बाप...लेकरांच्या आनंदावरच आपलं जीवन जगतो
बाप... हा शब्द जरी छोटा असला तरी त्यामागे एक अथांग समुद्र दडलेला असतो. बाप म्हणजे फक्त पैसा कमावणारा माणूस नाही, तर घराचा आधारस्तंभ, कणा आणि लेकरांसाठी जगणारा खरा देवदूत असतो. त्याचं जगणं, त्याचा श्वास, त्याचे प्रत्येक कष्ट हे सगळं केवळ लेकरांच्या आनंदासाठीच असतं.
बाप स्वतः कितीही थकला, दमला, दुःखात बुडाला तरी लेकरं हसताना दिसली की त्याला सगळं विसरायला होतं. दिवसभर अंगाची लक्तरं होत काम करूनही संध्याकाळी घरी आल्यावर दारात धावत येणाऱ्या लेकरांच्या हास्यात त्याला खरी शक्ती मिळते. लेकरांच्या चेहऱ्यावरचं समाधान त्याच्यासाठी स्वर्गाहूनही मोठं सुख असतं.
त्याग हा त्याचा श्वासच जणू. स्वतःसाठी नवीन कपडे न घेता लेकरांना शाळेत चांगली बॅग मिळावी याची काळजी करणारा, स्वतःच्या इच्छा दडपून लेकरांच्या छोट्या हौसेसाठी पैसे जमवणारा, स्वतःला उपाशी ठेवून लेकरांच्या ताटात भर घालणारा हा बापच असतो.
तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. कारण त्याचं खऱ्या अर्थानं समाधान फक्त एकच “माझी लेकरं आनंदी असली पाहिजेत.”
आईच्या मायेप्रमाणेच बापाचं प्रेमही खोल आहे, पण ते शब्दांत फारसं व्यक्त होत नाही. तो गोड बोलत नाही, गोंजारत नाही, पण रात्री उशिरापर्यंत बसून लेकरांचा अभ्यास बघणं, त्यांच्या मागे उभं राहणं, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणं हेच त्याचं न बोललेलं प्रेम आहे. लेकरांचा आनंद म्हणजेच त्याच्या प्रेमाचं खरं रूप आहे.
संघर्ष हा बापाचा सहचरच जणू. समाजात, आयुष्यात, पैशात, परिस्थितीत तो प्रत्येक वेळी लढतो. पण या संघर्षामागे त्याचं स्वतःचं स्वप्न नसतं. त्याचं एकमेव स्वप्न असतं, “माझ्या लेकरांनी माझ्यापेक्षा चांगलं जगावं.” यासाठी तो कितीही अडचणी सहन करतो. अंगावरच्या जखमा लपवतो, भुकेची वेदना गिळतो, झोप हरवतो, आरोग्य गमावतो…
पण जेव्हा लेकरं यशस्वी होतात तेव्हा त्याच्या डोळ्यांतून ओघळलेले आनंदाश्रू सांगतात “हेच माझं खरं यश आहे.”
बाप स्वतःसाठी काही मागतच नाही. त्याला मोठं घर, महागडी गाडी, परदेश सफर नको असते. त्याचं खरं सुख म्हणजे लेकरांचा आनंद. लेकरांना नवीन कपडे घातलेले पाहून तो स्वतः सजल्यासारखा आनंदी होतो. लेकरांच्या पहिल्या यशाचा आनंद त्याला स्वतःच्या हजार यशापेक्षा मोठा वाटतो. खरं तर बापाचं आयुष्य एकच गोष्ट सांगतं
“मी आहे म्हणून लेकरं आनंदी आहेत...आणि लेकरं आनंदी आहेत म्हणून माझं आयुष्य सफल आहे.”
आपण आईचं मोल नेहमी ओळखतो, तिचं प्रेम नेहमी बोलतो, पण बापाचं योगदान मात्र अनेकदा शांतपणे विसरतो. कारण तो शब्दांनी नाही तर कृतीतून प्रेम दाखवतो. त्याचे त्याग, संघर्ष, आयुष्यभराचं झिजणं हे सगळं न बोलताच आपल्या जीवनाचा पाया घडवतं.म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं
“बाप… लेकरांच्या आनंदावरच आपलं जीवन जगतो.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा