जोशीकाकूंना आठ दिवस गावाला जायचं असेल, तर त्याची तयारी एक महिना आधी सुरू व्हायची आणि सतराशेसाठ सूचना वासंतीला पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागायच्या.
किती वेळा जुनी यादी रद्द होऊन नवी यादी करावी लागायची आणि या व्यापाला वासंतीशिवाय कुणी त्यांच्या समोर नसायचं. या वेळी तर जोशीकाकू गणपतीला एक महिन्यासाठी गावाला जाणार होत्या.
शेजार पाजारचे वासंतीला म्हणायचे, “तू कशी सहन करतेस?”
‘कशी सहन करते?’ याचं उत्तर, ‘हसतमुखानं सहन करते’ हे ती स्वतः कृतीतून सिद्ध करत होती… पण ‘का सहन करते?’ याचं उत्तर सोळा सतरा वर्षात तिलाच धड कळलं नव्हतं.
कितीदा काम सोडावसं वाटायचं. किती वेळा, ‘मी उद्यापासून येणार नाही’, हे वाक्य तिनं निकरानं ओठातून परतवलं होतं.
काकूंच्या काटेकोरपणाला आणि सततच्या सुचनांना त्यांचा मुलगाही कंटाळला होता आणि नोकरीच्या निमित्तानं पुण्याला पसार झाला होता. सूनबाई फोनवरूनच खैरीयत विचारायची. नातवंड तर आजीच्या वाऱ्यालाही उभी रहायची नाहीत. शेजारी तर दारं लावून बसल्यासारखे असायचे.
पण जोशीकाकूंना कश्शानं फरक पडायचा नाही. त्यांचा दिवस योगासनानं सुरू व्हायचा आणि गीतेच्या एका अध्यायाचं वाचन करून संपायचा.
गणपतीसाठी गावाला जायचं निश्चित झालं आणि आधी एक महिना वासंतीला तारीख सांगितली गेली. मग वासंतीला कळलं, आता महिनाभर सुचनांसाठी पंधरा मिनिटं रोज वेगळी काढून ठेवायला हवीत.
त्यात गणपतीची तयारी गावाला जाऊन करायची ठरली, तरी त्या ‘तयारी’ची तयारी त्या इथूनच घेऊन जाणार होत्या… कारण मुलगा त्यांच्या शब्दाला मान देऊन गणपतीच्या दिवशी उगवणार होता. सुनेनं तेवढंही महत्त्व दिलं नव्हतं. त्यातून मुलगा वेळेत नाही पोहोचला, तर पूजा स्वतः करायचीही जोशीकाकूंची तयारी होती.
दिवाळीची झाडलोट परवडली पण ही गणपतीला गावाला जायची तयारी नको…! वासंती मनातून कावून जायची पण उत्साहापुढं जोशीकाकूंच्या ते लक्षातच यायचं नाही.
गाडी बुक केली की कपाटावरून दोन बॅग्ज काढायला लावायच्या. मग त्या स्वतः डेटॉल वापरून त्या पुसून दिवसभर उन्हात ठेवायच्या. त्यात दोन तास पुढल्या दारात आणि पुढचे तीन तास मागल्या दारात नेऊन ठेवायला लावायच्या. त्यातही सूचना असायच्याच… ‘जरा उजवीकडे ठेव, मागं ठेव, पुढं सरकव, मागं सरकव…’ वासंती निमूटपणे ते अमलात आणायची.
मग गावाला न्यायची पांघरूणं काढायची. ती रीठ्याच्या पाण्यानं धुवायची. नीट वाळवायची. मग त्या बॅग भरणार. बॅग स्वतः भरत असल्या तरी सूचना वासंतीलाच ऐकाव्या लागायच्या.
असं मजल दरमजल करत गावाला जायच्या आधीचा दिवस उगवायचा, तेव्हा वासंतीची खरी परीक्षा असायची… कारण त्या दिवशी फ्रीज बंद केला जायचा. त्या निमित्तानं तो स्वच्छ केला जायचा आणि त्यासाठी तो रिकामा केला जायचा. अर्थात बरेचसे जिन्नस, बरेचसे पदार्थ वासंतीलाच दिले जायचे… पण त्यासाठी भरमसाठ सुचनांचा भडीमार वासंतीला झेलावा लागायचा.
रामदासांनी संसार नेटका कसा करायचा याबद्दल जे विश्लेषण दासबोधात मांडलंय, त्याच्या दूप्पट जोशीकाकूंकडे ते अलिखीत स्वरूपात आहे आणि ते फक्त वासंतीलाच ऐकावं लागतं!
पिशव्या किती आण? कशा आण? डबे किती आण? दूध नेशील, त्याचा विनियोग कसा कर? भाजीपाला त्या संपवायचा प्रयत्न करायच्या पण फ्रिज बंद करतांना काहीतरी हाताशी लागायचंच…
टॉमेटो, मिरच्या, पनीर, ताक, दही, पावभाजीचा मसाला, हे असे जिन्नस जोशी काकूंना हळवे करून टाकायचे. त्याप्रमाणात सूचना असायच्या.
लोणची, मोरंबा, गुळांबा, असे पदार्थ दीर्घकाळ टिकू शकतात म्हणून ते काकूंच्या करड्या नजरेतून सुटायचे.
सापडायची ती वासंती.
‘किती पिशव्या आणल्यास?’ ‘ही कशाला आणलीस?’ ‘डोशाचं पीठ देणार होते, सांगितलं होतं ना?’ ‘कांदे कशात घेशील?’ ‘तुझ्यासाठीच घेतले होते.’ ‘माझ्याकडून पिशवी मिळणार नाही हं!’ ‘आणि दिली तर नीट धुवून आणावी लागेल…’
दरवेळचा हा प्रसंग जशाच्या तसा घडायचा. पण यावेळी त्यात भर पडली म्हणजे, सांगितलेली वेळ टळूनही गेली होती आणि अजून ती आली नव्हती.
सूचना करत एक एक पदार्थ काढायचा म्हणजे सफिशियंट वेळ लागायचा. घाई करून चालायची नाही. त्यापुढे फ्रीज पुसून काढायचा आणि मग बंद करायचा. बसल्या बसल्या त्या पदार्थ फ्रीज मधून काढायला उतावळ्या होत होत्या, ‘ही पण मला कंटाळली की काय?’ अशा शंकेनं जास्त बेचैन होत होत्या.
थोडी थोडकी नाही, सतरा वर्ष वासंती त्याच्या तालमीत तयार झाली होती. ‘उद्याच्या उद्या ये आणि तुझा पगार घेऊन जा… मग तू मोकळी आणि मी मोकळी!’ हा डॉयलॉग मारून सुध्दा दशक उलटलं होतं. छोटी मोठी कुरबुर झाली तरी तसा दोघीत छान संवाद होता…
‘मग आज यायला एवढा उशीर का केलाय? किंवा का उशीर झाला? निदान फोन तरी करायचा ना, मी काय खाणार होते? भजन मंडळात सुध्दा बायका बोलायला लागल्या होत्या तुमची वासंती तुमच्या तालमीत अगदी छान तयार झालीय… पण त्यामुळे ती आम्हाला झेपत नाही…’
जोशीकाकूंनी विचार थोपविण्यासाठी फ्रीजपाशी घुटमळणं थांबवलं आणि मन शांत करण्यासाठी त्या बाल्कनीचं दार उघडून बाहेर येऊन बसल्या. नुकती पावसाची मोठी सर बरसून गेली होती. ‘उद्या प्रवासात पाऊस नाही लागला म्हणजे मिळवली’, असं म्हणत त्यांनी चिंब भिजलेल्या बागेकडे पाहिलं.
…आणि बघतात तर तगरीच्या झाडाखाली वासंती मुटकूळं करून बसलेली! सोबत पिशव्या नव्हत्या, डबे नव्हते,
पण भरलेली पिशवी होती.
तिला असं बघून जोशीकाकूंच पाणी पाणी झालं. त्या़ंच्या नकळत त्या तिच्याकडे धावल्या आणि वासंती बोलायला लागल्यावर तर त्या हतबुद्धच झाल्या.
फ्रीज रिकामा करायचा म्हणून वासंती येणार होती… पण दुपारीच तिच्या सुनेनं तिला फर्मावलं, “माझ्या माहेरचे लोक गणपती बघायला चार दिवस यायचे आहेत… म्हणून तेवढे दिवस मुलीकडे जा.”
पण मुलीकडे तिची नणंद बाळंतपणासाठी आली होती. त्यात मुलीकडे सुध्दा अकरा दिवसांचा गणपती! कोणत्या तोंडानं तिच्या दोन खोल्यात ‘येऊ का’ विचारणार?
वासंती ला नको नको झालं होतं… नवरा गेल्यावर भाडेपावती थेट मुलाच्या नावावर फाडली जाऊ लागली आणि वासंतीला आज जोशीकाकूंच्या बागेत तगरी खाली बसायची वेळ आली.
काटेकोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोशीकाकूंनी आपला गावाला जायचा बेत पुढे ढकलला. पार्थीव मूर्तीसाठीच जायचंय ना? त्याची तयारी तो करून घेईल… पण या माझ्या सोबतीणीची सोय मला आधी बघायला हवी.
…आणि अचानक जोशीकाकूंनी एक काम तातडीनं पार पाडलं ते म्हणजे, वकीलाला गाठून आपलं मृत्यूपत्र तयार केलं… तेव्हाही सतराशे साठ सुचना होत्याच… पण वकील तरबेज होता आणि त्यांचाच विद्यार्थी होता. त्यामुळं अगदी स्पष्ट आणि पध्दतशीर मृत्यूपत्र तयार झालं.
आपल्या पश्चात सगळी मालमत्ता मुलाच्या नावावर करताना काकूंनी ही महत्त्वाची अट घातली… ‘मी असेन-नसेन… पण वासंती हयात असेपर्यंत तिची जबाबदारी संपूर्णपणे मी घेतेय. त्यामुळे ती या घरात मानानं आणि आनंदानं राहील’, याची जबाबदारी मुलगा या नात्यानं मुलालाही घ्यायला सांगितली.
गजाननला श्रध्देनं मखरात बसवायच्या आधी जोशीकाकूंनी वासंतीला घरात हक्काचं स्थान दिलं.
आपण जोशीकाकूंना का सहन करतो, याचं उत्तर मला वाटतं, वासंतीला मनोमन मिळालं. जोशीकाकू गणपतीला गावाला जायचा बेत रद्द करायला तयार असताना वासंतीनं जाण्याचा आग्रह धरला आणि जोशीकाकूंच्या सतराशे साठ सुचनांसह ती तयारीला लागली.
- चंद्रशेखर गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा