आमच्या घरामागे राहणार प्रमिलाबाई बाळंतीण सुनेचा डबा घेऊन दवाखान्यात निघाल्या होत्या. घरापासून वीस मिनिटांच्या अंतरावर दवाखाना. वाटेत त्यांना गल्लीतली दुसरी बाई भेटली आणि त्या तिच्याशी बोलू लागल्या. त्यांची सून बाळंतीण झाली आहे हे जवळपास अवघ्या गावाला माहित होतं. तरीही दोघींची प्रश्नोत्तरे सुरू झाली.
"काय झालं?"
"नॉर्मल झाली का डिलिव्हरी?"
"बरं झालं बया पहिल्याच वेळी मुलगा झाला."
अशा अंगाने सुरू झालेल्या गोष्टी पुढे, रात्री किती वाजता कळा सुरू झाल्या, मग गाडी कशी बोलावली, मग सोबत कोण कोण आलं, भेटायला कोण कोण आलं, बाळाचं वजन किती भरलं, बाळ कोणासारखं दिसतंय, बारसं कधी करणार, गल्लीतल्या कोण कोण बायका दवाखान्यात येऊन गेल्या, आजकाल डॉक्टर सगळंच खायला सांगतात, आमच्या वेळी असं नव्हतं बया.... अशा लांबलचक गप्पा सुरू झाल्या.
अर्धा तासाच्या जवळपास गप्पा मारल्यानंतर प्रमिलाबाई पुढे दवाखान्यात गेल्या. त्या गेल्या तोपर्यंत नाश्त्याची वेळ संपून डॉक्टरांचा राऊंड सुरू झाला होता. राऊंड होईपर्यंत त्यांना बाहेर थांबावे लागले. नंतर त्या आत गेल्या आणि सुनेजवळ डबा दिला, तोपर्यंत नाश्ता थंडगार होऊन गेला होता.
आमच्या गल्लीतल्या दोन वृद्ध महिला रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना थांबवून त्यांच्याशी तास तास बोलतात. जाणाऱ्या बायकांना बऱ्याच वेळेस घाई असते परंतु यांच्या वयाचा आणि मानाचा विचार करून बायका त्यांच्याशी थोड्या वेळ तरी बोलतात.
समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःच्या वेळेची किंमत समजत नाही. कामांची प्राथमिकता ठरवता येत नाही. काही बायका स्वयंपाक करताना शेजारीण आली तर हातातले काम टाकून बोलत बसतात. काही जण घरातली महत्त्वाची कामे टाकून फोनवर बोलत बसतात.
आपल्या मुलांचा अभ्यास, कुटुंबाशी संवाद, घरातली गरजेची कामे टाळून टीव्हीवरच्या सिरीयल बघणे, फोनवर तासनतास गप्पा मारणे युट्युबवरचे बकवास व्हिडिओ बघत बसणे, असे उद्योग करणारे लोक आयुष्यातला अत्यंत मौल्यवान वेळ वाया घालवत असतात.
घरातील मुलांचे पाढे पाठ करून घेणे, त्यांना अभ्यासाच्या ट्रिक्स शिकविणे, उद्या सकाळसाठी भाजी निवडून ठेवणे, कपड्यांना इस्त्री करून ठेवणे, टू व्हीलर स्वच्छ धुऊन पुसून ठेवणे, रुमालांच्या आणि कपड्यांच्या घड्या घालणे, घरातल्या एखाद्या कोपऱ्यातला पसारा आवरणे, आरसा कपाटे पुसून घेणे, वर्तमानपत्राची रद्दी जागेवर लावणे, एक्सपायरी झालेली औषधे फेकून देणे, महत्त्वाचे डॉक्युमेंट फायलिंग करून ठेवणे.... अशी शेकडो महत्त्वाची कामे मागे टाकून टाइमपास करणाऱ्या लोकांचे मला फार आश्चर्य वाटते.
फोनवर बोलतानासुद्धा समोरची व्यक्ती बोलत आहे ते मुद्दे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे ठरवता आले पाहिजे. फालतू चौकशा करणारा फोन दुसऱ्या मिनिटाला कापला पाहिजे. एखाद्याशी फोनवर बोलण्यापूर्वीच आपल्याला समोरच्या व्यक्तीशी ज्या मुद्द्यांवर बोलायचे आहे त्याचे नंबरिंग करून ठेवले पाहिजे. काय बोलायचं आहे हे मनात ठरवून ठेवलं पाहिजे.
असे बोलावे की एक अक्षरही जास्त जाता कामा नये. असे बोलावे की प्रत्येक शब्द समोरच्याला समजला पाहिजे. असे बोलावे की ऐकून समोरच्याचे समाधान झाले पाहिजे. असे बोलावे की ऐकणाऱ्याला आपल्या मर्यादा समजल्या पाहिजेत. असे बोलावे कोणीही अवास्तव मागणी करू शकणार नाही, असे बोलावे की एक क्षणही वाया जाणार नाही.
जेव्हा आपण काम आणि वेळेचे योग्य नियोजन करतो तेव्हा कामाला आपोआप वेग येतो आणि कामे भराभर पार पडतात. जुनी कामे रेंगाळत पडलेली नसल्यामुळे नवीन कामासाठी वेळ शिल्लक मिळतो आणि उत्साह वाटत राहतो. डोक्यात जुन्या कामांची गर्दी नसल्यामुळे नवीन कामे अधिक कल्पकतेने करता येतात.
परमेश्वराने दिलेल्या अमूल्य साधनसंपत्तीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ. तुम्ही त्याचा कसा उपयोग करता यावर आयुष्याचे यश किंवा अपयश अवलंबून राहणार आहे. तुमचा बुद्ध्यांक किती आहे, तुम्ही दिसायला कसे आहात, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमचे राहणीमान कसे आहे याहीपेक्षा तुम्ही वेळ कसा वापरता यावर आयुष्याचे यश जास्त अवलंबून असते.
कुणीही कुठेही भेटलं की वेळेचे भान न ठेवता वेड्यासारख्या गप्पा मारत बसायचं हे शहाणपणाचं लक्षण नाही. अनेक महिला आणि पुरुष रोज आपल्या नातेवाईकांना फोन करून प्रचंड बोलतात. एकच मुद्दा सतरा वेळा सांगत बसतात. यात कामाचे मुद्दे फार थोडे असतात. असल्या मूर्खपणामुळे आपण आपला आणि समोरच्याचा दोघांचाही वेळ वाया घालवत आहोत याचे त्यांना भान असते. शिवाय ज्यांच्या कानावर या गप्पा पडत आहेत त्यांचाही वेळ ते ऐकण्यात वाया जातो.
आपल्या आयुष्यात आपल्याला जे यश मिळतं त्या सगळ्याच्या पाठीमागे आपण केलेला वेळेचा सदुपयोग हे महत्त्वाचं कारण असतं. आपण ज्या प्रमाणात वेळेचा सदवापर करतो त्या प्रमाणात आपल्याला यश मिळतं. योग्य कामावर भरपूर वेळ खर्च केला पाहिजे आणि आउटपुट नसलेल्या कामाकडे सरळ दुर्लक्ष करता आलं पाहिजे.
माझी आई बसायला बोलायला कोणी बायका आल्या तर लोकरीचे विणकाम हातात घेऊन गप्पा मारायची. खेड्यातल्या काही महिला दळण किंवा भाजी निवडत गप्पा मारतात. यात एका वेळी दोन कामे साधतात. मी स्वतः कुणी आले तर हातात काहीतरी काम घेऊन बोलते. पोळ्या करताना फोनवर बोलणे उरकून टाकते. म्हणजे लिहिण्यासाठी निवांत वेळ मिळतो.
वेळ ही फार मौल्यवान संपत्ती आहे. ती गेली की पुन्हा मिळणे अशक्य. पैसा पुन्हा मिळू शकतो, आरोग्य आणि सन्मान पुन्हा मिळवता येते पण वेळ पुन्हा मिळवता येत नाही.
आपण स्वतःला एका वेळी दोन-तीन कामे करण्याची सवय लावू शकतो. बोलता बोलता साफसफाई करता येते, भाज्या किंवा धान्य निवडता येते, चेहऱ्याचे क्लिनिंग करता येते, कपड्यांच्या घड्या घालता येतात, मग रिकामे बसून का बोलायचे? संपूर्ण संसाराचे यश योग्य पद्धतीने विनिमय केलेल्या वेळात असते.
आपण कामासाठी घराबाहेर पडलेले असताना रस्त्यात भेटलेल्या कुणाशीही निवांत गप्पा मारत उभे राहणे हे चांगले लक्षण नव्हे. आपण ज्या कामासाठी घराबाहेर पडलो आहोत ते आधी लक्षात ठेवले पाहिजे. ते जास्त महत्त्वाचे आहे. समोरच्याला आपल्या कामाचे महत्त्व सांगून चटकन पुढे जाता आले पाहिजे.
नंतर मग पुढे जाऊन घाईगडबडीने आपली कामे उरकायची आणि कशातरीच भाज्या घेऊन घरी यायचे किंवा अर्धवट कामे करून घरी परतायचे हे सद्गृहस्थाचे लक्षण नव्हे. कामाचे क्युइंग करता आले पाहिजे. हातातले काम करत असताना हे संपल्यानंतर पुढे कोणती कामे आहेत त्याची डोक्यात रांग लावली पाहिजे. हे कौशल्य प्रत्येक क्षेत्रात अतिशय महत्त्वाचे आणि उपयोगी ठरते.
साँमरसेट मॉम नावाचा जगप्रसिद्ध लेखक त्याला सुचलेली कथानके किंवा कंटेंट एका डायरीत शॉर्टमध्ये लिहून ठेवायचा. नंतर फावल्या वेळात त्यावर सविस्तर लिहायचा. आपण दैनंदिन जीवनात आपले महत्त्वाचे कामे साध्या कागदावर लिहून तो कागद कपड्याच्या चिमट्याने कॅलेंडरला लावून ठेवला पाहिजे. असे केल्यामुळे कुठलेही काम विसरत नाही. कामाची प्राथमिकता लक्षात राहते.
आई आणि वडील दोघांनी आपल्या मुलांना वेळेचा सदुपयोग करायला शिकवले पाहिजे. कधी कधी पाहुणे आल्यानंतर मुले अभ्यास सोडून रिकाम्या गप्पा ऐकत बसतात, उद्याचा गृहपाठ सोडून टीव्ही पाहत बसतात, दैनंदिन अभ्यास सोडून पाहुण्यांशी बोलण्यात गरजेपेक्षा जास्त वेळ रमतात. हे योग्य नव्हे. मुलांना प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे.
तुम्ही जसा वेळ वापरणार आहात तसा वेळ तुम्हाला वापरणार आहे. आयुष्य सुख-समृद्धीत जगायचे असेल तर वेळाचे महत्त्व जाणले पाहिजे. वेळाचे महत्त्व जाणले तर पुढे येणारी वेळ तुमच्यासाठी सुख-समृद्धीची असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा