बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

2270. “मला स्पेस हवी आहे” – पिढ्यांचा संवाद

 आजकाल तरुण पिढीच्या तोंडी वारंवार ऐकू येणारं वाक्य म्हणजे 
“मला स्पेस हवी आहे.”
पण ही स्पेस म्हणजे नेमकं काय?
अनिर्बंध स्वातंत्र्य?
अमर्याद मोबाईल/OTT टाइम?
अनकंट्रोल्ड नातेसंबंध, दारू, नशा?
की फक्त स्वतःच्या निर्णयांनी जगण्याची इच्छा?
हा प्रश्न जुन्या पिढीला सतावतो.

जुन्या पिढीचं आयुष्य
आम्ही आमच्या काळात किती कष्ट केले, गरिबीत राहिलो, अपमान सहन केले, फाटकी कपडे घातले, सायकलवर प्रवास केला – हे सांगून तक्रार करायची माझी इच्छा नाही.
कारण आजची पिढी तसं ऐकून घ्यायलाच तयार नसते. उलट म्हणते 
“तुम्हाला मिळालं नाही, त्यात आमचा दोष काय?”
“तुम्ही आमच्यावर जळता म्हणून बोलता.”

पण खरं सांगायचं तर, आमच्या पिढीतही मजा होती, खोड्या होत्या, गमती होत्या. फरक एवढाच मर्यादा होत्या.
मर्यादा ओलांडल्या तरी जबाबदारी स्वतःवर घेतली. आई-वडिलांना किंवा नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही.
कदाचित हाच आमच्या पिढीचा “स्पेस” होता.
आजची पिढी आणि पालकांचं स्थान
आज आई-वडील मुलांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी सामील असतात.
सकाळी उठवणं, खाणं-पिणं, शाळा, कॉलेज, अभ्यास, स्पर्धा, करिअर… सगळं.
कदाचित या अति सहभागामुळेच मुलांना स्वतःची “स्पेस हरवल्यासारखी” वाटू लागते.
जेव्हा ते मोठे होतात, तेव्हा स्वतःचे निर्णय घ्यायची त्यांची हौस असते.
पण आयुष्यभर निर्णय घेऊ दिलेले नसल्यामुळे त्यांची निर्णयक्षमता कमी राहते.
अनुभव कमी असल्यामुळे निर्णय चुकतात.
परिणामी त्यांचा इमोशनल क्वॉशंट कमी राहतो.
आणि मग राग, नाराजी, अस्वस्थता – हे सगळं आईवडिलांवर किंवा जवळच्या मित्रांवर ओसंडून पडतं.
इथेच दोन पिढ्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो.
उपाय आणि अपेक्षा
मला वाटतं – स्पेस मागणं चुकीचं नाही.
पण तिचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे.
स्पेस म्हणजे –
स्वतःला शोधण्याची जागा,
स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य,
आणि त्या निर्णयांची जबाबदारी स्वतः घेण्याची ताकद.
स्पेस म्हणजे बेजबाबदार स्वातंत्र्य नाही.
ती म्हणजे जबाबदारीसह जगण्याची संधी आहे.
जुन्या पिढीची अपेक्षा फार मोठी नाही. एवढीच विनंती -
तुमच्या पुढच्या पिढीचं पोट भरलं, आयुष्य शांत झालं, एवढं तरी मागे ठेवा.
कारण आजचा पैसा आयुष्यभर पुरेलच असं नाही.
शेवटी
स्पेस ही संकल्पना नातं तोडणारी नसावी.
ती नातं अधिक मजबूत करणारी ठरावी.
जर हा अर्थ दोन्ही पिढ्यांनी समजून घेतला –
तर पिढ्यांमधला संघर्ष नाहीसा होईल, जो आज विनाकारण निर्माण झाला आहे
आणि नात्यांमध्ये खरी शांतता स्वास्थ्य निर्माण होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...