कविता ताई लग्न करून कुलकर्ण्यांचा घरात आल्या तेव्हा जेमतेम बारावी शिकलेल्या होत्या. सासरे एका कॉलेज मध्ये प्रोफेसर होते. लग्न जूळवतांना त्यांनी कविताला एक अट घातली होती. पुढे शिकावे लागेल तरच हे लग्न होऊ शकते अन्यथा नाही. लग्नाची घाई यासाठी की माझी आई, श्रीरंगची आजी हिला नातसून बघायची आहे. एकुलता एक लाडका नातू त्यामुळे खूप कौतुक तिला नाताचे आणि होणाऱ्या नात सूनेचे. सध्या ती खूप आजारी आहे. किती दिवस जगेल काही भरवसा नाही? त्यामुळे लग्न लवकरात लवकर करायचे आहे. सून म्हणून तू आम्हाला पसंत आहे. बायको म्हणून श्रीरंगला देखील तू पसंत आहे.
तुला श्रीरंग नवरा म्हणून कसा वाटला ते सांग? शिवाय तुला पुढे शिकायचे आहे. घरात बसून चूल आणि मूल इतके तुझे विश्व नसणार. त्यामुळे त्यावर सुध्दा विचार कर आणि सांग. घाई नाही. चार दिवस वेळ घे हवे तर!
बाबा, इतके स्पष्ट आणि उच्च विचार ते सुध्दा या काळात. माझ्या सारखी भाग्यवान मीच. माझा या लग्नाला होकार आहे.
"काही शंका?"
नाही बाबा !
"रंग बघितला का?"
नाही समजले बाबा!
श्रीरंग चे बाबा श्रीरंग कडे इशारा करून म्हणाले, "अग रंग बघितला का?"
कविताने चमकून श्रीरंगच्या बाबांकडे पाहिले.
काय उत्तर द्यावे गोंधळून गेली होती.
"हो पाहिला!"
"काय पाहिला?"
"रंग?"
कोणाचा?
तिच्या तोंडून निघून गेले श्रीरंग चा!
लाजली!
अच्छा !
काय दिसले?
बाबा, पुरुषाचे रंग नाही तर गुण बघायचे असतात.
अरे वा !
हुशार आहेस!
कविता उठून पाया पडायला गेली.
श्रीरंगच्या बाबांनी शगुनाचे १०० रुपये तिच्या हातात ठेवले.
हे लग्न पक्के ना!
तिने मानेने होकार दिला.
काय ग?
या जमान्यात मामंजी, सासूबाई किंवा आत्याबाई बोलायची पद्धत आहे. तु डायरेक्ट आई, बाबा वर कशी काय आलीस?
मुलगी बघायला आल्यावर लेकीच्या नात्याने इतके स्पष्ट आणि तिचे मत पण विचारायची पद्धत या जमान्यात नाही. तरीही तुम्ही मला विचारलेच ना!
स्मार्ट आहेस!
माझ्या पारखण्यात १००% मार्क बर का?
धन्यवाद बाबा!
मी तुमच्या अपेक्षेत १००% उतरण्याचा नक्की प्रयत्न करेन.
त्या नंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी दोन वेळा श्रीरंग ला त्यांनी भेटायला पाठवले. त्या काळी हे सगळे नवीनच होते.
श्रीरंग मुळातच लाजाळू. मुलगी परवडली, पण हा मुलगा नाही. कविताच त्याला बोलत करायची. श्रीरंग जेवढ्याच तेव्हढे उत्तर देत होता. पण त्याच्यात एक साधेपणा होता. तोच मनाला खूप भावला.
लग्न ठरले, साखरपुडा झाला, दोन महिन्याने मे मध्ये लग्न झाले. नातसून बघून आजी जाम खुश झाल्या.तब्येतीत पण सुधार होत होता.
म्हणायच्या "इतक्या लवकर आता ही म्हातारी जायची नाही." "तुझ्याच पोटी जन्माला येईन."
"हो आजी" म्हणून कविता आजीला मिठी मारायची.
सुट्टीचे दिवस संपले.
जून मध्ये लगेच कविताची एडमिशन कॉमर्सला करण्यात आली.
बघता बघता बी.कॉम झाले.
जोडीला मराठी , इंग्लिश टायपिंग क्लास लावला होता.
बाबांचे एकच म्हणणे, आधी नोकरीला लाग, त्यानंतर बाळाचा विचार कर.
त्या काळी प्रायव्हेट कंपनी इतक्या उदयाला आल्या नव्हत्या. पेपरला जाहिरात यायच्या. मग फॉर्म भरून लेखी परीक्षा. पास झालो तर तोंडी.
दोन, तीन ठिकाणी फॉर्म भरले. परीक्षा दिल्या. एकात पास झाले. तोंडी परीक्षेची बरीच तयारी श्रीरंगच्या बाबांनी करून घेतली.
श्रीरंग सुध्दा थोडाफार अभ्यास करून घेत होते.
काय आश्चर्य ? पास झाले. पंधरा दिवसात जॉईन व्हायचे होते. तेव्हा कविता साड्या नेसायची. ड्रेस क्वचितच कोणी घालत होते.
कविता तुला आता रोज लोकल ने जा ये करावी लागेल नाही का ?
हो बाबा !
करेन मी!
साडी नेसून इतक्या गर्दीत जमणार आहे का तुला ?
जमेल बाबा!
सवयीने सगळ होते!
श्रीरंग!
उद्या सूनबाई सोबत मार्केट मध्ये जा आणि चांगले आठ , दहा ड्रेस घेऊन या!
आई म्हणाल्या अहो लोक काय म्हणतील?
आधीच आपण तिला कॉलेज मध्ये घातले तर सगळे नातेवाईक नाव ठेवत आहे.
ड्रेस घातले तर नाही नाही ते बोलतील. तुम्हा पुरुषांना कोणी बोलत नाही. सगळे मलाच टोमणे मारतात.
बाबा, आई बरोबर बोलतात.
नको मला ड्रेस, नेसेन मी साडी. कित्येक बायका साडीच नेसतात.
अजिबात नाही!
उद्या ड्रेस घेऊन ये!
कोणाला काय उत्तर द्यायचे मी बघतो.
अश्या प्रकार ड्रेस चा श्री गणेशा झाला.
पहिल्या दिवशी ड्रेस घालून तयार झाले. श्रीरंग भान हरपून बघत होते.
किती सुंदर दिसतेस?
ड्रेस मध्ये तर खूप लहान दिसतेस.
काय बघून माझ्या सोबत लग्न केले ग???
खर सांगु !
अगदी खर!
तुमचा स्वभाव !
किती प्रेमळ आहात हो ! इतकं प्रेम करणारा नवरा मिळायला खरच भाग्य लागते. इथे तर प्रेमाची खाण आहे. लग्न झाल्या पासून माझे शिक्षण चालू, त्यामुळे अभ्यास, क्लास. घराकडे लक्ष द्यायला वेळच नसायचा . पण आई, त्यांनी कधीच कुरबुर केली नाही. उलट परीक्षेच्या दिवसात अभ्यास करते म्हणून यायते ताट वाढून मिळायचे. रूम मध्ये चहा. मी सासरी आले असे वाटलेच नाही. बाबांनी मी शिकावी म्हणून केलेली धडपड. आणि तुम्ही दिलेली साथ ! कित्येक वेळा मी अभ्यास करत असायचे. तुम्ही म्हणायचे अग आटोप तुझा अभ्यास, झोपू या. माझी वाट बघत झोपून जायचे. नवीनच लग्न झालेल्या नवऱ्याच्या त्याच्या बायको कडून काही अपेक्षा असतात अभ्यास करतांना मी विसरून जायचे. तुम्ही मात्र कधी त्या बद्दल चकार शब्द बोलले नाहीत. बायकोला असे प्रोत्साहन देणारे खूप कमी असतात. हे पाहिले मी तुमच्यात.
अहो बोलता बोलता किती उशिर झाला?
आज पहिला दिवस, आईंना बोलले मी आज डबा नाही नेत.
उद्या पासून जरा लवकर उठून करेन.
ड्रेस घालून किचन मध्ये गेली.
आई चहा गाळत होत्या.
आई !
तुम्ही का उठलात!
मी केला असता ना चहा !
अग आज पहिला दिवस, काही सुचत नसेल तुला. मी समजू शकते ग , म्हणून तर उठले.
चहा घे !
डबा पण भरून ठेवला. तुला आवडतात तश्या बटाट्याच्या काचऱ्या केल्या आणि पोळ्या.
जातांना देवाला नमस्कार करून जा!
आजीला भेटून जाशील ग!
म्हातारे माणसं मनापासून आशिर्वाद देतात.
हो आई!
देवाला नमस्कार करून सासूबाईंच्या पाया पडली. आई येते मी!
कविता खरच ड्रेस मध्ये खूप छान दिसते.
Thank you आई म्हणून ती
आजीच्या रूम मध्ये गेली. आजी मी कविता!
उठलात का?
आज ऑफीसचा पहिला दिवस. नमस्कार करते.
तुझ्या क्षेत्रात खूप यशस्वी हो बेटा. माझे आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे.
आजी येते मी.
बाहेरून दारावर टकटक केली.
कोण ?
बाबा, मी कविता !
आत येऊ का?
ये! ये!
बाबा !
नमस्कार करते.
अरे आज तुझा पहिला दिवस नाही का?
अग आमचे आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे.
थांब आधी जरा पडदे बाजूला करतो.
रूम मध्ये लक्ख उजेड पडला. आपल्या सूनेकडे ऐकटक पाहात राहतात.
कविता ड्रेस मध्ये किती गोड दिसतेस?
बाहुलीच जणू!
बाबा तुमच्या मुळे!
आपल्या लेकीला सासरी किती बंधने आहेत हे माहीत असूनही आपल्या सुनेला इतकी मोकळीक देणारे क्वचित सापडतील.
अग त्यातला मी एक!
ते त्यांचे काम करतात, मी माझे.
खरय बाबा !
खरच खूप भाग्यवान मी!
काय ग!
श्रीरंग येतोय ना सोबत, का मी येऊ?
नाही बाबा, कोणीच नका येऊ. मी जाते.
बर.
किचन मध्ये येऊन डबा पाण्याची बाटली पर्स मध्ये ठेवली. पुन्हा देवाला हात जोडले, आई येते.
आई, बाबा, आजी आणि श्रीरंग अगदी बाहेर गेट पर्यंत सोडवायला आले.
बाबा सारखे मागून नीट चढशिल ग!
ओढणी बांधून घे!
दारात उभी राहू नको !
असे सल्ले देत होते.
अहो जाईल ती नीट, नका काळजी करू!
अनुसया ! पोरीने माझे स्वप्न पूर्ण केले.
मी काय म्हणतो, ड्रेस घातल्यावर ते ओढणी का काय म्हणतात ती सांभाळण जरा कठीण वाटते.
मग आता काय जीन्स घालायला सांगणार आहात की काय?
अगदी माझ्या मनातल बोलली.
काय?
हो अग !
तिला जीन्सच घेऊन देऊ.
छान सुटसुटीत पेहराव.
धन्य बाई तुमची.
माझ्याकडे नाही कधी इतकं लक्ष दिलं हो.
नाही कस!
अग तुला नऊवारीतून सहावारीत कोणी आणल?
हो की हो!
मी तर विसरूनच गेले.
त्या वेळी सगळ्या बायका नऊवारी नेसायच्या.
माहेरी मी लग्नाआधी साडी नेसायची. इकडे आल्यावर नऊवारी. मला खूप अवघडल्या सारखे व्हायचे.
मग तुम्ही बेडरूम मध्ये गेल्यावर साडी नेसायला लावायचे. सतत ते करून पण कंटाळा यायचा.
एक दिवस तुम्ही आईंना म्हणाले, आई अनुसयाला साडी आणली मी सहावारी . नेसली तर चालेल ना ग!
तशी तू चालवून घेशील खात्री आहे.
पण बाबा !
त्यांची खात्री नाही वाटत.
अरे दे तिला नेसायला!
मी बोलते बाबांशी. त्यांचे विचार इतके बुरसटलेले नाही. फक्त आमच्या हे लक्षात आले नाही इतकंच. आणि माझा साडीचा श्रीगणेशा झाला. खूप मायाळू माणसे लाभली मला. बाबा गेले तेव्हा शकु ताई पेक्षा मीच जास्त रडत होते. सगळेच विचारत होते, ही मुलगी वाटते.
मग कुणीतरी म्हणाले, नाही ही सून आहे.
सून ,इतकी रडते???
असे प्रश्नार्थक नजरेने सगळे माझ्याकडे पाहायचे.
आईंनी सुध्दा खूप प्रेम दिले. माहेरची उणीव भासू दिली नाही.
तोच वारसा आता आपण पुढे चालवायचा आहे अनुसया.
तेच अनुकरण कविता आणि श्रीरंग करतील.आपोआप घराचा स्वर्ग होतो.
खरय तुमचं.
कविता ऑफिस मधून घरी आली.
फ्रेश होऊन सासूबाईंना मदत करायला किचन मध्ये गेली.
दमलीस ना ग!
अनुसया बाई म्हणाल्या.
खरतर हो आई!
सवय होई पर्यंत होईल थोडा त्रास!
तु बस!
मी चहा करते.
आई जेवायला काय बनवू?
तु बस, हलके फुलके काम कर, पीठ मळून दे. मी करते बाकी.
आई दिवसभर आजीच्या मागे तुमची खूप दमझाक होते. तुम्ही आराम करा, मी बघते जेवणाचे. फक्त काय करू तेव्हढे सांगा?
भरली वांगी करायचा विचार होता. तुला आवडतात ना! आणि गोडाचा शिरा देवाला नैवेद्य.
आज तुझा ऑफीसचा पाहिला दिवस ना!
श्रीरंग नाही आले अजून. नाही अग!
कविता चहाचा घोट घेणार, आई ! म्हणून श्रीरंग ने आवाज दिला.
अग बाई !
आला वाटते ?
आई त्यांना यातलाच थोडा चहा देते. मी अजून घेतला नाही.
एक काम कर दोघांचाही घेऊन रूम मध्ये जा!
ये जरा वेळाने.
कविता चहा घेऊन रूम मध्ये आली.
श्रीरंगने तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकले.
मॅडम!
कसा गेला पहिला दिवस.
खूप छान!
सगळ्यांची ओळख, भेटीगाठी, कामाचे स्वरूप सगळे सांगून ती स्वयंपाक घरात आली.
शिरा करायला घेतला. पान वाढली. जेवण आटोपली.
कवितांने सकाळी डब्यासाठी भाजी निवडायला घेतली.
अनुसया ताई म्हणाल्या, अग डब्याचे माझ्या लक्षातच नाही बघ. हे दोघे उशिरा जातात तीच सवय.
दुपारी वेळ असतो मला तेव्हाच निवडून ठेवली असती.
आई!
अहो किती करणार?
घेऊ द्या थोडी जबाबदारी मलाही!
आण इकडे , पटपट मोडून देते गवार.
उद्या पासून दुपारीच निवडून ठवते डब्याच्या भाज्या.
सकाळी कविता उठली, स्वयंपाक घरात सासूबाई आधीच उठून तयार.
कविता तू चहा टाक!
तोवर मी भाजी फोडणी घालते आणि दोन पोळ्या लाटून देते पटापट.
देवा !
किती प्रेम करतात ही माणसे?
मला ही नाती जपायची कायम सद्बुद्धी दे!
दोघींनी चहा घेतला.
डबा भरून तयार होता. रोजच आई उठून डबा करत होत्या.
आता आता आजी खूपच आजारी झाल्या. आईंना वेळ पुरत नव्हता.
बाबा ! आईंची खूप धावपळ होते. तब्येत पण खालावली त्यांची. आपण कपडे , भांडी करायला बाई ठेऊ या का?
तुम्हाला चालत असेल तर रात्री पोळ्या करायला सुध्दा बाई ठेऊ या.
आई आजारी पडल्या तर मग घराची घडी विस्कटून जाईल.
अग करते मी हळुहळू!
बाबा ! खरच आईंना आरामाची गरज आहे.
बरोबर बोलते तू !
खालच्या देशमाने काकुकडे येते बाई!
बाबा मी आत्ताच विचारून येते.
रविवारी ती जरा उशीराच येते.
उषाबाई त्यांच्याकडे काम करतच होती.
कविता ने तिला विचारल्यावर
म्हणाली , ताई मला खरच कामाची गरज होती.
आठ दिवस झाले एक मोठं काम सुटल. सुटल नाही म्हणू शकत. त्यांची बदली झाली. म्हणून सुटल. मुलगा दहावीला आहे. त्याची फी, क्लास लावला त्याची फी. सगळी घडी विस्कटली. त्यात नवरा दारुड्या. काडीचा आधार नाही. उलट माझ्याच जवळचे घेऊन जातो.
उषाताई कधी येताय मग. ताई अगदी आत्ता पासून. देशमाने काकुंचे काम झाले. आता निघणारच होते.
चला मग !
कविता सोबतच बाईला घेऊन आली. उषाला कामाचा भारी उरक. पटपट भांडी घासली, कपडे धुतले, झाडू मारला, फरशी पुसली .तोवर जेवायची वेळ झाली.
आई पोळ्या करत होत्या, कविता वाढत होती.
ताई तुम्ही दोघी बसा गरम गरम जेवायला. मी करते पोळ्या. चार घरी पोळ्या करते मी.
अगदी मऊसूत पोळ्या करते. आवडेल तुम्हाला. नाही नाही म्हणत असताना आई जवळून पोळपाट, लाटणं घेऊन पोळ्या करायला सुरवात केली.
छानच केल्या पोळ्या. मग बाबाच म्हणाले, कविता हीलाच विचार रात्री जमेल का पोळ्या करायला?
हो काका !
जमेल मला ! साडेसात पर्यंत आले तर चालेल ना!
उत्तमच मग तर.
पोळ्या झाल्या, उषा म्हणाली येते कविता ताई!
काकु येते !
उषा अग गरम गरम पोळ्या नुसत्या खाऊ घालायच्या नसतात. खायच्या पण असतात. ताट घे, आणि चार घास खाऊन घे.
नाही काकु!
येते मी!
मुकाट्याने बस !
दोन घास खा, मगच जा.
ती जेवली . हातासरशी सगळी भांडी घासून घेतली. नको नको म्हणत असताना मग ओटा पुसून काढला.
आता आजीचे पण काम करत होती. आमच्याच घरातील एक होऊन गेली.
आजीची तब्बेत खूप खराब झाली. Admit करावे लागले. नवीनच जॉब फार सुट्ट्या मिळणे कठीण होते. आजी जवळ जवळ पंधरा दिवस admit होत्या.
घरी आल्यावर एक दिवस कवितांचा हात हातात घेतला. कविता सगळे संपले आता. आता फार नाही जगत.
पण तुझ्या पोटी जन्म नक्की बर का?
आजी अश्या नका ना बोलू!
तुम्हाला पणतू बघायचा आहे आहे ना !
नाही ग !
मलाच तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे.
दुसऱ्या दिवशी आजीला सकाळी सकाळी उठवायला गेल्यावर उठतच नव्हत्या. नाडी पाहिली, सगळे संपले होते.आजी आम्हाला सोडून गेल्या होत्या. तीन दिवस सुट्या घेऊन कविताला कामावर जावे लागले. उषाने घराची बरीच जबाबदारी घेतली. त्यामुळे सगळे निभावून जात होते. आजी गेल्या तोच महिना कविताला राहिला. सगळे म्हणत होते आजी येणार कविताच्या पोटी. तिची तीच इच्छा होती. नेमके कविताला डोहाळे सुध्दा आजीला आवडतात त्याच पदार्थाचे लागले. नऊ महिने सगळे सर्वतोपरी कविताची काळजी घेत होते. नववा लागला, तेव्हा सासरे म्हणाले, कविता पाहिले बाळंतपण माहेरी करतात. पण तुझ्या माहेरी इतक्या चांगल्या सुविधा नाहीत हॉस्पिटलच्या. मला वाटते तू इथे डिलिव्हरी करून भले मग पंधरा दिवसाने आईकडे जा. पण ही सक्ती नाही बाळा. माझे मत. अनुसयाचे पण हेच म्हणने पडते. तरी तुम्ही दोघे नवरा बायको मिळवून ठरवा. शेवटी बाळ तुमचे आहे. बाबा हे हो काय बोलता?
बाळ आमचे जरी असले तरी ते या घराण्याचा अंश आहे. त्यामुळे तुम्ही जो नर्णय घ्याल तो माझ्या भल्याचाच असणार आहे. मी इथेच करते डिलिव्हरी. आईंना सोबत म्हणून माझ्या आईला बोलवून घेते. नववा सरला, कविताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. स्वरा नाव ठेवले. आजी सारखीच दिसायला. गोरीपान, दाट केस, नाजूक जीवनी, आजीची एक खूण ती म्हणजे गालावर खळी. जन्मताच स्वरा हसली आणि गालावर खळी पडली. सर्व घर स्वराच्या येण्याने आनंदी झालं. आजी ,आजोबांना तर आपल्या नातीला कुठे ठेवू नी कुठे नको असे झाले होते. खरतर कविताला सुध्दा थोडे दिवस माहेरी जावेसे वाटत होते. पण सासू, सासरे आणि नवरा यांच्या प्रेमापुढे नेहमी कविताने माहेरी झुकते माप दिले.
