मी फार जगावेगळी आहे असं मुळीच नाही. कारण बऱ्याचदा हातातल्या फोनवर रिल्स बघत बसण्याचा मोह मलाही होतो,एका नंतर एक रिल्स बघण्यात किती वेळ गेला हे लक्षातही येत नाही.
सध्याच्या काळात रिल्स चा मारा होतोय. मनाचा आणि मेंदूचा विचार करता सतत किंवा बराच वेळ रिल्स बघत बसणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे यावर लिहावसं वाटलं.
रिल्स बहुदा हलक्याफुलक्या आणि मनोरंजक असतात,झटपट रेसिपी बघणं सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे सध्या तरी रिल्स कडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा नकारात्मक नाही,माझाही नाही कारण झटपट शिकणं,वेळ वाचवणं या दृष्टीने अनेक दर्जेदार विषय सुद्धा या रिल्समध्ये असतात जे मी मान्य करते आहे पण,
आपलं मन एखाद्या लहान मुलासारखं आहे आणि कल्पना करा की एखाद्या लहान मुलाला दु:खी केलं मग पुढच्या मिनिटाला हसवलं मग त्याच्या पुढच्या मिनिटाला एखाद्या समस्येवर विचार करायला लावला मग पुढे एखाद्या रेसिपी बद्दल सांगितलं आणि त्याच्यात ती खाण्याची इच्छा निर्माण केली गेली,पुढे नृत्य दाखवलं.
तर त्याचं काय होईल,हे जवळपास वेड लागणंच म्हणता येईल.
कहर म्हणजे लहान मुलं सुद्धा रिल्स बघत असतात,
एका क्षणी हसायचं,
पुढच्या क्षणी रडायचं,
त्याच्या पुढच्या क्षणी एखाद्या गहन मुद्द्यावर विचार करायचा,
नंतर थोडसं घाबरायचं,
किती भावना आपण क्षणाक्षणाला बदलतोय आपणच आपल्या मनाचं संतुलन अक्षरशः ढासळवतोय.
याचे सूक्ष्म परिणाम म्हणजे,
सतत अस्वस्थ वाटणं,
भावभावनांमध्ये तारतम्य नसणं,
चिडचीड,
आयुष्यात शिस्त नसणं,
कुठेही एकाग्र होता न येणं,
कशाचाही लवकर कंटाळा येणं,
कोणत्याही परिस्थितीचा सारासार विचार करता न येणं,
आणि
विवेक गमावणं!
हे सगळे दुष्परिणाम आहेत आणि भविष्यात याचे आणखी गंभीर परिणाम दिसणार आहेत.
म्हणजे अगदी एखादा घातक ऑनलाईन गेम खेळणं जितकं हानिकारक आहे तितकंच रिल्स बघत सुटणं आहे.
कंटेंट तयार करणारे क्रिएटर्स त्यांचं काम करत असतात प्रश्न हा आहे की,आपलं मन आपण कसं सांभाळणार आहोत?
मनोरंजनाला माझा मुळीच विरोध नाही किंवा रिल्सच्या माध्यमातून कमी वेळात आपण काही महत्त्वाचा विचार किंवा चांगल्या गोष्टी शिकू यावरही माझा विश्वास आहे.
प्रश्न हा आहे की,
यात असणारं #वैविध्य आपल्या मनाला झेपतंय का?आणि स्विच ऑन स्विच ऑफ करणं जमतंय का?
अनेक विषय अनेक भावना क्षणाक्षणाला बदलत असतात आपलं मन यात थकून जातं मन आणि मेंदू इतक्या वैविध्याला (उत्क्रांतीचा विचार करता)सरावलेला नाही,त्याला इतक्या वैविध्याची सवय सुद्धा नाही.
त्याची एक लयबध्द शिस्त आणि गती आहे,त्याची एक सायकल आहे आणि ती डिस्टर्ब करणाऱ्या नवनवीन गोष्टी दररोज आपणच देतोय.
कॉमन सेन्स बाळगावा लागेल,यावर सध्या तरी तात्पुरता उपाय मला हा सुचलेला आहे की,
समजा मला एखाद्या क्रिएटरची एखादी रील आवडली मी बघितली तर मी त्याच्या प्रोफाईलवर जाईन आणि त्याच्याच रिल्स बघत बसेन.
यानं काय होईल? तर मी विषय सोडणार नाही आणि थोड्या रिल्स बघून माझं समाधान सुद्धा होईल.
पण मी Jump करत रहाणार नाही म्हणजे इकडून तिकडे उडी मारणार नाही माझ्या मनाला एकाच विषयाबद्दल थोडाफार कंटेंट पाहिल्याचं समाधान मिळेल.
वेळ असेल तर आणखी दोन-तीन विषय/ क्रिएटर्स निवडेन आणि त्या प्रकारांमध्ये रिल्स बघत बसेन.
दुसरा उपाय मला हा सुचलेला आहे की, रिल्स बघताना कुठेही बसायचं नाही, म्हणजे उभं राहायचं शेवटी आपण किती वेळ उभं राहणार?उभ्या उभ्या किती वेळ बघणार?आपोआप आपण थांबू,बसून किंवा झोपून स्क्रोल करत रहायचं नाही.
हातात फोन घेतल्यावर फोन मध्ये एक अलार्म सुद्धा लावता येईल,दहा मिनिटांचा किंवा पाच मिनिटांचा अलार्म वाजताच फोन थांबवायचा आहे,फोन बघणं थांबवायचं आहे हे लक्षात येईल.
सर्वात महत्त्वाचा एक उपाय म्हणजे आत्मपरिक्षण,आपल्या दिवसभरातल्या रिकाम्या जागा शोधा जिथे आपण आपसूक फोनकडे वळतो.
मनाचे असे ट्रिगर्स शोधा जे आपल्याला फोनवर रिल्स बघत बसायला भाग पडतात.
उदा.एकटं वाटणं,कंटाळा येणं,राग येणं, खूप काम पेंडिंग असणं,त्याचा ताण येणं.
प्रत्येकाचे वेगवेगळे ट्रिगर्स असतात आपले ट्रिगर शोधा आणि त्यावर उपाय करा,मूळ समस्या भावनिक आहे आपण पळतोय किंवा उत्तरं रिल्स बघण्यात शोधतोय हे आपल्या लक्षात येईल.
विषय बराच मोठा आहे पण याविषयी जागरूकता मात्र निर्माण झाली पाहिजे, कारण रिल्स बघणारे आजूबाजूला खूप वाढत चाललेले आहेत.(अगदी घरात सुद्धा!कधीकधी मी सुध्दा !) म्हणून लिहावीशी वाटली पोस्ट.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा