मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५

2209. मनकवडी..!

  तसा मी सुर्यवंशी...!
आठ वाजेपर्यंत बेडवर लोळत पडायच आणि बायकोनं आणलेला गरमगरम चहा घेऊनच उठायचं ही माझी दिवसाची ठरलेली सुरवात..!
पण रविवार असतानाही सकाळी बायकोच्या आधी लवकर जाग आली आणि झोप येईना म्हणुन मोबाईल घेऊन व्हॉटसअपवर स्टेटस बघायला  सुरुवात केली..
आपल्या नागपूरच्या दिव्या देशमुखनं महिला चेसचा विश्वचषक जिंकल्यामुळे   व्हॉटसपवर  तिचा आणि एकुणच भारतीय महिलांचा कौतुकाचा  वर्षाव चालला होता. महिलाच्या कौतुकाचे आणि शुभेच्छाचे ते मेसेज वाचता वाचता माझ्या मनातही बायकोवरच प्रेम उफाळून आलं. 
ठरवलं पहिला चहा आपण करायचा आणि तिला आज सरप्राइज द्यायचं....! मी उत्साहानं किचनमधे जाऊन चहाचं आधण ठेवलं आणि दुध घालुन पुन्हा  मोबाईलवरचे मेसेज वाचण्यात गढून गेलो..!
आणि जे नको ते झालंच..! 
मेसेजेसच्या नादात सगळा चहा खाली सांडुन गेला. चहाचं भांड, गॅसची शेगडी आणि अर्धा अधिक ओटा सांडलेल्या चहाच्या चित्रविचित्र  ओघोळांनी 
भरून गेला ...!!
नवरयानं पहिल्यांदाच चहा करून दिला याचं कौतुक ऐकणं तर लांबच राहिलं पण आता सकाळी सकाळी बायकोची 'रनींग कॉमेंट्री' ऐकावी लागणार होती..!
सकाळीच नको ती  'बोलणी' खायला नको आणि बायकोला समजायला नको म्हणुन   घाईघाईने गॅसची जाळी आणि ओटा घासुन पुसुन पुन्हा पुन्हा स्वच्छ केला आणि पुन्हा एकदा चहा करून  तिला हाक मारली...
"निलू डीअर..आज तुझ्यासाठी सरप्राईज आहे..! मुद्दाम तुझा आवडता प्युअर दुधातला चहा करून आणलाय..!
आणि सांगून ठेवतो आता दर रविवारी पहिला चहा मी करणार..!!"
तिनं बेडमधुनच आश्चर्यानं "बहुतेक ह्यांना आज बरं वाटतं नसावं!" अशा दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं आणि चहाचा कप हातात घेतला....
        दुपारी ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली " सकाळी सगळा चहा सांडला वाटतं.. मला कळलं ते...! कुणी सांगितलं होत  चहा करायला ?..मी करत होते ना.? नको तेंव्हा तुम्हाला  असला फार उत्साह येत असतो...!"
आणि सांडलेल्या चहापेक्षा आपण लपवलेली चुक बायकोला कळली कशी ह्याच गोष्टीचं मला जास्त अप्रुप वाटायला लागलं.
बाकी  अनेक बाबतीत बायकोला आधी कसं कळतं  हा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे.!
काहीजणांना ज्योतिषाच फार वेड असतं. माझ्या ओळखीच्या एक मॅडम आहेत. माझा ज्योतिषाचा थोडाफार अभ्यास असल्यामुळे त्या दर दोनचार दिवसांनी मला फोन करून काहीतरी सल्ला आणि प्रश्न विचारत असतात.(माझ्या पत्रिकेतील हा काही तरी कुयोग असावा!)
आणि हिला आधी कसं कळत कुणास ठाऊक, त्यांची रिंग वाजली की  बायको मोबाईल न उचलताच माझ्यावर डाफरते..."मनिषा मॅडमचा फोन आला वाटतं..! घ्या.. आणि बसा  बोलत आता तासभर"....
परवा भाजी आणायला मंडईला निघालो आणि बायकोनं 'कारलं' आणायला
बजावुन सांगितलं..आणि वयोमानाप्रमाणे कारल  (कारल्याचा कडूपणा तो हाच !)की तोंडल ह्या कन्फ्युजनमध्ये 'कारल' विसरून  मी घरी आलो !
आणि नेमका मोबाईल चार्जींग संपल्यामुळे घरी ठेवलेला..
घरी आल्या आल्या तिचं अंतरज्ञान प्रकट झालं " बहुतेक कारल विसरले असणार...आता सांगू नका मंडईत कारली नव्हती म्हणुन"......
एका रविवारी 'कटींग' करायला म्हणुन बाहेर पडलो आणि पाच सहा वर्षांपुर्वी शेजारी राहणारे ‌लोकरेकाका भेटले... मग काय शेजारच्या चहाच्या टपरीवर गेलो आणि तासभर गप्पा झोडल्या.! 
ते गेले आणि मला घरची आठवण झाली..! मनातल्या मनात  आता बायकोला उशीर झाल्याबद्दल काय सांगायचं ह्याच 'प्लॅनिंग' करायला लागलो. पण आपल्या भारताच्या 'बजेट'प्रमाणे माझंही प्लॅनिंग प्रत्यक्षात निरुपयोगी ठरत असतं..!  
"अहो, कितीवेळ वाट बघायची ? 
मी काही कारण सांगायच्या आत ती फणकारली " काहीं सांगु नका ! मला माहित आहे, कुणीतरी उपटसुंभ भेटला असेल आणि बसला असताल एखाद्या टपरीत जाऊन चहा ढोसतंं...."
आणि पुन्हा एकदा  तिला हे कसं कळलं  याचा विचार करत मी शरणागती पत्करली.....
पुन्हा अशीच एका रविवारची गोष्ट..!
सुट्टी असल्यामुळे दोन ब्रँचमधल्या स्टाफमध्ये क्रिकेटची फ्रेंडली मॅच ठेवली होती. पप्पा क्रिकेट खेळणार म्हटल्यावर
मुलानं हट्ट धरला आणि मीही उत्साहाच्या भरात पाचसहा हजार खर्चून स्पोर्टस शूज आणि  नवी ट्रॅक पँट घेऊन आलो..!!
मॅच झाली आणि पहिल्यांदाच भर उन्हात खेळल्यामुळे मी 
थकून भागून घरी  आलो होतो..
 अजून शूज पायातून काढतोय एवढ्यात सौभाग्यवतीच्या 'एक्सपर्ट' कॉमेंटस्.....
 " बहुतेक शुन्यावर 'रनआऊट' झाले असणार..! तरी मी म्हणत होते उगीच 
शुजबिजसाठी एवढे पैसे घालवू नका म्हणून..एवढ्यात माझ्या दोन चांगल्या साड्यांच्या आल्या असत्या..!!"
 आता मात्र मी चाट पडलो होतो..! खरोखरच मी शून्यावर रनआऊट झालो होतो आणि घरी बसून तिला हे कळलं होतं..! 
 "तुला कसं कळलं.? मी भांबावून विचारलं.. 
अहो त्यात काय..! परवा तुम्ही समोरच्या क्रिकेटर मनिषला 'क्रीज' कोठे असतं हे विचारताना मी ऐकलं होतं..
आणि ज्याला कुठपर्यंत पळायचं
आणि कुठं थांबायचं ते क्रिज माहीत नाही तो रनआऊट होणार नाही तर काय होणार..!!" 
(बोलताबोलता तिनं मला आयुष्याचं तत्वज्ञानही सांगून टाकलं होतं.!)
क्रिकेटच्या मैदानात 'रनआऊट' झालेला मी..
आता बायकोपुढे 'क्लीनबोल्ड' झालो होतो..!!
मग बायकोच्या ह्या 'मनकवडे'पणाचा माझं मन शोध घेऊ लागलं. एखादी दैवी शक्ती तर नाही ना असा एक पुसटसां विचारही डोक्यात येऊन गेला. 
आणि शेवटी माझ्या अंतर्मनानं मला त्याचं उत्तर दिलं.
ते उत्तर होतं प्रेमआणि फक्त प्रेम....!
     वर्षानुवर्षांच्या सहवासातुन जे  प्रेम अंतर्मनात दडुन बसलेलं असतं, ते अंतर्मन तिच्याही नकळत आपल्या आयुष्याच्या जोडीदाराशी, त्याच्या जीवनाशी एकरूप झालेलं असत, तादात्म्य पावलेलं  असतं आणि त्याचं एकरूपतेचं तादात्म्यतेचं प्रकटीकरण अशा प्रसंगातुन उत्स्फुर्तपणे होत असतं....
निस्सीम प्रेमाची ती एक अनोखी रंगछटा असते...!
समर्पित प्रेम भावनेचा तो एक प्रापंचिक आविष्कार असतो....
आणि म्हणुनच ती केवळ बायको, पत्नीचं नव्हे तर 'अर्धांगिनी'ही असते......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...