स्वरा सहा महिन्याची झाली . कविताने office जॉईन केले. उषाबाई बाळाची मॉलिश, आणि वरची बरीच कामे करू लागली. दुपारी तीन ते सहा बाळाला सांभाळण्याची जबाबदारी पण उषाताई ने घेतली. तेवढाच आईंना आराम. स्वरा चार वर्षाची झाली. कविता ला पुन्हा दिवस गेले. मुलगा , मुलगी हा भेद नाही पण मुलगा व्हावा हीच सगळ्यांची इच्छा. कुटुंब पूर्ण, एक मुलगा ,एक मुलगी. दोन्ही हौस पूर्ण. मुलगाच झाला. घरात आनंदी वातावरण होते. आता आई पण थकत चालल्या होत्या. म्हणून उषा ताईंना दिवसभर कामासाठी ठेवून घेतले. नातीला शाळेत सोडायला आणि घ्यायला मात्र बाबाच जायचे. रिटायर्ड झाल्यावर ही जबाबदारी त्यांनी मुद्दाम घेतली. तेवढाच विरंगुळा. शाळा पण तशी घरापासून जवळच होती. यथावकाश मुलं मोठी झाली. कविताला दोन प्रमोशन मिळाले.
मुलांचे शिक्षण, लग्न आटोपले. मुलगी डायरेक्ट अमेरिकेला गेली लग्न करून. मुलगा इंजिनिअर झाला. प्रायव्हेट कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहे, सून पण नोकरी करते. सगळे खूप छान चालले होते. मुलीला एक मुलगा आणि मुलाला एक मुलगी. पतवंड पाहून आजी , आजोबा खुश होते. श्रीरंग रिटायर्ड झाले होते. त्यांनी घराची बरीच जबाबदारी स्वतःवर घेतली. आई, बाबा खूप थकेले होते. एक दिवस या जगाचा निरोप घेऊन आम्हाला पोरके करून गेले. कविताचे रिटायर्डमेंट झाले. नात अकरा वर्षांची झाली होती.
सगळे खूप छान चालले होते. अचानक एक दिवस पोटात खूप दुखायला लागले. डॉक्टर कडे गेलो. सोनोग्राफी केली. डॉक्टरांचे समाधान झाले नाही. लगेच MRI केला. पोटात गोळा आहे आणि तो बहुतेक कॅन्सर चा असावा असा डॉक्टरांनी अंदाज वर्तवला. टेस्टिंग ला पाठवले. डॉक्टरांचा अंदाज खरा ठरला. कॅन्सर निघाला. सगळे आतून हादरून गेले होते. ऑपरेशन करून गोळा काढला. त्यानंतर सुरू झाला तो वेदनादायक प्रवास. ज्याचे नाव काढले की धडकी भरते तो.
केमो !
डोक्यावर एक केस राहिले नाही. कविता ताईंपेक्षा जास्त वेदना श्रीरंग रावांना होतात असे चित्र होते ते. कविता ताई कणखर होत्या, पण श्रीरंग हा धक्का पचवू शकले नाही. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता मुलगा, सूनबाई आणि नात खूप हळवे झाले. मुलगी साता समुद्रापार जाऊन येऊन होती. जिथे राहत होते तिथे कविता ताईंना पोषक असे वातावरण नाही हे सुनेच्या लक्षात आले. ती सौरभला म्हणाली, सौरभ आता आईंना खूप बरे वाटते. त्या स्वतः हिंडूभिरू शकत नाही पण आपण शनिवार रविवार त्यांना बाहेर वॉकर वर बसवून फिरवून आणू शकतो.
अग पण इथे कस शक्य आहे. इथे लिफ्ट पण नाही. तेच.... म्हणून आपण दुसरा फ्लॅट घेऊ. जिथे लिफ्ट असेल शिवाय गार्डन , किंवा फिरायला मोकळी जागा असेल.
कल्पना खूप चांगली आहे. पण आई तयार होईल का?
अरे आईंना काही सांगायचे नाही. सगळे गुपचूप करू. पूजेच्या दिवशी डायरेक्ट surprise.
मी काल बघून पण आले. मोठ कॉम्प्लेक्स आहे. अठरा अठरा माळ्याच्या बिल्डिंग आहेत सात. जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल, इनडोअर गेम सगळे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हास्य क्लब. सगळ खूप छान आहे. आईंचे मन तिकडे नक्की रमेल.शिवाय माझ्या ऑफिस मधली एक मैत्रीण राहते तिकडे. तिच्या सासूबाई पण खूप छान आहेत स्वभावाने. सासरे वारलेत. हळूहळू आई बऱ्या झाल्या की मस्त एकमेकींकडे जातील , बाहेर फिरून येतील. आई या दुष्ट चक्रातून लवकर बाहेर पडतील. शैला तू तर खूप दूरचा विचार केला. खरच खूप चांगली कल्पना आहे. स्वराला सांगून निर्णय घेऊ. अर्थात तिलाही हे आवडेल. दुसऱ्या दिवशी स्वराला साईट वर जावून व्हिडिओ कॉल केला. तिला सुध्दा आपल्या वहिनीची कल्पना खूप आवडली. फ्लॅट जवळ जवळ तयारच होता. दोन , तीन महिन्यात पझेशन मिळणार होते. तिथेच फ्लॅटचे टोकण देऊन, आठच दिवसात सर्व फॉर्म्यालीटी पूर्ण करून agreement केले. नवीन घरी सगळ आईच्या सोईनुसार फर्निचर बनवले. घराचा ताबा मिळताच वास्तू पूजेचा अगदी घरातल्या घरात बेत आखला. उद्या वास्तू पूजा, सगळी तयारी करून शैला जरा उशीराच घरी आली. येताना जेवणाचे पार्सल घेवून आली. नेमकी आज उषा सुट्टीवर होती. कारण तिला नवीन घरी बरीच कामं करायला सांगितली होती.
शैला घरी येताच कविता ताई म्हणाल्या. शैला कालपासून खूप उशीर होतो तुला. मला मेलीला काही हातभार लावता येत नाही. लेकराची नुसती ओढाताण होते. फार वाईट वाटते. आई तुम्ही बऱ्या होत्या तेव्हा घराची जबाबदारी किती छान पार पाडली. मी अगदी बिनधास्त होते. तुम्ही लवकर बऱ्या होणार आणि पुन्हा सगळी जबाबदारी तुमच्यावर टाकून मी निश्चित होणार. आता तो दिवस नाही येणार ग. नकोसे झाले मला.
आई अस नाही बोलायचं. बघा आज उशीर झाला म्हणून मी तुमच्या आवडीचे पार्सल जेवण आणले. चला जेऊन घेऊ.
सौरभ आवर लवकर, मनु लवकर ये बाळा.शैलाने जेवण वाढले. सौरभ उद्या आपल्याला एका ठिकाणी वास्तू पूजेला जायचे आहे आणि त्यांची ईच्छा आहे की आईंना पण सोबत आणायचे.
नाही ह शैला मी कुठेही येणार नाही.
तुम्ही जा !
आई त्यांनी सांगितले तुझ्या सासुबाई येणार नसेल तर तू सुध्दा येऊ नको.
आई माझी खूप जवळची मैत्रीण आहे. तुम्ही ओळखता हो तिला. मंजुषा ! तुमच्या हातची पुरणपोळी खूप आवडते तिला. आठवले का?
हो आठवले ग!
पण मी नाही येत. तू तिला समजावून सांग ना !
आई थांबा तुम्हाला फोन लावून देते. तुम्हीच बोला. ती तयार असेल तर मला काहीच प्रोब्लेम नाही.
हॅलो मंजू !
हॅलो शैला !
मंजू! आई उद्या तुझ्याकडे वास्तू पूजेला यायला नाही म्हणतात. तूच बोल त्यांच्याशी.
काकू मी मजू !
काकू please तुम्ही उद्या नक्की या ना !
शैला आणि सौरभ आणेल तुम्हाला व्यवस्थित. Please काकू.
ठीक आहे ! बघते.
नाही, काकू मी वाट पाहते. तुम्ही नाही आलात तर शैला आणि सौरभला पण नका पाठवू.
बर बाई येते.
काकू तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
भेटू उद्या.
बाय काकू.
बाय !
फार हट्टी आहे ग ही मंजू !
अहो आई मी तिला किती सांगितले आईला नाही झेपणार हे सगळ. इतका वेळ बसणं . पण ती ऐकायला तयारच नाही. जाऊ या उद्या . सकाळी नऊला निघू.
अग इतक्या सकाळी. हो आई ! सुरवाती पासून शेवट पर्यंत तिला तुम्ही हव्या आहेत. बर, आई तुमच्यासाठी नवीन साडी आणली ब्लाऊज पण शिवून आणले. आई उद्या तीच साडी नेसा. नको वाटते ग आता हे सगळ. आई थोडा वेळ नेसा . सोबत एक साधी साडी घेते. पूजा झाल्यावर ती नेसा.
बर बाई!
तू आणि तुझी ती मैत्रीण दोघी ऐकायच्या नाही.
सकाळी शैला पाचलाच उठली. सगळ आवरून नवीन घरी पोहचले. उषा आणि तिच्या नवऱ्याने मिळून सर्व तयारी करून ठेवली होती. शैलाने बेल वाजवली तसा उषाने दरवाजा उघडला. अग उषा तू इथे काय करते? कविता ताई अहो मी कालपासून यांना मदत करते आहे. म्हणून तर घरी कामाला आले नाही.
अग बाई हो का?
शैला, सौरभ आणि मनु तिघे आत गेले. व्हील चेअर वर दारात कविता ताईंना बसवून, शैला ने आरतीचे ताट आणले आणि कविता ताईंना ओवाळले.
शैला काय हे?
अग तुझी मैत्रीण कुठे आहे?
काय नाव तिचे?
हं आठवले मंजू?
कुठे आहे ती?
तिच्या घराची पूजा आणि तू मला का ओवळत आहे ?
तेव्हढ्यात मंजू पुढे आली. आई मी पण आहे.
अग काय चालवलं तुम्ही आज.
सौरभ बाहेर आला. व्हील चेअर ढकलत आईंना आत घेऊन आला.
उषा, शैला, मंजू , उषाचा नवरा देवराम सगळ्यांनी कविता ताईंच्या अंगावर फुलांची उधळण केली.
शैला पुढे येऊन म्हणाली. आई ,आपल्या नवीन घरात तुमचे स्वागत आहे.
काय?
हो आई!
लगेच शैलाने स्वराला व्हिडिओ कॉल केला.
आई, स्वरा ताई . बोला त्यांच्याशी. स्वरा कशी आहेस ग!
आणि हे काय चाललय तुमचं?
आई खूप भाग्यवान आहेस तू शैला वहिनी सारखी सून मिळाली.
अग खरच मी खूप भाग्यवान आहेच. शैला सारखी सून, सौरभ सारखा मुलगा आणि मनस्वी सारखी नात मिळाली.
तुझ्या सारखी गोड मुलगी. सुरेशराव जावई आणि प्रतिक सारखा गुणी नातू मिळाला.
पण खर सांगू. लग्न झाले तेव्हाच माझा भाग्योदय झाला.
तुझे आजोबा, आजी आणि माझ्या आजेसासुबाई यांनी भरपूर माया दिली. माहेरचा विसर पडावा इतके प्रेम दिले. बाबा आईंना नेहमी म्हणायचे. अनुसया बाहेरून आलेल्या पोरीवर माय, बापा सारख प्रेम करायच घराचा स्वर्ग होतो. त्याचेच अनुकरण पुढची पिढी करते.
मग मी आणि तुझ्या बाबांनी तोच वसा पुढे चालवला. त्यामुळे शैला सारखी गुणी सून लाभली. तू सुध्दा चालव ग हा वसा.
हो आई !
तुला तर माझ्या सासुबाई किती प्रेमळ आहे ठावूक आहे. ठरवून पण त्याच्याशी कुणी वाईट नाही वागू शकत.
खरय ग ! त्या बाबतीत तू सुध्दा भाग्यवानच.
माझी मनस्वी सुध्दा असेच वागणार होना मनु.
हो आजी !
आज तुमचे बाबा असायला हवे होते.
श्रीरंगचा मोठा फोटो फ्रेम करून आणला होता. त्या समोर कविता ताईंना व्हील चेअरवर नेले. कविता ताई आश्चर्याने श्रीरंग च्या फोटो कडे बघत राहिल्या. डोळे आनंदाश्रूने ओसंडून वाहत होते.
अहो पाहिलत का? खूप नशीबवान हो आपण इतकी गुणी मुल आहेत आपली.
खूप घाई केली हो तुम्ही मला सोडून जायची. खरतर तुमच्या हळव्या मनाने तुमचा घात केला. फार हळवे तुम्ही. मला कॅन्सर झाला. पण आजारी तुम्ही झाले. शेवटचा निरोप घेतला. हे सुख बघायला खरच आज तुम्ही हवे होते हो !
आजकाल मुलांना आईवडील नकोत. वृध्दाश्रमात पाठवतात आपली मुलं आपल्या सुखासाठी धडपडतात. इतक मोठ घर होत आपल. पण फक्त माझ्या सोईचे नाही म्हणून ह्या घराचा विचार केला ते सुध्दा आपल्या सुनेने. खरतर सून हा शब्दच नको वाटते. आपल्या लेकीने. हो हेच बरोबर आहे. अस वातावरण प्रत्येक घरात असेल तर खरच प्रत्येक जण हेच म्हणेल
"सुख म्हणजे नक्की हेच असत?"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा