बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

2262. पालकांचा सन्मान

सुरेशराव निवृत्त झालेले. वयामुळे औषधं जास्त होती. एक दिवस ते हॉलमध्ये औषधं मांडून बसले होते. तेवढ्यात सून, स्वाती चिडून म्हणाली —
"बाबा, हे काय सगळं? हॉलमध्येच औषधाचा  पसारा लावलाय! पाहुणा आला तर काय म्हणेल? खोली  आहे ना तुमची तिथे बसत जा ?"
अचानक झोपेतून दचकून उठलेले सुरेशराव औषधं गोळा करू लागले. तेवढ्यात मुलगा अमित संतापून म्हणाला —
"स्वाती, कशी बोलतेस बाबांशी अस ? बाबा कुठेही बसले तरी चालेल!"
बापाच्या डोळ्यांत आनंद चमकला. मुलाच्या शब्दांनी थोड्यावेळापूर्वी सुनेने केलेला अपमान विसरला.
नंतर सुरेशरावांच्या पत्नी शारदा देवळावरून आल्या. नवऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून विचारलं —
"काय झालं? एवढं आनंदात का दिसताय?"
ते हसून म्हणाले —
"पालकांना काय हवं असतं? मुलांचं प्रेम आणि आदर. आज ते मिळालं."
काही दिवसांनी मात्र सत्य समोर आलं. शारदा जेव्हा मुलाच्या दारात गेल्या, तेव्हा अमित आणि स्वाती यांचं बोलणं ऐकून थबकल्या.
अमित म्हणत होता —
"पप्पा इथे असतील तर पेन्शनचे पैसे आपल्याकडे राहतात. वडिलांचा खर्च कितीसा असतो? बाकीचे पैसे आपल्या जीवनासाठी उपयोगी पडतात. मावसभाऊ विनोद सतत गावाला बोलावतो, पण जर बाबा तिकडे गेले तर आपलं ४० हजाराचं नुकसान होईल!"
स्वाती त्याला साथ देत होती —
"हो, ना सगळीकडे नुसते औषधं,  नुसता त्रास…माझ्या मैत्रिणी मोकळ्या राहतात. फक्त पैशांसाठी त्यांना  इथे ठेवावे लागते,नसते तर केव्हाच गावाला पाठवलं असतं."
हे ऐकून शारदाच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा पैशासाठीच त्यांना थांबवत होता!
त्या खोलीत शिरल्या आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या —
"अमित, आता ठरवलंय. बाबांची पेन्शन आम्ही वृद्धाश्रमाला दान करणार आहोत. ज्यांना गरज आहे त्यांना उपयोग होईल."
मुलगा घाबरून म्हणाला —
"आई, हे काय बोलतीये ? इतके पैसे दान करायचे म्हणजे आपल नुकसान आहे!"
शारदा डोळ्यातले पाणी आवरत म्हणाल्या —
"बाळा, तू आमच्यासाठी नाही, पैशांसाठी सहन करतोस हे मी ऐकलं. आम्ही तुला वाढवलं तेव्हा स्वतःच्या इच्छा मारल्या, पैसा पाहिला नाही. आज तुझ्या वागणुकीनं सगळं स्पष्ट झालं."
दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशराव आणि शारदा गावाला निघाले.
"आता आयुष्य कठीण जाईल, पण अपमान सहन करत राहायचं नाही. उरलेलं आयुष्य सन्मानाने जगायचं."
कार निघाली, मागे उभा राहून अमित रडत राहिला. पण पालकांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...