शंकर स्कॅालरशिपची परीक्षा संपवून घरी आला. लहानसं तोंड करून त्यानं टोपलीत भाजी भरायला सुरूवात केली. त्याची आई कमलाबाई त्याच्या बहिणीच्या, राणीच्या, वेण्या घालत होती पण एका क्षणात शंकरचं काहीतरी बिनसलय हे तिच्या लक्षात आलं. शहरात भाजी विकायला शंकर व राणी आई बरोबर जात असतं. आईनं शंकरचा चेहरा बघून त्याला विचारलं, “काय रं...काय जालं?”
शंकर म्हणाला, “आई परीक्षा सोपी नव्हती. बाकीची मुलं बाहेरचे क्लास लावून खूप अभ्यास करतात. त्यांना सोपी गेली असेल. मी काय नंबरात येईन असं वाटत नाही ग.” त्यानं शर्टाच्या बाहीने डोळे पुसले.
कमलाबाईनं डोक्यावर घेतलेली भाजीची टोपली खाली ठेवली. त्याच्या केसातून हात फिरवला.
“शंकर,भाजीपाल्यातलं तुला जेवडं कळतय तेवढं तुज्या मित्रांना कळतय का रं? तू काम करून अब्यास करतुयास. मला त्याचं जास्त कवतिक हाय बघ. तू परयत्न केलास नव्हं, मंग त्येच नंबरात येनं हाय.
शंकऱ्या, रडायला शंबर कारनं मिळतील.. हसायची कारनं शोध रं.. ही हिरवीगार भाजी पिकवणं, ह्ये काम करणारे हात पाय, आणि हे शानं डोकं तुजं..होय क नाई?” ती खळखळून हसली..
आईचं मोकळं हसणं त्याला फार आवडायचं. तिचे शब्द ऐकून शंकरला हुरूप आला. “होय आई, मी वर्गात लक्ष देतो. कळलं नाही तर विचारतो आणि मी वेळ मिळेल तेव्हा खूप अभ्यास केला आई पण कमी पडला वाटतं.” त्या निरागस चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा बघून तिला भरून आलं. राणीला काय झालं समजत नव्हतं पण दादाला रडताना बघून ती पण रडू लागली.
भाजी विकून झाल्यावर आईनं त्याला तिथल्या लक्ष्मी हॅाटेलात नेलं व दोघांना त्यांची आवडती मिसळ खाऊ घातली.
गुलाबजाम पण घेतले व म्हणाली,”शंकऱ्या, हे तुजं बक्षिस त्या कसल्याशा परीक्षेला बसल्याबद्दल. तुज्या परयत्नाचं. बाकी काय बी म्हत्वाचं न्हाई बघ.” शंकरचा व राणीचा चेहरा गुलाबजाम खाताना खूप आनंदला होता.
त्याची स्कॅालरशिप चार मार्कात हुकली पण गुरूजी म्हणाले,” शंकर, तू अभ्यास करत रहा..मला खात्री आहे..तू पुढच्या अनेक परीक्षांमधे नंबरात येशील.”
शंकरला बरं वाटलं. स्कॅालरशिप मिळालेल्या मुलांच्या सत्काराला त्यानं मनापासून टाळ्या वाजवल्या. “दुसऱ्याचं भलं होऊदे म्हणणं लई म्हत्वाचं” सांगणारी आई आठवून त्यांनं त्या मुलांचं चांगलं होवो अशी प्रार्थना पण केली.
एक दिवस शंकरचे बाबा खुषीत घरी आले. मालकानं पगार वाढवला होता. वडील आईला साडी, शंकरला शर्ट, त्याच्या धाकट्या बहिणीला, राणीला, परकर पोलकं घेऊन आले. “शंकऱ्या, मालकांकडं त्यांची मुलं ही बुकं वाचित होती. मी वैनीना इचारून तुज्यासाठी घेऊन आलो.”
बाबांनी “श्यामची आई” हे साने गुरूजींचे पुस्तक व संत ज्ञानेश्वर ही दोन पुस्तके शंकरला दिली. शंकर ती पुस्तकं वाचून हळवा झाला पण खूप काही शिकला. त्याने शेजारी राहणाऱ्या मुलांना एकत्र केलं व त्यांनाही ती पुस्तकं वाचून दाखवली. “श्यामची आई” वाचून दाखवताना त्याचे डोळे भरून येतं. ..,देवाला वाहायला फुले तोडू नयेत म्हणून कळ्या तोडणाऱ्या श्यामला “श्याम अशा मुक्या कळ्या तोडू नयेत, त्यांना नीट फुलू द्याव” वाचताना शंकरला वाटे हेच तर माझी आई पण मला पण शिकवते.
त्यानंतर शंकरला वाचनाचं वेड लागलं. गुरूजी त्याला अनेक मराठी व इंग्रजी पुस्तकं वाचायला देत. त्या पुस्तकांनी शंकरवर खूप संस्कार केले. शाळेचा अभ्यास, वाचन, भाजी विकणं यात शंकर मोठा होत होता.
आता शंकर व राणीच्या मदतीनं घरी भरपूर भाजी निघत असे.
कामानं दमून गेलेली आई पदरानं चेहरा पुसत म्हणे, “शंकऱ्या, त्यो भाजी लावल्येला कोपरा कसा नटल्यावानी दिसतोय बग. जणू हिरवी साडी नेसलिया धरनी..लाल पिवळ्या फुलाचे दागिने घालून..
“होय आई.. लई छान दिसतय.” शंकर म्हणाला.
“अरं, तू का आमची भाषा बोलतोस? शाळंत शिकीवलेलं बोल की” आई म्हणाली. आई हुशार होती.
“बरं आई .. खूप छान दिसतय” शंकर म्हणाला.
त्या महिन्यात एक दूरची गोदूमावशी आईला भेटायला आली होती. तिचा नवरा सहा महिन्यापूर्वी वारला होता म्हणून ती एकटी पडली होती. पदरात दोन मुलं होती. शंकरला मावशी
बद्दल खूप वाईट वाटलं.. आई तिला सांगत होती, “गोदाक्का तू इथं ये रहायला. भाजी विकायला बस. जी चटणी भाकर मिळलं ती अर्धी अर्धी वाटून खाऊ. आमचा शंकऱ्या लई हुशार हाय आणि राणी बी हुशार हाय. तुज्या मुलांना ते शिकिवतील शाळेतलं. लेकरांना शिकवायचं बघ.”
गोदूमावशीला ते पटलं.. ती तिथं रहायला आली. राणी एक दिवस रडत आईला म्हणाली, “आई काय ग ..सगळं त्या दोघांना वाटून देताना आमालाच पुरत नाही की!”
आई म्हणाली,” असुदे गं. त्या लेकरांनी कुटं जावं सांग. जे हाये तेच वाटून घ्यायाचं. करावं जमतय तेवडं. शानी माजी राणी!”
शंकर दहावी, बारावी मधे उत्तम मार्क मिळवून कॅालेजात गेला. उत्तम मार्क मिळवत कॅालेजच्या परीक्षा पार पाडत होता. विद्यापीठाने इंग्रजी साठी ठेवलेले गोल्ड मेडलही त्याला मिळाले. त्याच्या कॅालेजनं, शाळेनं त्याचा सत्कार केला. वर्तमानपत्रात नाव आले..तिथून पुढे डॅाक्टरेट संपवून तो इंग्रजीचा प्रोफेसर झाला. प्रथम त्यानं आई वडिलांचे घर उत्तम प्रकारे डागडूजी करून दिलं. राणी पण आता त्याच शाळेत शिकवू लागली होती. ती आई बाबांना अधून मधून मुंबईला दादाकडे घेऊन येत असे.
शंकर कॅालेजमधे एमरसन ची Success ही कविता शिकवत होता. कवितेतील बारकावे शिकवताना त्याचं सगळं लहानपण त्याला डोळ्यापुढे दिसत होतं.
What is Success? तो वाचत होता..
By Ralph Waldo Emerson
To laugh often..
To earn the appreciation..of the best..
….to find the best in others..
To leave the world bit better..by a healthy child.. a garden patch
…
To know even one life has breathed easier because you have lived
…
This is to have succeeded…
त्याच्या अशिक्षित आई बाबांनी आयुष्यभर त्याला एमरसनचं तत्वज्ञानचं शिकवलं होतं. गोदाक्का सारख्या एकीचेच नाही तर अनेक बाया बापड्यांचे डोळे त्यांनी पुसले होते. त्यांना हसायला शिकवलं होतं.. अंगणातला एक कोपरा भाज्या लावून सुंदर बनवला होता..पिक उगवणं म्हणजे आनंद उगवणं म्हणणारी माझी जगावेगळी आई ..मालकिण बाईंकडून माहिती काढून त्याच्यासाठी पुस्तकं आणणारे बाबा..त्यांच्या संस्कारानं त्याच्या आयुष्याला अर्थ आला होता..
आणि..
एमरसनच्याही पुढे जाऊन आई बाबांनी मुलांना शिकवलं होतं ..मनापासून प्रयत्न करणं म्हणजे यश! त्यानंतर रिझल्ट काय येतो हा विचार न करणं म्हणजे सुध्दा यशच! ..तेच तो आज विद्यार्थ्यांना शिकवत होता.
शंकरनी त्याचा सोनेरी काड्यांचा चष्मा काढून डोळे पुसले..
क्लास संपला होता..मुलं भारावून वर्गातून बाहेर पडत होती..
त्यानं वर्तमानपत्रासाठी कॅालम लिहायला घेतला..
What is Success? ..
“अमेरिकेत ऐश्वर्यात जन्मलेल्या आणि जगप्रसिध्द हारवर्ड विद्यापीठात शिकलेल्या राल्फ वाल्डो एमरसननं सांगितलेली यशाची व्याख्या जेव्हा माझे अशिक्षित आई बाबा मला शिकवतात त्याला खरं यश म्हणायचं!
श्यामच्या आईनं त्याला दिलेल्या संस्कारांना यश म्हणायचं!
भाजी विकता विकता मुंबई मधील प्रसिध्द कॅालेजमधे इंग्रजी शिकवायची संधी लाभणे याला यश म्हणायचं!
….
आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी दुसऱ्याला देण्याची ईच्छा असण्याला यश म्हणायचं !
….
दुसऱ्याच्या यशासाठी टाळ्या वाजवण्यालाही यशच म्हणायचं !
असं यश देशाच्या कानाकोपऱ्यातून राहणाऱ्या माझ्या बंधु व भगिनींना मिळो “
त्याने लेख संपवला. वर्तमानपत्राला पाठवला.
आई-बाबांना कळावे म्हणून प्रत्येक इंग्रजी लेखाचे मराठी भाषांतर करून तो त्यांना वाचून दाखवण्यास घाईने घरी जाण्यास निघाला.
©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा