ही गोष्ट बिहारमधील एका गावातील आहे. तेथील एका कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्न जवळच्याच एका गावातील मुलीबरोबर जुळले होते. जशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली. तशी मुलीच्या वडिलांनी एक विचित्र अट घातली. ती अशी की “मुलाकडच्या लोकांनी लग्नाच्या वऱ्हाडा सोबत कोणाही वयस्कर व्यक्तींना बरोबर आणू नये. जर वयस्कर व्यक्ती वऱ्हाडा सोबत असतील, तर आम्ही आमच्या मुलीला त्यांच्याबरोबर पाठवणार नाही.”
ही अट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.लग्नासाठी केवळ दोन दिवस बाकी राहीले होते.जर ते लग्नासाठी गेले नाहीत, तर त्यांची, त्यांच्या गावात बदनामी झाली असती आणि समजा वऱ्हाडा सोबत वडिलधाऱ्यांना नेले आणि मुलीनेच लग्न करण्यासाठी नकार दिला, तर अजूनच जास्त बदनामी झाली असती. सगळेजण चिंतातूर झाले होते. सर्वजणं तीच चर्चा करत होते की, "मोठ्यांशिवाय कसले हे लग्न?"
पण आता त्यांच्यासमोर दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. शेवटी मुलाचे वडील जड अंत:करणाने म्हणाले,"की लग्नासाठी वऱ्हाड निघेल आणि तेही थोरामोठ्यांशिवय!"
घरातील सर्व वडीलधारी मंडळी या गोष्टीसाठी तयार झाली होती, पण मुलाचे काका त्यांच्या हट्टावर ठाम राहिले. ते म्हणाले की, "असे कसे ते म्हणू शकतात? लग्न आणि ते ही थोरामोठ्यांशिवाय? हे कसे होऊ शकते? मी तर लग्नाला जाणारच. बघू कोण अडवतं मला!" घरच्यांनी काकांची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले त्यांनी कुणाचेही ऐकले नाही.
शेवटी असे ठरले की,कपड्यांची गाठोडी करून त्यात त्यांना लपवून घेऊन जायचे.आणि त्यांना असे बजावण्यात आले, की ते कुणाच्याही नजरेस पडता कामा नयेत. सर्वांच्या सांगण्यावरून काकांनी मान्य केले, की ते कोणासमोर ही येणार नाहीत.
लग्नाच्या दिवशी वऱ्हाड मुलीच्या गावी पोहोचले. मुलीकडील सर्वांनी त्यांचे स्वागत केले,पण मुलीच्या वडिलांनी आणखी एक अट घातली. त्या गावाच्या बाहेरच एक नदी होती. मुलीचे वडील म्हणाले, "या नदीत पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा प्रवाह वाहून दाखवलात, तरच हे लग्न होईल आणि मग आम्ही आमच्या मुलीला सासरी पाठवू. अन्यथा हे लग्न होणार नाही. ही अट ऐकून सर्वच चक्रावून गेले. संपूर्ण नदीत दूध ओतणे,हे तर अशक्यच होते ! प्रत्येकजण काळजीत पडला.
सर्वांनी त्यांच्या खूप विनवण्या केल्या, त्यांना खूप समजावले, पण मुलीचे वडील आपल्या अटीवर ठाम राहिले आणि म्हणाले, “माझी अट पूर्ण केलीत, तरच हे लग्न होईल.”
हे तर अशक्य होते, म्हणून वऱ्हाडा बरोबर आलेल्या सर्व लोकांनी ठरवलं की, "चला, आता लग्नाचे वऱ्हाड घेऊन आपल्या गावी परत जाऊ.कारण आपण ही अट पूर्ण करू शकत नाही." ही गोष्ट बैलगाडीत लपलेल्या काकांच्या कानावर पडली, तेंव्हा ते बाहेर आले आणि म्हणाले, "काय झाले? आपण वऱ्हाड पुन्हा माघारी का घेऊन जात आहोत! हे आपल्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे."
तेवढ्यात काकांना कोणीतरी सांगितले की, "मुलीच्या वडिलांनी आणखी एक अट घातली आहे की, "जर त्यांनी नदीच्या प्रवाहात पाण्याऐवजीं दुधाचा प्रवाह वाहून दाखवला तरच हे लग्न होईल आणि तसे झाले तरच ते त्यांच्या मुलीला पाठवतील." आता तुम्हीच सांगा काका, की नदीत दुधाचा प्रवाह वाहून दाखविणे शक्य आहे का ! म्हणून आम्ही वऱ्हाड घेऊन आपल्या गावी परत जात आहोत.”
हे ऐकून काका म्हणाले, "बस इतकीशी गोष्ट ! इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही वऱ्हाडाला घेऊन पुन्हा गावी जात आहात? जा त्यांना सांगा, की आम्ही या नदीत पाण्याऐवजी दुधाचा प्रवाह वाहून दाखवण्यास तयार आहोत. पण त्या आधी या नदीतील सर्व पाणी बाहेर काढा व नदीचे पात्र रिकामं करा.
हे ऐकून तिथे उभे असलेले सर्व लोक खूप आनंदित झाले. ही गोष्ट आधी कुणाच्याही लक्षात आली नव्हती. सर्वांना खूप आनंद झाला. दोन वऱ्हाडी, मुलीच्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले, "आम्हाला तुमची अट मान्य आहे, आम्ही नदीत दुधाचा प्रवाह वाहून दाखवू शकतो, पण त्या आधी नदीचे पात्र पूर्णपणे रिकामे करा."
हे ऐकताच मुलीचे वडील पटकन म्हणाले," की नक्कीच तुम्ही वऱ्हाडा बरोबर एखाद्या वयस्कर व्यक्तीला आणले असेल!"
आणि मग मुलीचे वडील हसून म्हणाले," की हे लग्न नक्की होणार आणि तेही सर्व थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने!"
तेव्हां कोणीतरी मुलीच्या वडिलांना विचारले," की मग तुम्ही या अटी का ठेवल्यात?"
तेंव्हा मुलीचे वडील म्हणाले की,"मला आजकालच्या तरुणांना एवढाच धडा द्यायचा होता की, आधुनिकतेच्या शर्यतीत ते इतके पुढे गेले आहेत, की आपल्या थोरामोठ्यांचे व आई वडिलांचे प्रेम आणि त्यांच्या अनुभवाला ते निरुपयोगी मानू लागले आहेत. आज त्यांना कळले असेल, की जर आज काका वऱ्हाडा सोबत आले नसते तर काय झाले असते !”
कथा इथे संपते पणं ही कथा आपणां सर्वांना एका गहन प्रश्नावर विचार करण्यास भाग पाडते. ज्या गतीने आपण जीवनात वाटचाल करत आहोत, ज्या वेगाने आपण धावत आहोत, तेव्हां आपण कुठेतरी तणावाच्या आणि एकाकीपणाच्या वर्तुळात गिरक्या घेत आहोत. याचे कारण आपल्या वडिलधाऱ्यांची सावली आपल्यापासून दूर होत चालली आहे का. का आपल्यात आणि वडीलधाऱ्यांमध्ये खोल दरी निर्माण झाली आहे? मग या दरीला आपण कसं पार करायचं?
-----🙏🙏🙏🙏------
प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा