण संध्याकाळी मी दमलेय, रविवारी माझा विश्रांतीचा दिवस, संध्याकाळी मित्र मैत्रिणी कधी सांगू तिला काम?"
"कोविडच्या काळात तेवढी केली मदत !"
अनुष्काला छान वस्तीत फ्लॅट मिळाला, मधुकर तिची व्यवस्था लावून आले.पण सुनिताला चैन पडत नव्हती. तिने अनुष्काजवळ पंधरा दिवस राहून यायचं ठरवलं अन् ती दिल्लीत दाखल झाली. घरात आली तर तिने दिलेले आवश्यक साहित्य, भांडी अनुष्काने नुसतीच ठेवली होती. घरात फक्त चहा शिवाय काही होत असेल असं वाटत नव्हतं. आल्यावर रात्री जेवायला दोघी बाहेर गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनिता म्हणाली 'अग आज तुला पोळी, भाजी करुन देऊ का? भाजी आणून देशील का? सोसायटीच्या खाली गाडी दिसली होती काल येताना."
"चिल ममा. आता थोडी विश्रांती घे...आता आपल्याला स्विगीवरून इडली चटणी मागवली आहे."
"अनु, दुपारच्या जेवणाचे?"
तिला पुढचं बोलू न देता अनु म्हणाली,
"ममा, बरोबर दिड वाजता गरमागरम जेवण हजर होईल. तू रेस्ट कर. मला ऑफिसमध्ये जेवण मिळते."
दुपारी झोमॅटो,स्विगी अशाच कुठून तरी जेवण आलं. बसून बसून,टी.व्ही. बघून कंटाळलेली सुनिता संध्याकाळी खाली उतरली. खाली लॉनवर बरेच लोक फिरत होते. हिने बायकांच्या घोळक्यात प्रवेश केला, आवर्जून सर्वांशी ओळख करून घेतली. बहुतेक जण आपल्या मुलांजवळ रहायला आले होते. एक तास गप्पा मारून ती बाहेरच फुटपाथवर असलेल्या भाजीवाल्याकडे गेली. घासाघीस करून दोनचार भाज्या, काही आवश्यक स्वयंपाकाचे सामान घेऊन आली. स्वयंपाक घरातील ऑनलाईन खरेदीतील सर्व प्लॅस्टिक कंटेनर एका पिशवीत घालून कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवले. रात्री साठी डाळ खिचडी पापड असा बेत केला.
"ममा, काय हे अग तुला हवं ते ऑनलाइन मिळत कशाला गेली खाली,सब्जीडाॅटकाॅमवरुन निवडलेली भाजी घरी येते. गरज नाही ग या अडाणी लोकांची मचमच ऐकायची."
सुनिता फक्त हसली,आठ दिवसांत भाजीवाला गोविंद त्याची बायको रुखमा यांच्याशी गट्टी झाली होती. मराठी गोविंद लहानपणीच वडिलांबरोबर दिल्लीत आलेला पण मराठीला विसरला नव्हता. कधी सुनिता खाली गेली नाही तर रुखमा काही ताजी भाजी आली तर वरपर्यंत आणून देई. शेजारच्या लेलेकाकू एकट्याच रहात. दुपारी सुनिताकडे चक्कर मारत. त्यांची मुलगी दोन सोसायटी सोडून राही. काकूंना मेसचा डबा येई. पण सुनिता गरम गरम काही केलं की नेऊन देई. अनुष्का रविवारी मात्र जेवण बाहेरूनच मागवत असे. किराणा माल, औषधे ऑनलाईन येत. एकूण काय सुनिता या घरी चांगली रमली होती. ऑनलाईन खरेदी मात्र ती टाळत असे. एक दिवस गोविंद कडे भाजी आणायला ती निघाली, अनुष्का घरातूनच काम करत होती.
"ममा, अग मागवते ना कशाला उन्हात निघालीस."
असं म्हणून अनु उठली आणि नुकत्याच पुसलेल्या फरशीवरुन जोरात घसरून पडली. टीपाॅयवर डोके जोराने आपटले. अन् बेशुद्ध पडली.
ते अनुच्या कपाळातून वाहणारे रक्त पाहून सुनिता घाबरली. लेले काकूंना हाका मारायला लागली. काकू आल्या. सुनिताला धीर देत त्यांनी ॲब्युलन्सला फोन केला. अनुला कपाळाला पट्टी बांधली. गोविंदाला बोलावले. ॲब्युलन्स आल्यावर गोविंद,रखमा साऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले. सुनिता घाबरून गेली होती, मधुकर यायला निघाले होते. लेलेकाकू आणि गोविंदाने काम वाटून घेतली होती. अनु दुसऱ्या दिवशी शुध्दीवर आली. लेलेकाकूंची सुमती सकाळी ऑफिसला जाता जाता डबा देऊन जाई.रात्री गोविंद डबा घेऊन येत असे. सुनिताच्या बोलक्या स्वभावामुळे ओळख झालेल्या सिंगभाभी,शर्माभाभी म दुपारचे खाणे आणतं. आठ दिवसांनी अनु घरी आली. मधुकर पुण्याला जायला निघाले,
"बाबा,रहा न आईला काय इतक्यात येता यायचं नाही."
बोलता बोलता अनुने रडायला सुरुवात केली. सुनिता घाबरली,
"अनु, बाळा दुखतंय का ग ?"
"नाही ममा सॉरी ग तु सतत सगळ्यांच्यात मिसळते. गोविंदकाका आणि रखमा मावशीला, आजी, सिंग, शर्मा आन्टी या साऱ्यांना घरी बोलावते, तू त्यांच्या कडे जाते म्हणून मी तुझ्यावर सतत चिडचिड करत होते. तू हसून शांत राहिलीस."
"अनु बाळा तूला कळलं ना ऑनलाईन सारं मिळत पण प्रेम नाही. तू रडू नको राजा."
"अरे,अनु बिटीया तुम्हें खीर ले के आयी हूं बेटा खा ले, सुनिता भाईसाबको भी खिलाना .पुत्तर रोना नही. हां ये मेरे वाली खीर ऑनलाईन नही मिलती हां."
अनु क्या आन्टी आप भी म्हणत लाजली अन् सारं घर हास्यात बुडाले.
सुनिता निवांत झाली होती आता ती पुण्याला परत गेली की अनु एकटी असणार नाही याची तिला खात्री होती.
©® स्वप्नजा घाटगे
कोल्हापूर
8888033332
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा